२ राजे १०:१-३६
१० अहाबची+ ७० मुलं शोमरोनमध्ये राहत होती. म्हणून येहूने शोमरोनमध्ये असलेल्या वडीलजनांना,+ इज्रेलच्या प्रमुखांना आणि अहाबच्या मुलांचा सांभाळ करणाऱ्यांना पत्रं पाठवली. पत्रांत त्याने असं लिहिलं:
२ “पाहा! तुमच्याजवळ तुमच्या प्रभूची मुलं आहेत. शिवाय, तुमच्याकडे तटबंदीचं शहर, युद्धाचे रथ, घोडे आणि शस्त्रंही आहेत. तेव्हा हे पत्र मिळताच,
३ तुमच्या प्रभूच्या मुलांपैकी जो सगळ्यात उत्तम व योग्य असेल त्याला निवडा आणि त्याला त्याच्या वडिलांच्या राजासनावर बसवा. मग आपल्या प्रभूच्या घराण्यासाठी लढा.”
४ पण ते फार घाबरले आणि म्हणाले: “त्याच्यासमोर जर दोन राजे टिकले नाहीत,+ तर आपण काय टिकणार?”
५ तेव्हा, राजमहालाचा व्यवस्थापक, शहराचा अधिकारी, वडीलजन आणि अहाबच्या मुलांचा सांभाळ करणारे या सर्वांनी येहूला असा निरोप पाठवला: “आम्ही तुमचे दास आहोत. तुम्ही म्हणाल ते सगळं आम्ही करू. आम्ही कोणालाही राजा बनवणार नाही. तुम्हाला जसं योग्य वाटतं, तसं करा.”
६ मग येहूने त्यांना आणखी एक पत्र पाठवलं. तो म्हणाला: “तुम्ही जर माझ्या बाजूने असाल आणि माझं ऐकायला तयार असाल, तर उद्या या वेळेपर्यंत तुमच्या प्रभूच्या मुलांची मुंडकी मला इज्रेलमध्ये आणून द्या.”
अहाब राजाच्या ७० मुलांना शहरातली प्रतिष्ठित माणसं सांभाळायची.
७ पत्र मिळताच त्यांनी राजाच्या ७० मुलांना घेऊन त्यांची कत्तल केली.+ मग त्यांची मुंडकी टोपल्यांमध्ये टाकून त्यांनी त्या टोपल्या इज्रेलमध्ये येहूकडे पाठवल्या.
८ तेव्हा एका सेवकाने येऊन येहूला सांगितलं: “ते राजाच्या मुलांची मुंडकी घेऊन आलेत.” त्यावर तो म्हणाला: “शहराच्या दरवाजाजवळ त्यांचे दोन ढीग करा आणि सकाळपर्यंत ते तसेच राहू द्या.”
९ मग सकाळी येहू बाहेर गेला आणि सर्व लोकांसमोर उभा राहून म्हणाला: “तुम्ही निर्दोष* आहात. मी माझ्या प्रभूविरुद्ध कट रचला. हो, मीच त्याला ठार मारलं.+ पण या सगळ्यांना कोणी ठार मारलं?
१० तर आता लक्षात ठेवा, की यहोवाने अहाबच्या घराण्याबद्दल जे काही सांगितलं होतं, त्यातला यहोवाचा एकूण एक शब्द पूर्ण होईल.+ आणि यहोवा आपला सेवक एलीया याच्याद्वारे जे काही बोलला होता ते त्याने पूर्ण केलंय.”+
११ येहूने इज्रेलमध्ये अहाबच्या घराण्यातला जो कोणी उरला होता, त्या प्रत्येकाला ठार मारलं; तसंच, त्याने अहाबच्या सर्व प्रतिष्ठित माणसांना, मित्रांना आणि त्याच्या याजकांनाही ठार मारलं;+ त्यांतल्या एकालाही त्याने जिवंत सोडलं नाही.+
१२ मग येहू शोमरोनकडे जायला निघाला. रस्त्यात त्याला लोकर कातरणाऱ्यांचं घर लागलं.
