करिंथकर यांना दुसरं पत्र १२:१-२१

  • पौलने पाहिलेले दृष्टान्त (१-७क)

  • पौलच्या “शरीरात एक काटा” (७ख-१०)

  • अतिश्रेष्ठ प्रेषितांपेक्षा कोणत्याही बाबतीत कमी नाही (११-१३)

  • करिंथकरांबद्दल पौलची काळजी (१४-२१)

१२  बढाई मारायचा काहीच उपयोग नसला, तरी मला बढाई मारणं भाग आहे. आता मी, प्रभूने दाखवलेले अद्‌भुत दृष्टान्त+ आणि त्याच्याकडून प्रकट झालेल्या गोष्टींबद्दल बोलीन.+ २  ख्रिस्तासोबत ऐक्यात असलेल्या अशा एका माणसाला मी ओळखतो, ज्याला १४ वर्षांपूर्वी तिसऱ्‍या स्वर्गात उचलून घेण्यात आलं होतं. त्याला शरीरासह घेण्यात आलं की शरीराशिवाय, हे मला माहीत नाही. देवालाच ते माहीत आहे. ३  हो, खरंच मी अशा माणसाला ओळखतो. त्याला शरीरासह घेण्यात आलं की शरीराशिवाय, हे मला माहीत नाही. देवालाच ते माहीत आहे. ४  त्याला नंदनवनात उचलून नेण्यात आलं आणि ज्या गोष्टी बोलल्या जाऊ शकत नाहीत आणि ज्या बोलायची माणसाला परवानगी नाही, अशा गोष्टी त्याने ऐकल्या. ५  अशा माणसाबद्दल मी बढाई मारीन. मी स्वतःबद्दल नाही, तर फक्‍त माझ्या दुर्बलतांबद्दल बढाई मारीन. ६  कारण जरी मला बढाई मारावीशी वाटली, तरी मी मूर्ख ठरणार नाही, कारण मी खरं तेच बोलीन. तरीसुद्धा मी स्वतःला आवरतो. हे यासाठी, की कोणी माझ्यामध्ये जे काही पाहतो किंवा माझ्याकडून जे काही ऐकतो त्यापेक्षा जास्त श्रेय त्याने मला देऊ नये. ७  तसंच, मला असाधारण गोष्टी प्रकट करण्यात आल्या, म्हणून कोणी मला जास्त महत्त्व देऊ नये. मी गर्वाने फुगू नये, म्हणून माझ्या शरीरात एक काटा रुतवण्यात आला आहे.+ मला तोंडात मारत राहण्यासाठी* ठेवलेल्या सैतानाच्या दूतासारखा तो आहे. म्हणजे मी आहे त्यापेक्षा स्वतःला जास्त समजणार नाही. ८  तो काटा काढून टाकायची मी तीन वेळा प्रभूला विनंती केली. ९  पण तो मला म्हणाला: “माझी अपार कृपा तुझ्यासाठी पुरेशी आहे. कारण दुर्बलतेतच माझं सामर्थ्य परिपूर्ण होतं.”+ त्यामुळे, माझ्या दुर्बलतांबद्दल मी खूप आनंदाने बढाई मारीन, म्हणजे ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया तंबूसारखी माझ्यावर राहील. १०  म्हणूनच मी ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, छळ आणि कठीण परिस्थिती यांना तोंड देताना आनंद मानतो. कारण जेव्हा मी दुर्बळ असतो, तेव्हाच मी ताकदवान होतो.+ ११  मी मूर्ख बनलो आहे आणि तुम्हीच मला असं बनायला भाग पाडलं. खरंतर, तुम्हीच माझी शिफारस करायला हवी होती. कारण तुमच्या नजेरत मी काहीच नसलो, तरी तुमच्या त्या अतिश्रेष्ठ प्रेषितांपेक्षा मी कोणत्याही बाबतीत कमी नाही.+ १२  खरंतर, मी प्रेषित असण्याचे पुरावे तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्यांनी पाहिले होते. मी खूप धीराने+ तुमच्यामध्ये चिन्हं, चमत्कार आणि अद्‌भुत कार्यं करून तुम्हाला ते पुरावे दिले होते.+ १३  कारण फक्‍त एकाच गोष्टीत तुम्ही इतर मंडळ्यांपेक्षा कमी ठरला. ती म्हणजे, मी कोणत्याही प्रकारे तुमच्यावर भार टाकला नाही.+ या चुकीबद्दल मला माफ करा. १४  आता मी तिसऱ्‍यांदा तुमच्याकडे यायच्या तयारीत आहे. पण मी तुमच्यावर भार टाकणार नाही, कारण मला तुमची संपत्ती नको आहे,+ तर तुम्ही हवे आहात. मुलांनी+ आईवडिलांसाठी नाही, तर आईवडिलांनी मुलांसाठी पैसा साठवून ठेवावा, अशी अपेक्षा केली जाते. १५  म्हणून, माझ्याजवळ जे काही आहे ते सगळं मी तुमच्यासाठी* आनंदाने खर्च करीन आणि स्वतःसुद्धा तुमच्यासाठी खर्च होईन.+ मी जर तुमच्यावर इतकं प्रेम करतो, तर मला तुमच्याकडून कमी प्रेम मिळावं का? १६  असो! मी तुमच्यावर कोणताही भार टाकला नाही.+ तरीसुद्धा, मी “धूर्त” होतो आणि मी तुम्हाला “कपटाने” फसवलं, असं तुम्ही म्हणता. १७  मी ज्यांना तुमच्याकडे पाठवलं त्यांच्यापैकीही कोणाद्वारे मी तुमचा गैरफायदा घेतला नाही, घेतला का? १८  मी तीतला विनंती केली आणि त्याच्यासोबत एका बांधवाला पाठवलं. तीतने मुळीच तुमचा गैरफायदा घेतला नाही, घेतला का?+ आम्ही एकसारखीच मनोवृत्ती ठेवून चाललो नाही का? आम्ही एकसारखंच वागलो नाही का? १९  तुम्ही अजूनही असा विचार करत आहात का, की आम्ही तुमच्यासमोर स्वतःचं समर्थन करायचा प्रयत्न करत आहोत? आम्ही ख्रिस्ती या नात्याने देवासमोर स्वतःचं समर्थन करत आहोत. पण प्रिय बांधवांनो, आम्ही जे काही करतो ते सगळं तुम्हाला प्रोत्साहन मिळावं म्हणून करतो. २०  कारण मला भीती वाटते, की मी तुमच्याकडे आल्यावर कदाचित तुम्ही मला माझ्या अपेक्षेप्रमाणे आढळणार नाही. आणि मीसुद्धा तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुम्हाला आढळणार नाही. कदाचित तुमच्यामध्ये भांडणतंटे, हेवेदावे, राग, मतभेद, निंदा, इतरांबद्दल कुजबुज, गर्विष्ठपणा आणि अव्यवस्था या गोष्टी मला दिसून येतील. २१  मला याची चिंता वाटते, की मी तुमच्याकडे येईन तेव्हा माझा देव मला तुमच्यासमोर मान खाली घालायला लावेल; आणि अशुद्धपणा, अनैतिक लैंगिक कृत्यं* आणि निर्लज्ज वर्तन* करून पश्‍चात्ताप न करणाऱ्‍यांबद्दल मला शोक करावा लागेल.

तळटीपा

किंवा “मला मारण्यासाठी.”
किंवा “तुमच्या जिवांसाठी.”
ग्रीक, पोर्निया. शब्दार्थसूची पाहा.
ग्रीक, ॲसेल्गेया. शब्दार्थसूची पाहा.