२ राजे १५:१-३८

१५  इस्राएलचा राजा यराबाम* याच्या शासनकाळाच्या २७ व्या वर्षी अजऱ्‍या*+ राजा बनला;+ तो यहूदाच्या राजाचा, अमस्याचा+ मुलगा होता. २  अजऱ्‍या राजा बनला त्या वेळी तो १६ वर्षांचा होता. त्याने ५२ वर्षं यरुशलेममधून राज्य केलं. त्याच्या आईचं नाव यखल्या असून ती यरुशलेमची राहणारी होती. ३  आपले वडील अमस्या यांच्याप्रमाणेच अजऱ्‍यासुद्धा यहोवाच्या नजरेत जे योग्य ते करत राहिला.+ ४  पण उपासनेची उच्च स्थानं* काढून टाकण्यात आली नव्हती.+ आणि लोक अजूनही उच्च स्थानांवर बलिदानं अर्पण करत होते व बलिदानांचं हवन करत होते.*+ ५  यहोवाने अजऱ्‍या राजाला कुष्ठरोगाने* पीडित केलं, आणि तो मरेपर्यंत कुष्ठरोगीच राहिला.+ कुष्ठरोगामुळे राजा वेगळ्या घरात राहायचा;+ या काळात, राजाचा मुलगा योथाम+ हा राजमहालाचा कारभार पाहायचा आणि देशातल्या लोकांचा न्यायनिवाडा करायचा.+ ६  अजऱ्‍याबद्दलची+ बाकीची माहिती, म्हणजे त्याने जे काही केलं ते सर्व यहूदाच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे. ७  मग, अजऱ्‍याचा मृत्यू झाला*+ आणि त्याला दावीदपुरात आपल्या पूर्वजांच्या कबरेत दफन करण्यात आलं. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा योथाम त्याच्या जागी राजा बनला. ८  यहूदाचा राजा अजऱ्‍या+ याच्या शासनकाळाच्या ३८ व्या वर्षी यराबामचा मुलगा जखऱ्‍या+ इस्राएलचा राजा बनला. त्याने शोमरोनमधून सहा महिने इस्राएलवर राज्य केलं. ९  आपल्या पूर्वजांप्रमाणेच जखऱ्‍यासुद्धा यहोवाच्या नजरेत जे वाईट ते करत राहिला. नबाटचा मुलगा यराबाम याने इस्राएलला जी पापं करायला लावली होती,+ ती करण्याचं जखऱ्‍याने सोडलं नाही. १०  मग याबेशचा मुलगा शल्लूम याने जखऱ्‍याविरुद्ध कट रचून त्याला इब्लाम+ इथे ठार मारलं.+ त्याला ठार मारल्यावर शल्लूम त्याच्या जागी राजा बनला. ११  जखऱ्‍याबद्दलची बाकीची माहिती इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आली आहे. १२  अशा प्रकारे, यहोवाने येहूला सांगितलं होतं ते पूर्ण झालं. तो म्हणाला होता: “तुझ्या चौथ्या पिढीपर्यंत तुझी मुलं+ इस्राएलच्या राजासनावर बसतील.”+ आणि अगदी तसंच घडलं. १३  यहूदाचा राजा उज्जीया+ याच्या शासनकाळाच्या ३९ व्या वर्षी याबेशचा मुलगा शल्लूम राजा बनला. त्याने एक महिना शोमरोनमधून राज्य केलं. १४  मग गादीचा मुलगा मनहेम हा तिरसा+ इथून शोमरोनला आला. आणि तिथे त्याने याबेशचा मुलगा शल्लूम+ याला ठार मारलं. शल्लूमला ठार मारल्यावर मनहेम त्याच्या जागी राजा बनला. १५  शल्लूमबद्दलची बाकीची माहिती आणि त्याने रचलेल्या कटाबद्दल, इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे. १६  त्या वेळी, मनहेम हा तिरसातून निघून तिफसाह या ठिकाणी आला. पण तिथल्या लोकांनी त्याच्यासाठी तिफसाहचे दरवाजे उघडले नाहीत. म्हणून त्याने तिथल्या आणि आसपासच्या प्रदेशांतल्या लोकांवर हल्ला केला आणि त्यांना मारून टाकलं; तिथे राहणाऱ्‍या गरोदर स्त्रियांना त्याने चिरून टाकलं. अशा रितीने त्याने तिफसाहचा नाश केला. १७  यहूदाचा राजा अजऱ्‍या याच्या शासनकाळाच्या ३९ व्या वर्षी गादीचा मुलगा मनहेम इस्राएलचा राजा बनला; त्याने दहा वर्षं शोमरोनमधून राज्य केलं. १८  यहोवाच्या नजरेत जे वाईट ते तो करत राहिला. नबाटचा मुलगा यराबाम याने इस्राएलला जी पापं करायला लावली होती,+ ती करण्याचं मनहेमने आयुष्यभर सोडलं नाही. १९  अश्‍शूरचा राजा पूल+ इस्राएलवर हल्ला करायला आला, तेव्हा मनहेमने त्याला १,००० तालान्त* चांदी दिली; राज्यावरची आपली पकड मजबूत करण्यासाठी अश्‍शूरच्या राजाने आपल्याला मदत करावी, या उद्देशाने मनहेमने असं केलं.+ २०  अश्‍शूरच्या राजाला चांदी देण्यासाठी मनहेमने इस्राएलच्या प्रत्येक श्रीमंत आणि प्रतिष्ठित माणसाकडून ५० शेकेल* चांदी जबरदस्ती काढून घेतली.