२ इतिहास १२:१-१६

  • शिशक यरुशलेमवर हल्ला करतो (१-१२)

  • रहबामच्या शासनाचा अंत (१३-१६)

१२  रहबामचं राज्यपद स्थिर झालं+ आणि तो सामर्थ्यशाली झाला. त्यानंतर काही काळातच त्याने यहोवाच्या नियमशास्त्राप्रमाणे चालायचं सोडून दिलं.+ आणि त्याच्यासोबत सर्व इस्राएली लोकांनीही तसंच केलं. २  इस्राएली लोक यहोवाला विश्‍वासू राहिले नाहीत. म्हणून रहबाम राजाच्या शासनकाळाच्या पाचव्या वर्षी इजिप्तचा राजा शिशक+ यरुशलेमवर हल्ला करायला आला. ३  तो १,२०० रथ आणि ६०,००० घोडेस्वार घेऊन आला. तसंच, इजिप्तमधून आलेल्या त्याच्या सैन्यात लिबियाचे, सुक्कीचे आणि इथियोपियाचे+ असंख्य सैनिकही होते. ४  त्याने यहूदातली तटबंदीची शहरं काबीज केली आणि शेवटी तो यरुशलेमला पोहोचला. ५  शिशकच्या भीतीमुळे रहबाम आणि यहूदाचे अधिकारी यरुशलेममध्ये एकत्र जमले. तेव्हा शमाया+ संदेष्टा त्यांच्याकडे आला आणि म्हणाला: “यहोवा असं म्हणतो, की ‘तुम्ही मला सोडून दिलं, म्हणून मीही तुम्हाला सोडून दिलंय+ आणि शिशकच्या हवाली केलंय.’” ६  हे ऐकून राजा व इस्राएलचे अधिकारी नम्र झाले+ आणि म्हणाले: “यहोवाने जे केलं ते योग्यच आहे.” ७  ते नम्र झाले आहेत ही गोष्ट जेव्हा यहोवाने पाहिली, तेव्हा शमायाला यहोवाकडून असा संदेश मिळाला: “त्यांनी स्वतःला नम्र केलंय, म्हणून मी त्यांचा नाश करणार नाही.+ मी लवकरच त्यांची सुटका करीन. मी शिशकद्वारे यरुशलेमवर माझा राग व्यक्‍त करणार नाही. ८  पण ते त्याचे दास बनतील. म्हणजे मग त्यांना कळून येईल, की माझी सेवा करण्यात आणि इतर राष्ट्रांच्या राजांची सेवा करण्यात किती फरक आहे.” ९  मग इजिप्तचा राजा शिशक याने यरुशलेमवर हल्ला केला. त्याने यहोवाच्या मंदिरात आणि राजमहालात असलेला खजिना लुटला.+ त्याने सगळं काही लुटलं; शलमोनने बनवलेल्या सोन्याच्या ढालीसुद्धा त्याने लुटल्या.+ १०  म्हणून रहबाम राजाने त्यांच्याऐवजी तांब्याच्या ढाली बनवल्या. आणि त्याने त्या ढाली राजमहालाच्या प्रवेशद्वाराची राखण करणाऱ्‍या रक्षकांच्या* प्रमुखांच्या हवाली केल्या. ११  राजा यहोवाच्या मंदिरात यायचा तेव्हा हे रक्षक ढाली घेऊन यायचे आणि त्याच्यासोबत चालायचे. आणि नंतर त्या पुन्हा रक्षकांच्या चौकीत आणून ठेवायचे. १२  राजा नम्र झाल्यामुळे यहोवाचा क्रोध त्याच्यावर भडकला नाही.+ आणि देवाने त्याचा व त्याच्या लोकांचा पूर्णपणे नाश केला नाही.+ शिवाय, यहूदाच्या लोकांमध्ये काही चांगल्या गोष्टीही दिसून आल्या होत्या.+ १३  रहबाम राजाने यरुशलेममध्ये आपलं राज्यपद आणखी बळकट केलं आणि तो तिथे राज्य करत राहिला. रहबाम यहूदाचा राजा बनला तेव्हा तो ४१ वर्षांचा होता आणि त्याने यरुशलेममध्ये, म्हणजे यहोवाने आपल्या नावाच्या गौरवासाठी इस्राएल वंशांच्या प्रदेशातून निवडलेल्या शहरामध्ये १७ वर्षं राज्य केलं. रहबामची आई अम्मोनी असून तिचं नाव नामा होतं.+ १४  रहबाम वाईट कामं करत राहिला. कारण त्याने यहोवाला शोधण्याचा आपल्या मनात निश्‍चय केला नव्हता.+ १५  रहबामबद्दलची सगळी माहिती, म्हणजे त्याची सुरुवातीपासून शेवटपर्यंतची सगळी माहिती, वंशावळींच्या अहवालातल्या शमाया+ संदेष्ट्याच्या आणि दृष्टान्त पाहणाऱ्‍या इद्दोच्या+ लिखाणांत दिली आहे. रहबाम आणि यराबाम यांच्यात सतत लढाया होत राहिल्या.+ १६  मग रहबामचा मृत्यू झाला आणि त्याला दावीदपुरात+ आपल्या पूर्वजांच्या कबरेत दफन करण्यात आलं. रहबामच्या मृत्यूनंतर त्याच्या जागी त्याचा मुलगा अबीया+ हा राजा बनला.

तळटीपा

शब्दशः “धावणाऱ्‍यांच्या.”