१ शमुवेल २५:१-४४

  • शमुवेलचा मृत्यू ()

  • नाबाल दावीदच्या माणसांना नकार देतो (२-१३)

  • अबीगईलचा सुज्ञपणा (१४-३५)

    • ‘मौल्यवान वस्तू जशा थैलीत सांभाळून ठेवल्या जातात, तसा यहोवा तुमचा जीव सांभाळून ठेवेल’ (२९)

  • मूर्ख नाबालला यहोवा तडाखा देतो (३६-३८)

  • अबीगईल दावीदची बायको बनते (३९-४४)

२५  काही काळाने शमुवेलचा+ मृत्यू झाला. तेव्हा, सर्व इस्राएली लोक शोक करायला आणि रामामध्ये त्याच्या घराजवळ+ त्याला दफन करायला एकत्र आले. मग दावीद निघाला आणि खाली पारानच्या ओसाड रानात गेला. २  मावोन+ या ठिकाणी एक माणूस राहायचा. तो खूप श्रीमंत असून कर्मेल*+ इथे आपला व्यवसाय चालवायचा. त्याच्याकडे ३,००० मेंढरं आणि १,००० बकऱ्‍या होत्या. आणि त्या वेळी तो कर्मेलमध्ये मेंढरांची लोकर कातरत होता. ३  त्या माणसाचं नाव नाबाल,+ तर त्याच्या बायकोचं नाव अबीगईल+ होतं. ती समंजस आणि दिसायला सुंदर होती. पण तिचा नवरा मात्र कठोर असून सगळ्यांशी वाईट वागायचा;+ तो कालेबच्या+ वंशातला होता. ४  दावीदने ओसाड रानात असताना ऐकलं, की नाबाल आपल्या मेंढरांची लोकर कातरत आहे. ५  म्हणून दावीदने आपली दहा माणसं त्याच्याकडे पाठवली. तो त्यांना म्हणाला: “कर्मेलला जा. तिथे नाबालला भेटा आणि माझ्यावतीने त्यांची ख्यालीखुशाली विचारा. ६  त्यांना म्हणा: ‘तुम्हाला दीर्घायुष्य लाभो. तुमच्यावर, तुमच्या घराण्यावर आणि तुमचं जे काही आहे त्यावर शांती असो. ७  मी ऐकलंय, की तुम्ही मेंढरांची लोकर कातरत आहात. तुमचे मेंढपाळ आमच्यासोबत होते त्या वेळी आम्ही त्यांना कोणताही त्रास दिला नाही.+ ते जितके दिवस कर्मेलमध्ये होते, तितके दिवस त्यांचं काहीएक हरवलं नाही. ८  वाटल्यास तुमच्या माणसांनाच विचारा, ते तुम्हाला सांगतील. आता माझ्या माणसांवर कृपा करा, कारण आम्ही आनंदाच्या प्रसंगी* तुमच्याकडे आलो आहोत. कृपा करून, तुमच्या या सेवकांना आणि तुमचा मुलगा दावीद याला जे काही देता येईल ते द्या.’”+ ९  मग दावीदची माणसं नाबालकडे गेली आणि त्यांनी त्याला दावीदचा निरोप दिला. त्यांचं बोलणं संपल्यावर, १०  नाबाल त्यांना म्हणाला: “कोण हा दावीद? आणि कोण हा इशायचा मुलगा? आजकाल बरेच सेवक आपल्या मालकांना सोडून पळून जात आहेत.+ ११  मी माझ्या लोकर कातरणाऱ्‍यांसाठी तयार केलेलं मांस आणि माझं अन्‍नपाणी अशा माणसांना द्यायचं का, जे कोण जाणे कुठून आलेत?” १२  तेव्हा दावीदची माणसं परत आली आणि त्यांनी त्याला सगळं काही सांगितलं. १३  त्यावर दावीद लगेच आपल्या माणसांना म्हणाला: “सगळे जण आपापल्या तलवारी बांधा!”+ तेव्हा सगळ्यांनी आपल्या कंबरेला तलवारी बांधल्या. दावीदनेसुद्धा आपली तलवार बांधली. मग दावीदसोबत सुमारे ४०० माणसं गेली आणि २०० माणसं सामानाजवळ थांबली. १४  यादरम्यान नाबालच्या बायकोला, अबीगईलला एका सेवकाने येऊन सांगितलं: “आपल्या मालकाला शुभेच्छा देण्यासाठी दावीदने ओसाड रानातून काही माणसांना पाठवलं होतं. पण, मालक त्यांच्यावर ओरडले आणि त्यांनी त्यांचा अपमान केला.+ १५  खरंतर ती माणसं आमच्याशी खूप चांगलं वागली. त्यांनी कधीच आम्हाला त्रास दिला नाही. आम्ही जितके दिवस त्यांच्यासोबत रानात होतो, तितके दिवस आमचं काहीएक हरवलं नाही.