१ शमुवेल ३:१-२१

  • संदेष्टा होण्यासाठी शमुवेलची निवड (१-२१)

 शमुवेल हा मुलगा एलीच्या देखरेखीखाली यहोवाची सेवा करत होता.+ त्या दिवसांत, यहोवाकडून संदेश मिळणं फार कमी झालं होतं; आणि त्याच्याकडून दृष्टान्तही+ सहसा मिळत नव्हते. २  एकदा एली आपल्या खोलीत झोपला होता. त्याची दृष्टी मंद झाली होती आणि त्याला फारसं काही दिसत नव्हतं.+ ३  देवाच्या घरात लावलेला दिवा+ अजून विझला नव्हता. शमुवेल यहोवाच्या मंदिरात*+ झोपला होता, आणि मंदिरात देवाच्या कराराची पेटी होती. ४  तेव्हा यहोवाने शमुवेलला आवाज दिला. त्यावर शमुवेल म्हणाला: “हो आलो!” ५  मग तो धावत एलीकडे गेला आणि म्हणाला: “तुम्ही बोलवलंत मला?” पण एली त्याला म्हणाला: “नाही, मी नाही बोलवलं. जा, जाऊन झोप परत.” म्हणून शमुवेल गेला आणि जाऊन झोपला. ६  यहोवाने पुन्हा त्याला आवाज दिला: “शमुवेल!” तेव्हा शमुवेल लगेच उठून एलीकडे गेला आणि म्हणाला: “तुम्ही बोलवलंत मला?” पण एली त्याला म्हणाला: “नाही बाळा, मी नाही बोलवलं. जा जाऊन झोप.” ७  (आतापर्यंत शमुवेलला यहोवाची पूर्णपणे ओळख झाली नव्हती. आणि यहोवाने त्याला आपला संदेश द्यायला सुरुवात केली नव्हती.)+ ८  मग यहोवाने पुन्हा तिसऱ्‍यांदा त्याला आवाज दिला: “शमुवेल!” तेव्हा शमुवेल परत उठला आणि एलीकडे जाऊन त्याला म्हणाला: “तुम्ही बोलवलंत मला?” त्या वेळी एलीच्या लक्षात आलं, की यहोवाच त्या मुलाला आवाज देत आहे. ९  म्हणून तो शमुवेलला म्हणाला: “जा जाऊन झोप. आणि त्याने जर पुन्हा तुला आवाज दिला तर म्हण: ‘हे यहोवा! बोल, तुझा सेवक ऐकतोय.’” मग शमुवेल गेला आणि आपल्या जागी जाऊन झोपला. १०  मग यहोवा तिथे येऊन उभा राहिला आणि त्याने आधीसारखंच या वेळीही शमुवेलला आवाज दिला: “शमुवेल, शमुवेल!” त्यावर शमुवेल म्हणाला: “हे देवा बोल, तुझा सेवक ऐकतोय.” ११  यहोवा त्याला म्हणाला: “बघ! इस्राएलमध्ये मी असं काहीतरी करणार आहे, की जो कोणी ते ऐकेल त्याला धक्का बसेल.*+ १२  एलीच्या घराण्याबद्दल मी जे काही बोललोय, त्यातली प्रत्येक गोष्ट सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी त्या दिवशी पूर्ण करीन.+ १३  मी एलीच्या घराण्याला कडक शिक्षा देईन आणि त्याचे परिणाम त्यांना कायम भोगावे लागतील हे तू त्याला सांग. कारण, आपली मुलं देवाची निंदा करत आहेत+ हे माहीत असूनही+ त्याने त्यांना फटकारलं नाही.+ १४  आणि म्हणूनच मी अशी शपथ घेतली आहे, की एलीच्या घराण्याने केलेल्या पापाचं प्रायश्‍चित्त कोणत्याही बलिदानांनी किंवा अर्पणांनी कधीही होणार नाही.”+ १५  शमुवेल सकाळ होईपर्यंत झोपून राहिला. मग त्याने उठून यहोवाच्या घराची दारं उघडली. त्याने जो दृष्टान्त पाहिला होता त्याबद्दल तो एलीला सांगायला घाबरत होता. १६  पण एलीने शमुवेलला हाक मारली: “शमुवेल बाळा!” त्यावर तो म्हणाला: “हो आलो.” १७  एली त्याला म्हणाला: “देवाने तुला काय संदेश सांगितला? बाळा, माझ्यापासून काहीही लपवू नकोस. देवाने तुला जे काही सांगितलं त्यातला एकही शब्द जर तू माझ्यापासून लपवलास तर देव तुला कडक शिक्षा देईल.” १८  तेव्हा शमुवेलने त्याला सगळं काही सांगितलं; त्याच्यापासून काहीही लपवलं नाही. त्यावर एली म्हणाला: “तो यहोवा आहे. त्याला जसं योग्य वाटतं तसं तो करो.” १९  शमुवेल मोठा होत गेला. यहोवा त्याच्यासोबत होता+ आणि त्याने त्याचा एकही शब्द खोटा ठरू दिला नाही. २०  यहोवाने शमुवेलला आपला संदेष्टा म्हणून निवडलं आहे हे दानपासून बैर-शेबापर्यंत सगळ्या इस्राएली लोकांना समजलं. २१  आणि यहोवा शिलोमध्ये प्रकट होत राहिला; म्हणजे यहोवा शिलोमध्ये यहोवाच्या वचनांद्वारे शमुवेलसमोर प्रकट होत राहिला.+

तळटीपा

म्हणजे, उपासना मंडपात.
शब्दशः “त्याचे दोन्ही कान भणभणतील.”