१ शमुवेल २६:१-२५

  • पुन्हा संधी मिळूनही दावीद शौलचा जीव घेत नाही (१-२५)

    • दावीद यहोवाच्या अभिषिक्‍ताचा आदर करतो (११)

२६  काही काळाने, जीफचे+ लोक गिबा+ इथे शौलकडे आले आणि म्हणाले: “दावीद यशीमोनसमोर* असलेल्या हकीला टेकडीवर लपून बसलाय.”+ २  तेव्हा शौलने इस्राएलच्या ३,००० निवडलेल्या माणसांना आपल्याबरोबर घेतलं आणि तो दावीदचा शोध करायला जीफच्या ओसाड रानात गेला.+ ३  शौलने यशीमोनसमोर हकीला टेकडीवर, रस्त्याच्या कडेला छावणी दिली. त्या वेळी दावीद ओसाड रानात राहत होता. दावीदला समजलं, की शौल आपला शोध घेत ओसाड रानात आला आहे. ४  शौल खरंच आला आहे का, याची खातरी करायला दावीदने गुप्तहेर पाठवले. ५  नंतर दावीद, शौलने छावणी दिली होती त्या ठिकाणी गेला. शौल आणि त्याचा सेनापती, म्हणजे नेरचा मुलगा अबनेर+ हे कुठे झोपले आहेत हे त्याने पाहून ठेवलं. शौल छावणीच्या मधोमध गाढ झोपला होता आणि त्याच्या चारही बाजूंना सैनिकांनी तळ दिला होता. ६  मग दावीदने हित्ती+ अहीमलेख आणि सरूवाचा+ मुलगा अबीशय+ (अबीशय हा यवाबचा भाऊ होता) या दोघांना विचारलं: “माझ्यासोबत खाली शौलच्या छावणीत यायला कोण तयार आहे?” तेव्हा अबीशय म्हणाला: “मी तुझ्यासोबत यायला तयार आहे.” ७  मग दावीद आणि अबीशय रात्रीच छावणीत गेले. तिथे, छावणीच्या मधोमध त्यांना शौल गाढ झोपलेला दिसला आणि त्याचा भाला त्याच्या उशाजवळ जमिनीत रोवलेला होता. अबनेर आणि बाकीचे सैनिक शौलच्या आजूबाजूला झोपले होते. ८  तेव्हा अबीशय दावीदला म्हणाला: “आज देवाने तुझ्या शत्रूला तुझ्या हाती दिलंय.+ मला फक्‍त एकदाच त्याच्यावर भाल्याने वार करून त्याला जमिनीत खिळू दे. दुसऱ्‍यांदा वार करायची मला गरजच पडणार नाही!” ९  पण दावीद अबीशयला म्हणाला: “नाही, त्यांना काहीही करू नकोस. कारण यहोवाच्या अभिषिक्‍तावर+ हात उचलून कोण निर्दोष राहू शकेल?”+ १०  दावीद पुढे म्हणाला: “जिवंत देव यहोवा याची शपथ, यहोवा स्वतः त्यांना मारून टाकेल+ किंवा युद्धात ते मारले जातील,+ किंवा मग त्यांची वेळ येईल तेव्हा ते मरतील.+ ११  मी यहोवाच्या अभिषिक्‍तावर हात उचलण्याचा विचारसुद्धा करू शकत नाही! असं करणं यहोवाच्या दृष्टीने चुकीचं ठरेल.+ आपण असं करू, शौलच्या उशाजवळ असलेला भाला आणि पाण्याची सुरई घेऊन इथून निघून जाऊ.” १२  मग शौलच्या उशाजवळ असलेला भाला आणि पाण्याची सुरई दावीदने घेतली. त्यानंतर ते तिथून निघून गेले. ते दोघं तिथे आल्याचं कोणीही पाहिलं नाही,+ कोणाला त्यांची चाहूल लागली नाही किंवा कोणाला जागही आली नाही. कारण ते सर्व झोपले होते; यहोवानेच त्यांना गाढ झोप आणली होती. १३  मग दावीद पलीकडे गेला आणि एका दूरच्या डोंगरावर जाऊन उभा राहिला. त्याच्यात आणि शौलच्या छावणीत बरंच अंतर होतं. १४  दावीद मग सैनिकांना आणि नेरचा मुलगा अबनेर+ याला हाक मारून म्हणाला: “हे अबनेर, ऐकतोस का?” त्यावर अबनेर म्हणाला: “राजाला कोण हाक मारतंय? कोण आहेस तू?” १५  दावीद अबनेरला म्हणाला: “शूर योद्धा आहेस ना तू? इस्राएलात तुझ्या तोडीचा कोण आहे? आणि तरीही तू आपल्या प्रभूचं, आपल्या राजाचं रक्षण का केलं नाहीस? बघ! एक सैनिक तुझ्या प्रभूचा, तुझ्या राजाचा जीव घ्यायला आला होता.