१३ तिथे येहूला यहूदाच्या राजाचे, अहज्याचे+ भाऊ भेटले. येहूने त्यांना विचारलं: “तुम्ही कोण आहात?” ते म्हणाले: “आम्ही अहज्याचे भाऊ आहोत. आणि राजाची मुलं व राजमातेची मुलं ही सगळी ठीक आहेत की नाही, ते पाहण्यासाठी आम्ही तिकडे चाललोय.”
१४ त्यावर तो लगेच म्हणाला: “धरा या सगळ्यांना!” तेव्हा त्यांनी त्या ४२ जणांना पकडलं आणि लोकर कातरणाऱ्यांच्या घराजवळ असलेल्या विहिरीकडे नेऊन ठार मारलं; त्यांतल्या एकालाही येहूने जिवंत सोडलं नाही.+
१५ तिथून पुढे गेल्यावर येहूला रेखाबचा+ मुलगा यहोनादाब+ भेटला; तो येहूलाच भेटायला येत होता. त्याने त्याला नमस्कार केला.* मग येहू त्याला म्हणाला: “मी जसा मनापासून तुला विश्वासू आहे, तसा तूही मनापासून मला विश्वासू आहेस का?”
त्यावर यहोनादाब म्हणाला: “हो आहे.”
तेव्हा येहू म्हणाला: “तसं असेल, तर आपला हात पुढे कर.”
म्हणून मग यहोनादाबने आपला हात पुढे केला आणि येहूने त्याचा हात धरून त्याला आपल्या रथात घेतलं.
१६ तो त्याला म्हणाला: “माझ्यासोबत चल, आणि यहोवासाठी मला किती आवेश आहे ते बघ.”*+ अशा प्रकारे ते यहोनादाबला रथात घेऊन पुढे निघाले.
१७ नंतर येहू शोमरोनमध्ये आला. तिथे अहाबच्या घराण्यातला जो कोणी उरला होता त्या प्रत्येकाला त्याने ठार मारलं;+ यहोवाने एलीयाला सांगितलं होतं त्याप्रमाणे येहूने त्यांचा समूळ नाश केला.+
१८ नंतर येहूने सगळ्या लोकांना एकत्र जमवलं आणि तो त्यांना म्हणाला: “बआलची उपासना करण्यासाठी अहाबने फारसं काही केलं नाही;+ पण बआलची उपासना करण्यासाठी येहू सगळं काही करेल.
१९ म्हणून आता बआलच्या सगळ्या संदेष्ट्यांना,+ त्याच्या सगळ्या भक्तांना आणि त्याच्या सगळ्या पुजाऱ्यांना+ माझ्याकडे बोलवा. त्यातला एकही गैरहजर राहायला नको. जो कोणी येणार नाही त्याला मारून टाकलं जाईल! कारण मी बआलसाठी एक मोठं बलिदान देणार आहे.” पण येहू खरंतर, बआलच्या सगळ्या भक्तांचा नाश करण्यासाठी चलाखीने वागत होता.
२० येहू पुढे म्हणाला: “बआलसाठी एक पवित्र सभा ठेवा आणि त्याची घोषणा करा.” तेव्हा त्यांनी तशी घोषणा केली.
२१ त्यानंतर येहूने संपूर्ण इस्राएलमध्ये संदेश पाठवला आणि बआलचे सगळे भक्त त्याच्याकडे आले; त्यांतला एकही मागे राहिला नाही. मग ते सगळे बआलच्या मंदिरात+ गेले आणि मंदिर लोकांनी खचाखच भरलं.
२२ मग येहूने वस्त्र-भांडाराच्या अधिकाऱ्याला अशी आज्ञा दिली: “बआलच्या सगळ्या भक्तांसाठी पोशाख आण.” तेव्हा त्याने त्या सगळ्यांसाठी पोशाख आणले.
२३ यानंतर येहू आणि रेखाबचा मुलगा यहोनादाब+ हे बआलच्या मंदिरात गेले. मग येहू बआलच्या भक्तांना म्हणाला: “इथे सगळे बआलचेच भक्त आहेत ना, यहोवाचा एकही भक्त नाही याची पक्की खातरी करा.”
