१ शमुवेल ४:१-२२

  • पलिष्टी लोक कराराची पेटी घेऊन जातात (१-११)

  • एली आणि त्याच्या मुलांचा मृत्यू (१२-२२)

 देव शमुवेलद्वारे सर्व इस्राएली लोकांना आपला संदेश कळवत राहिला. मग इस्राएली लोक पलिष्टी लोकांसोबत युद्ध करायला निघाले. त्यांनी एबन-एजर इथे छावणी केली, तर पलिष्टी सैनिकांनी अफेक इथे छावणी केली. २  पलिष्टी लोकांनी इस्राएलशी लढण्यासाठी सैन्यरचना केली. पलिष्ट्यांपुढे इस्राएली लोकांचा पराभव होऊ लागला. पलिष्ट्यांनी इस्राएली लोकांना हरवलं आणि युद्धभूमीवर त्यांचे जवळपास ४,००० सैनिक मारून टाकले. ३  इस्राएली सैनिक छावणीत परत आले तेव्हा इस्राएलचे वडीलजन म्हणाले: “आज यहोवाने पलिष्टी लोकांसमोर आपल्याला का हरू दिलं?*+ आता आपण शिलोमधून+ यहोवाच्या कराराची पेटी आपल्यासोबत घेऊन जाऊ. म्हणजे ती आपल्याबरोबर राहील आणि शत्रूंपासून आपल्याला वाचवेल.” ४  त्यामुळे लोकांनी शिलो इथे काही माणसांना पाठवलं. ती माणसं, करुबांच्या+ वर* विराजमान असलेला सैन्यांचा देव यहोवा याच्या कराराची पेटी तिथून घेऊन आली. एलीची दोन मुलं, हफनी आणि फिनहास+ हीसुद्धा खऱ्‍या देवाच्या कराराच्या पेटीसोबत होती. ५  यहोवाच्या कराराची पेटी छावणीमध्ये येताच सगळे इस्राएली लोक मोठ्याने जल्लोष करू लागले; ते इतक्या मोठ्याने जल्लोष करू लागले की जमीन हादरायला लागली. ६  तो आवाज ऐकून पलिष्टी लोक म्हणाले: “इब्री लोकांच्या छावणीत हा कसला गोंगाट चाललाय?” नंतर त्यांना समजलं, की यहोवाच्या कराराची पेटी इस्राएलच्या छावणीत आली आहे. ७  तेव्हा पलिष्टी लोक फार घाबरले आणि म्हणाले: “त्यांच्या छावणीत देव आला आहे!”+ ते म्हणू लागले: “आता आपली काही खैर नाही. असं काही कधीच घडलं नव्हतं! ८  आता आपलं काय होईल? या शक्‍तिशाली देवाच्या हातून आपल्याला कोण वाचवेल? ज्याने ओसाड रानात इजिप्तच्या लोकांवर वेगवेगळ्या पीडा आणून त्यांना मारून टाकलं होतं तो हाच देव आहे.+ ९  पण पलिष्ट्यांनो, हिंमत धरा आणि मर्दासारखं लढा. नाहीतर, इब्री लोकांनी आपली गुलामी केली, तशी आपल्याला त्यांची गुलामी करावी लागेल.+ म्हणून आता मर्दांसारखं व्हा आणि लढा.” १०  तेव्हा पलिष्टी लोक इस्राएली लोकांशी लढले आणि त्यांनी इस्राएलला हरवून टाकलं.+ सगळे इस्राएली सैनिक आपापल्या घरी पळून गेले. त्या दिवशी फार मोठ्या प्रमाणात कत्तल झाली; इस्राएली लोकांचे ३०,००० पायदळ सैनिक मारले गेले. ११  तसंच, पलिष्ट्यांनी देवाच्या कराराची पेटी ताब्यात घेतली. एलीची दोन्ही मुलं, हफनी आणि फिनहास हीसुद्धा मारली गेली.