१ शमुवेल ८:१-२२

  • इस्राएली लोक एक राजा मागतात (१-९)

  • शमुवेल लोकांना परिणामांबद्दल बजावून सांगतो (१०-१८)

  • राजासाठी केलेली लोकांची विनंती यहोवा मान्य करतो (१९-२२)

 शमुवेल वृद्ध झाला तेव्हा त्याने आपल्या मुलांना इस्राएलचे न्यायाधीश म्हणून नेमलं. २  त्याच्या पहिल्या मुलाचं नाव योएल, तर दुसऱ्‍या मुलाचं नाव अबीया होतं.+ ते दोघं बैर-शेबा इथे न्यायाधीश म्हणून काम करायचे. ३  पण शमुवेलच्या मुलांनी त्याच्या उदाहरणाचं अनुकरण केलं नाही. ते बेइमानीने पैसा कमवायचे,+ लाच घ्यायचे+ आणि जाणूनबुजून चुकीचा न्याय करायचे.+ ४  काही काळानंतर इस्राएलचे सर्व वडीलजन एकत्र जमले आणि रामा इथे शमुवेलकडे आले. ५  ते त्याला म्हणाले: “हे बघ, तुझं आता वय झालंय, आणि तुझी मुलंपण तुझ्यासारखी वागत नाहीत. म्हणून आता दुसऱ्‍या राष्ट्रांसारखंच आमच्यावरही न्याय करायला एक राजा नेम.”+ ६  पण ते जेव्हा असं म्हणाले, की “आमचा न्यायनिवाडा करायला आम्हाला एक राजा दे,” तेव्हा शमुवेलला फार वाईट वाटलं. त्यामुळे शमुवेलने यहोवाला प्रार्थना केली, ७  आणि यहोवा शमुवेलला म्हणाला: “हे लोक तुला जे काही सांगतात ते सगळं कर. कारण त्यांनी तुला नाकारलेलं नाही, तर राजा म्हणून मला नाकारलंय.+ ८  मी त्यांना इजिप्तमधून बाहेर आणलं तेव्हापासून आजपर्यंत ते असंच वागत आलेत. ते नेहमी मला सोडून+ इतर दैवतांची उपासना करत राहिले.+ आणि आता तुझ्यासोबतही ते तसंच वागत आहेत. ९  तर आता, ते जे काही सांगतात ते कर. पण या गोष्टीचे परिणाम काय होतील ते त्यांना बजावून सांग. जो राजा त्यांच्यावर राज्य करेल, त्याला त्यांच्याकडून कोणकोणत्या गोष्टी मागण्याचा हक्क असेल ते त्यांना सांग.” १०  मग यहोवा जे काही म्हणाला ते सर्व शमुवेलने, राजाची मागणी करणाऱ्‍या लोकांना सांगितलं. ११  तो म्हणाला: “जो राजा तुमच्यावर राज्य करेल त्याला तुमच्याकडून या गोष्टी मागण्याचा हक्क असेल:+ तो तुमच्या मुलांना घेऊन+ आपल्या रथांसाठी+ आणि आपले घोडेस्वार होण्यासाठी ठेवेल.+ आणि त्यांच्यापैकी काहींना त्याच्या रथांपुढे धावावं लागेल. १२  तो काहींना हजार सैनिकांवर,+ तर काहींना पन्‍नास सैनिकांवर प्रमुख नेमेल.+ तसंच, काहींना तो आपली शेतं नांगरायला+ आणि आपल्या पिकांची कापणी करायला लावेल.+ आणि काहींना आपल्यासाठी युद्धाची शस्त्रं व रथ बनवायला लावेल.+ १३  तो तुमच्या मुलींना नेऊन सुगंधी अत्तरं बनवायला, स्वयंपाक करायला आणि भटारखान्यात* काम करायला लावेल.+ १४  तो तुमची चांगल्यातली चांगली शेतं, तुमचे द्राक्षमळे आणि तुमच्या जैतुनाच्या बागा घेऊन+ आपल्या सेवकांना देईल. १५  तो तुमच्या शेतांतल्या धान्यांचा आणि द्राक्षमळ्यांच्या उत्पन्‍नाचा दहावा हिस्सा घेऊन आपल्या दरबाऱ्‍यांना आणि सेवकांना देईल. १६  तो तुमचे दास-दासी, तुमची उत्तम गुरंढोरं आणि तुमची गाढवं घेईल आणि आपल्या कामासाठी त्यांचा उपयोग करेल.+ १७  तो तुमच्या बकऱ्‍यांच्या व मेंढरांच्या कळपांतला दहावा हिस्सा घेईल.+ आणि तुम्ही त्याचे दास व्हाल. १८  असा एक दिवस येईल, जेव्हा तुम्ही स्वतःसाठी निवडलेल्या राजामुळे रडाल आणि यहोवाचा धावा कराल.+ पण त्या दिवशी तो तुमचं ऐकणार नाही.” १९  पण लोक शमुवेलचं काहीएक ऐकायला तयार नव्हते. ते म्हणाले: “ते काही नाही, आम्हाला राजा पाहिजे म्हणजे पाहिजे! २०  मग आम्हीसुद्धा बाकीच्या राष्ट्रांसारखं होऊ. आमचा राजा आमचा न्यायनिवाडा करेल, आमचं नेतृत्व करेल आणि आमच्यासाठी लढाया लढेल.” २१  शमुवेलने लोकांचं हे सगळं म्हणणं ऐकून घेतलं, आणि ते यहोवाला सांगितलं. २२  तेव्हा यहोवा शमुवेलला म्हणाला: “त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कर आणि त्यांच्यावर शासन करण्यासाठी एक राजा नेम.”+ मग शमुवेल इस्राएलच्या माणसांना म्हणाला: “आता आपापल्या शहरात परत जा.”

तळटीपा

किंवा “मोठ्या स्वयंपाकघरात.”