१ शमुवेल १९:१-२४
१९ नंतर शौल, दावीदला मारून टाकण्याबद्दल आपला मुलगा योनाथान आणि आपले सर्व सेवक यांच्याशी बोलला.+
२ पण योनाथानला दावीद खूप आवडायचा.+ म्हणून तो दावीदला म्हणाला: “माझे वडील तुला मारून टाकायला बघत आहेत. म्हणून उद्या सकाळी जरा सावध राहा आणि एखाद्या गुप्त ठिकाणी जाऊन लपून बस.
३ तू ज्या ठिकाणी लपलेला असशील तिथे मी माझ्या वडिलांच्या शेजारी मैदानात जाऊन उभा राहीन. मग मी त्यांच्याशी तुझ्याबद्दल बोलीन, आणि मला काही माहिती मिळाली तर मी तुला नक्की सांगीन.”+
४ मग योनाथानने आपल्या वडिलांना दावीदबद्दल चांगल्या गोष्टी सांगितल्या.+ तो शौलला म्हणाला: “राजाने आपला सेवक दावीद याच्याविरुद्ध पाप करू नये. कारण, त्याने तुमच्याविरुद्ध कोणताही अपराध केलेला नाही. उलट तुमच्यासाठी त्याने जे काही केलं त्यामुळे तुम्हाला फायदाच झालाय.
५ त्याने आपला जीव धोक्यात घालून त्या पलिष्ट्याला मारलं,+ आणि यहोवाने सगळ्या इस्राएलला मोठा विजय मिळवून दिला.* तुम्ही स्वतः ते पाहिलं आणि त्यामुळे तुम्ही खूप आनंदीही झाला होता. तर मग कोणतंही कारण नसताना, दावीदला मारून तुम्ही एका निर्दोष व्यक्तीचा खून करण्याचं पाप का करता?”+
६ शौलने योनाथानचं म्हणणं मान्य केलं, आणि तो शपथ घेऊन म्हणाला: “जिवंत देव यहोवाची शपथ, मी त्याला मारून टाकणार नाही.”
७ त्यानंतर योनाथानने दावीदला बोलावून या सगळ्या गोष्टी सांगितल्या. मग त्याने दावीदला शौलकडे नेलं आणि दावीद पूर्वीप्रमाणे शौलची सेवा करू लागला.+
८ काही काळानंतर इस्राएली आणि पलिष्टी लोकांमध्ये पुन्हा युद्ध सुरू झालं, तेव्हा दावीद जाऊन त्यांच्याशी लढला. त्याने पलिष्टी लोकांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली आणि ते त्याच्यापुढून पळून गेले.
९ मग, यहोवाने अस्वस्थ व अशांत करणाऱ्या विचारांना शौलला छळू दिलं.+ त्या वेळी शौल आपल्या घरात हातात भाला घेऊन बसला होता आणि दावीद वीणा* वाजवत होता.+
१० शौलने दावीदच्या दिशेने भाला फेकून त्याला भिंतीला खिळण्याचा प्रयत्न केला. पण दावीद बाजूला सरकला आणि भाला भिंतीत घुसला. त्या रात्री दावीद शौलपासून निसटून पळून गेला.
११ नंतर शौलने दावीदच्या घरावर पाळत ठेवण्यासाठी आणि त्याला सकाळी ठार मारण्यासाठी काही जासूद पाठवले.+ पण दावीदची बायको मीखल दावीदला म्हणाली: “तुम्ही जर आज रात्रीच इथून पळून गेला नाहीत, तर उद्यापर्यंत तुम्ही जिवंत राहणार नाही.”
१२ मग, दावीदला पळून जाता यावं म्हणून मीखलने लगेच त्याला खिडकीतून खाली उतरवलं.
१३ त्यानंतर तिने तेराफीम मूर्ती* घेऊन ती पलंगावर झोपवली. तिने डोक्याच्या बाजूला बकरीच्या केसांचं जाळीदार कापड ठेवलं आणि दुसऱ्या कापडाने ती मूर्ती झाकली.
१४ शौलने जेव्हा दावीदला पकडून आणण्यासाठी जासुदांना पाठवलं, तेव्हा मीखल त्यांना म्हणाली: “ते आजारी आहेत.”
१५ मग दावीदला प्रत्यक्ष पाहण्यासाठी शौलने त्याच्याकडे जासुदांना पाठवलं आणि त्यांना सांगितलं: “त्याला मारून टाकण्यासाठी पलंगासकट त्याला माझ्याकडे घेऊन या.”+
१६ जासूद दावीदला घ्यायला आले तेव्हा त्यांनी पाहिलं, की पलंगावर तेराफीम मूर्ती* आहे, आणि जिथे त्याचं डोकं असायला हवं होतं तिथे बकरीच्या केसांचं जाळीदार कापड ठेवलं आहे.
१७ मग शौल मीखलला म्हणाला: “का फसवलंस तू मला? आणि माझ्या शत्रूला+ पळून जायला का मदत केलीस?” तेव्हा मीखल शौलला म्हणाली: “ते मला म्हणाले, ‘मला जाऊ दे, नाहीतर मी तुला मारून टाकीन!’”
१८ दावीद पळून गेला आणि रामा इथे शमुवेलकडे आला.+ शौल आपल्याशी कसा वागला ते सगळं त्याने त्याला सांगितलं. मग ते दोघं तिथून निघाले आणि नायोथ इथे जाऊन राहिले.+
१९ काही काळाने शौलला अशी खबर देण्यात आली, की “दावीद रामामधल्या नायोथ इथे आहे.”
२० तेव्हा शौलने दावीदला पकडायला लगेच काही माणसांना तिकडे पाठवलं. तिथे पोहोचल्यावर त्यांनी पाहिलं, की संदेष्ट्यांपैकी वयस्कर संदेष्टे भविष्यवाणी करत आहेत आणि शमुवेल त्यांचं नेतृत्व करत आहे. तेव्हा देवाची पवित्र शक्ती* शौलच्या माणसांवर आली आणि तेसुद्धा संदेष्ट्यांसारखं वागू लागले.
२१ शौलला हे कळवण्यात आलं, तेव्हा त्याने लगेच आणखी काही माणसांना तिथे पाठवलं. तिथे पोहोचल्यावर तेसुद्धा संदेष्ट्यांसारखं वागायला लागले. म्हणून मग शौलने तिसऱ्यांदा काही माणसांना पाठवलं. पण तेही संदेष्ट्यांसारखं वागू लागले.
२२ शेवटी, शौल स्वतः रामा इथे गेला. तो सेखूमधल्या मोठ्या विहिरीजवळ पोहोचला तेव्हा त्याने लोकांना विचारलं: “शमुवेल आणि दावीद कुठे आहेत?” ते त्याला म्हणाले: “ते रामा इथल्या नायोथमध्ये आहेत.”+
२३ मग शौल तिथून रामामधल्या नायोथ इथे जात असताना त्याच्यावरही देवाची पवित्र शक्ती आली. आणि नायोथला पोहोचेपर्यंत तो संदेष्ट्यांसारखा वागत राहिला.
२४ त्याने आपले कपडे काढून टाकले आणि शमुवेलसमोर तोसुद्धा संदेष्ट्यांसारखा वागू लागला. तो संपूर्ण दिवस आणि रात्र तिथे तसाच उघडा* पडून राहिला. यावरून अशी म्हण पडली, की “शौलसुद्धा संदेष्टा आहे की काय?”+
तळटीपा
^ किंवा “उद्धार केला.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “कुलदैवताची मूर्ती.”
^ किंवा “कुलदैवताची मूर्ती.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “कमी कपडे घालून.”