२ राजे १७:१-४१

  • इस्राएलचा राजा होशे (१-४)

  • इस्राएलचा पराभव (५, ६)

  • देवाला सोडल्यामुळे इस्राएली लोक बंदिवासात गेले (७-२३)

  • विदेशी लोकांना शोमरोनच्या शहरांत वसवलं जातं (२४-२६)

  • शोमरोनी लोकांची मिश्र उपासना (२७-४१)

१७  यहूदाचा राजा आहाज याच्या शासनकाळाच्या १२ व्या वर्षी एलाहचा मुलगा होशे+ इस्राएलचा राजा बनला. त्याने शोमरोन इथून नऊ वर्षं इस्राएलवर राज्य केलं. २  यहोवाच्या नजरेत जे वाईट ते तो करत राहिला; पण त्याच्याआधी होऊन गेलेल्या इस्राएलच्या इतर राजांइतकं वाईट त्याने केलं नाही. ३  अश्‍शूरचा राजा शल्मनेसर याने होशेवर हल्ला केला,+ तेव्हा होशे त्याच्या अधीन झाला आणि त्याला नजराणा* देऊ लागला.+ ४  पुढे अश्‍शूरच्या राजाला कळलं, की होशे आपल्याविरुद्ध कट रचत आहे. कारण, होशेने इजिप्तचा राजा सो याच्याकडे काही दूतांना पाठवलं होतं.+ तसंच, पूर्वी तो अश्‍शूरच्या राजाला जो नजराणा द्यायचा, तो द्यायचाही त्याने बंद केला होता. म्हणून अश्‍शूरच्या राजाने त्याला पकडलं आणि बेड्या घालून तुरुंगात टाकलं. ५  अश्‍शूरच्या राजाने संपूर्ण इस्राएल देशावर हल्ला केला. आणि शोमरोनला येऊन त्याने त्या शहराला तीन वर्षं वेढा घातला. ६  होशे राजाच्या शासनकाळाच्या नवव्या वर्षी, अश्‍शूरच्या राजाने शोमरोन शहर काबीज केलं.+ मग त्याने इस्राएलच्या लोकांना बंदी बनवून अश्‍शूरला नेलं.+ त्याने त्यांना मेदच्या शहरांमध्ये,+ तसंच हलह शहरात व गोजान+ नदीजवळ असलेल्या हाबोर शहरात वसवलं. ७  हे सर्व यासाठी घडलं, कारण ज्या यहोवा देवाने इस्राएलच्या लोकांना इजिप्तच्या राजाच्या, म्हणजे फारोच्या हातून सोडवलं होतं आणि इजिप्त देशातून बाहेर आणलं होतं,+ त्या आपल्या देवाविरुद्ध त्यांनी पाप केलं. त्यांनी इतर देवांची उपासना केली;+ ८  तसंच, यहोवाने ज्या राष्ट्रांना इस्राएली लोकांपुढून हाकलून लावलं होतं, त्या राष्ट्रांच्या चालीरितींचं त्यांनी अनुसरण केलं; आणि इस्राएलच्या राजांनी लावून दिलेल्या रितीरिवाजांप्रमाणे ते चालत राहिले. ९  इस्राएली लोक, आपला देव यहोवा याच्या नजरेत योग्य नसलेल्या गोष्टींच्या मागे लागले. त्यांनी आपल्या सर्व शहरांमध्ये, म्हणजे पहारेकऱ्‍यांच्या बुरुजांपासून तटबंदीच्या शहरांपर्यंत सगळीकडे,* उपासनेची उच्च स्थानं* बांधली.+ १०  त्यांनी आपल्यासाठी प्रत्येक उंच टेकडीवर व प्रत्येक हिरव्यागार वृक्षाखाली+ पूजेचे स्तंभ व पूजेचे खांब* उभे केले.+ ११  आणि यहोवाने ज्या राष्ट्रांना इस्राएली लोकांपुढून हाकलून लावलं होतं,+ त्या राष्ट्रांप्रमाणेच ते उच्च स्थानांवर बलिदानांचं हवन करत राहिले. यहोवाला क्रोध येईल अशा सर्व वाईट गोष्टी त्यांनी केल्या. १२  यहोवाने ज्या घृणास्पद मूर्तींची* उपासना करण्याविषयी त्यांना सांगितलं होतं, की “असं करू नका!”+ तेच ते करत राहिले.+ १३  आपल्या सर्व संदेष्ट्यांद्वारे आणि दृष्टान्त पाहणाऱ्‍या प्रत्येकाद्वारे यहोवा त्यांना असा इशारा देत राहिला:+ “आपले वाईट मार्ग सोडून द्या!+ आणि मी माझ्या संदेष्ट्यांद्वारे तुमच्या पूर्वजांना जे नियमशास्त्र दिलं होतं, त्यात सांगितलेल्या माझ्या आज्ञा आणि कायदे पाळा.” १४  पण त्यांनी त्याचं ऐकलं नाही. आणि आपल्या पूर्वजांसारखंच ते हट्टीपणे वागत राहिले; त्यांच्या पूर्वजांनीही आपला देव यहोवा याच्यावर विश्‍वास असल्याचं दाखवलं नाही.