१ शमुवेल ३०:१-३१

  • अमालेकी लोक सिक्लागवर हल्ला करून ते जाळतात (१-६)

    • दावीदला देवाकडून बळ मिळतं ()

  • दावीदचा अमालेकी लोकांवर विजय (७-३१)

    • कैद करून नेलेल्यांना दावीद सोडवतो (१८, १९)

    • लुटीच्या बाबतीत दावीदचा कायदा (२३, २४)

३०  दावीद आणि त्याची माणसं तिसऱ्‍या दिवशी सिक्लागमध्ये+ आली, तेव्हा त्यांनी पाहिलं की अमालेकी+ लोकांनी दक्षिण* प्रदेशावर आणि सिक्लागवर हल्ला करून ते लुटलं आहे. तसंच त्यांनी सिक्लाग शहर जाळून टाकलं आहे. २  अमालेकी लोकांनी त्या शहरातल्या स्त्रियांना आणि लहान-मोठ्या अशा सगळ्यांना कैद करून नेलं होतं.+ त्यांनी कोणालाही ठार मारलं नव्हतं; पण त्या सगळयांना ते कैद करून घेऊन गेले होते. ३  दावीद आणि त्याची माणसं शहरात आली, तेव्हा आपलं शहर जाळून टाकण्यात आलं आहे आणि आपल्या बायकांना आणि मुला-मुलींना कैद करून नेण्यात आलं आहे असं त्यांना दिसलं. ४  त्यामुळे दावीद आणि त्याच्यासोबतचे लोक मोठमोठ्याने रडू लागले. ते इतके रडले की त्यांच्यात आणखी रडण्याची शक्‍ती उरली नाही. ५  दावीदच्या दोन बायका, म्हणजे इज्रेलमधली अहीनवाम आणि कर्मेलमधली नाबालची विधवा अबीगईल+ यांनाही कैद करून नेण्यात आलं होतं. ६  दावीदच्या माणसांचं मन, आपल्या मुला-मुलींना गमावल्याच्या दुःखामुळे खूप कटू झालं. आणि ते दावीदला दगडमार करण्याच्या गोष्टी करू लागले. त्यामुळे दावीद अतिशय दुःखी झाला. पण तो मदतीसाठी आपला देव यहोवा याच्याकडे वळला आणि त्याला बळ मिळालं.+ ७  मग, दावीद अहीमलेखच्या मुलाला, अब्याथार+ याजकाला म्हणाला: “कृपया एफोद इकडे आण.”+ म्हणून अब्याथारने दावीदकडे एफोद आणलं. ८  दावीदने यहोवाला विचारलं:+ “मी लुटारूंच्या टोळीचा पाठलाग करू का? मला त्यांना पकडता येईल का?” त्यावर देव त्याला म्हणाला: “जा, त्यांचा पाठलाग कर. तू त्यांना नक्की पकडशील आणि सगळं काही परत मिळवशील.”+ ९  मग दावीद लगेच आपली ६०० माणसं+ घेऊन निघाला. ते बसोर ओढ्यापर्यंत* गेले, तेव्हा काही माणसं तिथेच थांबली. १०  ही २०० माणसं इतकी थकली होती, की ती बसोर ओढा पार करू शकत नव्हती. म्हणून ती मागेच राहिली.+ पण दावीदने ४०० माणसांना घेऊन त्यांचा पाठलाग चालूच ठेवला. ११  रस्त्याने जाताना त्यांना माळरानात इजिप्तचा एक माणूस दिसला आणि ते त्याला दावीदकडे घेऊन आले. त्यांनी त्या माणसाला खायला अन्‍न आणि प्यायला पाणी दिलं. १२  तसंच, त्यांनी त्याला अंजिराच्या ढेपेचा एक तुकडा आणि मनुकांच्या दोन ढेपाही दिल्या. ते खाल्ल्यानंतर त्याच्या जिवात जीव आला. कारण, त्याने तीन दिवस आणि तीन रात्रींपासून काही खाल्लं नव्हतं किंवा तो काही प्यायलाही नव्हता. १३  मग दावीदने त्याला विचारलं: “तू कोणाचा सेवक आहेस? तू कुठून आलास?” त्यावर तो म्हणाला: “मी इजिप्तचा आहे. आणि एका अमालेकी माणसाचा दास आहे. पण तीन दिवसांआधी मी आजारी पडलो, म्हणून माझा मालक मला सोडून गेला. १४  आम्ही करेथी+ लोकांच्या दक्षिण* प्रदेशावर, यहूदाच्या प्रदेशावर आणि कालेबच्या+ दक्षिण* प्रदेशावर हल्ला करून ते प्रदेश लुटले. आणि सिक्लाग शहर जाळून टाकलं.” १५  तेव्हा दावीद