१ शमुवेल २४:१-२२
२४ शौल पलिष्ट्यांचा पाठलाग करून परत येताच लोकांनी त्याला सांगितलं: “पाहा! दावीद एन-गेदीच्या+ ओसाड रानात आहे.”
२ म्हणून मग शौलने संपूर्ण इस्राएलमधून ३,००० माणसं निवडली. आणि तो रानबकऱ्यांच्या खडकाळ भागात दावीदचा आणि त्याच्या माणसांचा शोध करायला गेला.
३ रस्त्याने जाता-जाता शौल दगडांनी बनलेल्या मेंढवाड्यांजवळ आला. तिथे जवळच एक गुहा होती. शौल त्या गुहेत शौचास गेला. त्या वेळी, दावीद आणि त्याची माणसं गुहेच्या अगदी आतल्या बाजूला बसली होती.+
४ दावीदची माणसं त्याला म्हणाली: “आज यहोवा तुम्हाला म्हणत आहे, ‘पाहा! मी तुझा शत्रू तुझ्या हाती देतोय.+ त्याच्या बाबतीत तुला जे योग्य वाटेल ते कर.’” तेव्हा दावीद उठला आणि त्याने शौलच्या झग्याचा* काठ हळूच कापून घेतला.
५ पण नंतर असं झालं, की शौलच्या झग्याचा काठ कापून घेतल्यामुळे दावीदचं मन त्याला खाऊ लागलं.*+
६ तेव्हा तो आपल्या माणसांना म्हणाला: “मी आपल्या प्रभूवर, यहोवाच्या अभिषिक्तावर हात उचलण्याचा विचारसुद्धा करू शकत नाही. असं करणं यहोवाच्या दृष्टीने साफ चुकीचं ठरेल. कारण यहोवाने त्यांचा अभिषेक केलाय.”+
७ असं म्हणून दावीदने आपल्या माणसांना आवरलं* आणि शौलवर हल्ला करण्यापासून त्यांना रोखलं. शौल मग गुहेतून उठून आपल्या रस्त्याने निघून गेला.
८ मग दावीद गुहेतून बाहेर आला आणि त्याने शौलला हाक मारली: “हे माझ्या प्रभू! हे राजा!”+ शौलने जेव्हा मागे वळून पाहिलं तेव्हा दावीद खाली वाकला आणि त्याने जमिनीवर डोकं टेकवून दंडवत घातला.
९ मग तो शौलला म्हणाला: “जे लोक तुम्हाला म्हणतात: ‘पाहा! दावीद तुमचं वाईट करायला टपलाय,’ त्यांचं तुम्ही का ऐकता?+
१० आज तुम्ही स्वतःच पाहिलं, की यहोवाने कशा प्रकारे तुम्हाला या गुहेत माझ्या हाती दिलं होतं. तुम्हाला मारून टाकावं असं कोणीतरी मला सुचवलंही होतं.+ पण मी तुमच्यावर दया केली आणि म्हणालो: ‘मी माझ्या प्रभूवर हात उचलणार नाही, कारण ते यहोवाचे अभिषिक्त आहेत.’+
११ आणि हे माझ्या पित्या, पाहा, माझ्या हातात हा तुमच्या झग्याचा काठ आहे. मी जेव्हा तो कापला तेव्हा खरंतर मी तुम्हाला ठार मारू शकलो असतो. पण मी तसं केलं नाही. यावरून तुम्हाला समजलं असेल, की तुमचं काही वाईट करण्याचा किंवा तुमच्याविरुद्ध बंड करण्याचा माझा काही हेतू नाही. शिवाय, मी तुमच्याविरुद्ध काही गुन्हाही केला नाही.+ पण तुम्ही मात्र माझ्या जिवावर टपलेले आहात.+
१२ आता यहोवाच आपल्या दोघांचा न्याय करो.+ माझ्यासाठी यहोवाच तुमचा बदला घेवो.+ पण मी मात्र तुमच्यावर हात उचलणार नाही.+
१३ एक जुनी म्हण आहे: ‘दुष्ट दुष्टताच करतो.’ त्यामुळे माझा हात कधीच तुमच्यावर उठणार नाही.
१४ हे इस्राएलच्या राजा! तुम्ही कोणाचा पाठलाग करत आहात? कोणाच्या मागे लागला आहात? माझ्यासारख्या मेलेल्या कुत्र्याच्या? एका पिसवेच्या?+
१५ तर आता यहोवालाच न्यायाधीश होऊन तुमच्या आणि माझ्यामध्ये न्याय करू द्या. तोच या खटल्याची चौकशी करून माझी वकिली करेल.+ माझा न्याय करून तोच तुमच्या हातून माझी सुटका करेल.”
१६ दावीदचं हे बोलणं संपल्यावर शौल म्हणाला: “दावीद, माझ्या मुला, हा तुझाच आवाज आहे ना?”+ असं म्हणून शौल मोठ्याने रडू लागला.
१७ तो दावीदला म्हणाला: “तू माझ्यापेक्षा भला माणूस आहेस. तू नेहमीच माझ्याशी चांगलं वागलास. पण त्या बदल्यात मी तुझं वाईटच केलं.+
१८ आज तू दाखवून दिलंस, की तू माझ्या भल्याचाच विचार करतोस. यहोवाने मला तुझ्या हाती दिलं असतानाही तू मला मारून टाकलं नाहीस.+
१९ असा कोण आहे जो शत्रू तावडीत सापडल्यावरही त्याला सहज सोडून देतो? आज माझ्यासाठी तू जे काही केलंस, त्याबद्दल यहोवा नक्की तुला चांगलं प्रतिफळ देईल.+
२० आता मला खातरी झाली आहे, की तू राजा होऊन राज्य करशील+ आणि इस्राएलचं राज्य कायम तुझ्या हातात राहील.
२१ म्हणून आता यहोवाच्या नावाने मला असं वचन दे,+ की माझ्यानंतर तू माझ्या वंशजांचा नाश करणार नाहीस आणि माझ्या वडिलांच्या घराण्यातून माझं नाव मिटवून टाकणार नाहीस.”+
२२ तेव्हा दावीदने शौलला तसं वचन दिलं. त्यानंतर शौल आपल्या घरी गेला.+ पण दावीद आणि त्याची माणसं परत सुरक्षित ठिकाणी निघून गेली.+
तळटीपा
^ किंवा “बिनबाह्यांच्या झग्याचा.”
^ किंवा “दावीदचा विवेक त्याला बोचू लागला.”
^ किंवा कदाचित, “इथे-तिथे पाठवून दिलं.”