+ १२  त्या दिवशी बन्यामीन वंशातला एक माणूस युद्धभूमीतून पळून शिलोमध्ये आला. त्याने दुःखाने आपले कपडे फाडले होते आणि डोक्यात धूळ टाकली होती.+ १३  तो आला तेव्हा एली रस्त्याच्या कडेला आपल्या आसनावर वाट बघत बसला होता. कारण त्याला खऱ्‍या देवाच्या कराराच्या पेटीची फार काळजी वाटत होती.+ त्या माणसाने, जे काही झालं ते शहरातल्या लोकांना सांगितलं, तेव्हा सगळे लोक मोठ्याने आक्रोश करू लागले. १४  तो आवाज ऐकून एलीने विचारलं: “हा काय गोंधळ आहे? कसला आवाज ऐकू येतोय?” तो माणूस धावत धावत एलीकडे आला आणि त्याने त्याला सगळी हकिगत सांगितली. १५  (एली आता ९८ वर्षांचा झाला होता आणि त्याला काहीच दिसत नव्हतं.)+ १६  तो माणूस एलीला म्हणाला: “युद्धभूमीतून पळून आलेला तो मीच आहे. आजच मी तिथून पळून आलोय.” त्यावर एली म्हणाला: “काय खबर आणलीस मुला?” १७  तेव्हा त्या माणसाने एलीला सांगितलं: “पलिष्ट्यांपुढे इस्राएली लोक फार वाईट रितीने हरले आणि युद्धातून पळून गेले.+ तुमची दोन्ही मुलं, हफनी आणि फिनहास हीसुद्धा ठार झाली.+ आणि शत्रू खऱ्‍या देवाच्या कराराची पेटी घेऊन गेले.”+ १८  त्या माणसाने खऱ्‍या देवाच्या कराराच्या पेटीचा उल्लेख करताच, दरवाजाजवळ आपल्या आसनावर बसलेला एली तिथेच मागे कोसळून पडला. तो वयस्कर आणि जाडजूड होता. त्यामुळे तो पडला तेव्हा त्याची मान मोडली आणि तो जागीच मेला. त्याने ४० वर्षं इस्राएलचा न्यायाधीश म्हणून काम केलं होतं. १९  त्याची सून, म्हणजे फिनहासची बायको गरोदर होती आणि बाळाला जन्म द्यायची वेळ जवळ आली होती. शत्रूंनी खऱ्‍या देवाच्या कराराची पेटी ताब्यात घेतली आहे; तसंच, आपल्या सासऱ्‍याचा आणि नवऱ्‍याचा मृत्यू झाला आहे, हे ऐकल्याबरोबर तिच्या कळा सुरू झाल्या. आणि प्रसूतीच्या वेदना अचानक वाढून तिने बाळाला जन्म दिला. २०  आणि त्यानंतर ती मेली. पण अखेरचा श्‍वास घेत असताना तिच्या जवळ उभ्या असलेल्या स्त्रिया तिला म्हणाल्या: “घाबरू नकोस, तुला मुलगा झालाय.” पण तिने त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही आणि काही उत्तरही दिलं नाही. २१  पण तिने त्या बाळाला ईखाबोद*+ असं नाव दिलं, आणि ती म्हणाली: “इस्राएलचं वैभव गेलंय!”+ कारण, शत्रू खऱ्‍या देवाच्या कराराची पेटी घेऊन गेले होते आणि तिचा सासरा व नवरा मेला होता.+ २२  ती म्हणाली: “इस्राएलचं वैभव गेलंय, कारण खऱ्‍या देवाच्या कराराची पेटी शत्रू घेऊन गेले.”+

तळटीपा

शब्दशः “यहोवाने आपल्याला का हरवलं?”
किंवा कदाचित, “करुबांच्या मधे.”
म्हणजे “वैभव कुठे गेलं?”