२ इतिहास १:१-१७
१ दावीदचा मुलगा शलमोन याचं राज्य दिवसेंदिवस मजबूत होत गेलं. त्याचा देव यहोवा* त्याच्यासोबत असल्यामुळे तो अतिशय शक्तिशाली होत गेला.+
२ शलमोनने सगळ्या इस्राएलला, म्हणजे हजारांवर व शंभरांवर प्रमुख असलेल्यांना, न्यायाधीशांना आणि घराण्यांचे प्रमुख असलेल्या इस्राएलच्या सगळ्या प्रधानांना बोलावून घेतलं.
३ मग शलमोन आणि इस्राएलची सर्व मंडळी गिबोनमधल्या उच्च स्थानाकडे*+ गेली. कारण, यहोवाचा सेवक मोशे याने ओसाड रानात बनवलेला खऱ्या देवाचा भेटमंडप तिथे होता.
४ पण दावीदने मात्र खऱ्या देवाच्या कराराची पेटी किर्याथ-यारीम इथून आणून,+ यरुशलेममध्ये आपण उभारलेल्या तंबूत ठेवली होती.+
५ हूरचा नातू, म्हणजे उरीचा मुलगा बसालेल+ याने बनवलेली तांब्याची वेदी+ यहोवाच्या उपासना मंडपासमोर ठेवण्यात आली होती. आणि शलमोन व इस्राएलची मंडळी त्यापुढे प्रार्थना करायची.*
६ शलमोनने तिथे यहोवापुढे अर्पणं दिली. त्याने भेटमंडपाजवळ असलेल्या तांब्याच्या वेदीवर १,००० जनावरांची होमार्पणं दिली.+
७ त्या रात्री देवाने शलमोनला दर्शन दिलं. देव त्याला म्हणाला: “तुला जे काही हवंय ते माग, मी तुला ते देईन.”+
८ त्यावर शलमोन देवाला म्हणाला: “तू माझे वडील दावीद यांच्यावर अपार प्रेम* केलंस,+ आणि त्यांच्या जागी मला राजा बनवलंस.+
९ आता हे यहोवा देवा! तू माझे वडील दावीद यांना जे वचन दिलं होतंस, ते पूर्ण कर.+ तू ज्या लोकांवर मला राजा बनवलंस, त्यांची संख्या पृथ्वीवरच्या धुळीच्या कणांइतकी अगणित आहे.+
१० म्हणून आता या लोकांचं नेतृत्व करण्यासाठी मला बुद्धी आणि ज्ञान दे.+ कारण तुझ्या एवढ्या मोठ्या प्रजेचा न्याय करणं कोणाला शक्य आहे?”+
११ तेव्हा देव शलमोनला म्हणाला: “तू धनसंपत्ती, श्रीमंती आणि मानसन्मान मागितला नाहीस; तुझा द्वेष करणाऱ्यांचा जीव मागितला नाहीस किंवा स्वतःसाठी दीर्घायुष्यही मागितलं नाहीस. याउलट, ज्या लोकांवर मी तुला राजा बनवलं त्या लोकांचा न्याय करण्यासाठी तू बुद्धी आणि ज्ञान मागितलंस.+ तुझी अशी इच्छा असल्यामुळे,
१२ मी तुला बुद्धी आणि ज्ञान तर देईनच; पण त्यासोबतच, तुझ्याआधी होऊन गेलेल्या कोणत्याही राजाला मिळाली नाही आणि तुझ्यानंतर होणाऱ्या कोणत्याही राजाला मिळणार नाही इतकी धनसंपत्ती, श्रीमंती आणि मानसन्मानही मी तुला देईन.”+
१३ मग शलमोन गिबोनमधल्या+ उच्च स्थानावर असलेल्या भेटमंडपाकडून यरुशलेमला आला; आणि त्याने इस्राएलवर राज्य केलं.
१४ शलमोन स्वतःसाठी रथ आणि घोडे* जमा करत राहिला. त्याच्याकडे १,४०० रथ आणि १२,००० घोडे* होते.+ त्यातले काही त्याने, रथांसाठी बांधलेल्या शहरांत+ आणि काही स्वतःजवळ यरुशलेममध्ये ठेवले.+
१५ शलमोन राजाने यरुशलेममध्ये सोन्या-चांदीचं प्रमाण दगडांइतकं+ आणि देवदाराच्या लाकडाचं प्रमाण शेफीलातल्या उंबराच्या झाडांइतकं मुबलक केलं.+
१६ शलमोनसाठी इजिप्तमधून* घोडे मागवले जायचे.+ राजाचे व्यापारी घोड्यांच्या कळपाची किंमत ठरवून कळपचे कळप विकत घ्यायचे.*+
१७ इजिप्तमधून मागवलेल्या प्रत्येक रथाची किंमत ६०० चांदीचे तुकडे आणि प्रत्येक घोड्याची किंमत १५० चांदीचे तुकडे इतकी होती; मग राजाचे व्यापारी हे रथ व घोडे हित्ती लोकांच्या सर्व राजांना आणि सीरियाच्या सर्व राजांना विकायचे.
तळटीपा
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “देवाकडे मार्गदर्शन मागायची.”
^ किंवा “एकनिष्ठ प्रेम.”
^ किंवा “घोडेस्वार.”
^ किंवा “घोडेस्वार.”
^ किंवा “मिसरमधून.”
^ किंवा कदाचित, “कळपचे कळप इजिप्त आणि कोवा देशातून विकत घ्यायचे; राजाचे व्यापारी कोवामधून ते विकत घ्यायचे.” कोवा हे कदाचित किलिकिया असावं.