२ राजे १४:१-२९
१४ इस्राएलचा राजा यहोआहाज+ याच्या मुलाच्या, म्हणजे यहोआशच्या शासनकाळाच्या दुसऱ्या वर्षी, यहूदाचा राजा यहोआश याचा मुलगा अमस्या हा राजा बनला.
२ अमस्या राजा बनला तेव्हा तो २५ वर्षांचा होता. त्याने यरुशलेममधून २९ वर्षं राज्य केलं. त्याच्या आईचं नाव यहोअद्दीन असून ती यरुशलेमची राहणारी होती.+
३ अमस्या यहोवाच्या नजरेत जे योग्य ते करत राहिला; मात्र आपला पूर्वज दावीद याच्याइतकं नाही.+ त्याचे वडील यहोआश यांच्यासारखंच त्याने सगळं काही केलं.+
४ पण उपासनेची उच्च स्थानं* काढून टाकण्यात आली नव्हती.+ आणि लोक अजूनही उच्च स्थानांवर बलिदानं अर्पण करत होते व बलिदानांचं हवन करत होते.*+
५ अमस्याने राज्यावरची आपली पकड मजबूत करताच आपल्या वडिलांचा खून करणाऱ्या आपल्या सेवकांना ठार मारलं.+
६ पण त्या सेवकांच्या मुलांना त्याने ठार मारलं नाही. कारण, यहोवाने मोशेच्या नियमशास्त्रात अशी आज्ञा दिली होती: “मुलांच्या पापासाठी वडिलांना, किंवा वडिलांच्या पापासाठी मुलांना ठार मारलं जाऊ नये. तर प्रत्येकाला स्वतःच्याच पापासाठी ठार मारलं जावं.”+
७ मग अमस्याने क्षार खोऱ्यात+ अदोमच्या+ १०,००० माणसांना ठार मारलं. त्याने युद्ध करून सेला शहर काबीज केलं+ आणि त्याला यकथेल असं नाव दिलं; आजपर्यंत ते याच नावाने ओळखलं जातं.
८ मग अमस्याने इस्राएलचा राजा येहू याच्या नातवाला, म्हणजे यहोआहाजचा मुलगा यहोआश याला दूतांच्या हातून असा संदेश पाठवला: “चल, युद्ध करायला ये! आपण समोरासमोर लढू.”+
९ त्यावर इस्राएलचा राजा यहोआश याने यहूदाचा राजा अमस्या याला असं उत्तर दिलं: “लबानोनच्या काटेरी झुडपाने लबानोनच्या देवदार वृक्षाला एकदा असा निरोप पाठवला: ‘तुझी मुलगी माझ्या मुलाला बायको म्हणून दे.’ पण लबानोनच्या एका जंगली प्राण्याने तिथून जाताना, त्या काटेरी झुडपाला आपल्या पायांखाली तुडवलं.
१० हे खरंय, की तू अदोमला हरवलंस,+ आणि यामुळे तुझं मन गर्वाने फुगलंय. तर आता आपल्या घरातच बसून विजयाचा आनंद घे. संकटाला आमंत्रण का देतोस? स्वतःसोबत यहूदालाही संकटात का पाडतोस?”
११ पण अमस्याने त्याचं ऐकलं नाही.+
म्हणून इस्राएलचा राजा यहोआश यहूदाच्या राजाशी, अमस्याशी युद्ध करायला गेला. आणि ते यहूदामधल्या+ बेथ-शेमेश+ या ठिकाणी एकमेकांशी लढले.
१२ युद्धात इस्राएलने यहूदाला हरवलं, आणि यहूदाचे सगळे सैनिक घरी पळून गेले.
१३ मग इस्राएलचा राजा यहोआश याने बेथ-शेमेश इथे यहूदाचा राजा अमस्या याला बंदी बनवलं (अमस्या हा अहज्याचा नातू आणि यहोआशचा मुलगा होता). यहोआशने अमस्याला बंदी बनवून यरुशलेमला आणलं. तिथे त्याने यरुशलेमच्या भिंतीचा ४०० हात* लांब भाग, म्हणजे एफ्राईमच्या दरवाजापासून+ कोपऱ्याच्या दरवाजापर्यंतचा+ भाग तोडून टाकला.
१४ मग त्याने यहोवाच्या मंदिरात आणि राजमहालाच्या भांडारांत असलेलं सगळं सोनं, चांदी व सगळ्या वस्तू लुटल्या; आणि लोकांना बंदी बनवून तो शोमरोनला परत गेला.
१५ यहोआशबद्दलची बाकीची माहिती, म्हणजे त्याने केलेली पराक्रमाची कामं आणि तो यहूदाचा राजा अमस्या याच्याशी कसा लढला; तसंच, त्याने जे काही केलं ते सर्व इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे.
