२ इतिहास १०:१-१९
-
इस्राएलने रहबामविरुद्ध केलेलं बंड (१-१९)
१० रहबाम शखेम+ इथे गेला, कारण सर्व इस्राएली लोक त्याला राजा बनवण्यासाठी तिथे जमले होते.+
२ ही गोष्ट नबाटचा मुलगा यराबाम+ याला समजली, तेव्हा तो इजिप्तहून परत आला (तो शलमोन राजाच्या भीतीमुळे इजिप्तला पळून गेला होता आणि अजूनही तिथेच राहत होता).+
३ मग लोकांनी त्याला बोलावून घेतलं, आणि यराबाम व सर्व इस्राएली लोक रहबामकडे येऊन म्हणाले:
४ “तुझ्या वडिलांनी आमच्यावर फार जड जू* लादलंय.+ त्यांनी आम्हाला कामाच्या ओझ्याखाली भरडून काढलंय. पण तू जर आमच्या कामाचा भार कमी केलास आणि हे जड जू हलकं केलंस तर आम्ही तुझी सेवा करू.”
५ त्यावर रहबाम त्यांना म्हणाला: “तुम्ही तीन दिवसांनी परत या.” म्हणून ते लोक निघून गेले.+
६ मग रहबाम राजाने वडीलधाऱ्यांशी* सल्लामसलत केली; या वडीलधाऱ्या माणसांनी त्याचा पिता शलमोन याची सेवा केली होती. रहबामने त्यांना विचारलं: “तुम्हाला काय वाटतं, या लोकांना काय उत्तर द्यावं?”
७ ते त्याला म्हणाले: “तू या लोकांशी प्रेमळपणे वागलास आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे करून त्यांना खूश केलंस, तर ते आयुष्यभर तुझे सेवक होऊन राहतील.”
८ पण वडीलधाऱ्यांनी दिलेला हा सल्ला त्याने धुडकावून लावला. आणि ज्यांच्यासोबत तो लहानाचा मोठा झाला होता त्या आपल्या तरुण सेवकांशी त्याने सल्लामसलत केली.+
९ त्याने त्यांना विचारलं: “जे लोक मला म्हणाले की ‘तुझ्या वडिलांनी आमच्यावर लादलेलं जू हलकं कर,’ त्या लोकांना आपण काय उत्तर द्यावं असं तुम्हाला वाटतं?”
१० तेव्हा, त्याच्यासोबत लहानाचे मोठे झालेले तरुण त्याला म्हणाले: “जे लोक तुला असं म्हणाले की ‘तुझ्या वडिलांनी आमच्यावर लादलेलं जू फार जड आहे, ते हलकं कर,’ त्यांना तू असं सांग: ‘माझ्या हाताची करंगळी माझ्या वडिलांच्या कमरेपेक्षा जाड होईल.
११ माझ्या वडिलांनी तुमच्यावर जड जू लादलं; पण मी ते आणखी जड करीन. माझ्या वडिलांनी तुम्हाला चाबकाचे फटके देऊन शिक्षा केली; पण मी तुम्हाला काटेरी चाबकाचे फटके देऊन शिक्षा करीन.’”
१२ “तिसऱ्या दिवशी परत या” असं जे रहबामने सांगितलं होतं, त्याप्रमाणे यराबाम आणि सर्व लोक तिसऱ्या दिवशी त्याच्याकडे आले.+
१३ पण रहबाम राजा त्यांच्याशी अतिशय कठोरपणे बोलला; आणि त्याने वडीलधाऱ्या माणसांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे केलं नाही.
१४ याउलट, तरुणांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे तो लोकांना म्हणाला: “तुमच्यावर लादलेलं जू मी आणखी जड करीन. माझ्या वडिलांनी तुम्हाला चाबकाचे फटके देऊन शिक्षा केली; पण मी तुम्हाला काटेरी चाबकाचे फटके देऊन शिक्षा करीन.”
१५ अशा प्रकारे राजाने लोकांचं म्हणणं ऐकलं नाही. खऱ्या देवाने नबाटचा मुलगा यराबाम याला शिलोतल्या अहीयाद्वारे जे सांगितलं होतं,+ ते पूर्ण व्हावं म्हणून यहोवानेच हे सगळं घडवून आणलं होतं.+
१६ राजा आपलं म्हणणं ऐकत नाही हे सर्व इस्राएली लोकांनी पाहिलं, तेव्हा ते त्याला म्हणाले: “दावीदशी आमचं काहीही घेणंदेणं नाही. इशायच्या मुलाच्या वारशात आम्हाला काहीच हिस्सा नाही. हे इस्राएलच्या लोकांनो! चला आपापल्या देवांकडे! हे दावीद! आता तुझं घराणं तूच सांभाळ!”+ असं बोलून सर्व इस्राएली लोक आपापल्या घरी निघून गेले.+
१७ पण रहबाम यहूदाच्या शहरांमध्ये राहणाऱ्या इस्राएली लोकांवर राज्य करत राहिला.+
१८ मग रहबाम राजाने, सक्तीची मजुरी करणाऱ्या लोकांवर अधिकारी असलेल्या हदोरामला+ इस्राएली लोकांकडे पाठवलं. पण त्यांनी त्याला दगडमार करून मारून टाकलं. रहबाम राजा कसाबसा आपल्या रथावर चढून यरुशलेमला पळून गेला.+
१९ आणि आजपर्यंत इस्राएली लोक दावीदच्या राजघराण्याविरुद्ध बंड करत आहेत.