२ इतिहास १८:१-३४
१८ यहोशाफाटकडे भरपूर धनसंपत्ती होती आणि त्याला खूप मान होता.+ पण तरी त्याने अहाबच्या घराण्याशी लग्नाचे संबंध जोडले.*+
२ मग काही वर्षांनी यहोशाफाट शोमरोनामध्ये अहाबकडे गेला.+ तेव्हा अहाबने त्याच्यासाठी आणि त्याच्यासोबत आलेल्या लोकांसाठी मोठ्या प्रमाणात मेंढरांचं आणि गुराढोरांचं बलिदान दिलं. आणि आपल्यासोबत रामोथ-गिलादवर+ हल्ला करायला त्याला प्रवृत्त केलं.*
३ मग इस्राएलचा राजा अहाब हा यहूदाच्या राजाला, यहोशाफाटला म्हणाला: “तू माझ्यासोबत रामोथ-गिलादमध्ये लढाई करायला येशील का?” त्यावर यहोशाफाट म्हणाला: “हो मी येईन. माझे लोक घेऊन मी तुझ्यासोबत येईन आणि युद्धात तुला मदत करीन.”
४ पण यहोशाफाट इस्राएलच्या राजाला म्हणाला: “कृपा करून याबद्दल आधी यहोवाचा सल्ला घे.”+
५ म्हणून मग इस्राएलच्या राजाने ४०० संदेष्ट्यांना बोलावून विचारलं: “आम्ही रामोथ-गिलादशी युद्ध करायला जावं की नाही?” ते म्हणाले: “हो जा. कारण खरा देव ते शहर राजाला नक्की मिळवून देईल.”
६ मग यहोशाफाट म्हणाला: “इथे कोणी यहोवाचा संदेष्टा नाही का?+ आपण त्याच्याकडूनही देवाचा सल्ला घेऊ.”+
७ त्यावर इस्राएलचा राजा यहोशाफाटला म्हणाला: “इथे आणखी एक माणूस आहे;+ इम्लाचा मुलगा मीखाया. आपण त्याच्याकडूनही यहोवाचा सल्ला घेऊ शकतो, पण मला तो अजिबात आवडत नाही. कारण माझ्या बाबतीत तो कधीच चांगला संदेश देत नाही, नेहमी वाईटच देतो.”+ पण यहोशाफाट म्हणाला: “राजाने असं बोलू नये.”
८ मग इस्राएलच्या राजाने दरबारातल्या एका अधिकाऱ्याला बोलावून म्हटलं: “पटकन जा आणि इम्लाच्या मुलाला, मीखायाला घेऊन ये.”+
९ त्या वेळी इस्राएलचा राजा आणि यहूदाचा राजा यहोशाफाट, शाही पोशाख घालून शोमरोनच्या प्रवेशद्वाराकडे असलेल्या खळ्याजवळ* आपल्या राजासनांवर बसले होते. आणि सगळे संदेष्टे त्यांच्यापुढे भविष्यवाणी करत होते.
१० मग कनाना याचा मुलगा सिद्कीया याने आपल्यासाठी लोखंडाची शिंगं बनवली, आणि तो म्हणाला: “यहोवा असं म्हणतो, ‘सीरियाच्या लोकांचा नाश होईपर्यंत तुम्ही या शिंगांनी त्यांना ढकलत राहाल.’”*
११ बाकीचे सगळे संदेष्टेही असंच म्हणत होते: “जा, रामोथ-गिलादवर हल्ला कर. यहोवा ते शहर राजाला नक्की मिळवून देईल; तू यशस्वी होशील.”+
१२ इकडे, मीखायाला बोलवायला गेलेला दूत त्याला म्हणाला: “पाहा! सगळे संदेष्टे राजाबद्दल चांगल्या गोष्टी बोलत आहेत. तर आता कृपा करून तुमचंही बोलणं त्यांच्यासारखंच+ चांगलं असू द्या.”+
१३ पण मीखाया म्हणाला: “जिवंत देव यहोवा याची शपथ, माझा देव जे सांगेल तेच मी बोलेन.”+
१४ मग मीखाया राजाकडे आला आणि राजाने त्याला विचारलं: “मीखाया, मी रामोथ-गिलादशी युद्ध करायला जावं की नाही?” तो लगेच म्हणाला: “हो जा, तू यशस्वी होशील. ते शहर तुझ्या हाती दिलं जाईल.”
१५ त्यावर राजा त्याला म्हणाला: “मी किती वेळा तुला शपथ घालून सांगू, की यहोवाच्या नावाने फक्त खरं तेच बोल?”
१६ तेव्हा तो म्हणाला: “मला सगळे इस्राएली लोक, मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे डोंगरांवर इकडे-तिकडे पसरलेले दिसत आहेत.+ यहोवा म्हणतो: ‘यांना कोणीही मालक नाही. तेव्हा प्रत्येकाला शांतीने आपापल्या घरी परत जाऊ द्या.’”
