१ शमुवेल ९:१-२७

  • शमुवेल आणि शौलची भेट (१-२७)

 बन्यामीन वंशात कीश+ नावाचा एक माणूस होता. तो अबीएलचा मुलगा होता; अबीएल हा सरोरचा, सरोर हा बखोरथचा, तर बखोरथ हा अफियाचा मुलगा होता. बन्यामीन+ वंशातला कीश खूप श्रीमंत होता. २  त्याला शौल+ नावाचा एक मुलगा होता. शौल हा तरुण आणि देखणा होता. संपूर्ण इस्राएलमध्ये त्याच्यासारखा देखणा कोणीही नव्हता. तो एवढा उंच होता की सगळे लोक फक्‍त त्याच्या खांद्याला लागायचे. ३  एकदा शौलच्या वडिलांची, कीशची गाढवं हरवली. तेव्हा तो शौलला म्हणाला: “माझ्या मुला, आपल्यासोबत एका सेवकाला घेऊन जा आणि गाढवं शोधून आण.” ४  म्हणून शौल आणि त्याचा सेवक एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात आणि शलीशा प्रदेशात गाढवांचा शोध करत फिरले. पण त्यांना ती सापडली नाहीत. मग ते शालीम प्रदेशात गेले, पण तिथेही त्यांना ती सापडली नाहीत. त्यांनी बन्यामिनी लोकांचा सगळा प्रदेश पालथा घातला, पण त्यांना काही ती सापडली नाहीत. ५  ते सूफच्या प्रदेशात आले तेव्हा शौल आपल्या सेवकाला म्हणाला: “चल, आपण परत जाऊ. नाहीतर माझे वडील गाढवांची चिंता करायचं सोडून आपलीच चिंता करत बसतील.”+ ६  पण त्याचा सेवक त्याला म्हणाला: “हे बघ, जवळच्याच शहरात देवाचा एक माणूस आहे आणि लोक त्याचा खूप आदर करतात. तो जे काही सांगतो ते सगळं खरं ठरतं.+ चल आपण तिकडे जाऊ. आपण कोणत्या रस्त्याने गेलं पाहिजे हे कदाचित तो आपल्याला सांगू शकेल.” ७  त्यावर शौल आपल्या सेवकाला म्हणाला: “आपण त्या माणसाकडे गेलो, तर आपण त्याला देणार काय? आपल्या थैलीतल्या भाकरीसुद्धा संपल्या आहेत. खऱ्‍या देवाच्या त्या माणसाला भेट द्यायला आपल्याकडे काहीच नाही. मग काय देणार त्याला?” ८  तेव्हा तो सेवक शौलला म्हणाला: “हे बघ, माझ्याकडे चांदीचं एक छोटं नाणं* आहे. मी हे नाणं खऱ्‍या देवाच्या त्या माणसाला देईन. मग आपण कोणत्या रस्त्याने गेलं पाहिजे हे तो आपल्याला सांगेल.” ९  (प्राचीन काळात इस्राएलमध्ये एखादा माणूस देवाचं मार्गदर्शन घ्यायला जायचा, तेव्हा तो म्हणायचा: “चला आपण द्रष्ट्याकडे* जाऊ.”+ कारण, प्राचीन काळात संदेष्ट्याला द्रष्टा म्हणायचे.) १०  तेव्हा शौल आपल्या सेवकाला म्हणाला: “ठीक आहे, चल आपण जाऊ.” मग खऱ्‍या देवाचा माणूस ज्या शहरात राहत होता तिथे ते गेले. ११  ते शहराकडे जाणाऱ्‍या चढावरून जात होते, तेव्हा पाणी भरायला निघालेल्या काही मुली त्यांना दिसल्या. तेव्हा त्यांनी त्या मुलींना विचारलं: “द्रष्टा इथे आहे का?”+ १२  त्यावर त्या मुली म्हणाल्या: “हो, ते इथेच आहेत. बघा, ते आताच तुमच्या पुढे गेलेत. लवकर जा. खरंतर आजच ते शहरात आलेत. कारण, आज लोक उच्च स्थानावर*+ बलिदान अर्पण करणार आहेत.