करिंथकर यांना दुसरं पत्र ७:१-१६
७ म्हणूनच प्रिय बांधवांनो, आपल्याला ही अभिवचनं मिळाली असल्यामुळे+ आपण शरीराला आणि मनाला दूषित करणाऱ्या सगळ्या गोष्टींपासून स्वतःला शुद्ध करू या+ आणि देवाची भीती बाळगून दिवसेंदिवस आणखी पवित्र होऊ या.
२ आमचा मनापासून स्वीकार करा.+ आम्ही कोणाचं वाईट केलं नाही. कोणाचं नुकसान केलं नाही. कोणाचा गैरफायदाही घेतला नाही.+
३ अर्थात, तुम्हाला दोष देण्यासाठी मी या गोष्टी बोलत नाही. कारण मी आधीच सांगितलं आहे, की आम्ही जगलो किंवा मेलो तरी तुम्ही कायम आमच्या मनात असाल.
४ तुमच्याशी मी अगदी मनमोकळेपणाने बोलू शकतो. मला तुमचा फार अभिमान वाटतो. तुमच्यामुळे मला खूप दिलासा मिळाला आहे. आमच्यावर इतकी संकटं असूनही माझं मन आनंदाने ओसंडून वाहत आहे.+
५ आम्ही मासेदोनियात आलो,+ तेव्हा खरंतर आमच्या जिवाला जराही विसावा नव्हता. आम्ही सर्व प्रकारची दुःखं सहन करत होतो; बाहेर भांडणतंटे, तर आत भीती.
६ पण देव, जो खचून गेलेल्यांचं सांत्वन करतो,+ त्याने तीतच्या भेटीद्वारे* आमचं सांत्वन केलं.
७ आणि फक्त त्याच्या भेटीमुळेच नाही, तर मला भेटण्यासाठी तुमची आतुरता, तुम्ही करत असलेला शोक, माझ्याबद्दल असलेली तुमची काळजी* हे सगळं आम्हाला येऊन सांगताना त्याला तुमच्याकडून किती दिलासा मिळाला हे ऐकूनसुद्धा आम्हाला सांत्वन मिळालं; आणि म्हणून मला आणखी जास्त आनंद झाला.
८ मी लिहिलेल्या पत्रामुळे तुम्हाला दुःख झालं असलं,+ तरी याबद्दल मला वाईट वाटत नाही. हो, सुरुवातीला वाटलं (कारण थोड्या वेळासाठी का होईना ते पत्र वाचून तुम्हाला दुःख झालं होतं).
९ पण आता मात्र मला आनंद होतो. कारण तुम्हाला फक्त दुःखच झालं नाही, तर त्या दुःखामुळे तुम्ही पश्चात्ताप करायलाही प्रवृत्त झाला. तुमचं हे दुःख, देवाच्या इच्छेप्रमाणे असल्यामुळे आम्ही तुम्हाला आधी जे सांगितलं, त्यामुळे तुमचं मुळीच नुकसान झालं नाही.
१० कारण, देवाच्या इच्छेप्रमाणे असलेल्या दुःखामुळे पश्चात्ताप उत्पन्न होऊन तारण होतं* आणि यामुळे पुढे पस्तावा करायची वेळ येत नाही.+ याउलट, जगातल्या लोकांसारख्या दुःखामुळे मरण येतं.
११ कारण पाहा! देवाच्या इच्छेप्रमाणे असलेल्या दुःखामुळे तुमच्यामध्ये इतकी उत्सुकता निर्माण झाली, की तुम्ही तुमच्यातला दोष दूर करायला झटला. झालेल्या चुकीबद्दल तुम्हाला मनापासून वाईट वाटलं. तसंच, तुमच्या मनात देवाबद्दल गाढ आदर, पश्चात्ताप करायची प्रामाणिक इच्छा आणि आवेश निर्माण झाला आणि तुम्ही आपली चूक सुधारली!+ या बाबतीत तुम्ही सर्व प्रकारे शुद्ध* असल्याचं दाखवून दिलं.
१२ मी तुम्हाला जे पत्र लिहिलं, ते चूक करणाऱ्यामुळे किंवा ज्याच्याविरुद्ध चूक करण्यात आली त्याच्यामुळे नाही,+ तर आम्ही सांगितलेल्या गोष्टी ऐकायला तुम्ही किती उत्सुक आहात, हे देवासमोर सिद्ध व्हावं म्हणून लिहिलं.
१३ यामुळे आम्हाला दिलासा मिळाला आहे.
पण, यासोबतच तीतला मिळालेल्या आनंदामुळे आम्ही आणखीनच आनंदी झालो, कारण तुम्ही त्याला प्रोत्साहन दिलं.
१४ मी तुमच्याबद्दल त्याच्याजवळ जो अभिमान व्यक्त केला, त्यामुळे माझ्यावर खाली पाहायची वेळ आली नाही. आम्ही तुम्हाला सांगितलेल्या सगळ्या गोष्टी जितक्या खऱ्या होत्या, तितकाच आम्ही तीत याच्याजवळ व्यक्त केलेला अभिमानही खरा ठरला.
१५ इतकंच नाही, तर तुमच्या सर्वांची आज्ञाधारक वृत्ती+ आणि तुम्ही भीतभीत आणि थरथर कापत कशा प्रकारे त्याचा स्वीकार केला, या गोष्टींची आठवण झाल्यावर तुमच्याबद्दल त्याला आणखीनच आपुलकी वाटते.
१६ मला या गोष्टीचा आनंद होतो, की मी सगळ्या बाबतींत तुमच्यावर भरवसा ठेवू शकतो. *
तळटीपा
^ शब्दशः “उपस्थितीद्वारे.”
^ शब्दशः “तुमचा आवेश.”
^ किंवा “आपल्याला वाचवलं जातं.”
^ किंवा “निष्कलंक; निर्दोष.”
^ किंवा कदाचित, “तुमच्यामुळे मला खूप धैर्य मिळतं.”