२ राजे ११:१-२१

  • अथल्या राजासन बळकावते (१-३)

  • यहोआशला गुप्तपणे राजा बनवलं जातं (४-१२)

  • अथल्याला मारून टाकलं जातं (१३-१६)

  • यहोयादाने केलेल्या सुधारणा (१७-२१)

११  अहज्याची आई अथल्या+ हिने जेव्हा पाहिलं, की आपल्या मुलाचा मृत्यू झाला आहे,+ तेव्हा तिने राजघराण्यातल्या सगळ्या वारसदारांना मारून टाकलं.+ २  पण राजाच्या ज्या मुलांना मारलं जाणार होतं, त्यांच्यापैकी अहज्याचा मुलगा यहोआश+ याला यहोशेबाने पळवून नेलं; यहोशेबा ही अहज्याची बहीण आणि यहोराम राजाची मुलगी होती. तिने यहोआशला आणि त्याच्या दाईला एका आतल्या खोलीत लपवून ठेवलं. यहोआशला अथल्यापासून लपवून ठेवल्यामुळे तो वाचला. ३  त्याला सहा वर्षं यहोवाच्या मंदिरात लपवून ठेवण्यात आलं. त्या काळात अथल्या देशावर राज्य करत होती. ४  सातव्या वर्षी, यहोयादाने शंभर कारी अंगरक्षकांवर* अधिकारी असलेल्या प्रमुखांना आणि राजमहालाच्या शंभर रक्षकांवर+ अधिकारी असलेल्या प्रमुखांना यहोवाच्या मंदिरात बोलावून घेतलं. तिथे यहोवाच्या मंदिरात त्याने त्यांच्याशी एक करार केला आणि त्यांना तो पाळायची शपथ घ्यायला लावली. मग त्याने त्यांना राजाचा मुलगा दाखवला.+ ५  त्याने त्यांना अशी सूचना दिली: “तुम्ही असं करा: तीन तुकड्यांपैकी रक्षकांची जी तुकडी शब्बाथाच्या दिवशी पहाऱ्‍यावर असेल, तिने राजमहालावर कडक पहारा ठेवावा;+ ६  दुसरी तुकडी ‘पाया’ नावाच्या दरवाजावर पहारा ठेवेल आणि तिसरी राजमहालाच्या रक्षकांच्या मागे असलेल्या दरवाजावर पहारा ठेवेल. तुम्ही आळीपाळीने मंदिरावर पहारा ठेवा. ७  तुमच्यापैकी ज्या दोन तुकड्या शब्बाथाच्या दिवशी पहाऱ्‍यावर नसतात, त्यासुद्धा राजाचं रक्षण करण्यासाठी यहोवाच्या मंदिरावर कडक पहारा ठेवतील. ८  तुम्ही शस्त्रं घेऊन चारही बाजूंनी राजाचं संरक्षण करा. कोणीही पहारा फोडून आत आला, तर त्याला ठार मारून टाका. आणि राजा जिथे कुठे जाईल तिथे त्याच्यासोबत राहा.” ९  तेव्हा, यहोयादा याजकाने सांगितलं होतं, अगदी तसंच त्या शंभर रक्षकांच्या प्रमुखांनी+ केलं. त्यांच्यापैकी प्रत्येकाने, शब्बाथाच्या दिवशी पहाऱ्‍यावर असलेली आपली माणसं सोबत घेतली; तसंच, जी माणसं शब्बाथाच्या दिवशी पहाऱ्‍यावर नव्हती त्या माणसांनाही त्यांनी सोबत घेतलं. मग ते सगळे यहोयादा याजकाकडे आले.+ १०  तेव्हा याजकाने शंभर रक्षकांच्या त्या प्रमुखांना, यहोवाच्या मंदिरात असलेल्या दावीद राजाच्या गोलाकार ढाली आणि भाले दिले. ११  मग राजमहालाचे रक्षक+ हातात शस्त्रं घेऊन आपापल्या जागी उभे राहिले. ते मंदिराच्या उजव्या टोकापासून डाव्या टोकापर्यंत तैनात झाले; ते वेदीच्या+ आणि मंदिराच्या जवळ, राजाच्या सभोवती तैनात झाले. १२  नंतर यहोयादाने राजाच्या मुलाला बाहेर आणलं.