१ शमुवेल ५:१-१२

  • पलिष्ट्यांच्या प्रदेशात कराराची पेटी (१-१२)

    • दागोनचा अपमान (१-५)

    • पलिष्टी लोकांवर आलेली पीडा (६-१२)

 पलिष्टी लोकांनी ताब्यात घेतलेली खऱ्‍या देवाच्या कराराची पेटी+ त्यांनी एबन-एजरमधून अश्‍दोद इथे आणली. २  खऱ्‍या देवाच्या कराराची ती पेटी त्यांनी दागोन दैवताच्या मंदिरात नेली आणि दागोनच्या मूर्तीजवळ ठेवली.+ ३  दुसऱ्‍या दिवशी अश्‍दोदचे लोक पहाटेच उठले तेव्हा पाहतात तर काय! दागोनची मूर्ती यहोवाच्या कराराच्या पेटीपुढे जमिनीवर पालथी पडली आहे.+ म्हणून त्यांनी ती मूर्ती उचलून पुन्हा तिच्या जागेवर ठेवली.+ ४  मग परत दुसऱ्‍या दिवशी लोक पहाटे उठले तेव्हा त्यांनी पाहिलं, की दागोनची मूर्ती पुन्हा यहोवाच्या कराराच्या पेटीपुढे जमिनीवर पालथी पडली आहे. आणि दागोनचं डोकं व त्याच्या दोन्ही हातांचे तळवे तुटून मंदिराच्या उंबरठ्यावर पडले आहेत. फक्‍त माशासारखं दिसणारं त्याचं धड* तेवढं शाबूत आहे. ५  म्हणूनच आजपर्यंत अश्‍दोदमध्ये, दागोनचे पुजारी आणि त्याच्या मंदिरात जाणारे लोक मंदिराच्या उंबरठ्यावर पाय ठेवत नाहीत. ६  यहोवाने अश्‍दोदच्या लोकांना कडक शिक्षा दिली. त्याने अश्‍दोदमधल्या लोकांना आणि त्याच्या आसपासच्या प्रदेशात राहणाऱ्‍या लोकांना मूळव्याधीच्या आजाराने पिडलं.+ ७  ते बघून अश्‍दोदचे लोक म्हणाले: “इस्राएलच्या देवाच्या कराराची पेटी आपल्यामध्ये ठेवायला नको. कारण इस्राएलचा देव आपल्याशी आणि आपल्या दागोन दैवताशी फार कठोरपणे वागलाय.” ८  म्हणून त्यांनी पलिष्ट्यांच्या सगळ्या प्रमुखांना निरोप पाठवून बोलावून घेतलं. आणि त्यांना एकत्र जमवून विचारलं: “इस्राएलच्या देवाच्या कराराच्या पेटीचं काय करायचं?” तेव्हा ते म्हणाले: “इस्राएलच्या देवाच्या कराराची पेटी इथून हलवा आणि गथमध्ये घेऊन जा.”+ म्हणून त्यांनी ती पेटी गथला नेली. ९  कराराची पेटी गथला नेण्यात आली, तेव्हा यहोवाने त्या शहरालाही कडक शिक्षा दिली आणि तिथल्या लोकांमध्ये खूप भीती पसरली. त्याने त्या शहरातल्या छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना मूळव्याधीने पिडलं.+ १०  म्हणून गथच्या लोकांनी खऱ्‍या देवाच्या कराराची पेटी एक्रोनला+ पाठवली. पण कराराची पेटी एक्रोनला पोहोचताच तिथले लोक मोठमोठ्याने ओरडू लागले आणि म्हणू लागले: “ते इस्राएलच्या देवाच्या कराराची पेटी आमच्याकडे का घेऊन आलेत? त्यांना काय आम्हाला आणि आमच्या लोकांना मारून टाकायचंय?”+ ११  म्हणून त्यांनी पलिष्ट्यांच्या सगळ्या प्रमुखांना निरोप पाठवून बोलावून घेतलं. आणि त्यांना एकत्र जमवून ते म्हणाले: “इस्राएलच्या देवाच्या कराराची पेटी इथून घेऊन जा. ती तिच्या जागी परत पाठवून द्या. म्हणजे आम्ही आणि आमचे लोक मरणार नाहीत.” कारण, त्या संपूर्ण शहरात मृत्यूचं भय पसरलं होतं. खऱ्‍या देवाने शहराला खूप कडक शिक्षा दिली होती.+ १२  जे लोक मेले नव्हते त्यांना मूळव्याधीच्या आजाराने पिडलं. आणि शहरातले लोक वर आकाशाकडे बघून मदतीसाठी धावा करू लागले.

तळटीपा

शब्दशः “फक्‍त दागोन.”