१ शमुवेल २१:१-१५

  • दावीद नोब इथे अर्पणाची भाकर खातो (१-९)

  • दावीद गथमध्ये वेड्याचं सोंग घेतो (१०-१५)

२१  नंतर दावीद नोब इथे अहीमलेख याजकाकडे आला.+ दावीदला पाहून अहीमलेख घाबरला आणि थरथर कापू लागला. तो दावीदला म्हणाला: “तुम्ही एकटेच कसे? तुमच्यासोबत आणखी कोणी का नाही?”+ २  यावर दावीद अहीमलेख याजकाला म्हणाला: “राजाने माझ्यावर एक कामगिरी सोपवली आहे. पण ते असंही म्हणाले, की ‘मी तुला ज्या कामगिरीवर पाठवतोय आणि ज्या सूचना मी तुला दिल्या आहेत त्यांबद्दल कोणाला काहीही सांगू नकोस.’ आणि मी माझ्या माणसांना अमुक एका ठिकाणी येऊन भेटायला सांगितलंय. ३  तुमच्याकडे जर पाच भाकरी असतील तर त्या मला द्या, नाहीतर मग जे काही खायला असेल ते द्या.” ४  तेव्हा याजक त्याला म्हणाला: “माझ्याकडे साध्या भाकरी नाहीत, तर पवित्र भाकरी आहेत.+ फक्‍त तुझी माणसं स्त्रियांपासून दूर राहिलेली असावीत.”*+ ५  दावीद याजकाला म्हणाला: “नेहमीप्रमाणेच, या मोहिमेवर जातानाही आम्ही स्त्रियांपासून दूर राहिलो आहोत.+ एखादी मोहीम साधारण असली तरी माझी माणसं आपली शरीरं शुद्ध ठेवतात. तर मग आज, या खास मोहिमेसाठी ती कितीतरी जास्त शुद्ध असतील!” ६  म्हणून मग याजकाने त्याला त्या पवित्र भाकरी दिल्या.+ कारण अर्पणाच्या भाकरींशिवाय तिथे दुसऱ्‍या कोणत्याही भाकरी नव्हत्या. त्या दिवशी, यहोवासमोर अर्पणाच्या ताज्या भाकरी ठेवण्यासाठी या जुन्या भाकरी काढण्यात आल्या होत्या. ७  शौलचा एक सेवकही त्या दिवशी तिथे होता. त्याला यहोवापुढे थांबवून ठेवण्यात आलं होतं. त्याचं नाव दवेग.+ तो अदोमचा+ राहणारा असून शौलच्या मेंढपाळांचा प्रमुख होता. ८  दावीद अहीमलेखला म्हणाला: “तुमच्याजवळ एखादा भाला किंवा तलवार आहे का? राजाने सोपवलेली कामगिरी ताबडतोब पार पाडायची होती, म्हणून मी माझी तलवार किंवा शस्त्रं सोबत घेऊ शकलो नाही.” ९  तेव्हा याजक त्याला म्हणाला: “तुम्ही ‘एलाहच्या खोऱ्‍यात’+ ज्या पलिष्टी गल्याथला मारलं होतं त्याची तलवार+ इथे आहे. ती एका कपड्यात गुंडाळून एफोदच्या+ मागे ठेवली आहे. तुम्हाला हवी असेल तर ती घ्या. कारण तिच्याशिवाय इथे दुसरं काहीच नाही.” त्यावर दावीद म्हणाला: “तिच्यासारखी दुसरी तलवार नाही! द्या ती मला.” १०  त्या दिवशी दावीद तिथून निघाला, आणि शौलपासून पळ काढत+ तो गथचा+ राजा आखीश याच्याकडे येऊन पोहोचला. ११  आखीशचे सेवक आपल्या राजाला म्हणाले: “हा त्या देशाचा राजा दावीदच आहे ना? नाचगाणं करत ते याच्याबद्दलच म्हणत होते ना, की‘शौलने हजारोंना मारलं,दावीदने लाखोंना मारलं’?”+ १२  दावीदने त्यांच्या या बोलण्यावर विचार केला, तेव्हा त्याला गथचा राजा आखीश याची खूप भीती वाटली.+ १३  म्हणून दावीदने त्यांच्यासमोर* वेड्याचं सोंग घेतलं.+ तो दरवाजावर रेघोट्या ओढू लागला आणि आपल्या दाढीवर लाळ गाळू लागला. १४  शेवटी आखीश आपल्या सेवकांना म्हणाला: “तुम्हाला दिसतंय ना, हा माणूस वेडा आहे ते? मग त्याला माझ्याकडे का आणलंत? १५  माझ्याकडे काय वेड्या लोकांची कमी आहे, म्हणून तुम्ही आणखी एका वेड्याला माझ्यासमोर आणलंत? मी याला माझ्या घरात का घेऊ?”

तळटीपा

किंवा “तुझ्या माणसांनी स्त्रियांसोबत शारीरिक संबंध ठेवलेले नसावेत.”
शब्दशः “त्यांच्या हाती असताना.”