+ १६  तू आपलं कर्तव्य पार पाडायला चुकलास. जिवंत देव यहोवाची शपथ, तुला मृत्यूची शिक्षा मिळालीच पाहिजे. कारण तुझ्या प्रभूचं, यहोवाच्या अभिषिक्‍ताचं तू रक्षण केलं नाहीस.+ राजाच्या उशाजवळ त्याचा भाला आणि पाण्याची सुरई होती.+ ती आता कुठे गेली? बघ बरं जरा!” १७  शौलने दावीदचा आवाज ओळखला आणि तो म्हणाला: “दावीद, माझ्या मुला, हा तुझा आवाज आहे का?”+ तेव्हा दावीद म्हणाला: “हे राजा, माझ्या प्रभू, मीच बोलतोय.” १८  तो पुढे म्हणाला: “प्रभू, तुम्ही आपल्या या सेवकाचा पाठलाग का करताय?+ मी काय केलंय? माझा दोष काय आहे?+ १९  हे राजा, माझ्या प्रभू, कृपया तुमच्या या सेवकाचं म्हणणं ऐकून घ्या: जर यहोवाने तुम्हाला माझ्याविरुद्ध चिथवलं असेल, तर त्याने माझं अन्‍नार्पण स्वीकारावं. पण जर माणसांनी तुम्हाला माझ्याविरुद्ध भडकवलं असेल,+ तर त्यांना यहोवाचा शाप लागो. कारण, आज त्यांनी मला यहोवाच्या लोकांमधून* हाकलून दिलंय.+ एका अर्थी ते मला म्हणत आहेत: ‘जा, दुसऱ्‍या दैवतांची उपासना कर!’ २०  म्हणून आता यहोवापासून दूर अशा जमिनीवर माझं रक्‍त सांडू देऊ नका. कारण डोंगरांवर तितर पक्ष्याच्या शिकारीला जावं, तसं इस्राएलचा राजा एका पिसवेला पकडायला निघालाय.”+ २१  तेव्हा शौल म्हणाला: “मी पाप केलंय.+ दावीद, माझ्या मुला, परत ये! मी तुला काहीही करणार नाही. कारण आज तू दाखवून दिलंस, की तुला माझा जीव मौल्यवान वाटतो.+ मी खरंच मूर्खपणे वागलो; मी खूप मोठी चूक केली.” २२  त्यावर दावीद म्हणाला: “हे राजा, पाहा तुमचा भाला इथे आहे. तो घेऊन जायला तुमच्या एका माणसाला इकडे पाठवा. २३  यहोवाच प्रत्येकाच्या नीतिमान कार्यांची आणि विश्‍वासूपणाची परतफेड करेल.+ कारण आज यहोवाने तुम्हाला माझ्या हाती दिलं होतं, पण मी यहोवाच्या अभिषिक्‍तावर हात उचलला नाही.+ २४  आज मला जसा तुमचा जीव मौल्यवान वाटला, तसाच यहोवालासुद्धा माझा जीव मौल्यवान वाटो. आणि माझ्या सगळ्या संकटांतून तो माझी सुटका करो.”+ २५  तेव्हा शौल दावीदला म्हणाला: “दावीद, माझ्या मुला! देवाचा आशीर्वाद तुझ्यावर असो. तू नक्कीच मोठमोठी कार्यं करशील आणि नक्कीच विजयी होशील.”+ त्यानंतर, दावीद आपल्या मार्गाने निघून गेला आणि शौल आपल्या घरी परत गेला.+

तळटीपा

किंवा कदाचित, “वाळवंटासमोर; ओसाड रानासमोर.”
शब्दशः “‘वारशातून;’ यात लोक आणि त्यांचा देश या दोन्ही गोष्टींचा समावेश असू शकतो.”