१७ मग इस्राएलचा राजा यहोशाफाटला म्हणाला: “मी तुला म्हणालो होतो ना, ‘हा माझ्याबद्दल चांगला संदेश देणार नाही, वाईटच देईल’?”+
१८ मग मीखाया म्हणाला: “तर आता यहोवाचा संदेश काय आहे तो ऐक: मी पाहिलं, की यहोवा आपल्या राजासनावर बसलाय+ आणि त्याच्या उजवीकडे व डावीकडे+ स्वर्गातली सगळी सेना उभी आहे.+
१९ यहोवाने मग विचारलं, ‘इस्राएलचा राजा अहाब याने रामोथ-गिलादला जावं आणि तिथे त्याचा मृत्यू व्हावा, म्हणून त्याला कोण फसवेल?’ तेव्हा कोणी असं सुचवलं, तर कोणी तसं.
२० मग एक स्वर्गदूत+ पुढे आला आणि यहोवासमोर उभा राहिला. तो म्हणाला, ‘मी त्याला फसवीन.’ तेव्हा यहोवाने त्याला विचारलं, ‘तू हे कसं करशील?’
२१ त्यावर तो स्वर्गदूत म्हणाला: ‘मी जाईन आणि त्याच्या सर्व संदेष्ट्यांना खोटं बोलायला लावीन.’ तेव्हा देव त्याला म्हणाला: ‘तू त्याला फसवशील; तू नक्की यशस्वी होशील. जा आणि तसंच कर.’
२२ म्हणूनच यहोवाने तुझ्या या संदेष्ट्यांना खोटं बोलायला लावलंय.+ पण खरंतर तुझ्यावर संकट येईल अशी घोषणा यहोवाने केली आहे.”
२३ तेव्हा कनानाचा मुलगा सिद्कीया+ मीखायाच्या+ जवळ आला आणि त्याला थोबाडीत मारून+ म्हणाला: “यहोवाची पवित्र शक्ती* मला सोडून तुझ्याशी कधीपासून बोलायला लागली?”+
२४ मीखायाने उत्तर दिलं: “ज्या दिवशी तू आतल्या खोलीत लपायला पळशील त्या दिवशी तुला हे कळेल.”
२५ तेव्हा इस्राएलचा राजा म्हणाला: “मीखायाला धरा आणि त्याला शहराचा प्रमुख आमोन व राजाचा मुलगा योवाश यांच्या हवाली करा.
२६ त्यांना सांगा, की ‘राजाचा असा हुकूम आहे: “या माणसाला तुरुंगात टाका+ आणि मी सुखरूप परत येईपर्यंत त्याला फक्त भाकरीच्या तुकड्यावर व घोटभर पाण्यावर ठेवा.”’”
२७ पण मीखाया म्हणाला: “तू सुखरूप परत आलास, तर असं समज की यहोवा माझ्याशी बोललाच नाही.”+ तो पुढे म्हणाला: “लोकांनो, तुम्हीसुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवा.”
२८ यानंतर इस्राएलचा राजा आणि यहूदाचा राजा यहोशाफाट रामोथ-गिलादवर हल्ला करायला गेले.+
२९ तेव्हा इस्राएलचा राजा यहोशाफाटला म्हणाला: “मी वेष बदलून लढाईत जाईन, पण तू मात्र तुझा शाही पोशाख घाल.” मग इस्राएलच्या राजाने आपला वेष बदलला आणि ते लढाईला गेले.
३० इकडे, सीरियाच्या राजाने आपल्या रथदलाच्या अधिकाऱ्यांना असा आदेश दिला होता: “कोणत्याही छोट्या-मोठ्या सैनिकाशी किंवा अधिकाऱ्याशी लढू नका; फक्त इस्राएलच्या राजाशी लढा.”
३१ मग यहोशाफाटला पाहताच रथदलाचे अधिकारी आपसात म्हणाले: “हा इस्राएलचा राजा असावा.” म्हणून मग ते त्याच्याशी लढायला गेले. त्या वेळी यहोशाफाट मदतीसाठी ओरडू लागला.+ तेव्हा यहोवाने त्याची मदत केली आणि त्यांना लगेच त्याच्यापासून दूर केलं.
३२ तो इस्राएलचा राजा नाही हे समजताच रथदलाच्या अधिकाऱ्यांनी त्याचा पाठलाग करायचं सोडून दिलं.
३३ मग एका माणसाने सहजच एक बाण सोडला आणि तो इस्राएलच्या राजाला जाऊन लागला; चिलखताचे दोन भाग जिथे जोडले होते, तिथे जाऊन तो बाण रुतला. मग राजा रथ चालवणाऱ्या माणसाला म्हणाला: “रथ वळव आणि मला या लढाईतून बाहेर ने, कारण मी फार जखमी झालोय.”+
३४ त्या दिवशी दिवसभर लढाई चालली. आणि इस्राएलच्या राजाला सीरियाच्या लोकांच्या दिशेने रथात आधार देऊन संध्याकाळपर्यंत उभं करावं लागलं. आणि सूर्यास्ताच्या वेळी त्याचा मृत्यू झाला.+
तळटीपा
^ किंवा “सोयरीक केली.”
^ किंवा “त्याचं मन वळवलं.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “शिंगांनी त्यांना हुंदडत राहाल.”
^ शब्दार्थसूची पाहा.