करिंथकर यांना दुसरं पत्र १:१-२४
१ करिंथ इथली देवाची मंडळी आणि संपूर्ण अखयातल्या+ सगळ्या पवित्र जनांना, देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित असलेला पौल आणि आपला भाऊ तीमथ्य+ यांच्याकडून:
२ देव जो आपला पिता आणि येशू ख्रिस्त जो आपला प्रभू यांच्याकडून तुम्हाला अपार कृपा आणि शांती मिळो.
३ आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव आणि पिता,+ जो खूप करुणामय असा पिता आहे,+ आणि सगळ्या प्रकारच्या सांत्वनाचा देव आहे,+ त्याची स्तुती असो.
४ तो आपल्या सगळ्या संकटांमध्ये* आपलं सांत्वन करतो.*+ देवाकडून मिळणाऱ्या या सांत्वनाद्वारे+ आपल्यालाही इतरांचं, कोणत्याही प्रकारच्या संकटात* सांत्वन करता यावं+ म्हणून तो असं करतो.
५ कारण ज्या प्रकारे ख्रिस्तासाठी आपल्याला पुष्कळ संकटांना तोंड द्यावं लागतं,+ त्याच प्रकारे ख्रिस्ताद्वारे आपल्याला पुष्कळ सांत्वनसुद्धा मिळतं.
६ आता, जर आम्हाला परीक्षांना* तोंड द्यावं लागतं, तर ते यासाठी की तुम्हाला सांत्वन मिळावं आणि तुमचं तारण व्हावं;* आणि जर आमचं सांत्वन केलं जातं, तर तेसुद्धा तुमच्याच सांत्वनासाठी आहे. कारण, आम्हाला जी दुःखं सोसावी लागतात, त्याच प्रकारची दुःखं सोसायला हे सांत्वन तुम्हाला मदत करतं.
७ आणि तुमच्याबद्दल आमची आशा ही न डळमळणारी आहे. कारण ज्या प्रकारे तुम्ही आमच्यासोबत दुःखं सोसता, त्याच प्रकारे आमच्यासोबत तुमचं सांत्वनही केलं जाईल+ हे आम्हाला माहीत आहे.
८ बांधवांनो, आशिया प्रांतात आम्हाला जे संकट सोसावं लागलं, त्याबद्दल तुम्हाला माहीत असावं असं आम्हाला वाटतं.+ तिथे आमच्यावर इतक्या भयंकर समस्या आल्या, की स्वतःच्या बळावर त्यांचा सामना करणं आम्हाला शक्य नव्हतं. एवढंच काय, तर आमच्या जिवाचीही आम्हाला खातरी नव्हती.+
९ खरंतर आम्हाला मृत्युदंड सुनावण्यात आला आहे असं आम्हाला वाटलं. हे यासाठी घडलं, की आम्ही स्वतःवर नाही, तर जो मेलेल्यांना उठवतो त्या देवावर भरवसा ठेवावा.+
१० त्याने आम्हाला मरणासारख्या मोठ्या संकटातून वाचवलं, पुढेही वाचवेल आणि वाचवत राहील अशी आम्ही आशा बाळगतो.+
११ तुम्हीही आमच्यासाठी देवाला याचना करण्याद्वारे आम्हाला मदत करू शकता.+ कारण यामुळे, पुष्कळ जणांनी केलेल्या प्रार्थनांचं उत्तर म्हणून आमच्यावर होणाऱ्या कृपेबद्दल पुष्कळ जणांना देवाचे आभार मानायची संधी मिळेल.+
१२ आम्हाला या गोष्टीचा अभिमान वाटतो, की जगातल्या लोकांशी आणि विशेषतः तुमच्याशी व्यवहार करताना आम्ही पवित्रतेने आणि देव शिकवत असलेल्या प्रामाणिकपणाने वागलो. आणि आम्ही माणसांच्या बुद्धीने नाही,+ तर देवाच्या अपार कृपेने वागलो आणि याबद्दल आमचा विवेक साक्ष देतो.
