१ शमुवेल १८:१-३०
१८ दावीदचं शौलसोबत बोलणं संपलं आणि योनाथान+ व दावीद यांच्यात घट्ट मैत्री जुळली. योनाथान दावीदवर जिवापाड प्रेम करू लागला.+
२ त्या दिवसापासून शौलने दावीदला आपल्याकडेच ठेवून घेतलं, आणि त्याला आपल्या वडिलांच्या घरी परत जाऊ दिलं नाही.+
३ योनाथानचं दावीदवर जिवापाड प्रेम असल्यामुळे+ त्या दोघांनी आपसात मैत्रीचा करार केला.+
४ योनाथानने आपल्या अंगातला बिनबाह्यांचा झगा काढून दावीदला दिला. त्यासोबतच त्याने आपला सैनिकी पोषाख, कमरपट्टा, धनुष्य आणि आपली तलवारही त्याला दिली.
५ दावीद युद्धं लढायला जाऊ लागला. आणि शौल त्याला जिथे कुठे पाठवायचा तिथून तो विजयी होऊन परत यायचा.*+ म्हणून मग शौलने त्याला आपल्या सैनिकांवर अधिकारी नेमलं.+ ही गोष्ट शौलच्या सर्व सेवकांना आणि सगळ्या लोकांनाही आवडली.
६ दावीद आणि त्याच्यासोबतचे इतर सैनिक पलिष्ट्यांना मारून परत यायचे, तेव्हा इस्राएलच्या सर्व शहरांतून स्त्रिया डफ+ आणि सरोद वाजवत शौल राजाला भेटायला आनंदाने नाचत-गात बाहेर यायच्या.+
७ जल्लोष करत त्या असं गीत गायच्या:
“शौलने हजारोंना मारलं,दावीदने लाखोंना मारलं.”+
८ हे ऐकून शौलला फार राग आला.+ या गीताचे शब्द त्याला आवडले नाहीत. तो म्हणाला: “त्यांनी दावीदला लाखोंचं श्रेय दिलं, आणि मला फक्त हजारांचं! केवळ राज्यपद मिळायचंच बाकी राहिलंय त्याला!”+
९ त्या दिवसापासून शौल नेहमी संशयी नजरेने दावीदकडे पाहू लागला.
१० दुसऱ्या दिवशी, देवाने अस्वस्थ व अशांत करणाऱ्या विचारांना शौलला छळू दिलं.+ आणि तो आपल्या घरात विचित्र* वागू लागला; त्या वेळी दावीद नेहमीप्रमाणे वीणा* वाजवत होता.+ शौलच्या हातात भाला होता,+
११ आणि ‘मी दावीदला भिंतीत खिळून टाकीन,’ असा मनात विचार करून त्याने त्याच्या दिशेने तो भाला फेकला.+ पण दावीद दोनदा त्यापासून वाचला.
१२ शौलला दावीदची भीती वाटू लागली, कारण यहोवा दावीदसोबत होता;+ पण त्याने शौलला सोडलं होतं.+
१३ म्हणून शौलने त्याला आपल्यापासून दूर केलं आणि हजार सैनिकांवर प्रमुख म्हणून नेमलं. आणि दावीद युद्धात सैनिकांचं नेतृत्व करू लागला.+
१४ त्याने जे काही केलं त्यात तो यशस्वी होत गेला,*+ आणि यहोवा त्याच्यासोबत होता.+
१५ तो खूप यशस्वी होत आहे हे पाहून शौलला त्याची भीती वाटू लागली.
१६ पण इस्राएलच्या आणि यहूदाच्या सगळ्या लोकांचं दावीदवर प्रेम होतं. कारण, तो युद्धात त्यांचं नेतृत्व करायचा.