त्याला म्हणाला: “तू मला लुटारूंच्या त्या टोळीपर्यंत घेऊन जाशील का?” तो म्हणाला: “मी तुम्हाला लुटारूंच्या टोळीकडे घेऊन जाईन. पण त्याआधी तुम्ही देवाची शपथ घेऊन मला वचन द्या, की तुम्ही मला मारून टाकणार नाहीत किंवा मला माझ्या मालकाच्या ताब्यात देणार नाहीत.” १६  मग तो दावीदला तिकडे घेऊन गेला. तिथे ते लोक मैदानावर सगळीकडे पसरलेले होते. ते खातपीत होते आणि मजा करत होते. कारण त्यांनी पलिष्ट्यांच्या देशातून आणि यहूदातून मोठी लूट मिळवली होती. १७  मग दावीदने पहाटेच्या अंधारापासून रात्री अंधार पडेपर्यंत* त्यांची कत्तल केली. उंटांवर बसून पळून गेलेल्या ४०० माणसांशिवाय एकही माणूस त्याच्या हातून सुटला नाही.+ १८  अमालेकी लोकांनी जे काही लुटून नेलं होतं, ते सर्व दावीदने परत मिळवलं.+ त्याने आपल्या दोन्ही बायकांनाही सोडवलं. १९  लहान-मोठे, मुलं-मुली, किंवा लूट म्हणून नेलेलं काहीही परत मिळवायचं बाकी राहिलं नाही.+ त्यांनी लुटून नेलेलं सर्वकाही दावीदने परत मिळवलं. २०  दावीदने लुटारूंची सर्व मेंढरं, बकऱ्‍या आणि गुरंढोरं घेतली. आणि त्याच्या माणसांनी ती आपल्या जनावरांपुढे हाकून नेली. ते म्हणाले: “ही दावीदची लूट आहे.” २१  मग दावीद बसोरच्या ओढ्याजवळ+ थांबून राहिलेल्या २०० माणसांकडे परत आला; ही माणसं फार थकल्यामुळे त्याच्यासोबत जाऊ शकली नव्हती. ती दावीदला आणि त्याच्यासोबतच्या लोकांना भेटायला समोर आली, तेव्हा दावीदने त्यांच्याकडे जाऊन त्यांची विचारपूस केली. २२  पण दावीदसोबत गेलेल्या माणसांपैकी काही वाईट आणि नीच माणसं दावीदला म्हणाली: “ते आपल्यासोबत आले नाहीत. म्हणून परत मिळवलेल्या लुटीतलं काहीएक आम्ही त्यांना देणार नाही. त्यांना फक्‍त त्यांच्या बायका आणि मुलं मिळतील. त्यांना घेऊन त्यांनी निघून जावं.” २३  पण दावीद म्हणाला: “माझ्या भावांनो! हे सगळं यहोवानेच आपल्याला दिलंय. तेव्हा असं वागू नका. त्यानेच आपलं संरक्षण केलं. आणि आपल्याविरुद्ध आलेल्या लुटारूंच्या टोळीला त्यानेच आपल्या हाती दिलं.+ २४  तेव्हा तुमचं म्हणणं कोणाला पटेल? लढाईवर गेलेल्या माणसाला जितका वाटा मिळेल, तितकाच सामानाजवळ थांबलेल्या माणसालाही मिळेल.+ सगळ्यांना सारखाच वाटा मिळेल.”+ २५  दावीदचा हा निर्णय, त्या दिवसापासून आजपर्यंत संपूर्ण इस्राएलमध्ये कायदा आणि नियम बनला. २६  दावीद सिक्लाग इथे परत आला, तेव्हा त्याने आपल्या मित्रांना, म्हणजे यहूदातल्या वडीलजनांना लुटीतला काही माल पाठवून म्हटलं: “यहोवाच्या शत्रूंपासून मिळवलेल्या लुटीतून ही तुम्हाला पाठवलेली भेट* आहे.” २७  त्याने ज्यांना भेट पाठवली ते बेथेल,+ नेगेबकडचं* रामोथ, यत्तीर,+ २८  अरोएर, सिफमोथ, एष्टमोवा,+ २९  राखाल, यरहमेली+ लोकांची शहरं, केनी+ लोकांची शहरं, ३०  हर्मा,+ बोर-आशान, अथाख, ३१  हेब्रोन+ इथले राहणारे, आणि दावीद व त्याची माणसं ज्या ठिकाणी नेहमी जायची तिथले राहणारे होते.

तळटीपा

किंवा “नेगेब.”
किंवा “खोऱ्‍यापर्यंत;” शब्दार्थसूचीत “खोरं” पाहा.
किंवा “नेगेब.”
किंवा “नेगेब.”
किंवा “दुसऱ्‍या दिवशी संध्याकाळपर्यंत.”
शब्दशः “आशीर्वाद.”
किंवा “दक्षिणेकडचं.”