१ शमुवेल १३:१-२३

  • शौल सैनिकांना निवडतो (१-४)

  • शौल आपली मर्यादा ओलांडतो (५-९)

  • शमुवेल शौलला फटकारतो (१०-१४)

  • इस्राएलकडे युद्धाची शस्त्रं नव्हती (१५-२३)

१३  शौल राजा बनला तेव्हा तो . . .* वर्षांचा होता.+ त्याने दोन वर्षं इस्राएलवर राज्य केलं. २  शौलने इस्राएलमधून ३,००० पुरुष निवडले आणि बाकीच्यांना आपापल्या घरी पाठवून दिलं. निवडलेल्या ३,००० पुरुषांपैकी २,००० पुरुष शौलसोबत मिखमाशमध्ये आणि बेथेलच्या डोंगराळ प्रदेशात होते; तर १,००० पुरुष योनाथानसोबत+ बन्यामीन लोकांच्या प्रदेशातल्या गिबा+ इथे होते. ३  योनाथानने गेबामधल्या+ पलिष्टी+ सैनिकांच्या चौकीवर हल्ला करून ती जिंकली. ही गोष्ट पलिष्टी लोकांच्या कानावर आली, तेव्हा शौलने संपूर्ण देशात रणशिंग फुंकून+ अशी घोषणा करायला लावली: “इब्री लोकांनो, ऐका!” ४  सगळ्या इस्राएलने ही बातमी ऐकली, की “शौलने पलिष्टी सैनिकांची चौकी जिंकली आहे, आणि पलिष्टी लोक आता इस्राएलचा द्वेष करू लागले आहेत.” त्यामुळे सगळ्या लोकांना गिलगाल+ इथे शौलकडे एकत्र जमण्याची आज्ञा देण्यात आली. ५  इकडे, पलिष्टी लोकसुद्धा इस्राएलविरुद्ध लढाई करायला एकत्र जमले. त्यांच्याकडे ३०,००० युद्धाचे रथ आणि ६,००० घोडेस्वार होते. तसंच, त्यांच्या पायदळ सैनिकांची संख्या समुद्रकिनाऱ्‍यावरच्या वाळूइतकी अगणित होती.+ पलिष्टी सैनिकांनी बेथ-आवेनच्या+ पूर्वेकडे जाऊन वर मिखमाशमध्ये छावणी दिली. ६  इस्राएली लोकांच्या लक्षात आलं, की आपल्यावर आता फार मोठं संकट कोसळलं आहे. आपण अडचणीत सापडलो आहोत हे पाहून ते फार घाबरले आणि गुहांत, खड्ड्यांत, खडकांत, भुयारांत आणि कोरड्या विहिरींत जाऊन लपले.+ ७  काही इब्री माणसं तर यार्देन नदी ओलांडून गाद आणि गिलादच्या+ प्रदेशांत पळाली. शौल मात्र गिलगालमध्येच थांबला. त्याच्यासोबत असलेले सर्व लोक भीतीने थरथर कापत होते. ८  शमुवेलने ठरवून दिलेल्या वेळेप्रमाणे शौल सात दिवस त्याची वाट पाहत राहिला. पण शमुवेल काही गिलगालला आला नाही. आणि लोकसुद्धा शौलला सोडून जाऊ लागले. ९  म्हणून शेवटी शौल म्हणाला: “होमार्पण आणि शांती-अर्पणं माझ्याकडे घेऊन या.” आणि त्याने स्वतःच ते होमार्पण वाहिलं.+ १०  शौलने होमार्पण देण्याचं आटोपलं इतक्यात शमुवेल तिथे आला. म्हणून शौल त्याला भेटायला आणि त्याचं स्वागत करायला गेला. ११  तेव्हा शमुवेल त्याला म्हणाला: “तू हे काय केलंस?” त्यावर शौल म्हणाला: “मी पाहिलं, की लोक मला सोडून चाललेत,+ आणि तुम्हीसुद्धा ठरलेल्या वेळेत आला नाहीत. शिवाय, पलिष्टी लोक मिखमाशमध्ये जमा व्हायला लागले होते.