१ शमुवेल २२:१-२३
२२ मग दावीद तिथून निघून+ अदुल्लामच्या गुहेत पळून गेला.+ त्याच्या भावांनी आणि त्याच्या वडिलांच्या संपूर्ण घराण्याने हे ऐकलं, तेव्हा ते तिथे त्याच्याकडे गेले.
२ याशिवाय समस्येत असलेले, कर्जबाजारी आणि जीवनाला कंटाळलेले सगळे लोकही दावीदकडे आले, आणि तो त्यांचा प्रमुख बनला. अशा प्रकारे त्याच्याकडे जवळपास ४०० माणसं जमली.
३ नंतर दावीद तिथून मवाबातल्या मिस्पे इथे गेला. आणि तो मवाबच्या राजाला म्हणाला:+ “देव माझ्या बाबतीत काय करणार आहे हे मला समजेपर्यंत, कृपा करून माझ्या आईवडिलांना तुमच्याकडे राहू द्या.”
४ त्यानंतर दावीदने आपल्या आईवडिलांना मवाबच्या राजाकडे ठेवलं. दावीद जोपर्यंत डोंगरांतल्या सुरक्षित ठिकाणी लपून राहिला, तोपर्यंत ते तिथेच राहिले.+
५ मग काही काळाने गाद+ संदेष्टा दावीदला म्हणाला: “तू डोंगरांमध्ये राहू नकोस. तिथून निघ आणि यहूदाच्या प्रदेशात जा.”+ म्हणून दावीद तिथून निघून हरेथच्या रानात गेला.
६ दावीद आणि त्याच्यासोबतची माणसं कुठे आहेत याची खबर शौलला मिळाली. त्या वेळी, शौल गिबातल्या+ टेकडीवर एशेल* झाडाखाली हातात भाला घेऊन बसला होता; आणि त्याचे सेवक त्याच्या आजूबाजूला उभे होते.
७ मग शौल आपल्या सभोवती उभ्या असलेल्या सेवकांना म्हणाला: “बन्यामिनी लोकांनो, ऐका! इशायचा+ मुलगासुद्धा तुम्हाला शेतीवाडी आणि द्राक्षमळे देणार आहे का? तो काय तुम्हा सगळ्यांना शंभरांचे आणि हजारांचे प्रमुख नेमणार आहे?+
८ तुम्ही सगळ्यांनी माझ्याविरुद्ध कट केलाय! माझ्या स्वतःच्या मुलाने जेव्हा त्या इशायच्या मुलासोबत करार केला,+ तेव्हा कोणीही मला सांगितलं नाही! माझ्याच मुलाने माझ्या सेवकाला माझ्याविरुद्ध कट करायला भडकवलं, आणि आज तो सेवक माझ्या जिवावर उठलाय. पण त्याबद्दल कोणीही मला काहीच सांगितलं नाही. तुमच्यापैकी एकालाही माझ्याबद्दल काहीच वाटत नाही?”
९ त्या वेळी शौलच्या सेवकांचा प्रमुख, अदोमी दवेगही+ तिथे होता. तो शौलला म्हणाला:+ “मी इशायच्या मुलाला नोबमध्ये आल्याचं पाहिलं. तो अहीटूबचा+ मुलगा अहीमलेख याच्याकडे आला होता.
१० अहीमलेखने त्याच्यासाठी यहोवाकडे मार्गदर्शन मागितलं आणि त्याला काही अन्नसामग्रीही दिली. त्याने त्याला त्या पलिष्टी गल्याथची तलवारसुद्धा दिली.”+
११ तेव्हा राजाने लगेच आपली माणसं पाठवून अहीटूब याजकाचा मुलगा अहीमलेख याला, आणि नोबमध्ये असलेल्या त्याच्या वडिलांच्या घराण्यातल्या सगळ्या याजकांना बोलावलं. तेव्हा ते सर्व राजाकडे आले.
१२ मग शौल म्हणाला: “अहीटूबच्या मुला, ऐक!” त्यावर तो म्हणाला: “हो प्रभू.”
