१ शमुवेल १६:१-२३

  • शमुवेल दावीदचा राजा म्हणून अभिषेक करतो (१-१३)

    • “यहोवा हृदय पाहतो” ()

  • शौलवरून पवित्र शक्‍ती काढून घेतली जाते (१४-१७)

  • दावीद शौलसाठी वीणा वाजवणारा बनतो (१८-२३)

१६  मग यहोवा शमुवेलला म्हणाला: “मी शौलला इस्राएलचा राजा म्हणून नाकारलंय.+ मग कधीपर्यंत तू त्याच्यासाठी शोक करत राहशील?+ मी तुला बेथलेहेममध्ये राहणाऱ्‍या इशायच्या घरी पाठवतोय.+ तर आता शिंगात तेल भरून घे+ आणि जा. कारण त्याच्या मुलांपैकी एकाला मी राजा म्हणून निवडलंय.”+ २  पण शमुवेल म्हणाला: “मी कसं जाऊ? शौलने जर हे ऐकलं तर तो माझा जीवच घेईल.”+ तेव्हा यहोवा त्याला म्हणाला: “एक कालवड* सोबत घेऊन जा, आणि ‘मी यहोवासाठी बलिदान अर्पण करायला आलोय’ असं सांग. ३  मग इशायला बलिदान अर्पण करण्याच्या ठिकाणी यायचं आमंत्रण दे. त्यानंतर काय करायचं ते मी तुला सांगीन. आणि मी ज्याला निवडीन त्याचा माझ्या वतीने अभिषेक कर.”+ ४  यहोवाने जसं सांगितलं होतं तसं शमुवेलने केलं. तो बेथलेहेममध्ये+ आला तेव्हा शहरातले वडीलजन थरथर कापत त्याला भेटायला आले आणि म्हणाले: “तुमचं येणं शांतीचं आहे ना?” ५  त्यावर शमुवेल त्यांना म्हणाला: “हो, शांतीचं आहे. मी यहोवासाठी बलिदान अर्पण करायला आलोय. तर आता स्वतःला शुद्ध करा आणि माझ्यासोबत बलिदान अर्पण करायला या.” मग त्याने इशायला आणि त्याच्या मुलांना शुद्ध केलं आणि बलिदानाच्या ठिकाणी यायला सांगितलं. ६  ते तिथे आले तेव्हा शमुवेल अलीयाबला+ बघून म्हणाला: “हाच यहोवाचा अभिषिक्‍त असेल.” ७  पण यहोवा शमुवेलला म्हणाला: “त्याच्या स्वरूपावर किंवा तो किती उंचापुरा आहे यावर जाऊ नकोस.+ कारण मी त्याला निवडलेलं नाही. माणूस जसं पाहतो तसं देव पाहत नाही. माणूस फक्‍त बाहेरचं रूप पाहतो, पण यहोवा हृदय पाहतो.”+ ८  मग इशायने अबीनादाबला+ बोलावलं आणि शमुवेलपुढे आणलं. पण शमुवेल म्हणाला: “यहोवाने यालाही निवडलेलं नाही.” ९  त्यानंतर इशायने शाम्मा+ याला शमुवेलपुढे आणलं. पण तो म्हणाला: “यालासुद्धा यहोवाने निवडलेलं नाही.” १०  अशा प्रकारे इशायने आपल्या सात मुलांना शमुवेलपुढे आणलं. पण शमुवेल इशायला म्हणाला: “यहोवाने यांच्यापैकी कोणालाही निवडलेलं नाही.” ११  शेवटी शमुवेल इशायला म्हणाला: “तुला एवढीच मुलं आहेत का?” त्यावर इशाय म्हणाला: “नाही, आणखी एक आहे, सगळ्यात लहाना.+ तो मेंढरं चारायला गेलाय.”+ तेव्हा शमुवेल इशायला म्हणाला: “त्याला बोलावून घे. तो आल्याशिवाय आपण जेवायला बसणार नाही.” १२  म्हणून इशायने त्याला बोलावून घेतलं. तो तरुण मुलगा अतिशय देखणा होता आणि त्याचे डोळेही खूप सुंदर होते.+ यहोवा म्हणाला: “हाच तो आहे! ऊठ आणि त्याचा अभिषेक कर.”+ १३  म्हणून शमुवेलने तेलाचं शिंग घेतलं+ आणि त्याच्या भावांसमोर त्याचा अभिषेक केला. त्या दिवसापासून यहोवाची पवित्र शक्‍ती* दावीदवर कार्य करू लागली.+ नंतर शमुवेल उठला आणि रामा इथे निघून गेला.+ १४  इकडे, यहोवाने आपली पवित्र शक्‍ती शौलवरून काढून घेतली.+ आणि यहोवाने अस्वस्थ व अशांत करणाऱ्‍या विचारांना त्याला छळू दिलं.+ १५  शौलचे सेवक त्याला म्हणाले: “पाहा, देव अस्वस्थ करणाऱ्‍या विचारांना तुम्हाला छळू देत आहे. १६  तर आता आमच्या प्रभूने आपल्या सेवकांना आज्ञा द्यावी, म्हणजे ते जाऊन अशा एका माणसाला शोधून आणतील जो वीणा* वाजवण्यात तरबेज आहे.+ जेव्हा-जेव्हा अस्वस्थ व अशांत करणारे विचार तुम्हाला छळतील, तेव्हा-तेव्हा तो तुमच्यासाठी वीणा वाजवेल आणि तुम्हाला बरं वाटेल.” १७  त्यावर शौल आपल्या सेवकांना म्हणाला: “जा आणि वीणा वाजवण्यात तरबेज असलेल्या एखाद्या माणसाला शोधून माझ्याकडे घेऊन या.” १८  तेव्हा त्याचा एक सेवक म्हणाला: “बेथलेहेममध्ये राहणारा इशायचा एक मुलगा किती छान वीणा वाजवतो हे मी पाहिलंय. तो धाडसी आणि शूर योद्धा आहे.+ तो बोलण्यात कुशल असून देखणा आहे.+ आणि यहोवा त्याच्यासोबत आहे.”+ १९  शौलने मग आपल्या दूतांच्या हातून इशायला निरोप पाठवला, आणि सांगितलं: “मेंढरं चारणाऱ्‍या आपल्या मुलाला, दावीदला माझ्याकडे पाठवून दे.”+ २०  तेव्हा इशायने काही भाकरी आणि द्राक्षारसाची बुधली* एका गाढवावर लादली. तसंच त्याने एक बकरीचं पिल्लूही घेतलं. मग या सगळ्या गोष्टी त्याने आपला मुलगा दावीद याच्या हातून शौलकडे पाठवल्या. २१  अशा रितीने दावीद शौलकडे आला आणि त्याची सेवा करू लागला.+ शौलला दावीद फार आवडू लागला, आणि तो शौलचा शस्त्रवाहक बनला. २२  शौलने इशायला असा संदेश पाठवला: “कृपा करून दावीदला माझ्या सेवेसाठी राहू दे. कारण मी त्याच्यावर खूश आहे.” २३  देव जेव्हा अस्वस्थ व अशांत करणाऱ्‍या विचारांना शौलला छळू द्यायचा, तेव्हा दावीद वीणा वाजवायचा. त्यामुळे ते अस्वस्थ करणारे विचार नाहीसे व्हायचे आणि शौलचं मन शांत होऊन त्याला बरं वाटायचं.+

तळटीपा

किंवा “तरणी गाय.”