+ १५  इस्राएली लोकांनी वारंवार देवाचे नियम मोडले आणि त्याने त्यांच्या पूर्वजांसोबत जो करार केला होता, तोसुद्धा त्यांनी पाळला नाही.+ तसंच, त्यांना इशारा देण्यासाठी देवाने ज्या स्मरण-सूचना* दिल्या होत्या, त्यांकडेही त्यांनी लक्ष दिलं नाही.+ आणि ज्या आजूबाजूच्या राष्ट्रांबद्दल यहोवाने इस्राएली लोकांना असं बजावलं होतं, की त्यांचं अनुकरण करू नका, नेमकं तेच त्यांनी केलं;+ ते निरुपयोगी मूर्तींच्या मागे लागले+ आणि त्यांच्यासारखेच झाले.+ १६  त्यांनी आपला देव यहोवा याच्या सर्व आज्ञा पाळायचं सोडून दिलं. त्यांनी पूजेचा खांब* बनवला+ व धातूपासून वासरांच्या दोन मूर्ती बनवल्या.+ आणि ते आकाशातल्या सैन्याच्या+ व बआल दैवताच्या पाया पडले.+ १७  याशिवाय, त्यांनी आपल्या मुलामुलींचा अग्नीत होम केला.*+ तसंच, ते शकुन व भविष्य पाहायचे.+ अशा प्रकारे, यहोवाच्या नजरेत जे वाईट ते करण्याच्या ते आहारी गेले.* हे सर्व करून त्यांनी त्याला क्रोध आणला. १८  म्हणून इस्राएलवर यहोवाचा क्रोध भडकला; आणि त्याने त्यांना आपल्यापुढून घालवून दिलं.+ यहूदाचा वंश सोडून त्याने दुसऱ्‍या कोणत्याही वंशाला देशात राहू दिलं नाही. १९  पण यहूदानेही आपला देव यहोवा याच्या आज्ञा पाळल्या नाहीत;+ इस्राएलच्या लोकांनी जे रितीरिवाज पाळले होते, तेच यहूदाच्या लोकांनीसुद्धा पाळले.+ २०  म्हणून यहोवाने इस्राएलच्या सर्व वंशजांना नाकारलं व अपमानित केलं; तो त्यांना आपल्यापुढून घालवून देईपर्यंत लुटारूंच्या हाती देत राहिला. २१  त्याने इस्राएलला दावीदच्या घराण्यापासून वेगळं केलं. मग लोकांनी नबाटचा मुलगा यराबाम याला राजा बनवलं.+ पण यराबामने इस्राएलला यहोवाच्या उपासनेपासून दूर नेऊन खूप मोठं पाप केलं. २२  आणि यराबामने जी पापं केली होती, ती सर्व पापं इस्राएलचे लोक करत राहिले.+ ती करण्याचं त्यांनी सोडलं नाही; २३  यहोवाने आपल्या सर्व संदेष्ट्यांद्वारे सांगितलं होतं, त्याप्रमाणे त्याने इस्राएलला आपल्यापुढून घालवून देईपर्यंत त्यांनी ती पापं करण्याचं सोडलं नाही.+ म्हणून इस्राएलच्या लोकांना अश्‍शूर देशात बंदी बनवून नेण्यात आलं,+ आणि आजपर्यंत ते तिथेच आहेत. २४  मग अश्‍शूरच्या राजाने बाबेल, कूथा, अव्वा, हमाथ आणि सफरवाईम+ इथे राहणाऱ्‍या लोकांना आणलं; आणि त्यांना इस्राएली लोकांच्या जागी शोमरोनच्या शहरांत वसवलं. त्या लोकांनी शोमरोनचा ताबा घेतला आणि ते तिथल्या शहरांमध्ये राहू लागले. २५  ते तिथे राहू लागले, तेव्हा सुरुवातीला ते यहोवाचं भय बाळगत नव्हते.* म्हणून यहोवाने त्यांच्यामध्ये सिंह पाठवले+ आणि त्यांनी त्यांच्यापैकी काही लोकांना मारून टाकलं. २६  तेव्हा अश्‍शूरच्या राजाला असं सांगण्यात आलं: “तुम्ही ज्या राष्ट्रांतल्या लोकांना बंदी बनवून शोमरोनच्या शहरांमध्ये वसवलंय, त्यांना त्या देशातल्या देवाची उपासना कशी करायची ते माहीत नाही. म्हणून तो देव लोकांना मारून टाकण्यासाठी त्यांच्यामध्ये सिंह पाठवतो. त्यांच्यापैकी एकालाही त्या देशातल्या देवाच्या उपासनेची पद्धत माहीत नाही.” २७  यावर अश्‍शूरच्या राजाने असा हुकूम दिला: “तुम्ही ज्या लोकांना त्या देशातून बंदी बनवून नेलंय, त्यांच्यातल्या एका याजकाला त्या देशात जाऊन राहायला आणि तिथल्या देवाची उपासना कशी करायची ते शिकवायला परत पाठवा.” २८  म्हणून मग, शोमरोनातून बंदी बनवून नेलेल्या याजकांपैकी एक जण परत बेथेलमध्ये+ राहायला आला, आणि लोकांना यहोवाचं भय कसं बाळगायचं* ते शिकवू लागला.