२४ शेवटी, बलिदानं देण्यासाठी आणि होमार्पणं करण्यासाठी ते आत गेले. इकडे, येहूने आपल्या ८० सैनिकांना बाहेर तैनात केलं होतं. त्याने त्यांना असा आदेश दिला होता: “ज्या माणसांना मी तुमच्या हाती देणार आहे, त्यांच्यातल्या एकालाही निसटू देऊ नका; निसटला तर त्याच्या बदल्यात तुमचा जीव घेतला जाईल.”
२५ मग त्याने होमार्पण दिलं. होमार्पण देऊन झाल्या-झाल्या येहूने आपल्या सैनिकांना आणि सेनाधिकाऱ्यांना आज्ञा दिली: “आत या आणि यांना ठार मारा! एकालाही पळून जाऊ देऊ नका!”+ तेव्हा त्यांनी आत येऊन त्यांना तलवारीने मारून टाकलं आणि बाहेर फेकून दिलं. लोकांची कत्तल करत-करत ते मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत* गेले.
२६ मग त्यांनी बआलच्या मंदिरातले पूजेचे स्तंभ बाहेर काढून+ ते सगळे जाळून टाकले.+
२७ त्यांनी बआलच्या मंदिरातले पूजेचे स्तंभ पाडले.+ आणि ते मंदिर जमीनदोस्त करून+ त्या ठिकाणाला सार्वजनिक शौचालय करून टाकलं; आणि आजपर्यंत ते तसंच आहे.
२८ अशा प्रकारे येहूने इस्राएलमधून बआलची उपासना पूर्णपणे नष्ट केली.
२९ पण, नबाटचा मुलगा यराबाम याने इस्राएलला जी पापं करायला लावली होती, ती येहूने सोडली नाहीत; त्याने बेथेल आणि दान इथली सोन्याची वासरं तशीच राहू दिली.+
३० यहोवा त्याला म्हणाला: “अहाबच्या घराण्याच्या बाबतीत मी जे ठरवलं होतं,+ ते सगळं पूर्ण करून तू माझ्या नजरेत चांगलं तेच केलंस आणि योग्य वागलास. म्हणून तुझ्या चौथ्या पिढीपर्यंत तुझी मुलं इस्राएलच्या राजासनावर बसतील.”+
३१ पण येहू, इस्राएलचा देव यहोवा याच्या नियमशास्त्रानुसार पूर्ण मनाने चालला नाही;+ यराबामने इस्राएलला जी पापं करायला लावली होती, ती येहूने सोडली नाहीत.+
३२ त्या काळात, यहोवा इस्राएल देशाची सीमा हळूहळू कमी करू लागला.* हजाएलने इस्राएलच्या संपूर्ण प्रदेशात ठिकठिकाणी हल्ले करायला सुरुवात केली.+
३३ तो यार्देनपासून पूर्वेकडे असलेल्या गिलादच्या संपूर्ण प्रदेशावर, म्हणजे गाद, रऊबेन आणि मनश्शे यांचे वंशज+ राहायचे त्या संपूर्ण प्रदेशावर हल्ले करू लागला; या प्रदेशात, अर्णोनच्या खोऱ्याजवळ असलेल्या अरोएरपासून गिलाद आणि बाशानपर्यंतचा प्रदेश येतो.+
३४ येहूबद्दलची बाकीची माहिती, म्हणजे त्याने केलेली पराक्रमाची कामं आणि त्याने जे काही केलं ते सर्व इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे.
३५ मग येहूचा मृत्यू झाला* आणि त्याला शोमरोनात दफन करण्यात आलं. त्याच्या जागी त्याचा मुलगा यहोआहाज+ राजा बनला.
३६ येहूने एकूण २८ वर्षं शोमरोनमधून इस्राएलवर राज्य केलं.
तळटीपा
^ किंवा “नीतिमान.”
^ किंवा “आशीर्वाद दिला.”
^ किंवा “मी यहोवाविरुद्ध कोणताही अविश्वासूपणा कसा खपवून घेत नाही ते बघ.”
^ शब्दशः “शहर,” कदाचित किल्ल्यासारखी मजबूत इमारत.
^ किंवा “देश छाटू लागला.”
^ शब्दशः “आपल्या पूर्वजांकडे जाऊन निजला.”