२ राजे १२:१-२१

  • यहूदाचा राजा यहोआश (१-३)

  • यहोआश मंदिराची दुरुस्ती करतो (४-१६)

  • सीरियाचं आक्रमण (१७, १८)

  • यहोआशचा खून (१९-२१)

१२  येहूच्या+ शासनकाळाच्या सातव्या वर्षी यहोआश+ राजा बनला. त्याने ४० वर्षं यरुशलेममधून राज्य केलं. त्याच्या आईचं नाव सिब्या असून ती बैर-शेबा+ इथली होती. २  यहोयादा याजक जोपर्यंत मार्गदर्शन करत होता, तोपर्यंत यहोआश राजा यहोवाच्या नजरेत योग्य ते करत राहिला. ३  पण उपासनेची उच्च स्थानं*+ काढून टाकण्यात आली नव्हती. आणि लोक अजूनही उच्च स्थानांवर बलिदानं अर्पण करत होते आणि बलिदानांचं हवन करत होते.* ४  मग यहोआश याजकांना म्हणाला: “यहोवाच्या मंदिरात पवित्र अर्पण+ म्हणून येणारा सगळा पैसा गोळा करा; म्हणजे प्रत्येकाला द्यावी लागणारी ठरावीक रक्कम,+ नवस करणाऱ्‍या लोकांनी दिलेला पैसा, तसंच, यहोवाच्या मंदिरासाठी प्रत्येकाने स्वेच्छेने दिलेलं दान, हे सर्व गोळा करा.+ ५  याजकांनी स्वतः लोकांकडून* तो पैसा घ्यावा आणि जिथे कुठे मंदिराची मोडतोड झाली असेल,* तिथली दुरुस्ती करण्यासाठी त्याचा वापर करावा.”+ ६  पण, यहोआश राजाच्या शासनकाळाच्या २३ व्या वर्षापर्यंत याजकांनी मंदिराची दुरुस्ती केली नव्हती.+ ७  म्हणून राजाने, यहोयादा+ याजकाला आणि इतर याजकांना बोलावून विचारलं: “तुम्ही मंदिराची दुरुस्ती का करत नाहीत? जर लोकांकडून घेतलेला पैसा तुम्ही मंदिराची दुरुस्ती करायला वापरत नसाल, तर आता लोकांकडून आणखी पैसा घेऊ नका.”+ ८  तेव्हा, लोकांकडून आणखी पैसे घ्यायचे नाहीत आणि मंदिराच्या दुरुस्तीची जबाबदारीही परत देऊन टाकायची असं याजकांनी मान्य केलं. ९  मग यहोयादा याजकाने एक पेटी+ घेऊन तिच्या झाकणाला एक छिद्र पाडलं. त्याने ती पेटी वेदीच्या बाजूला, म्हणजे यहोवाच्या मंदिरात येणाऱ्‍यांच्या उजवीकडे ठेवली. द्वारपाल म्हणून काम करणारे याजक यहोवाच्या मंदिरात येणारा सगळा पैसा त्यात टाकायचे.+ १०  पेटीत भरपूर पैसे जमले, की राजाचा सचिव आणि महायाजक येऊन यहोवाच्या मंदिरात आलेला सगळा पैसा गोळा करायचे* आणि मोजायचे.+ ११  मग हा मोजलेला पैसा ते यहोवाच्या मंदिराचं दुरुस्तीचं काम पाहणाऱ्‍या माणसांना द्यायचे. पुढे ही माणसं तो पैसा यहोवाच्या मंदिरात काम करणाऱ्‍या सुतारांना व बांधकाम करणाऱ्‍यांना,+ १२  गवंड्यांना व दगड फोडणाऱ्‍यांना मजुरी म्हणून द्यायचे. तसंच, या पैशातून यहोवाच्या मंदिराची डागडुजी करण्यासाठी ते लाकडं आणि घडवलेले दगडही विकत घ्यायचे; शिवाय, दुरुस्तीचा इतर सर्व खर्च भागवण्यासाठीही ते या पैशाचा उपयोग करायचे. १३  पण यहोवाच्या मंदिरात येणाऱ्‍या पैशांचा उपयोग चांदीची गंगाळं, आग विझवण्याच्या कातरी, वाट्या किंवा कर्णे+ विकत घ्यायला; किंवा मग यहोवाच्या मंदिरासाठी सोन्या-चांदीच्या वस्तू विकत घ्यायला केला जात नव्हता.+ १४  तर हा पैसा फक्‍त बांधकाम करणाऱ्‍यांना दिला जायचा आणि या पैशाने ते यहोवाच्या मंदिराची डागडुजी करायचे. १५  कामगारांना मजुरी देण्यासाठी ज्या माणसांना नेमलं होतं, त्यांच्याकडून पैशांचा हिशोब घेतला जात नव्हता; कारण ही माणसं भरवशालायक होती.+ १६  दोषार्पणं+ आणि पापार्पणं यांसाठी दिल्या जाणाऱ्‍या पैशाचा उपयोग मात्र यहोवाच्या मंदिराची दुरुस्ती करण्यासाठी केला जात नव्हता; त्या पैशांवर याजकांचा हक्क होता.+ १७  त्याच काळात, सीरियाचा राजा हजाएल+ याने गथ+ शहरावर हल्ला करून ते काबीज केलं. मग त्याने यरुशलेमवर हल्ला करायचं ठरवलं.+ १८  तेव्हा यहूदाचा राजा यहोआश याने आपल्या वाडवडिलांनी, म्हणजे यहोशाफाट, यहोराम आणि अहज्या या यहूदाच्या राजांनी पवित्र अर्पण म्हणून राखून ठेवलेला पैसा घेतला आणि तो सीरियाचा राजा हजाएल याला पाठवला; तसंच यहोआशने स्वतः पवित्र अर्पण म्हणून राखून ठेवलेला पैसा आणि यहोवाच्या मंदिरातल्या व राजमहालातल्या भांडारांतलं सगळं सोनंसुद्धा हजाएलला पाठवलं.+ तेव्हा हजाएलने यरुशलेमवर हल्ला करण्याचा विचार सोडून दिला आणि तो तिथून निघून गेला. १९  यहोआशबद्दलची बाकीची माहिती, म्हणजे त्याने जे काही केलं ते सर्व यहूदाच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे. २०  पण, यहोआशच्या सेवकांनी त्याच्याविरुद्ध कट रचला,+ आणि सिल्ला या ठिकाणी जाणाऱ्‍या रस्त्यावर असलेलं बेथ-मिल्लो*+ इथे त्यांनी त्याला ठार मारलं. २१  त्याला त्याच्या सेवकांनी, म्हणजे शिमाथचा मुलगा योजाखार आणि शोमरचा मुलगा यहोजाबाद यांनी ठार मारलं.+ त्यांनी त्याला दावीदपुरात त्याच्या पूर्वजांच्या कबरेत दफन केलं. आणि त्याच्या जागी त्याचा मुलगा अमस्या राजा बनला.+

तळटीपा

किंवा “धूर वर जाण्यासाठी बलिदानं जाळत होते.”
शब्दशः “ओळखीच्या लोकांकडून.”
किंवा “भेगा पडल्या असतील.”
किंवा “थैल्यांमध्ये टाकायचे.” शब्दशः “बांधायचे.”
किंवा “टेकडीवरचा किल्ला.”