१ शमुवेल २७:१-१२

  • पलिष्टी लोक दावीदला सिक्लाग शहर देतात (१-१२)

२७  पण दावीदने मनात विचार केला: “एक ना एक दिवस मी नक्कीच शौलच्या हातून मारला जाईन. म्हणून मी पलिष्टी लोकांच्या देशात पळून गेलेलंच बरं.+ म्हणजे मग शौल इस्राएलमध्ये माझा शोध घेण्याचं सोडून देईल,+ आणि मी त्याच्या हातून वाचेन.” २  मग दावीदने आपल्या ६०० माणसांना+ सोबत घेतलं आणि तो गथचा राजा आखीश+ याच्याकडे गेला; आखीश हा मावोखचा मुलगा होता. ३  दावीद आणि त्याची माणसं गथमध्ये आखीशसोबत राहिली; सर्व जण आपापल्या कुटुंबासोबत तिथे राहिले. दावीदसोबत त्याच्या दोन बायका होत्या; इज्रेलमधली अहीनवाम+ आणि कर्मेलमधली नाबालची विधवा अबीगईल.+ ४  दावीद गथला पळून गेल्याची खबर जेव्हा शौलला मिळाली, तेव्हा त्याने त्याचा शोध घेण्याचं सोडून दिलं.+ ५  नंतर दावीद आखीशला म्हणाला: “तुमच्या या सेवकाने तुमच्यासोबत इथे राजधानीत का राहावं? आता तुमची माझ्यावर कृपा असेल, तर राज्यातल्या एखाद्या लहानशा शहरात मला जागा द्या, म्हणजे मी तिथे राहीन.” ६  तेव्हा आखीशने त्या दिवशी त्याला सिक्लाग+ शहर दिलं. म्हणून आजपर्यंत सिक्लाग हे शहर यहूदाच्या राजांचं आहे. ७  एक संपूर्ण वर्ष आणि चार महिने दावीद पलिष्ट्यांच्या देशात राहिला.+ ८  त्या काळात, तो आपल्या माणसांना घेऊन गशूरी,+ गिरजी आणि अमालेकी लोकांवर+ हल्ला करून त्यांना लुटायचा; हे लोक, तेलमपासून शूरपर्यंत+ आणि पुढे खाली इजिप्त देशापर्यंत असलेल्या प्रदेशांत राहायचे. ९  दावीद या प्रदेशांवर हल्ला करायचा, तेव्हा तो कोणत्याही स्त्री किंवा पुरुषाला जिवंत सोडायचा नाही.+ पण त्यांची मेंढरं, बकऱ्‍या, गुरंढोरं, गाढवं, उंट आणि कपडेलत्ते असं सर्वकाही तो लुटायचा आणि आखीशकडे परत यायचा. १०  आखीश जेव्हा त्याला विचारायचा: “आज तू कुठे लूटमार केलीस?” तेव्हा दावीद म्हणायचा: “यहूदाच्या दक्षिण प्रदेशात,”*+ किंवा “यरहमेलच्या दक्षिण प्रदेशात,”+ किंवा मग “केनी लोकांच्या दक्षिण प्रदेशात.”+ ११  दावीद एकाही स्त्रीला किंवा पुरुषाला जिवंत ठेवायचा नाही आणि गथमध्ये आणायचा नाही. कारण तो विचार करायचा: “कदाचित ते आपल्याविषयी त्यांना सगळं काही सांगतील आणि म्हणतील: ‘दावीदने असं-असं केलं.’” (दावीद जितका काळ पलिष्टी लोकांच्या देशात राहिला त्या संपूर्ण काळात तो असंच करायचा.) १२  त्यामुळे आखीशने दावीदवर विश्‍वास ठेवला. त्याने विचार केला: ‘त्याचे इस्राएली लोक नक्कीच त्याचा तिरस्कार करत असतील. तेव्हा आता त्याला कायमचा माझा दास होऊन राहावं लागेल.’

तळटीपा

किंवा “नेगेबमध्ये.”