+ मग त्याने त्याच्या डोक्यावर मुकुट आणि साक्षपट*+ ठेवला. अशा रितीने त्यांनी त्याला राजा बनवलं आणि त्याचा अभिषेक केला. नंतर ते टाळ्या वाजवून अशी घोषणा करू लागले: “राजाला दीर्घायुष्य लाभो!”+ १३  अथल्याने जेव्हा लोक पळत असल्याचा आणि ओरडत असल्याचा आवाज ऐकला, तेव्हा ती लगेच त्या लोकांकडे यहोवाच्या मंदिरात गेली.+ १४  तिने पाहिलं, की रिवाजाप्रमाणे राजा स्तंभाजवळ उभा आहे.+ आणि रक्षकांचे प्रमुख व कर्णे वाजवणारे+ राजासोबत आहेत. तसंच, देशातले सगळे लोकही जल्लोष करून कर्णे वाजवत आहेत. हे सर्व पाहून अथल्याने आपले कपडे फाडले आणि ती मोठ्याने ओरडून म्हणाली: “विश्‍वासघात! विश्‍वासघात!” १५  मग यहोयादा याजकाने शंभर रक्षकांच्या प्रमुखांना,+ म्हणजे सैन्यावर नेमलेल्या अधिकाऱ्‍यांना अशी आज्ञा दिली: “तिला पहारेकऱ्‍यांमधून बाहेर काढा आणि जो कोणी तिच्या मागे जाईल त्याला तलवारीने मारून टाका!” कारण, याजकाने त्यांना आधीच सांगितलं होतं, की “तिला यहोवाच्या मंदिरात ठार मारू नका.” १६  म्हणून त्यांनी तिला पकडून नेलं. आणि ज्या ठिकाणी घोडे राजमहालात+ प्रवेश करतात, त्या ठिकाणी आल्यावर त्यांनी तिला ठार मारलं. १७  मग यहोयादाच्या मार्गदर्शनाखाली राजाने आणि प्रजेने यहोवासोबत करार केला,+ की ते यहोवाचे लोक म्हणून राहतील. तसंच, राजा आणि लोक यांच्यातही एक करार करण्यात आला.+ १८  त्यानंतर देशातल्या सगळ्या लोकांनी बआलच्या मंदिरात जाऊन त्याच्या वेदी पाडून टाकल्या,+ त्याच्या मूर्तींचा पूर्णपणे चुराडा केला+ आणि वेदींसमोरच बआलच्या पुजाऱ्‍याला, मत्तानला मारून टाकलं.+ मग यहोवाच्या मंदिराची देखरेख करण्यासाठी यहोयादा याजकाने माणसं नेमली.+ १९  नंतर राजाला यहोवाच्या मंदिरातून राजमहालात घेऊन जाण्यासाठी, यहोयादाने शंभर रक्षकांच्या प्रमुखांना,+ कारी अंगरक्षकांना,* राजमहालाच्या रक्षकांना+ आणि देशातल्या सगळ्या लोकांना आपल्यासोबत घेतलं. मग ते सगळे राजमहालातल्या रक्षकांच्या दरवाजातून महालात आले, आणि राजा राजासनावर जाऊन बसला.+ २०  तेव्हा देशातल्या सगळ्या लोकांनी आनंदोत्सव केला. आणि अथल्याला राजमहालात तलवारीने मारून टाकण्यात आल्यामुळे शहर शांत झालं. २१  यहोआश+ राजा बनला तेव्हा तो सात वर्षांचा होता.+

तळटीपा

शाही अंगरक्षक म्हणून काम करणारी सैनिकांची तुकडी.
कदाचित देवाचं नियमशास्त्र असलेली गुंडाळी.
शाही अंगरक्षक म्हणून काम करणारी सैनिकांची तुकडी.