२ इतिहास ९:१-३१
९ शबाच्या राणीने+ शलमोनच्या कीर्तीबद्दल ऐकलं, तेव्हा ती त्याला अतिशय कठीण प्रश्न विचारून* त्याची परीक्षा पाहायला यरुशलेमला आली. ती एक भला-मोठा काफिला* घेऊन आली. येताना तिने अतिशय मोठ्या प्रमाणात सोनं,+ मौल्यवान रत्नं आणि बाल्सम* तेल उंटांवर लादून आणलं. मग ती शलमोनकडे गेली आणि तिला जे काही जाणून घ्यायचं होतं ते सर्व तिने त्याला विचारलं.+
२ शलमोनने तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. असा एकही प्रश्न नव्हता जो तिला समजावून सांगणं त्याला कठीण गेलं.
३ शबाच्या राणीने जेव्हा शलमोनची बुद्धिमत्ता,+ त्याने बांधलेला राजमहाल,+
४ त्याच्या मेजावरची पक्वान्नं,+ त्याच्या सेवकांची बसण्याची व्यवस्था, जेवण वाढणाऱ्यांचा पोशाख आणि त्यांची सेवा, त्याचे प्यालेबरदार आणि त्यांचा पोशाख पाहिला; तसंच, तो यहोवाच्या मंदिरात नियमितपणे अर्पण करत असलेली बलिदानं+ तिने पाहिली तेव्हा ती अगदी थक्क झाली.
५ ती राजाला म्हणाली: “तुम्ही केलेल्या मोठमोठ्या गोष्टींबद्दल* आणि तुमच्या बुद्धीबद्दल मी माझ्या देशात जे काही ऐकलं होतं ते अगदी खरंय.
६ पण प्रत्यक्ष येऊन स्वतःच्या डोळ्यांनी या सर्व गोष्टी पाहण्याआधी मी त्यांच्यावर विश्वास ठेवला नव्हता.+ आणि खरंतर मी जे काही पाहिलंय, त्याचं अर्धंसुद्धा मला सांगण्यात आलं नव्हतं!+ मी ऐकलं होतं त्यापेक्षा तुमची बुद्धी कितीतरी पटीने जास्त आहे.+
७ तुमच्या सर्व माणसांना आणि तुमच्या सेवेसाठी नेहमी हजर असलेल्या तुमच्या सेवकांना तुमच्याकडून बुद्धीचे शब्द ऐकायला मिळतात, ही त्यांच्यासाठी किती सन्मानाची गोष्ट आहे!
८ तुमचा देव यहोवा याचा गौरव होवो! कारण तुमच्या देवाने, यहोवाने तुम्हाला त्याच्या वतीने राज्य करायला मोठ्या आनंदाने त्याच्या राजासनावर विराजमान केलंय! तुमचा देव इस्राएलवर प्रेम करतो+ आणि त्याचं हे प्रेम कायम टिकून राहावं, म्हणून त्याने तुम्हाला न्यायनीतीने शासन करण्यासाठी राजा म्हणून नियुक्त केलंय.”
९ मग शबाच्या राणीने शलमोन राजाला १२० तालान्त* सोनं+ आणि अतिशय मोठ्या प्रमाणात बाल्सम* तेल व मौल्यवान रत्नं दिली. तिने राजाला जितक्या प्रमाणात बाल्सम तेल दिलं, तितकं पुन्हा कधीही कोणी दिलं नाही.+
१० याशिवाय, ओफीर+ इथून सोनं आणणाऱ्या हीरामच्या आणि शलमोनच्या सेवकांनी रक्तचंदनाची लाकडं आणि मौल्यवान रत्नंही आणली.+
११ राजाने रक्तचंदनाच्या लाकडांपासून यहोवाच्या मंदिरासाठी+ आणि राजमहालासाठी पायऱ्या बनवल्या.+ तसंच, त्याने त्यांपासून गायकांसाठी वीणा आणि तंतुवाद्यंही बनवली.+ या प्रकारचं लाकूड संपूर्ण यहूदा देशात कधीही पाहायला मिळालं नव्हतं.
१२ शलमोन राजानेसुद्धा शबाच्या राणीला जे काही हवं होतं आणि तिने जे काही मागितलं ते सगळं तिला दिलं. तिने राजासाठी जितक्या भेटवस्तू आणल्या होत्या, त्यांपेक्षा जास्त त्याने तिला दिल्या.* त्यानंतर ती आपल्या सेवकांसोबत आपल्या देशात परत गेली.+
१३ शलमोनला दरवर्षी ६६६ तालान्त सोनं मिळायचं.+
१४ यासोबतच व्यापारी, सौदा करणारे, तसंच अरबचे सर्व राजे आणि देशातले सगळे राज्यपालही त्याला सोनं-चांदी आणून द्यायचे.+
१५ शलमोन राजाने मिश्र सोन्याच्या २०० मोठ्या ढाली बनवल्या+ (प्रत्येक ढाल बनवायला ६०० शेकेल* मिश्र सोनं लागलं).+
१६ तसंच, त्याने मिश्र सोन्याच्या ३०० छोट्या ढालीही* बनवल्या (प्रत्येक छोटी ढाल बनवायला तीन मिना* सोनं लागलं). मग राजाने त्या सर्व ढाली लबानोन-वनगृहात+ ठेवल्या.