१३ शौल त्याला म्हणाला: “तू आणि इशायचा मुलगा, तुम्ही दोघांनी मिळून माझ्याविरुद्ध कट का केला? तू त्याला अन्नसामग्री आणि तलवार दिलीस. शिवाय त्याच्यासाठी देवाकडे मार्गदर्शनही मागितलंस. का केलंस तू असं? आज तो माझा विरोधी बनून माझ्या जिवावर उठलाय.”
१४ तेव्हा अहीमलेख राजाला म्हणाला: “प्रभू, तुमच्या सगळ्या सेवकांपैकी दावीदइतका भरवशालायक* कोण आहे?+ तो राजाचा जावई आहे,+ तुमच्या अंगरक्षकांच्या प्रमुखांपैकी एक आहे. शिवाय तुमच्या घराण्यात त्याला खूप मान आहे.+
१५ आणि मी काही पहिल्यांदाच त्याच्यासाठी देवाकडे मार्गदर्शन मागितलं असं नाही.+ तुमच्याविरुद्ध कट करण्याचा मी विचारसुद्धा करू शकत नाही! खरंतर तुमच्या या सेवकाला यातलं काहीच माहीत नव्हतं. म्हणून, कृपा करून राजाने आपल्या या सेवकाला आणि माझ्या वडिलांच्या घराण्यातल्या कोणालाही दोषी ठरवू नये.”+
१६ पण राजा म्हणाला: “अहीमलेख! तुला आणि तुझ्यासोबत तुझ्या वडिलांच्या संपूर्ण घराण्याला+ मृत्युदंड मिळालाच पाहिजे.”+
१७ मग राजा आपल्या आजूबाजूला उभ्या असलेल्या रक्षकांना म्हणाला: “जा, यहोवाच्या याजकांना मारून टाका. कारण त्यांनी दावीदशी हातमिळवणी केली आहे. तो पळून गेलाय हे माहीत असूनसुद्धा त्यांनी मला सांगितलं नाही!” पण राजाचे सेवक यहोवाच्या याजकांना मारून टाकायला तयार झाले नाहीत.
१८ मग राजा दवेगला म्हणाला:+ “तू जा, आणि याजकांना मारून टाक.” तेव्हा अदोमी+ दवेग लगेच गेला आणि त्याने स्वतः याजकांना मारून टाकलं. त्या दिवशी, त्याने मलमलीचं एफोद* घातलेल्या ८५ याजकांना मारून टाकलं.+
१९ त्याने याजकांचं शहर नोब+ यावरही हल्ला केला. आणि तिथल्या सर्व स्त्रियांना, पुरुषांना, मुलांना आणि तान्ह्या बाळांना तलवारीने मारून टाकलं. तसंच बैल, गाढवं आणि मेंढरं हीसुद्धा त्याने मारून टाकली.
२० पण अहीटूबचा मुलगा अहीमलेख, याचा एक मुलगा अब्याथार+ हा निसटला आणि दावीदला जाऊन मिळाला.
२१ अब्याथारने दावीदला सांगितलं: “शौलने यहोवाच्या याजकांना मारून टाकलंय.”
२२ त्यावर दावीद अब्याथारला म्हणाला: “ज्या दिवशी मी अदोमी दवेगला तिथे पाहिलं, त्याच दिवशी+ माझ्या लक्षात आलं होतं, की हा नक्कीच शौलला खबर देईल. तुझ्या वडिलांच्या घराण्यातल्या प्रत्येकाच्या मृत्यूला मीच जबाबदार आहे.
२३ तू माझ्यासोबतच राहा. घाबरू नकोस. कारण जो तुझा जीव घ्यायला बघतोय, तोच माझाही जीव घ्यायला बघतोय. माझ्याजवळ तू सुरक्षित राहशील.”+
तळटीपा
^ एक हिरवंगार झाड. याला बारीक पानं आणि पांढरी व गुलाबी फुलं असतात.
^ किंवा “विश्वासू.”
^ शब्दार्थसूची पाहा.