१७ शौल नंतर दावीदला म्हणाला: “बघ, माझ्या मोठ्या मुलीचं, मेरबचं+ लग्न मी तुझ्याशी लावून देतो.+ पण तू माझ्यासाठी शौर्य दाखवत राहा आणि यहोवाच्या लढाया लढत राहा.”+ कारण शौल असा विचार करत होता: ‘तो माझ्या हातून मरण्याऐवजी पलिष्ट्यांच्या हातून मेलेला बरा.’+
१८ तेव्हा दावीद त्याला म्हणाला: “मी कोण? किंवा इस्राएलमध्ये माझ्या वडिलांचं घराणं तरी काय, की मी राजाचा जावई बनावं?”+
१९ पण जेव्हा दावीदचं लग्न शौलच्या मुलीशी, मेरबशी लावून देण्याची वेळ आली, तेव्हा समजलं की तिचं लग्न आधीच महोला इथल्या अद्रीएलशी लावून देण्यात आलं होतं.+
२० यादरम्यान, शौलची मुलगी मीखल+ दावीदवर प्रेम करू लागली. ही गोष्ट शौलला कळवण्यात आली तेव्हा त्याला आनंद झाला.
२१ शौल मनातल्या मनात म्हणाला: “दावीदला फसवण्याची ही चांगली संधी आहे. मी जर माझ्या मुलीचं लग्न त्याच्याशी लावून दिलं, तर पलिष्ट्यांच्या हातून त्याला कसं मारायचं हे मला पाहता येईल.”+ मग शौल पुन्हा एकदा दावीदला म्हणाला: “आज तू माझा जावई होशील.”*
२२ शिवाय शौलने आपल्या सेवकांना आज्ञा दिली: “दावीदशी खासगीत बोला, आणि त्याला सांगा, ‘राजा तुझ्यावर खूप खूश आहे आणि त्याच्या सगळ्या सेवकांना तू आवडतोस. म्हणून राजाचा जावई हो.’”
२३ शौलच्या सेवकांनी दावीदला हे सगळं सांगितलं, तेव्हा तो म्हणाला: “माझ्यासारख्या गरीब आणि साध्यासुध्या माणसाने राजाचा जावई होणं ही तुम्हाला इतकी साधी गोष्ट वाटते का?”+
२४ दावीदचं हे म्हणणं सेवकांनी शौलला कळवलं.
२५ त्यावर शौल म्हणाला: “तुम्ही दावीदला जाऊन असं सांगा, की ‘राजाला कोणतीही वधू-दक्षिणा+ नको. त्याला फक्त १०० पलिष्ट्यांच्या अग्रत्वचा+ हव्यात. कारण त्याला आपल्या शत्रूंचा बदला घ्यायचाय.’” खरंतर, दावीद पलिष्टी लोकांच्या हातून मारला जाईल असा कट शौल करत होता.
२६ सेवकांनी दावीदला शौलचं म्हणणं कळवलं, तेव्हा राजाचा जावई होण्याची कल्पना त्याला आवडली.+ मग मुदत संपायच्या आत,
२७ दावीद आपल्या माणसांसोबत गेला आणि त्याने २०० पलिष्टी पुरुषांना मारलं. राजाचा जावई होण्यासाठी दावीदने त्या २०० पुरुषांच्या अग्रत्वचा राजाकडे आणल्या. म्हणून मग शौलने आपली मुलगी मीखल हिचं लग्न दावीदसोबत लावून दिलं.+
२८ शौलच्या लक्षात आलं, की यहोवा दावीदसोबत आहे+ आणि त्याच्या मुलीचं, मीखलचं दावीदवर प्रेम आहे.+
२९ यामुळे शौलला दावीदची आणखीनच भीती वाटायला लागली. आणि शौल दावीदचा कायमचा शत्रू बनला.+
३० पलिष्टी लोकांचे प्रमुख इस्राएलशी युद्ध करायला यायचे. पण जेव्हा-जेव्हा ते यायचे, तेव्हा-तेव्हा दावीदला शौलच्या इतर सेवकांपेक्षा जास्त यश मिळायचं,*+ आणि त्यामुळे दावीदचं नाव मोठं होत गेलं.+
तळटीपा
^ किंवा “हुशारीने काम करायचा.”
^ किंवा “संदेष्ट्यांसारखं.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “हुशारीने काम करायचा.”
^ किंवा “माझ्याशी सोयरीक करशील.”
^ किंवा “हुशारीने काम केलं.”