२ राजे १६:१-२०

  • यहूदाचा राजा आहाज (१-६)

  • तो अश्‍शूरच्या राजाला भेट पाठवतो (७-९)

  • तो मूर्तिपूजक लोकांच्या वेदीसारखी वेदी बांधतो (१०-१८)

  • आहाजचा मृत्यू (१९, २०)

१६  रमाल्याहचा मुलगा पेकह याच्या शासनकाळाच्या १७ व्या वर्षी, यहूदाचा राजा योथाम याचा मुलगा आहाज+ हा राजा बनला. २  तो राजा बनला तेव्हा २० वर्षांचा होता. त्याने १६ वर्षं यरुशलेममधून राज्य केलं. आपला पूर्वज दावीद याने जसं आपला देव यहोवा याच्या नजरेत योग्य ते केलं, तसं आहाजने केलं नाही.+ ३  तो इस्राएलच्या राजांच्या पावलांवर पाऊल ठेवून चालला.+ इतकंच नाही, तर त्याने आपल्या स्वतःच्या मुलाचाही अग्नीत होम केला.*+ यहोवाने ज्या राष्ट्रांना इस्राएली लोकांमधून घालवून दिलं होतं, त्यांच्या घृणास्पद चालीरितींचं त्याने अनुसरण केलं.+ ४  याशिवाय, तो उच्च स्थानांवर,*+ टेकड्यांवर आणि प्रत्येक हिरव्यागार वृक्षाखाली बलिदानं अर्पण करत राहिला व बलिदानांचं हवन करत राहिला.*+ ५  या काळात, इस्राएलचा राजा रमाल्याह याचा मुलगा पेकह आणि सीरियाचा राजा रसीन हे आहाजशी युद्ध करायला आले. त्यांनी येऊन यरुशलेमला वेढा घातला,+ पण ते त्या शहरावर कब्जा करू शकले नाहीत. ६  त्या वेळी, सीरियाचा राजा रसीन याने एलाथ+ शहर जिंकून ते परत अदोमच्या सत्तेखाली आणलं. त्याने एलाथमध्ये राहणाऱ्‍या यहुदी लोकांना* तिथून हाकलून लावलं. मग अदोमी लोक तिथे येऊन राहू लागले; आणि आजपर्यंत ते तिथेच राहत आहेत. ७  तेव्हा आहाजने अश्‍शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर+ याला दूतांच्या हातून असा संदेश पाठवला: “मी तर तुमचा सेवक, तुमचा मुलगाच आहे. सीरियाचा राजा आणि इस्राएलचा राजा माझ्याशी युद्ध करायला आले आहेत. तर आता, त्यांच्या हातून मला वाचवायला या.” ८  आहाजने मग यहोवाच्या मंदिरात आणि राजमहालाच्या भांडारांत असलेलं सोनं-चांदी घेतलं, आणि ते अश्‍शूरच्या राजाला भेट म्हणून पाठवलं.+ ९  तेव्हा अश्‍शूरच्या राजाने त्याची विनंती मान्य केली. त्याने दिमिष्कला जाऊन ते शहर काबीज केलं व रसीन राजाला ठार मारलं;+ आणि तिथल्या लोकांना बंदी बनवून कीर+ या ठिकाणी नेलं. १०  मग आहाज राजा अश्‍शूरच्या राजाला, म्हणजे तिग्लथ-पिलेसर याला भेटायला दिमिष्कला गेला. आहाजने तिथली वेदी पाहिली, तेव्हा त्याने त्या वेदीचा आकार आणि तिची घडण यांचा एक नमुना उरीया याजकाला पाठवला.+ ११  आहाज राजाने दिमिष्कमधून दिलेल्या सर्व सूचनांप्रमाणे उरीया+ याजकाने एक वेदी बांधली.+ राजा दिमिष्कहून परत यायच्या आत त्याने ती वेदी बांधून पूर्ण केली. १२  राजाने दिमिष्कवरून परत आल्यावर ती वेदी पाहिली, तेव्हा त्याने जाऊन त्या वेदीवर अर्पणं दिली.+ १३  त्या वेदीवर त्याने होमार्पणं आणि अन्‍नार्पणं जाळली; तसंच, त्यावर पेयार्पणं ओतली आणि शांती-अर्पणांचं रक्‍तही शिंपडलं. १४  मग, त्याने यहोवाच्या मंदिराच्या व आपण बनवलेल्या वेदीच्या मधे असलेली तांब्याची वेदी,+ म्हणजे यहोवापुढे मंदिरासमोर असलेली तांब्याची वेदी तिच्या जागेवरून काढली; आणि आपण बनवलेल्या वेदीच्या उत्तरेकडे ती ठेवली. १५  नंतर आहाज राजाने उरीया+ याजकाला अशी आज्ञा दिली: “या भव्य वेदीवर+ सकाळचं होमार्पण आणि संध्याकाळचं अन्‍नार्पण जाळ.+ तसंच, राजाने दिलेलं होमार्पण आणि अन्‍नार्पणही त्यावर जाळ; आणि लोकांनी दिलेली होमार्पणं, अन्‍नार्पणं आणि पेयार्पणंसुद्धा या वेदीवर जाळ. याशिवाय, या वेदीवर तू सर्व होमार्पणांचं आणि इतर सर्व बलिदानांचं रक्‍त शिंपड. तांब्याच्या वेदीचं मात्र काय करायचं ते मी नंतर ठरवीन.” १६  तेव्हा आहाज राजाने सांगितल्याप्रमाणे उरीया याजकाने सगळं काही केलं.+ १७  याशिवाय, आहाज राजाने मंदिरात असलेल्या तांब्याच्या गाड्यांचे+ पत्रे काढून त्यांचे तुकडे केले आणि त्यांवर असलेली गंगाळं+ काढून टाकली. तसंच, त्याने तांब्याच्या बैलांवर आधारलेला मोठा गंगाळ-सागरही+ काढून तो खाली दगडी फरशीवर ठेवला.+ १८  आणि मंदिरात शब्बाथासाठी बांधलेली छताची जागा व मंदिरात जाण्याचं राजाचं प्रवेशद्वार आहाजने यहोवाच्या मंदिरापासून दुसरीकडे हलवलं; त्याने हे सगळं अश्‍शूरच्या राजाच्या भीतीमुळे केलं. १९  आहाजबद्दलची बाकीची माहिती, म्हणजे त्याने जे काही केलं ते सर्व यहूदाच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे.+ २०  मग आहाजचा मृत्यू झाला* आणि त्याला दावीदपुरात आपल्या पूर्वजांच्या कबरेत दफन करण्यात आलं; आणि त्याच्या जागी त्याचा मुलगा हिज्कीया*+ राजा बनला.

तळटीपा

शब्दशः “अग्नीतून पार केलं.”
किंवा “धूर वर जाण्यासाठी बलिदानं जाळत राहिला.”
किंवा “यहूदाच्या लोकांना.”
शब्दशः “आपल्या पूर्वजांकडे जाऊन निजला.”
म्हणजे, “यहोवा बळ देतो.”