२ इतिहास ३०:१-२७

  • हिज्कीया वल्हांडणाचा सण पाळतो (१-२७)

३०  हिज्कीयाने मग संपूर्ण इस्राएलच्या आणि यहूदाच्या लोकांना असा निरोप पाठवला,+ की त्यांनी इस्राएलचा देव यहोवा याच्यासाठी वल्हांडण सण साजरा करायला यरुशलेममध्ये यहोवाच्या मंदिरात यावं.+ त्याने एफ्राईमच्या आणि मनश्‍शेच्या लोकांनाही पत्रं लिहून हा निरोप कळवला.+ २  पण राजाने, अधिकाऱ्‍यांनी आणि यरुशलेममधल्या संपूर्ण मंडळीने दुसऱ्‍या महिन्यात वल्हांडण सण साजरा करायचं ठरवलं.+ ३  कारण, बऱ्‍याचशा याजकांनी आणि यरुशलेममध्ये जमलेल्या लोकांनी स्वतःला शुद्ध केलं नव्हतं.+ आणि त्यामुळे ते हा सण त्याच्या नेहमीच्या वेळेला पाळू शकले नव्हते.+ ४  दुसऱ्‍या महिन्यात सण पाळण्याचा हा विचार राजाला आणि संपूर्ण मंडळीला योग्य वाटला. ५  म्हणून मग त्यांनी बैर-शेबापासून दानपर्यंत+ संपूर्ण इस्राएलमध्ये अशी घोषणा करायचं ठरवलं, की सर्व लोकांनी यरुशलेममध्ये यावं आणि इस्राएलचा देव यहोवा याच्यासाठी वल्हांडण सण साजरा करावा. कारण, याआधी त्यांनी नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे एकत्र मिळून हा सण साजरा केला नव्हता.+ ६  मग दूतांनी* राजाकडून आणि अधिकाऱ्‍यांकडून पत्रं घेतली, आणि राजाच्या आज्ञेप्रमाणे ते संपूर्ण इस्राएलच्या व यहूदाच्या प्रांतात गेले. ते लोकांना म्हणाले: “इस्राएलच्या लोकांनो! अब्राहाम, इसहाक आणि इस्राएलचा देव यहोवा याच्याकडे परत या. म्हणजे तुम्ही जे अश्‍शूरच्या राजांच्या हातून बचावले आहात, त्या तुमच्याकडे तोही परत येईल.+ ७  तुम्ही तुमच्या वाडवडिलांसारखं आणि भाऊबंदांसारखं वागू नका. ते त्यांच्या पूर्वजांचा देव यहोवा याच्याशी अविश्‍वासूपणे वागले. आणि म्हणून लोकांना दहशत बसेल अशी देवाने त्यांची अवस्था केली. आणि ही गोष्ट तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघतच आहात.+ ८  आता आपल्या वाडवडिलांसारखं अडेलपणे वागू नका.+ यहोवाच्या अधीन व्हा आणि जे मंदिर यहोवाने कायमसाठी पवित्र केलंय, तिथे येऊन तुमच्या देवाची उपासना करा.+ म्हणजे तुमच्यावर भडकलेला त्याचा क्रोध शांत होईल.+ ९  तुम्ही यहोवाकडे परत आलात, तर तुमच्या भावांना आणि मुलांना ज्या लोकांनी बंदी बनवून नेलंय ते त्यांना दया दाखवतील+ आणि त्यांना आपल्या देशात परत येऊ देतील.+ कारण तुमचा देव यहोवा हा करुणामय* आणि दयाळू आहे.+ म्हणून तुम्ही त्याच्याकडे परत आलात, तर तो तुमच्यापासून आपलं तोंड फिरवणार नाही.”+ १०  अशा प्रकारे ते दूत एफ्राईमच्या आणि मनश्‍शेच्या प्रदेशांतल्या प्रत्येक शहरांत गेले,+ इतकंच नाही तर ते जबुलूनच्या प्रदेशातही गेले. पण लोक त्यांच्यावर हसले आणि त्यांनी त्यांची थट्टा केली.+ ११  मात्र आशेर, मनश्‍शे आणि जबुलून इथले काही लोक नम्र होऊन यरुशलेमला आले.+ १२  यहोवाच्या वचनानुसार राजाने आणि अधिकाऱ्‍यांनी जी आज्ञा दिली होती, ती पाळण्यासाठी लोकांनी एक व्हावं,* म्हणून खऱ्‍या देवाचा आशीर्वादही यहूदावर होता. १३  मग, दुसऱ्‍या महिन्यात+ बेखमीर* भाकरीचा सण+ पाळण्यासाठी मोठ्या संख्येने लोक यरुशलेममध्ये एकत्र जमले; लोकांचा तो जमाव खरंच खूप मोठा होता. १४  त्यांनी यरुशलेममधल्या वेदी काढून टाकल्या.