१६ मग यहोआशचा मृत्यू झाला* आणि त्याला शोमरोनात इस्राएलच्या राजांच्या कबरेत दफन करण्यात आलं.+ त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा यराबाम*+ त्याच्या जागी राजा बनला.
१७ यहूदाचा राजा यहोआश याचा मुलगा अमस्या+ हा इस्राएलचा राजा यहोआहाज याच्या मुलाच्या, म्हणजे यहोआशच्या+ मृत्यूनंतर आणखी १५ वर्षं जगला.+
१८ अमस्याबद्दलची बाकीची माहिती, यहूदाच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आली आहे.
१९ पुढे अमस्याविरुद्ध यरुशलेममध्ये कट रचण्यात आला;+ म्हणून तो लाखीशला पळून गेला. पण त्याच्या शत्रूंनी लाखीशला त्याच्यामागे माणसं पाठवली आणि त्याला ठार मारलं.
२० मग, त्यांनी त्याचा मृतदेह घोड्यावर टाकून यरुशलेममध्ये परत आणला; आणि दावीदपुरात त्याच्या पूर्वजांच्या कबरेत त्याला दफन केलं.+
२१ त्यानंतर यहूदाच्या सर्व लोकांनी अमस्याचा मुलगा अजऱ्या*+ याला त्याच्या वडिलांच्या जागी राजा बनवलं.+ त्या वेळी अजऱ्या १६ वर्षांचा होता.+
२२ अमस्या राजाचा मृत्यू झाल्यानंतर* अजऱ्याने एलाथ+ शहर पुन्हा बांधलं आणि ते यहूदाच्या सत्तेखाली आणलं.+
२३ यहूदाच्या राजाचा मुलगा, म्हणजे यहोआशचा मुलगा अमस्या याच्या शासनकाळाच्या १५ व्या वर्षी, इस्राएलचा राजा यहोआश याचा मुलगा यराबाम+ हा शोमरोनात राजा बनला; त्याने ४१ वर्षं राज्य केलं.
२४ यहोवाच्या नजरेत जे वाईट ते तो करत राहिला. नबाटचा मुलगा यराबाम याने इस्राएलला जी पापं करायला लावली होती,+ ती त्याने सोडली नाहीत.
२५ त्याने लबो-हमाथपासून*+ थेट अराबाच्या+ समुद्रापर्यंतचा* इस्राएलचा संपूर्ण प्रदेश परत मिळवला. इस्राएलचा देव यहोवा याने आपल्या सेवकाद्वारे, म्हणजे योना संदेष्ट्याद्वारे जे सांगितलं होतं त्याप्रमाणे त्याने हे केलं; योना+ हा अमित्तय याचा मुलगा असून गथ-हेफेर+ इथला राहणारा होता.
२६ यहोवाने पाहिलं होतं, की इस्राएलला किती दुःख सहन करावं लागत आहे.+ शिवाय, इस्राएलला मदत करण्यासाठी कोणीही उरला नव्हता; अगदी लाचार किंवा दुर्बळ माणूसही उरला नव्हता.
२७ पण यहोवाने अशी शपथ घेतली होती, की तो पृथ्वीवरून इस्राएलचं नाव कधीही मिटवून टाकणार नाही.+ म्हणून त्याने यहोआशचा मुलगा यराबाम याचा उपयोग करून इस्राएलला वाचवलं.+
२८ यराबामबद्दलची बाकीची माहिती, म्हणजे त्याने केलेली पराक्रमाची कामं, तो कसा लढला आणि त्याने कशा प्रकारे दिमिष्क+ आणि हमाथ+ हे यहूदा व इस्राएलच्या सत्तेखाली परत आणलं; तसंच, त्याने जे काही केलं ते सर्व इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे.
२९ मग यराबामचा मृत्यू झाला* आणि त्याला इस्राएलच्या राजांच्या कबरेत दफन करण्यात आलं. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा जखऱ्या+ त्याच्या जागी राजा बनला.
तळटीपा
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “धूर वर जाण्यासाठी बलिदानं जाळत होते.”
^ शब्दशः “तो आपल्या पूर्वजांकडे जाऊन निजला.”
^ म्हणजे, यराबाम दुसरा.
^ म्हणजे, “यहोवाने मदत केली आहे.” २रा १५:१३; २इति २६:१-२३; यश ६:१; आणि जख १४:५ या वचनांत त्याला उज्जीया म्हटलं आहे.
^ शब्दशः “आपल्या पूर्वजांकडे जाऊन निजल्यानंतर.”
^ म्हणजे, क्षार समुद्र, किंवा मृत समुद्र.
^ किंवा “हमाथच्या प्रवेशद्वारापासून.”
^ शब्दशः “आपल्या पूर्वजांकडे जाऊन निजला.”