+ १३  शहरात जाताच तुम्हाला ते भेटतील. ते उच्च स्थानाकडे जेवायला जायच्या आधी जा. कारण जोपर्यंत ते बलिदानावर आशीर्वाद देत नाहीत, तोपर्यंत लोक जेवणार नाहीत. आशीर्वाद दिल्यावरच आमंत्रित लोक जेवू शकतात. तेव्हा लवकर जा, म्हणजे तुम्हाला ते भेटतील.” १४  म्हणून ते वर शहराकडे गेले. ते शहरात आले तेव्हा शमुवेल त्यांना भेटायला येत होता; तो त्यांना आपल्यासोबत उच्च स्थानाकडे घेऊन जायला येत होता. १५  शौल तिथे यायच्या आदल्या दिवशी यहोवा शमुवेलला म्हणाला होता: १६  “उद्या या वेळी मी बन्यामिनी+ लोकांच्या प्रदेशातला एक माणूस तुझ्याकडे पाठवीन. माझ्या इस्राएली लोकांचा पुढारी होण्यासाठी त्याचा अभिषेक कर.+ तो माझ्या लोकांना पलिष्ट्यांपासून वाचवेल. कारण माझ्या लोकांचं दुःख मी पाहिलंय, आणि त्यांचा आक्रोश माझ्यापर्यंत पोहोचलाय.”+ १७  शमुवेलने शौलला बघितलं तेव्हा यहोवा त्याला म्हणाला: “मी ज्या माणसाबद्दल तुला सांगितलं होतं तो हाच आहे. हाच माझ्या लोकांवर राज्य करेल.”*+ १८  मग शौल शहराच्या दरवाजाजवळ शमुवेलकडे आला आणि म्हणाला: “द्रष्ट्याचं घर कुठे आहे हे सांगता का?” १९  तेव्हा शमुवेल शौलला म्हणाला: “मीच द्रष्टा आहे. माझ्यापुढे उच्च स्थानाकडे चल. आज तुम्ही माझ्यासोबत जेवण कराल.+ मग उद्या सकाळी मी तुला पाठवून देईन, आणि तुला जे माहीत करून घ्यायचंय* ते तुला सांगीन. २०  आणि हो, तीन दिवसांआधी जी गाढवं हरवली होती,+ त्यांची चिंता करू नकोस. कारण ती सापडली आहेत. शिवाय, इस्राएलातली सगळी संपत्ती कोणाची आहे? तुझी आणि तुझ्या वडिलांच्या सगळ्या घराण्याचीच नाही का?”+ २१  त्यावर शौल म्हणाला: “मी इस्राएलातल्या सगळ्यात लहान वंशातला,+ बन्यामीन वंशातला नाही का? आणि बन्यामीन वंशातल्या सगळ्या घराण्यांमध्ये माझं घराणं अगदीच छोटं नाही का? मग तुम्ही असं का बोलता?” २२  मग शमुवेलने शौलला आणि त्याच्या सेवकाला भोजन-गृहात नेलं. आणि आमंत्रित लोकांमध्ये सर्वात मानाच्या स्थानी बसवलं; त्या वेळी तिथे जवळजवळ ३० आमंत्रित माणसं होती. २३  मग शमुवेल आचाऱ्‍याला म्हणाला: “मी तुला मांसाचा जो वाटा दिला होता आणि म्हणालो होतो, की ‘हा बाजूला ठेव’ तो घेऊन ये.” २४  तेव्हा आचाऱ्‍याने बलिदानाच्या मांसातला पायाचा भाग आणून शौलपुढे ठेवला. मग शमुवेल शौलला म्हणाला: “तुझ्यासमोर जे वाढलंय, ते तुझ्यासाठीच ठेवलं होतं. ते खाऊन घे. कारण या प्रसंगासाठी त्यांनी खास तुझ्यासाठी ते ठेवलं होतं. मी त्यांना सांगितलं होतं, की ‘मी काही पाहुण्यांना बोलावलंय.’” त्या दिवशी शौलने शमुवेलबरोबर जेवण केलं. २५  मग ते उच्च स्थानावरून खाली शहरात गेले,+ आणि तिथे घराच्या छतावरही शमुवेल शौलसोबत बोलत राहिला. २६  मग दुसऱ्‍या दिवशी ते पहाटेच उठले. दिवस उजाडल्यावर शमुवेलने घराच्या छतावर शौलला हाक मारून म्हटलं: “तयार हो, म्हणजे मला तुला पाठवून देता येईल.” मग शौल तयार झाला आणि शमुवेलसोबत बाहेर पडला. २७  ते शहराबाहेर उतारावरून खाली जात असताना शमुवेल शौलला म्हणाला: “तुझ्या सेवकाला+ पुढे जायला सांग. पण तू मात्र इथेच थांब. मग देवाचा काय संदेश आहे तो मी तुला सांगतो.” तेव्हा तो सेवक पुढे गेला.

तळटीपा

शब्दशः “पाव शेकेल चांदी;” एक शेकेल म्हणजे ११.४ ग्रॅम. अति. ख१४ पाहा.
किंवा “माझ्या लोकांना ताब्यात ठेवेल.”
शब्दशः “तुझ्या मनात जे काही आहे.”