१३ कारण ज्या गोष्टी तुम्ही वाचू शकता* आणि ज्यांचा अर्थ समजून घेऊ शकता अशा गोष्टींशिवाय आम्ही तुम्हाला दुसरं काही लिहीत नाही. आणि तुम्ही या गोष्टी पुढेही* पूर्णपणे समजून घेत राहाल अशी मी आशा करतो.
१४ खरंतर, तुम्ही काही प्रमाणात हे समजूनही घेतलं आहे, की आम्ही तुमच्यासाठी अभिमानाचं कारण आहोत आणि तुम्हीही आपला प्रभू येशू याच्या दिवशी आमच्यासाठी अभिमानाचं कारण असाल.
१५ याच भरवशामुळे मी आधी तुमच्याकडे यायच्या विचारात होतो. हे यासाठी की तुम्हाला आनंदी होण्याची आणखी एक संधी मिळावी.*
१६ कारण मासेदोनियाला जात असताना आणि तिथून परतताना तुम्हाला भेट द्यावी, आणि मग यहूदीयाला जाताना तुम्ही काही अंतरापर्यंत सोबत येऊन मला निरोप द्यावा,+ असा माझा विचार होता.
१७ आता, असा विचार करताना मी बेजबाबदारपणे वागलो का? किंवा माणसांच्या विचारसरणीप्रमाणे या गोष्टींची योजना करून, आधी “हो, हो” आणि नंतर “नाही, नाही” असं म्हणालो का?
१८ पण ज्याप्रमाणे देव भरवशालायक आहे त्याचप्रमाणे आम्ही तुम्हाला जे सांगतो तेही खरं आहे. आम्ही आधी “हो” आणि नंतर “नाही,” असं म्हणणार नाही.
१९ कारण देवाचा मुलगा, येशू ख्रिस्त, ज्याच्याबद्दल आम्ही, म्हणजेच मी, सिल्वान* आणि तीमथ्य+ याने तुमच्यामध्ये घोषणा केली, तो ख्रिस्त “हो” आणि तरीसुद्धा “नाही” असा झाला नाही. तर त्याच्या बाबतीत “हो” याचा अर्थ नेहमी “हो” असाच झाला आहे.
२० कारण देवाची कितीही अभिवचनं असली, तरी ती सगळी ख्रिस्ताद्वारे खरी ठरली आहेत.*+ आणि म्हणून, त्याच्याचद्वारे आपण देवाला “आमेन” असं म्हणतो+ आणि यामुळे आपल्याद्वारे त्याचा गौरव होतो.
२१ पण तुम्ही आणि आम्ही ख्रिस्ताचे आहोत या गोष्टीची जो हमी देतो आणि ज्याने आपल्याला अभिषिक्त केलं, तो स्वतः देव आहे.+
२२ त्याने आपल्यावर त्याचा शिक्का मारला आहे+ आणि आपल्याला येणाऱ्या गोष्टींची एक हमी* दिली आहे. ती म्हणजे, आपल्या हृदयात त्याने दिलेली त्याची पवित्र शक्ती.*+
२३ तुम्हाला आणखी दुःख द्यायचं नसल्यामुळेच मी अजून करिंथला आलेलो नाही. हे खोटं असेल, तर देवाने माझ्याविरुद्ध साक्ष द्यावी.
२४ आम्ही तुमच्या विश्वासावर सत्ता गाजवणारे आहोत असं नाही,+ तर तुमच्या आनंदासाठी आम्ही तुमचे सहकारी आहोत. कारण, तुम्ही उभे आहात ते तुमच्या स्वतःच्याच विश्वासामुळे.
तळटीपा
^ किंवा “परीक्षेत.”
^ किंवा “आपल्याला धीर देतो.”
^ किंवा “परीक्षांमध्ये.”
^ किंवा “संकटांना.”
^ किंवा “तुम्हाला वाचवलं जावं.”
^ किंवा कदाचित, “ज्या तुम्हाला आधीच चांगल्या प्रकारे माहीत आहेत.”
^ शब्दशः “शेवटपर्यंत.”
^ किंवा कदाचित, “तुम्हाला दोन वेळा फायदा व्हावा.”
^ याला सीला असंही म्हणतात.
^ शब्दशः “‘हो’ आहेत.”
^ किंवा “आगाऊ रक्कम.”
^ शब्दार्थसूची पाहा.