२ इतिहास १३:१-२२
१३ यराबाम राजाच्या शासनकाळाच्या १८ व्या वर्षी, अबीया हा यहूदाचा राजा बनला.+
२ त्याने यरुशलेममधून तीन वर्षं राज्य केलं. त्याच्या आईचं नाव मीखाया+ असून ती गिबामध्ये+ राहणाऱ्या उरीयेलची मुलगी होती. मग अबीया आणि यराबाम यांच्यात युद्ध सुरू झालं.+
३ अबीया आपल्यासोबत ४,००,००० शूर व प्रशिक्षित* योद्धे घेऊन लढायला गेला.+ आणि त्याचा सामना करण्यासाठी यराबामने ८,००,००० शूर व प्रशिक्षित* योद्ध्यांचं सैन्यदल तैनात केलं.
४ मग अबीया, एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातल्या समाराइम पर्वतावर उभा राहिला आणि म्हणाला: “हे यराबाम आणि सर्व इस्राएली लोकांनो! मी काय म्हणतो ते ऐका.
५ इस्राएलचा देव यहोवा याने दावीदशी आणि त्याच्या मुलांशी+ मिठाचा करार*+ केला आणि त्यांना इस्राएलवर कायम राज्य करण्याचा अधिकार दिला.+ ही गोष्ट तुम्हाला माहीत नाही का?
६ पण दावीदचा मुलगा शलमोन याचा सेवक, म्हणजे नबाटचा मुलगा यराबाम+ हा आपल्या प्रभूच्या विरोधात उठला आणि त्याने त्याच्याविरुद्ध बंड केलं.+
७ आणि काही रिकामटेकडी व दुष्ट माणसं त्याला जाऊन मिळाली. ते सगळे शलमोनच्या मुलापेक्षा, म्हणजे रहबामपेक्षा प्रबळ ठरले, कारण रहबाम वयाने लहान व भित्रा होता. आणि म्हणून तो त्यांच्यासमोर टिकाव धरू शकला नाही.
८ आणि आता तुम्ही असा विचार करताय, की तुम्ही दावीदच्या मुलांच्या हाती असलेल्या यहोवाच्या राज्यासमोर टिकाव धरू शकता; कारण तुम्ही संख्येने जास्त आहात आणि यराबामने तुमच्यासाठी देव म्हणून बनवलेली सोन्याची वासरं तुमच्याकडे आहेत.+
९ तुम्ही तर यहोवाच्या याजकांना, म्हणजे अहरोनच्या वंशजांना आणि लेव्यांना हाकलून दिलंत,+ आणि इतर देशांप्रमाणेच स्वतःचे याजक नेमले.+ जो कोणी तुमच्याकडे एखादा गोऱ्हा* आणि सात एडके घेऊन येतो तो याजक बनतो; आणि तेही अशा देवांचा याजक जे मुळात देवच नाहीत.
१० पण आमच्याविषयी म्हणाल, तर यहोवा आमचा देव आहे!+ आणि आम्ही त्याला सोडलेलं नाही. अहरोनचे वंशज, आमचे याजक आजही यहोवाची सेवा करत आहेत आणि लेवी त्यांना मदत करत आहेत.
११ ते रोज सकाळ-संध्याकाळ यहोवासाठी सुगंधी धूप+ आणि होमार्पणं जाळतात;+ शुद्ध सोन्याच्या मेजावर भाकरीची थप्पी*+ ठेवतात आणि रोज संध्याकाळी सोन्याचा दीपवृक्ष*+ व त्यावरचे दिवे पेटवतात.+ हे सर्व करून आम्ही आमचा देव यहोवा याच्या बाबतीत असलेली आमची सगळी कर्तव्यं पार पाडतोय; पण तुम्ही मात्र त्याला सोडून दिलंय.
१२ तर आता बघा! खरा देव आमच्यासोबत असून तो आमचं नेतृत्व करतोय. तुमच्याविरुद्ध युद्धाची घोषणा करायला त्याचे याजकही हातात कर्णे घेऊन आमच्यासोबत आहेत. तेव्हा हे इस्राएलच्या लोकांनो! तुमच्या पूर्वजांच्या देवाविरुद्ध, यहोवाविरुद्ध लढू नका. तुम्ही कधीही जिंकणार नाहीत.”+
१३ पण यराबामने त्यांच्यावर मागून हल्ला करण्यासाठी सैनिक पाठवले. अशा रितीने, यहूदाच्या लोकांसमोर यराबामचं मुख्य सैन्य होतं, आणि त्यांच्या मागेसुद्धा काही सैनिक हल्ला करण्यासाठी लपून बसले होते.
१४ यहूदाच्या लोकांनी मागे वळून पाहिलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, की आपल्याला समोरून आणि मागून अशा दोन्ही बाजूंनी लढावं लागणार आहे. म्हणून ते मदतीसाठी यहोवाचा धावा करू लागले+ आणि याजक मोठ्याने कर्णे फुंकू लागले.
१५ मग यहूदाच्या लोकांनी मोठ्याने युद्धाची घोषणा केली. युद्धाची घोषणा होत असताना, खऱ्या देवाने अबीयाला आणि यहूदाच्या लोकांना यराबामवर आणि सर्व इस्राएली लोकांवर विजय मिळवून दिला.
१६ त्या वेळी सर्व इस्राएली लोकांनी यहूदापुढून पळ काढला आणि देवाने त्यांना यहूदाच्या हाती दिलं.
१७ अबीयाने आणि त्याच्या लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात इस्राएली लोकांची कत्तल केली. त्या दिवशी इस्राएलचे ५,००,००० प्रशिक्षित योद्धे मरून पडले.
१८ अशा प्रकारे, इस्राएलच्या लोकांचा पराभव होऊन ते अपमानित झाले. पण यहूदाचे लोक प्रबळ ठरले; कारण त्यांनी आपल्या पूर्वजांच्या देवावर, यहोवावर भरवसा ठेवला होता.+
१९ अबीयाने यराबामचा पाठलाग केला आणि त्याची काही शहरं काबीज केली. त्याने बेथेल,+ यशाना आणि एफ्रान+ ही शहरं व त्यांच्या आसपासची नगरं काबीज केली.
२० अबीया जिवंत होता तोपर्यंत यराबाम कधीच पहिल्यासारखा शक्तिशाली होऊ शकला नाही. मग यहोवाने त्याला शिक्षा दिली आणि तो मेला.+
२१ पण अबीया मात्र शक्तिशाली होत गेला. काही काळाने, त्याने १४ बायका केल्या+ आणि त्याला २२ मुलं व १६ मुली झाल्या.
२२ अबीयाबद्दलची बाकीची माहिती, म्हणजे तो जे काही म्हणाला आणि त्याने जे काही केलं, ते सगळं इद्दो संदेष्ट्याच्या लिखाणांत नमूद करण्यात आलं आहे.+
तळटीपा
^ शब्दशः “निवडलेले.”
^ शब्दशः “निवडलेले.”
^ म्हणजे, कायमचा आणि न बदलणारा करार.
^ किंवा “तरणा बैल.”
^ एक प्रकारची समई.
^ म्हणजे, अर्पणाची भाकर.