२ राजे १:१-१८

  • एलीया अहज्याच्या मृत्यूची भविष्यवाणी करतो (१-१८)

 अहाबचा मृत्यू झाल्यावर मवाब+ राष्ट्राने इस्राएलविरुद्ध बंड केलं. २  एकदा शोमरोनमध्ये, अहज्या आपल्या छतावरच्या खोलीत असताना तिथल्या जाळीतून* खाली पडला आणि जखमी झाला. मग त्याने दूतांना असं सांगून पाठवलं: “एक्रोनच्या+ बआल-जबूब दैवताकडे जा, आणि मी बरा होईन की नाही याची चौकशी करा.”+ ३  पण यहोवाचा* स्वर्गदूत एलीया*+ तिश्‍बी याला म्हणाला: “ऊठ आणि शोमरोनच्या राजाच्या दूतांना जाऊन भेट. त्यांना असं म्हण: ‘तुम्ही चौकशी करायला एक्रोनच्या बआल-जबूब दैवताकडे का चाललात? इस्राएलमध्ये काय देव नाही?+ ४  म्हणून आता यहोवा असं म्हणतो: “तू ज्या बिछान्यावर पडून आहेस त्यावरून उठणार नाहीस. तू नक्की मरशील.”’” मग एलीया निघून गेला. ५  राजाचे दूत परत आले तेव्हा राजाने लगेच त्यांना विचारलं: “तुम्ही इतक्या लवकर परत कसं आलात?” ६  त्यावर ते राजाला म्हणाले: “एक माणूस आम्हाला भेटायला आला होता आणि तो आम्हाला म्हणाला: ‘ज्या राजाने तुम्हाला पाठवलंय त्याच्याकडे परत जाऊन त्याला सांगा, की “यहोवा असं म्हणतो: ‘तुम्ही चौकशी करायला एक्रोनच्या बआल-जबूब दैवताकडे का चाललात? इस्राएलमध्ये काय देव नाही? म्हणून आता तू ज्या बिछान्यावर पडून आहेस, त्यावरून उठणार नाहीस. तू नक्की मरशील.’”’”+ ७  तेव्हा राजाने त्यांना विचारलं: “जो माणूस तुम्हाला भेटायला आला होता आणि या सगळ्या गोष्टी बोलला, तो कसा दिसत होता?” ८  ते राजाला म्हणाले: “त्याने एक केसाळ झगा+ घातला होता आणि कमरेला चामड्याचा पट्टा बांधला होता.”+ तेव्हा राजा लगेच म्हणाला: “तो एलीया तिश्‍बीच आहे.” ९  मग राजाने, ५० सैनिकांवर प्रमुख असलेल्या एका अधिकाऱ्‍याला ५० सैनिकांसोबत एलीयाकडे पाठवलं. तो अधिकारी एलीयाकडे गेला तेव्हा एलीया डोंगरमाथ्यावर बसला होता. अधिकारी त्याला म्हणाला: “हे खऱ्‍या देवाच्या माणसा,+ राजाचा हुकूम आहे: ‘खाली ये!’” १०  पण एलीया, त्या अधिकाऱ्‍याला म्हणाला: “मी जर खऱ्‍या देवाचा माणूस असेन, तर आकाशातून अग्नी येऊन+ तुला आणि तुझ्या ५० माणसांना भस्म करो.” तेव्हा आकाशातून अग्नी आला आणि त्याने त्या अधिकाऱ्‍याला व त्याच्या ५० माणसांना भस्म केलं. ११  राजाने मग, ५० सैनिकांवर प्रमुख असलेल्या दुसऱ्‍या एका अधिकाऱ्‍याला ५० सैनिकांसोबत परत एलीयाकडे पाठवलं. तो अधिकारी एलीयाकडे गेला आणि त्याला म्हणाला: “हे खऱ्‍या देवाच्या माणसा, राजाचा आदेश आहे: ‘ताबडतोब खाली ये!’” १२  पण एलीया म्हणाला: “मी जर खऱ्‍या देवाचा माणूस असेन, तर आकाशातून अग्नी येऊन तुला आणि तुझ्या ५० माणसांना भस्म करो.” तेव्हा आकाशातून देवाचा अग्नी आला आणि त्याने त्या अधिकाऱ्‍याला व त्याच्या ५० माणसांना भस्म केलं. १३  मग राजाने, ५० सैनिकांवर प्रमुख असलेल्या तिसऱ्‍या एका अधिकाऱ्‍याला ५० सैनिकांसोबत एलीयाकडे पाठवलं. हा तिसरा अधिकारी मात्र डोंगरावर गेला आणि एलीयासमोर गुडघे टेकून त्याने त्याला नमन केलं. मग त्याच्याकडे दयेची भीक मागून तो अशी विनंती करू लागला: “हे खऱ्‍या देवाच्या माणसा, कृपया माझा आणि तुमच्या या ५० सेवकांचा जीव तुमच्या नजरेत मौल्यवान ठरू द्या. १४  आकाशातून आलेल्या अग्नीने आधीच, दोन अधिकाऱ्‍यांना आणि त्यांच्या ५०-५० माणसांना भस्म करून टाकलंय. पण माझ्यावर दया करा. माझा नाश करू नका.” १५  तेव्हा यहोवाचा स्वर्गदूत एलीयाला म्हणाला: “घाबरू नकोस. त्याच्यासोबत खाली जा.” म्हणून मग एलीया खाली उतरून त्याच्यासोबत राजाकडे गेला. १६  एलीया राजाला म्हणाला: “यहोवा असं म्हणतो: ‘तू तुझ्या दूतांना एक्रोनच्या+ बआल-जबूब दैवताकडे चौकशी करायला का पाठवलंस? इस्राएलमध्ये काय देव नाही?+ तू त्याच्याकडे चौकशी का केली नाहीस? म्हणून आता तू ज्या बिछान्यावर पडून आहेस, त्यावरून उठणार नाहीस. तू नक्की मरशील.’” १७  नंतर अहज्याचा मृत्यू झाला; एलीयाने यहोवाचा जो संदेश सांगितला होता त्याप्रमाणेच हे घडलं. अहज्याला कोणी मुलगा नव्हता, म्हणून यहोराम*+ त्याच्या जागी राजा बनला; यहूदाचा राजा यहोशाफाट याच्या मुलाच्या, म्हणजे यहोरामच्या+ शासनकाळाच्या दुसऱ्‍या वर्षी तो राजा बनला. १८  अहज्याविषयीची+ बाकीची माहिती, म्हणजे त्याने जे काही केलं ते सर्व इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे.

तळटीपा

ही कदाचित, सूर्यप्रकाश येण्यासाठी छताला असलेल्या झरोक्यावरची लाकडी जाळी असावी.
म्हणजे “माझा देव यहोवा आहे.”
म्हणजे, अहज्याचा भाऊ.