+ १२  त्यामुळे मी विचार केला: ‘आता पलिष्टी लोक खाली गिलगालमध्ये येतील आणि माझ्यावर हल्ला करतील. आणि मी तर अजून आशीर्वादासाठी* यहोवाला प्रार्थनासुद्धा केलेली नाही.’ आणि म्हणून होमार्पण करणं मला भाग पडलं.” १३  तेव्हा शमुवेल शौलला म्हणाला: “तू अतिशय मूर्खपणे वागलास. तुझ्या देवाने, यहोवाने तुला जी आज्ञा दिली होती ती तू पाळली नाहीस.+ तू ती पाळली असतीस, तर यहोवाने इस्राएलवर तुझं राज्य कायम ठेवलं असतं. १४  पण आता तुझं राज्य टिकणार नाही.+ यहोवा आपल्यासाठी असा एक माणूस शोधेल जो त्याच्या मनासारखा असेल.+ आणि यहोवा त्याला आपल्या लोकांचं नेतृत्व करण्यासाठी नेमेल.+ कारण तू यहोवाची आज्ञा पाळली नाहीस.”+ १५  मग शमुवेल गिलगालहून निघाला आणि बन्यामिनी लोकांच्या प्रदेशातल्या गिबामध्ये गेला. शौलने मग उरलेल्या लोकांची संख्या मोजली, तेव्हा आपल्यासोबत अजूनही जवळजवळ ६०० माणसं आहेत असं त्याला दिसलं.+ १६  शौल, त्याचा मुलगा योनाथान आणि त्याच्यासोबत राहिलेले लोक बन्यामीनच्या गेबामध्ये+ होते. आणि पलिष्टी लोकांची छावणी मिखमाशमध्ये होती.+ १७  पलिष्टी सैनिकांच्या छावणीतून लूटमार करणाऱ्‍या तीन टोळ्या निघायच्या. एक टोळी, अफ्राला जाणाऱ्‍या रस्त्याने शुवाल प्रदेशाकडे जायची; १८  दुसरी टोळी, बेथ-होरोनच्या+ रस्त्याने जायची; तर तिसरी टोळी, सबोईम खोऱ्‍यासमोर असलेल्या सीमेकडे जाणाऱ्‍या रस्त्याने जायची; सबोईम खोरं हे ओसाड रानाजवळ होतं. १९  त्या काळात, संपूर्ण इस्राएल देशात धातूकाम करणारा एकही नव्हता. कारण, “इब्री लोकांना तलवार किंवा भाला बनवता येऊ नये,” असं पलिष्टी लोकांचं म्हणणं होतं. २०  त्यामुळे सगळ्या इस्राएली लोकांना आपली कुदळ, फाळ,* कुऱ्‍हाड आणि विळा या अवजारांना धार लावण्यासाठी पलिष्ट्यांकडे जावं लागायचं. २१  फाळ, कुदळ, तीन टोकांचं अवजार, कुऱ्‍हाड यांना धार लावायची किंमत आणि पराणी* बसवायची किंमत एक पिम* असायची. २२  त्यामुळे युद्धाच्या वेळी, शौल आणि योनाथान यांच्यासोबत असलेल्या एकाही माणसाकडे तलवार किंवा भाला नसायचा.+ फक्‍त शौल आणि योनाथान यांच्याकडेच युद्धाची शस्त्रं असायची. २३  इकडे, पलिष्टी सैनिकांची एक तुकडी* मिखमाशच्या+ खिंडीकडे गेली.

तळटीपा

मूळ हिब्रू लिखाणात संख्या दिलेली नाही.
किंवा “कृपेसाठी.”
नांगराचं लोखंडी पातं.
प्राचीन काळातलं एक वजन, सुमारे दोन तृतीयांश शेकेल.
किंवा “चौकी.”