१ शमुवेल १५:१-३५

  • शौल अगागला जिवंत ठेवून आज्ञा मोडतो (१-९)

  • शमुवेल शौलला फटकारतो (१०-२३)

    • “बलिदानापेक्षा आज्ञा पाळणं चांगलं” (२२)

  • शौलचं राज्यपद काढून घेण्यात येतं (२४-२९)

  • शमुवेल अगागला ठार मारतो (३०-३५)

१५  मग शमुवेल शौलला म्हणाला: “यहोवाने त्याच्या इस्राएली लोकांचा राजा म्हणून तुझा अभिषेक करायला मला पाठवलं होतं.+ आता यहोवाचं काय म्हणणं आहे ते ऐक.+ २  सैन्यांचा देव यहोवा म्हणतो: ‘इस्राएली लोक इजिप्तमधून निघून येत होते, तेव्हा रस्त्यात अमालेकी लोकांनी त्यांचा विरोध केला. त्याबद्दल आता मी त्यांच्याकडून हिशोब घेईन.+ ३  तर आता जा, आणि अमालेकी लोकांवर हल्ला कर.+ त्यांचा आणि त्यांचं जे काही आहे त्या सगळ्याचा पूर्णपणे नाश करून टाक.+ त्यांना मुळीच दयामाया दाखवू नकोस.* स्त्री, पुरुष, लहान मूल, तान्हं बाळ, तसंच बैल, मेंढरं, उंट, गाढवं+ अशा सगळ्यांना मारून टाक.’”+ ४  म्हणून शौलने लोकांना बोलावून घेतलं आणि तलाईम इथे त्यांची संख्या मोजली. तेव्हा २,००,००० पायदळ सैनिक आणि यहूदा वंशातली १०,००० माणसं असल्याचं दिसून आलं.+ ५  मग शौल अमालेकी लोकांच्या शहरापर्यंत गेला आणि तिथे खोऱ्‍यात त्याने आपल्या सैनिकांना हल्ला करायला लपवून बसवलं. ६  शौल केनी+ लोकांना म्हणाला: “अमालेकी लोकांमधून निघून जा. म्हणजे त्यांच्यासोबत मी तुमचा नाश करणार नाही.+ कारण, इस्राएली लोक इजिप्तमधून बाहेर आले तेव्हा तुम्ही त्यांना दया दाखवली आणि त्यांच्याशी प्रेमाने वागलात.”+ म्हणून मग केनी लोक अमालेकी लोकांमधून निघून गेले. ७  त्यानंतर शौल हवीलापासून+ इजिप्तजवळ असलेल्या शूरपर्यंत+ अमालेकी लोकांना ठार मारत गेला.+ ८  त्याने अमालेकी लोकांचा राजा अगाग+ याला जिवंत पकडलं. पण बाकीच्या सगळ्या लोकांना त्याने तलवारीने मारलं आणि त्यांचा नाश केला.+ ९  शौल आणि त्याच्या लोकांनी अगागला जिवंत ठेवलं.* शिवाय अमालेकी लोकांची चांगली-चांगली मेंढरं, बकऱ्‍या, गुरंढोरं, धष्टपुष्ट पशू, एडके आणि जे काही उत्तम होतं ते सगळं त्यांनी राखून ठेवलं.+ त्यांचा नाश करायची त्यांची इच्छा नव्हती. पण जे काही निरुपयोगी आणि टाकाऊ होतं त्या सगळ्याचा त्यांनी नाश केला. १०  मग यहोवा शमुवेलला म्हणाला: ११  “मी शौलला राजा बनवलं या गोष्टीचं मला खूप दुःख होतंय.* त्याने माझ्याकडे पाठ फिरवली आणि मी दिलेल्या आज्ञा त्याने पाळल्या नाहीत.”+ हे ऐकून शमुवेलला फार वाईट वाटलं आणि तो रात्रभर यहोवाला कळकळून प्रार्थना करत राहिला.+ १२  मग शमुवेल सकाळीच उठून शौलला भेटायला गेला. तेव्हा त्याला असं सांगण्यात आलं: “शौल कर्मेलला+ गेला होता, आणि तिथे त्याने स्वतःसाठी विजयाचा एक स्मारकस्तंभ उभारला आहे.+ तिथून तो आता गिलगालला गेलाय.” १३  शेवटी शमुवेल शौलकडे आला तेव्हा शौल त्याला म्हणाला: “यहोवाचा आशीर्वाद तुमच्यावर असो. यहोवाने मला जे सांगितलं होतं ते मी केलं.” १४  पण शमुवेल त्याला म्हणाला: “मग मला हा मेढरांचा आणि गुराढोरांचा आवाज का ऐकू येतोय?”+ १५  त्यावर शौल म्हणाला: “इस्राएली लोकांनी अमालेक्यांकडून ती आणली आहेत. तुमचा देव यहोवा याच्यासाठी बलिदान द्यायला लोकांनी कळपातली सगळ्यात चांगली मेंढरं आणि गुरंढोरं जिवंत ठेवलीत.* पण बाकी सगळ्यांचा आम्ही नाश करून टाकलाय.” १६  तेव्हा शमुवेल शौलला म्हणाला: “बस्स कर! काल रात्री यहोवा मला काय म्हणाला ते मी तुला सांगतो.”+ त्यावर शौल म्हणाला: “बोला!” १७  शमुवेल पुढे म्हणाला: “यहोवाने जेव्हा तुला इस्राएलच्या वंशांवर प्रमुख नेमलं होतं आणि इस्राएलचा राजा म्हणून तुझा अभिषेक केला होता,+ तेव्हा तू स्वतःला इतरांपेक्षा कमी समजत नव्हतास का?