१७ राजाने हस्तिदंतांचं एक भव्य राजासनसुद्धा बनवलं आणि ते शुद्ध सोन्याने मढवलं.+
१८ राजासनापर्यंत चढून जाण्यासाठी सहा पायऱ्या होत्या आणि पाय ठेवण्यासाठी राजासनाला जोडूनच एक सोन्याचं आसनही होतं. राजासनाच्या दोन्ही बाजूंना हात ठेवण्यासाठी आधार असून त्यांच्या बाजूला सिंहांचे+ दोन पुतळे उभे करण्यात आले होते.
१९ सहा पायऱ्यांवर दोन्ही बाजूंना एकेक असे १२ सिंहांचे+ पुतळे उभे करण्यात आले होते. अशा प्रकारचं राजासन दुसऱ्या कोणत्याही राज्यात बनवण्यात आलं नव्हतं.
२० शलमोन राजाकडे असलेले पिण्याचे सर्व प्याले सोन्याचे होते. तसंच, लबानोन-वनगृहातली सर्व भांडीसुद्धा शुद्ध सोन्याची होती. कुठलीही वस्तू चांदीची नव्हती. कारण शलमोनच्या काळात चांदीला कोणीही विचारत नव्हतं.+
२१ हीरामचे सेवक+ राजाच्या जहाजांतून तार्शीशला+ जायचे. आणि तार्शीशची जहाजं तीन वर्षांतून एकदा सोनं, चांदी, हस्तिदंत,+ वानरं आणि मोर घेऊन यायची.
२२ संपूर्ण पृथ्वीवर शलमोन राजाइतका श्रीमंत आणि बुद्धिमान राजा दुसरा कोणीही नव्हता.+
२३ खऱ्या देवाने शलमोनला अफाट बुद्धी दिली होती. आणि त्याच्या तोंडून बुद्धीचे बोल ऐकण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यांतून राजे त्याच्याकडे यायचे.+
२४ येताना ते राजासाठी काही ना काही नजराणा घेऊन यायचे. ते आपल्यासोबत सोन्या-चांदीच्या वस्तू, तसंच वस्त्रं,+ शस्त्रं, बाल्सम तेल, घोडे आणि खेचरं आणायचे; असं वर्षानुवर्षं चालत राहिलं.
२५ शलमोनकडे त्याच्या घोड्यांसाठी व रथांसाठी ४,००० तबेले होते; तसंच त्याच्याकडे १२,००० घोडेसुद्धा*+ होते. त्यातले काही त्याने रथांसाठी बांधलेल्या शहरांत आणि काही स्वतःजवळ यरुशलेममध्ये ठेवले.+
२६ शलमोनने नदीपासून* ते पलिष्ट्यांच्या देशापर्यंत आणि इजिप्तच्या सीमेपर्यंत सर्व राजांवर अधिकार गाजवला.+
२७ शलमोन राजाने यरुशलेममध्ये चांदीचं प्रमाण दगडांइतकं मुबलक केलं; आणि देवदाराच्या लाकडांचं प्रमाण शेफीलातल्या उंबराच्या झाडांइतकं मुबलक केलं.+
२८ शलमोनसाठी इजिप्तमधून आणि इतर देशांतून घोडे मागवले जायचे.+
२९ शलमोनबद्दल बाकीची माहिती,+ म्हणजे त्याची सुरुवातीपासून शेवटपर्यंतची सर्व माहिती ही नाथान+ संदेष्ट्याच्या लिखाणांत, शिलोमधल्या अहीयाच्या+ भविष्यवाणीत आणि इद्दोच्या लिखाणांत,+ म्हणजे नबाटचा मुलगा यराबाम+ याच्याविषयीच्या दृष्टान्त-ग्रंथात लिहिलेली आहे.
३० शलमोनने यरुशलेममधून संपूर्ण इस्राएलवर एकूण ४० वर्षं राज्य केलं.
३१ मग शलमोनचा मृत्यू झाला* आणि त्यांनी त्याला त्याच्या वडिलांच्या शहरात, म्हणजे दावीदपुरात+ दफन केलं. आणि त्याच्या जागी त्याचा मुलगा रहबाम हा राजा बनला.+
तळटीपा
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “लवाजमा.”
^ किंवा “कोडी घालून.”
^ किंवा “तुमच्या शब्दांबद्दल.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा कदाचित, “तिने त्याच्यासाठी जितक्या भेटवस्तू आणल्या होत्या, तितक्याच किंमतीच्या भेटवस्तूही त्याने तिला दिल्या.”
^ सहसा तिरंदाजांजवळ असणारी छोटी ढाल.
^ किंवा “घोडेस्वारसुद्धा.”
^ म्हणजे, फरात नदी.
^ शब्दशः “शलमोन आपल्या पूर्वजांकडे जाऊन निजला.”