+ १६  आम्ही कळपाची राखण करत होतो, त्या संपूर्ण काळात त्यांनी रात्रंदिवस एका तटबंदीसारखं आमचं रक्षण केलं. १७  आता काय करायचं त्याचा विचार करा. कारण, आपल्या मालकावर आणि त्यांच्या सगळ्या घराण्यावर येणारं संकट अटळ आहे.+ आणि मालक तर कसल्याच लायकीचे नाहीत,*+ त्यांच्याशी जाऊन कोण बोलणार?” १८  तेव्हा अबीगईलने+ लगेच २०० भाकरी, द्राक्षारसाची दोन मोठी मडकी, पाच मेंढरांचं मांस, पाच सेया मापं* हुरडा, मनुकांच्या १०० ढेपा आणि अंजिराच्या २०० ढेपा घेतल्या. आणि ते सगळं तिने गाढवांवर लादलं.+ १९  मग ती आपल्या सेवकांना म्हणाली: “तुम्ही निघा पुढे. मी मागून येते.” पण याबद्दल तिने आपल्या नवऱ्‍याला, नाबालला काहीही सांगितलं नाही. २०  अबीगईल गाढवावर बसून डोंगराच्या आडोशाने खाली जात होती; इतक्यात समोरून दावीद आणि त्याची माणसं आली, आणि ती त्यांना भेटली. २१  दावीद आपल्या मनात म्हणत होता: “मी उगाचच ओसाड रानात त्या माणसाच्या सगळ्या मालमत्तेचं रक्षण केलं. त्या वेळी त्याची एकही गोष्ट हरवली नाही.+ पण तरी माझ्या चांगुलपणाची तो वाइटाने परतफेड करतोय!+ २२  मी जर त्याच्या एकाही माणसाला सकाळपर्यंत जिवंत राहू दिलं, तर देव माझ्या सगळ्या शत्रूंना* कठोरातली कठोर शिक्षा करो.” २३  अबीगईलने दावीदला पाहिलं तेव्हा ती लगेच गाढवावरून खाली उतरली. आणि जमिनीवर डोकं टेकवून तिने दावीदला नमन केलं. २४  ती त्याच्या पायांजवळ पडून म्हणाली: “हे माझ्या प्रभू! जे काही झालंय त्याचा दोष माझ्यावर येऊ द्या. कृपया तुमच्या या दासीला बोलू द्या; तुमच्या या दासीचं म्हणणं ऐकून घ्या. २५  माझ्या प्रभू, तुम्ही कृपा करून कसलीही लायकी नसलेल्या नाबालकडे लक्ष देऊ नका.+ कारण, ते त्यांच्या नावासारखेच आहेत. त्यांचं नावच नाबाल* आहे, आणि त्यांच्यात मूर्खपणा भरलाय. प्रभू, तुम्ही पाठवलेल्या माणसांना तुमच्या या दासीने पाहिलं नाही. २६  तर आता हे माझ्या प्रभू, जिवंत देवाची, यहोवाची शपथ आणि तुमच्या जिवाची शपथ, यहोवानेच तुम्हाला रक्‍तदोषी होण्यापासून+ आणि आपल्या हाताने बदला घेण्यापासून* रोखलंय.+ माझ्या प्रभू, तुमचे शत्रू आणि जे तुमचं वाईट करायला पाहतात ते नाबालसारखे होवोत. २७  प्रभू, आता तुमच्या या दासीने तुमच्यासाठी जी भेट* आणली आहे+ ती आपल्या माणसांना द्यावी.+ २८  कृपा करून तुमच्या या दासीचा अपराध माफ करा. प्रभू, तुम्ही यहोवाच्या लढाया लढत आहात,+ आणि आजपर्यंत तुमच्यात कोणताही दुष्टपणा दिसून आला नाही.+ म्हणून यहोवा नक्कीच माझ्या प्रभूचं घराणं कायमचं टिकवून ठेवेल.+ २९  माझ्या प्रभू! तुमचा जीव घेण्यासाठी कोणी तुमच्या मागे लागला, तर तुमचा देव यहोवा तुमच्या जिवाचं रक्षण करेल; मौल्यवान वस्तू जशा थैलीत सांभाळून ठेवल्या जातात, तसा तो तुमचा जीव सांभाळून ठेवेल. पण तुमच्या शत्रूंचे जीव मात्र तो गोफणीतून भिरकावलेल्या दगडांप्रमाणे फेकून देईल. ३०  आणि यहोवाने वचन दिल्याप्रमाणे जेव्हा तो माझ्या प्रभूसाठी सर्व चांगल्या गोष्टी करेल, आणि तुम्हाला इस्राएलचा पुढारी म्हणून नेमेल,+ ३१  तेव्हा माझ्या प्रभू, तुम्हाला विनाकारण रक्‍त सांडल्याचा आणि आपल्या हाताने बदला घेतल्याचा* पस्तावा होणार नाही, किंवा तुमचं मन तुम्हाला खाणार नाही.