१ शमुवेल ११:१-१५
११ नंतर अम्मोनी लोकांचा+ राजा नाहाश, गिलादमधल्या याबेश शहराविरुद्ध+ लढण्यासाठी आपलं सैन्य घेऊन आला. आणि त्याने शहराजवळ छावणी दिली. तेव्हा याबेशची सगळी माणसं नाहाशला म्हणाली: “आमच्यासोबत करार कर, मग आम्ही तुझी सेवा करू.”
२ त्यावर अम्मोनी लोकांचा राजा नाहाश त्यांना म्हणाला: “मी तुमच्यासोबत करार करीन, पण एका अटीवर. ती म्हणजे: मी तुमच्यापैकी प्रत्येकाचा उजवा डोळा फोडून टाकीन. सगळ्या इस्राएलची निंदा करायला मी असं करीन.”
३ तेव्हा याबेशचे वडीलजन त्याला म्हणाले: “आम्हाला सात दिवसांची मुदत दे. म्हणजे आम्ही इस्राएलच्या सर्व प्रदेशांत दूतांच्या हातून निरोप पाठवू. आणि जर आम्हाला वाचवायला कोणी आलं नाही, तर मग आम्ही स्वतःला तुझ्या हवाली करू.”
४ मग निरोप घेऊन जाणारे दूत शौल राहत असलेल्या गिबा+ शहरात आले. त्यांनी ही गोष्ट तिथल्या लोकांना सांगितली, तेव्हा ते सगळे मोठमोठ्याने रडू लागले.
५ त्या वेळी शौल गुरांच्या मागोमाग शेतातून येत होता. त्याने विचारलं: “काय झालं? लोक का रडत आहेत?” तेव्हा त्यांनी त्याला याबेशच्या माणसांचा निरोप सांगितला.
६ तो निरोप ऐकताच शौलवर देवाची पवित्र शक्ती* जोरदारपणे कार्य करू लागली,+ आणि तो रागाने पेटून उठला.
७ त्याने बैलांची एक जोडी घेऊन त्यांचे तुकडे-तुकडे केले आणि ते इस्राएलच्या सगळ्या प्रदेशांत दूतांच्या हातून पाठवले. त्यासोबत त्याने असा निरोप पाठवला: “जो कोणी शौल आणि शमुवेलच्या मागे येणार नाही, त्याच्या गुराढोरांसोबत असंच केलं जाईल!” तेव्हा सगळ्या लोकांना यहोवाची भीती वाटली आणि ते सगळे एक होऊन युद्धासाठी आले.
८ शौलने बेजेक इथे त्यांची संख्या मोजली, तेव्हा इस्राएलची ३,००,००० माणसं आणि यहूदाची ३०,००० माणसं असल्याचं त्याच्या लक्षात आलं.
९ मग शौल आणि त्याचे सैनिक निरोप घेऊन आलेल्या दूतांना म्हणाले: “गिलादमधल्या याबेशच्या माणसांना सांगा: ‘उद्या दुपारपर्यंत तुम्हाला वाचवलं जाईल.’” दूतांनी हा संदेश याबेशच्या माणसांना येऊन सांगितला, तेव्हा त्यांना अतिशय आनंद झाला.
१० मग याबेशची माणसं अम्मोनी लोकांना म्हणाली: “उद्या आम्ही स्वतःला तुमच्या हवाली करू. मग आमच्या बाबतीत तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा.”+
११ दुसऱ्या दिवशी शौलने सैनिकांच्या तीन तुकड्या केल्या. मग सकाळच्या प्रहरी* त्यांनी अम्मोनी लोकांच्या छावणीत+ घुसून त्यांच्यावर हल्ला केला. ते दुपारपर्यंत अम्मोनी लोकांची कत्तल करत राहिले. जे त्यांच्या हातून निसटले त्यांची अशी पांगापांग झाली, की त्यांच्यातली दोन माणसंही एकत्र राहिली नाहीत.
१२ मग लोक शमुवेलला म्हणाले: “कोण म्हणत होतं, की ‘शौल काय आमच्यावर राज्य करणार?’+ त्यांना आमच्या हवाली करा. आम्ही त्यांना मारून टाकू.”
१३ पण शौल म्हणाला: “आजच्या दिवशी कोणाचाही जीव घ्यायचा नाही.+ कारण आज यहोवाने इस्राएलला वाचवलंय.”
१४ शमुवेल नंतर लोकांना म्हणाला: “चला, आपण गिलगालला+ जाऊ आणि शौल राजा आहे याची पुन्हा घोषणा करू.”+
१५ म्हणून सगळे लोक गिलगालला गेले. तिथे त्यांनी यहोवासमोर शौलला राजा बनवलं आणि यहोवाला शांती-अर्पणं दिली.+ त्यानंतर शौल आणि इस्राएलच्या सगळ्या माणसांनी आनंदोत्सव केला.+