+ १८  यहोवाने नंतर तुला एका मोहिमेवर पाठवलं आणि सांगितलं: ‘जा, आणि त्या पापी अमालेकी लोकांचा नाश कर.+ त्यांचा पूर्णपणे नायनाट होत नाही तोपर्यंत त्यांच्याशी लढ.’+ १९  मग तू यहोवाची आज्ञा का पाळली नाहीस? उलट तू लोभीपणे लुटीवर तुटून पडलास+ आणि यहोवाच्या नजरेत जे वाईट ते तू केलंस!” २०  पण शौल शमुवेलला म्हणाला: “मी तर यहोवाची आज्ञा पाळली! यहोवाने मला ज्या मोहिमेवर पाठवलं होतं त्या मोहिमेवर मी गेलो. मी अमालेकी लोकांचा राजा अगाग याला घेऊन आलो आणि अमालेकी लोकांचा नाश केला.+ २१  पण ज्या जनावरांचा नाश करायचा होता त्यातली काही चांगली मेंढरं आणि गुरंढोरं लोक घेऊन आले. म्हणजे गिलगालमध्ये तुमचा देव यहोवा याला ती बलिदान म्हणून अर्पण करता येतील.”+ २२  तेव्हा शमुवेल म्हणाला: “यहोवाची आज्ञा पाळल्याने यहोवाला जितका आनंद होतो, तितका होमार्पणांनी आणि बलिदानांनी होतो का?+ पाहा! बलिदानापेक्षा आज्ञा पाळणं चांगलं,+ आणि एडक्यांच्या चरबीपेक्षा ऐकणं चांगलं.+ २३  कारण, बंड करणं+ हे शकुन पाहण्याइतकं गंभीर पाप आहे.+ आणि आपली मर्यादा ओलांडणं हे जादूटोणा आणि मूर्तिपूजा* करण्यासारखं आहे. तू यहोवाची आज्ञा मोडलीस,+ त्यामुळे त्याने आता तुला राजा म्हणून नाकारलंय.”+ २४  तेव्हा शौल शमुवेलला म्हणाला: “मी पाप केलंय. मी यहोवाची आज्ञा मोडली आणि तुमच्या सांगण्याप्रमाणे केलं नाही. कारण मी लोकांना घाबरलो आणि त्यांचं म्हणणं ऐकलं. २५  आता कृपा करून माझ्या पापाची क्षमा करा आणि माझ्यासोबत चला, म्हणजे मी यहोवाला दंडवत घालीन.”+ २६  पण शमुवेल त्याला म्हणाला: “मी तुझ्यासोबत येणार नाही. तू यहोवाची आज्ञा मोडलीस, त्यामुळे यहोवाने तुला नाकारलंय आणि इस्राएलवर तू राज्य करणार नाहीस.”+ २७  शमुवेल जाण्यासाठी वळला तेव्हा शौलने त्याच्या बिनबाह्‍यांच्या झग्याची किनार धरली, आणि तो झगा फाटला. २८  तेव्हा शमुवेल त्याला म्हणाला: “तू जसा हा झगा फाडलास, तसंच यहोवासुद्धा इस्राएलवरचं तुझं राज्यपद तुझ्यापासून काढून घेईल.* आणि ते अशा एका माणसाला देईल जो तुझ्यापेक्षा चांगला आहे.+ २९  इस्राएलचा वैभवशाली देव+ खोटा ठरणार नाही,+ किंवा तो आपलं मन बदलणार नाही.* कारण मन बदलायला* तो काही माणूस नाही.”+ ३०  तेव्हा शौल म्हणाला: “मी पाप केलंय, पण तरी मी तुम्हाला विनंती करतो, की माझ्या लोकांच्या वडीलजनांसमोर आणि इस्राएलसमोर कृपा करून माझा मान राखा. माझ्यासोबत चला, आणि मी तुमचा देव यहोवा याला दंडवत घालीन.”+ ३१  म्हणून शमुवेल शौलसोबत गेला. आणि शौलने यहोवाला दंडवत घातला. ३२  मग शमुवेल म्हणाला: “अमालेकी लोकांचा राजा अगाग याला माझ्यासमोर आणा.” तेव्हा अगाग भीतभीतच* त्याच्यासमोर गेला. कारण, अगाग असा विचार करत होता, की ‘मृत्यूचा धोका नक्कीच टळलाय.’ ३३  पण शमुवेल त्याला म्हणाला: “तू जसं तुझ्या तलवारीने आयांना निःसंतान केलं, तसंच आता तुझी आईसुद्धा निःसंतान होईल.” मग शमुवेलने गिलगालमध्ये यहोवासमोर अगागचे तुकडे-तुकडे केले.+ ३४  शमुवेल मग रामा इथे गेला. आणि शौल गिबामध्ये आपल्या घरी गेला. ३५  शमुवेलने मरेपर्यंत शौलचं तोंड बघितलं नाही. पण तो शौलमुळे शोक करत राहिला.+ आणि आपण शौलला इस्राएलचा राजा बनवलं या गोष्टीचं यहोवाला खूप दुःख झालं.*+

तळटीपा

किंवा “कोणालाही जिवंत सोडू नकोस.”
किंवा “दया दाखवली.”
किंवा “पस्तावा होतोय.”
किंवा “त्यांना दया दाखवली.”
शब्दशः “तेराफीम मूर्ती,” म्हणजे, कुलदैवतं; मूर्ती.
शब्दशः “फाडून घेईल.”
किंवा “पस्तावा करणार नाही.”
किंवा “पस्तावा व्हायला.”
किंवा कदाचित, “निडरपणे.”
किंवा “पस्तावा झाला.”