२ इतिहास ८:१-१८

  • शलमोनने हाती घेतलेले इतर बांधकाम प्रकल्प (१-११)

  • मंदिरातल्या उपासनेची व्यवस्था (१२-१६)

  • शलमोनच्या जहाजांचा ताफा (१७, १८)

 शलमोनला यहोवाचं मंदिर आणि आपला राजमहाल बांधून पूर्ण करायला २० वर्षं लागली.+ २  त्यानंतर, त्याने हीरामकडून+ मिळालेली शहरं पुन्हा बांधली आणि इस्राएली लोकांना तिथे वसवलं. ३  पुढे शलमोनने हमाथ-सोबावर हल्ला करून त्यावर कब्जा केला. ४  मग त्याने ओसाड रानातल्या तदमोर शहराची आणि हमाथमध्ये+ आपण बांधलेली कोठारांची सगळी शहरं+ मजबूत केली.* ५  त्याचप्रमाणे त्याने वरचं बेथ-होरोन+ आणि खालचं बेथ-होरोन+ या शहरांभोवती भिंती बांधल्या आणि त्यांना दरवाजे व अडसर बसवून ती शहरंही मजबूत केली. ६  याशिवाय, त्याने बालाथ+ शहरसुद्धा मजबूत केलं. तसंच त्याने कोठारांसाठी, रथांसाठी+ आणि घोडेस्वारांसाठी बांधलेली आपली शहरंही मजबूत केली. यासोबतच शलमोनने यरुशलेममध्ये, लबानोनमध्ये आणि त्याच्या अधिकाराखाली असलेल्या संपूर्ण देशात त्याला जे काही बांधायचं होतं ते बांधलं. ७  इस्राएली लोकांपैकी नसलेले+ हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी यांच्यापैकी उरलेल्या सर्व लोकांना,+ ८  म्हणजे देशात उरलेल्या त्यांच्या वंशजांना (ज्यांचा इस्राएली लोकांनी पूर्णपणे नाश केला नव्हता),+ शलमोनने सक्‍तीची मजुरी करायला लावली आणि आजपर्यंत ते हेच काम करत आहेत.+ ९  पण शलमोनने इस्राएली लोकांपैकी कोणालाही आपल्या कामासाठी दास बनवलं नाही.+ कारण ते त्याचे योद्धे, सहायक सेना अधिकारी आणि त्याच्या रथस्वारांचे व घोडेस्वारांचे प्रमुख होते.+ १०  शलमोन राजाच्या कामाची देखरेख करणारे २५० प्रमुख अधिकारी होते; ते काम करणाऱ्‍या लोकांवर देखरेख करायचे.+ ११  नंतर शलमोनने फारोच्या मुलीला+ दावीदपुरातून आणलं आणि त्याने तिच्यासाठी जो महाल बांधला होता तिथे तिला ठेवलं.+ तो म्हणाला: “ती जरी माझी बायको असली, तरी तिने इस्राएलचा राजा दावीद याच्या महालात राहायला नको. कारण, यहोवाच्या कराराची पेटी ज्या-ज्या ठिकाणी आली होती, ती सर्व ठिकाणं पवित्र आहेत.”+ १२  मग शलमोनने मंदिराच्या द्वारमंडपासमोर+ यहोवासाठी जी वेदी बांधली होती,+ तिच्यावर त्याने यहोवाला होमार्पणं दिली.+ १३  त्याने शब्बाथांसाठी,+ नवचंद्राच्या दिवसांसाठी+ आणि तीन वार्षिक सणांसाठी,+ म्हणजे बेखमीर भाकरींचा सण,+ सप्ताहांचा सण+ व मंडपांचा* सण+ यांसाठी मोशेच्या आज्ञेनुसार नित्यक्रमाप्रमाणे अर्पणं दिली. १४  पुढे शलमोनने आपले वडील दावीद यांनी घालून दिलेल्या नियमाप्रमाणे याजकांच्या गटांची त्यांच्या सेवेसाठी नेमणूक केली;+ तसंच, त्याने लेव्यांनासुद्धा आपल्या जबाबदाऱ्‍या पार पाडण्यासाठी, म्हणजे दररोच्या नियमाप्रमाणे देवाची स्तुती करण्यासाठी+ आणि याजकांसमोर सेवा करण्यासाठी नेमलं. याशिवाय, त्याने वेगवेगळ्या दरवाजांसाठी द्वारपालांच्या गटांची नेमणूक केली;+ कारण, हे सर्व करण्याची आज्ञा खऱ्‍या देवाचा माणूस दावीद याने दिली होती. १५  राजाने याजकांना आणि लेव्यांना, कोठारांच्या बाबतीत किंवा दुसऱ्‍या कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत जी काही आज्ञा दिली होती, ती त्यांनी जशीच्या तशी पाळली. १६  यहोवाच्या मंदिराचा पाया घालण्यात आला+ त्या दिवसापासून ते मंदिर बांधून पूर्ण झालं त्या दिवसापर्यंत शलमोनने केलेलं सर्व काम अगदी सुव्यवस्थित* होतं. अशा प्रकारे, यहोवाच्या मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं.+ १७  यानंतर शलमोन अदोम देशाच्या+ समुद्राजवळ असलेल्या एस्योन-गेबेर+ आणि एलोथ+ या ठिकाणी गेला. १८  मग हीरामने+ आपल्या सेवकांच्या नेतृत्वाखाली शलमोनकडे जहाजं आणि अनुभवी खलाशी पाठवले. ते शलमोनच्या सेवकांसोबत ओफीर+ इथे गेले आणि तिथून शलमोन राजासाठी+ ४५० तालान्त* सोनं घेऊन आले.+

तळटीपा

किंवा “पुन्हा बांधली.”
किंवा “तात्पुरत्या आश्रयांचा.”
किंवा “सुसंघटित.”
एक तालान्त म्हणजे ३४.२ किलो. अति. ख१४ पाहा.