*+ माझ्या प्रभू, यहोवा तुम्हाला आशीर्वादित करेल, तेव्हा तुमच्या या दासीची आठवण ठेवा.” ३२  मग दावीद अबीगईलला म्हणाला: “ज्या इस्राएलच्या देवाने, यहोवाने आज तुला माझ्याकडे पाठवलंय, त्याचा गौरव होवो! ३३  तू दाखवलेल्या समंजसपणाबद्दल देव तुला आशीर्वादित करो! आज तू मला रक्‍तदोषी होण्यापासून आणि आपल्या हाताने बदला घेण्यापासून* रोखलंस,+ म्हणून देव तुला आशीर्वाद देवो. ३४  कारण ज्या इस्राएलच्या देवाने, यहोवाने मला तुझं नुकसान करण्यापासून रोखलं+ त्या जिवंत देवाची शपथ, तू जर माझ्याकडे लवकर आली नसतीस,+ तर सकाळपर्यंत नाबालचा एकही माणूस जिवंत राहिला नसता.”+ ३५  मग तिने आणलेली भेट दावीदने स्वीकारली, आणि तो तिला म्हणाला: “शांतीने आपल्या घरी जा. मी तुझं म्हणणं ऐकलंय. तुझ्या विनंतीप्रमाणे मी करीन.” ३६  नंतर अबीगईल नाबालकडे परत आली. त्या वेळी नाबाल आपल्या घरी एखाद्या राजासारखी मेजवानी करत होता. तो खूप खूश होता आणि दारू पिऊन झिंगला होता. अबीगईलने सकाळपर्यंत त्याला काहीच सांगितलं नाही. ३७  मग सकाळी, नाबालची नशा उतरल्यावर त्याच्या बायकोने, अबीगईलने त्याला सगळी हकिगत सांगितली. तेव्हा, त्याचं हृदय एखाद्या मेलेल्या माणसासारखं झालं आणि तो सुन्‍न होऊन दगडासारखा पडून राहिला. ३८  मग सुमारे दहा दिवसांनंतर यहोवाने नाबालला असा तडाखा दिला, की तो मेला. ३९  दावीदला नाबालच्या मृत्यूची खबर मिळाली तेव्हा तो म्हणाला: “नाबालने केलेल्या अपमानाबद्दल+ माझी वकिली करणाऱ्‍या आणि आपल्या सेवकाला वाईट करण्यापासून आवरणाऱ्‍या+ यहोवाची स्तुती होवो!+ नाबालचा दुष्टपणा यहोवाने त्याच्याच माथी मारला!” मग दावीदने अबीगईलला निरोप पाठवून तिला लग्नाची मागणी घातली. ४०  दावीदचे सेवक कर्मेलमध्ये अबीगईलकडे येऊन तिला म्हणाले: “तुम्हाला आपली बायको करून घ्यायची दावीदची इच्छा आहे. आणि म्हणून त्याने तुम्हाला घेऊन यायला आम्हाला पाठवलंय.” ४१  तेव्हा तिने लगेच जमिनीवर डोकं टेकवून नमन केलं, आणि ती म्हणाली: “मी माझ्या प्रभूच्या सेवकांचे पाय धुणारी+ दासी व्हायला तयार आहे.” ४२  मग अबीगईल+ पटकन उठली आणि आपल्या गाढवावर बसून निघाली. तिच्यासोबत तिच्या पाच दासीही होत्या आणि त्या तिच्या मागून चालत येत होत्या. ती दावीदच्या माणसांसोबत गेली आणि त्याची बायको बनली. ४३  दावीदने इज्रेलमधल्या+ अहीनवाम हिच्याशीसुद्धा लग्न केलं होतं.+ आणि त्या दोघी त्याच्या बायका बनल्या.+ ४४  पण शौलने आपल्या मुलीला, म्हणजे दावीदची बायको मीखल+ हिला लईशचा मुलगा पालती+ याला देऊन टाकलं होतं. तो गल्लीम इथे राहणारा होता.

तळटीपा

कर्मेल डोंगर नाही, तर यहूदातलं एक शहर.
शब्दशः “चांगल्या दिवशी.”
किंवा “कुचकामी आहे.”
३५ लीटरच्या भांड्यात मावेल इतका हुरडा. अति. ख१४ पाहा.
किंवा कदाचित, “मला.”
म्हणजे, “अविचारी; मूर्ख.”
किंवा “उद्धार करण्यापासून.”
शब्दशः “आशीर्वाद.”
किंवा “उद्धार केल्याचा.”
शब्दशः “डळमळणं किंवा अडखळणं.”
किंवा “उद्धार करण्यापासून.”