+ तेव्हा अश्‍शूरच्या राजाने देशावर हल्ला करण्याचा आपला विचार सोडला आणि तो परत निघून गेला. २१  मनहेमबद्दलची+ बाकीची माहिती, म्हणजे त्याने जे काही केलं ते सर्व इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे. २२  मग मनहेमचा मृत्यू झाला* आणि त्याच्या जागी त्याचा मुलगा पकयाह राजा बनला. २३  यहूदाचा राजा अजऱ्‍या याच्या शासनकाळाच्या ५० व्या वर्षी मनहेमचा मुलगा पकयाह इस्राएलचा राजा बनला. त्याने शोमरोनमधून दोन वर्षं इस्राएलवर राज्य केलं. २४  यहोवाच्या नजरेत जे वाईट ते तो करत राहिला. नबाटचा मुलगा यराबाम याने इस्राएलला जी पापं करायला लावली होती,+ ती पकयाहने सोडली नाहीत. २५  मग पकयाहच्या+ सेनाधिकाऱ्‍याने, म्हणजे रमाल्याहचा मुलगा पेकह याने त्याच्याविरुद्ध कट रचून त्याला ठार मारलं. त्याने त्याला अर्गोब आणि अरये यांच्यासोबत शोमरोनातल्या राजमहालाच्या मनोऱ्‍यात ठार मारलं; गिलादची ५० माणसंही त्याच्यासोबत होती. पकयाहला मारून टाकल्यानंतर पेकह त्याच्या जागी राजा बनला. २६  पकयाहबद्दलची बाकीची माहिती, म्हणजे त्याने जे काही केलं ते सर्व इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे. २७  यहूदाचा राजा अजऱ्‍या याच्या शासनकाळाच्या ५२ व्या वर्षी रमाल्याहचा मुलगा पेकह+ इस्राएलचा राजा बनला. त्याने शोमरोनमधून २० वर्षं इस्राएलवर राज्य केलं. २८  यहोवाच्या नजरेत जे वाईट ते तो करत राहिला. नबाटचा मुलगा यराबाम याने इस्राएलला जी पापं करायला लावली होती,+ ती पेकहने सोडली नाहीत. २९  इस्राएलचा राजा पेकह याच्या शासनकाळात, अश्‍शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर+ याने ईयोन, आबेल-बेथ-माका,+ यानोहा, केदेश,+ हासोर व गिलाद+ आणि गालील, म्हणजे नफतालीच्या+ सगळ्या प्रदेशावर हल्ला करून ते काबीज केलं. तसंच, त्याने तिथल्या लोकांना बंदी बनवून अश्‍शूरला नेलं.+ ३०  मग एलाहचा मुलगा होशे+ याने रमाल्याहचा मुलगा पेकह याच्याविरुद्ध कट रचला; त्याच्यावर हल्ला करून त्याने त्याला ठार मारलं, आणि तो पेकहच्या जागी राजा बनला. उज्जीयाचा मुलगा योथाम+ याच्या शासनकाळाच्या २० व्या वर्षी होशे राजा बनला. ३१  पेकहबद्दलची बाकीची माहिती, म्हणजे त्याने जे काही केलं ते सर्व इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे. ३२  इस्राएलचा राजा रमाल्याह याच्या मुलाच्या, म्हणजे पेकहच्या शासनकाळाच्या दुसऱ्‍या वर्षी, यहूदाचा राजा उज्जीया+ याचा मुलगा योथाम+ हा राजा बनला. ३३  योथाम राजा बनला तेव्हा तो २५ वर्षांचा होता. त्याने १६ वर्षं यरुशलेममधून राज्य केलं. त्याच्या आईचं नाव यरूशा असून ती सादोकची मुलगी होती.+ ३४  योथाम हा आपले वडील उज्जीया यांच्याप्रमाणेच यहोवाच्या नजरेत जे योग्य ते करत राहिला.+ ३५  त्यानेच यहोवाच्या मंदिराचा वरचा दरवाजा बनवून घेतला होता.+ पण उपासनेची उच्च स्थानं काढून टाकण्यात आली नव्हती.+ आणि लोक अजूनही उच्च स्थानांवर बलिदानं अर्पण करत होते व बलिदानांचं हवन करत होते. ३६  योथामबद्दलची बाकीची माहिती, म्हणजे त्याने जे काही केलं ते सर्व यहूदाच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे. ३७  त्या काळात यहोवा, यहूदावर हल्ले करण्यासाठी+ रमाल्याहचा मुलगा पेकह+ आणि सीरियाचा राजा रसीन यांना पाठवू लागला. ३८  मग योथामचा मृत्यू झाला* आणि त्याला आपला पूर्वज दावीद याच्या शहरात, म्हणजे दावीदपुरात आपल्या पूर्वजांच्या कबरेत दफन करण्यात आलं. त्यानंतर त्याचा मुलगा आहाज त्याच्या जागी राजा बनला.

तळटीपा

म्हणजे, “यहोवाने मदत केली आहे.” २रा १५:१३; २इति २६:१-२३; यश ६:१; आणि जख १४:५ या वचनांत त्याला उज्जीया म्हटलं आहे.
म्हणजे, यराबाम दुसरा.
किंवा “धूर वर जाण्यासाठी बलिदानं जाळत होते.”
शब्दशः “आपल्या पूर्वजांकडे जाऊन निजला.”
एक तालान्त म्हणजे ३४.२ किलो. अति. ख१४ पाहा.
एक शेकेल म्हणजे ११.४ ग्रॅम. अति. ख१४ पाहा.
शब्दशः “आपल्या पूर्वजांकडे जाऊन निजला.”
शब्दशः “आपल्या पूर्वजांकडे जाऊन निजला.”