+ तसंच, त्यांनी सगळ्या धूप-वेदीही काढून टाकल्या+ आणि किद्रोन खोऱ्‍यात फेकून दिल्या. १५  दुसऱ्‍या महिन्याच्या १४ व्या दिवशी त्यांनी वल्हांडणाचा पशू कापून त्याचं बलिदान दिलं. याजकांना व लेव्यांना स्वतःची लाज वाटली, म्हणून त्यांनी स्वतःला शुद्ध केलं आणि ते यहोवाच्या मंदिरात होमार्पणं घेऊन आले. १६  आणि खऱ्‍या देवाचा माणूस मोशे याच्या नियमशास्त्राप्रमाणे, ते त्यांच्या ठरवून दिलेल्या जागी उभे राहिले. मग याजकांनी लेव्यांच्या हातून बलिदानांचं रक्‍त घेतलं आणि ते वेदीवर शिंपडलं.+ १७  जमलेल्या लोकांमध्ये असे बरेच लोक होते ज्यांनी स्वतःला शुद्ध केलं नव्हतं. त्यांनी यहोवासमोर पवित्र व्हावं, म्हणून त्यांच्या वतीने वल्हांडणाच्या बलिदानाचे पशू कापण्याची जबाबदारी लेव्यांवर होती.+ १८  बऱ्‍याच लोकांनी, खासकरून एफ्राईम, मनश्‍शे,+ इस्साखार आणि जबुलून इथल्या लोकांनी स्वतःला शुद्ध केलं नव्हतं, तरीसुद्धा ते वल्हांडणाचं भोजन करत होते. पण ही गोष्ट नियमशास्त्राच्या विरोधात होती. म्हणून हिज्कीयाने त्यांच्यासाठी अशी प्रार्थना केली: “हे यहोवा देवा, तू चांगला आहेस.+ तू अशा प्रत्येकाला क्षमा कर, १९  ज्याने पवित्रतेच्या नियमानुसार स्वतःला शुद्ध केलेलं नाही;+ पण आपल्या पूर्वजांच्या खऱ्‍या देवाला, यहोवाला शोधण्यासाठी आपलं मन तयार केलंय.”+ २०  यहोवाने हिज्कीयाची ही विनंती मान्य करून लोकांना क्षमा केली.* २१  यरुशलेममध्ये असलेल्या लोकांनी सात दिवस बेखमीर भाकरीचा सण+ मोठ्या आनंदाने साजरा केला.+ आणि लेवी व याजक दररोज यहोवासाठी मोठ्याने वाद्यं वाजवून यहोवाची स्तुती करत होते.+ २२  याशिवाय हिज्कीयाने, यहोवाची समंजसपणे सेवा करणाऱ्‍या सगळ्या लेव्यांशी बोलून त्यांना प्रोत्साहन दिलं. आणि सणाच्या त्या सात दिवसांदरम्यान त्यांनी खाणंपिणं केलं,+ शांती-अर्पणं वाहिली+ आणि आपल्या पूर्वजांच्या देवाचे, यहोवाचे आभार मानले. २३  त्यानंतर संपूर्ण मंडळीने आणखी सात दिवस सण पाळायचं ठरवलं. म्हणून मग त्या सर्वांनी आणखी सात दिवस मोठ्या आनंदाने सण साजरा केला.+ २४  यहूदाचा राजा हिज्कीया याने मंडळीसाठी १,००० बैल व ७,००० मेंढरं दिली. तसंच, अधिकाऱ्‍यांनीसुद्धा मंडळीसाठी १,००० बैल व १०,००० मेंढरं दिली.+ आणि अनेक याजक स्वतःला शुद्ध करत होते.+ २५  यहूदाची संपूर्ण मंडळी, याजक, लेवी आणि तिथे राहणारे विदेशी लोक; तसंच, इस्राएलमधून आलेली सगळी मंडळी+ आणि तिथून आलेले विदेशी लोक+ हे सर्व आनंदोत्सव करत राहिले. २६  इस्राएलचा राजा दावीद याच्या मुलाच्या, म्हणजे शलमोनच्या काळापासून आतापर्यंत यरुशलेममध्ये असं कधीही झालं नव्हतं. म्हणून यरुशलेममध्ये लोक मोठा जल्लोष करत होते.+ २७  शेवटी, लेवी वंशातल्या याजकांनी उभं राहून लोकांना आशीर्वाद दिला;+ आणि त्यांची प्रार्थना पवित्र निवासस्थानात, म्हणजे स्वर्गात पोहोचली आणि देवाने ती ऐकली.

तळटीपा

शब्दशः “धावणारे.”
किंवा “कृपाळू.”
शब्दशः “लोकांचं मन एक व्हावं.”
शब्दशः “बरं केलं.”