+ २९  पण तरीसुद्धा प्रत्येक राष्ट्रातून आलेल्या लोकांनी आपापले देव बनवले; आणि शोमरोनी लोकांनी उपासनेसाठी जी उच्च स्थानं बनवली होती, तिथल्या मंदिरांत त्यांनी ते देव ठेवले; प्रत्येक राष्ट्रातून आलेल्या लोकांनी ते राहत असलेल्या शहरांमध्ये असंच केलं. ३०  बाबेलच्या लोकांनी सुक्कोथ-बनोथ दैवत बनवलं; तसंच, कूथाच्या लोकांनी नेरगल, हमाथच्या+ लोकांनी अशीमा, ३१  आणि अव्वाच्या लोकांनी निभज व तर्ताक ही दैवतं बनवली. शिवाय, सफरवाईमचे लोक अद्रम्मेलेक आणि अनम्मेलेक या सफरवाईमच्या+ दैवतांपुढे आपल्या मुलांचा अग्नीत होम करायचे. ३२  हे लोक यहोवाचं भय तर बाळगत होते, पण उपासनेच्या उच्च स्थानांवर सेवा करण्यासाठी त्यांनी आपल्याच लोकांमधून काहींना याजक म्हणूनही नेमलं होतं; हे याजक त्यांच्या वतीने उच्च स्थानांवर असलेल्या मंदिरांत सेवा करायचे.+ ३३  अशा रितीने, ते यहोवाचं भय तर बाळगायचे, पण ज्या राष्ट्रांमधून त्यांना घालवून देण्यात आलं होतं, तिथल्या उपासनेच्या पद्धतींप्रमाणे ते आपापल्या देवाची उपासनाही करायचे.+ ३४  आजपर्यंत हे लोक आपले पूर्वीचेच रितीरिवाज पाळत आहेत; त्यांच्यापैकी कोणीही यहोवाची उपासना करत नाही. तसंच, यहोवाने ज्या याकोबचं नाव बदलून इस्राएल ठेवलं होतं,+ त्याच्या मुलांना दिलेल्या कायद्यांचं, न्याय-निर्णयांचं,* नियमशास्त्राचं आणि आज्ञेचंही हे लोक पालन करत नाहीत. ३५  यहोवाने इस्राएलशी करार केला,+ तेव्हा त्याने त्यांना अशी आज्ञा दिली होती: “तुम्ही इतर देवांची उपासना करू नका, त्यांच्या पाया पडू नका, त्यांची सेवा करू नका किंवा त्यांच्यासाठी बलिदानं देऊ नका.+ ३६  तर, फक्‍त यहोवाचीच उपासना करा,+ त्याच्याच पाया पडा आणि त्याच्यासाठीच बलिदानं द्या; कारण त्यानेच तुम्हाला मोठ्या सामर्थ्याने आणि शक्‍तिशाली हाताने इजिप्त देशातून बाहेर आणलं.+ ३७  तसंच, त्याने तुम्हाला लिहून दिलेले कायदे, न्याय-निर्णय, नियमशास्त्र आणि आज्ञा यांचं नेहमी काळजीपूर्वक पालन करा;+ दुसऱ्‍या कोणत्याही देवाची उपासना करू नका. ३८  मी तुमच्यासोबत केलेला करार कधीही विसरू नका.+ दुसऱ्‍या कोणत्याही देवाची उपासना करू नका; ३९  फक्‍त तुमचा देव यहोवा याचीच उपासना करा. कारण तोच तुम्हाला तुमच्या सर्व शत्रूंच्या हातून सोडवेल.” ४०  पण या राष्ट्रांनी त्याचं ऐकलं नाही; ते आपले पूर्वीचे रितीरिवाजच पाळत राहिले.+ ४१  अशा प्रकारे, या राष्ट्रांनी यहोवाचं भय तर बाळगलं,+ पण त्यासोबतच ते आपल्या कोरीव मूर्तींचीही उपासना करत राहिले. आणि आजपर्यंत त्यांची मुलं व नातवंडं आपल्या पूर्वजांप्रमाणेच करत आले आहेत.

तळटीपा

किंवा “कर, खंडणी.”
म्हणजे, प्रत्येक ठिकाणी; मग तिथे कमी लोकवस्ती असो किंवा जास्त लोकवस्ती असो.
इथे वापरलेला हिब्रू शब्द, “विष्ठा” या अर्थाच्या शब्दाशी संबंधित असावा आणि तो तिरस्कार दाखवण्यासाठी वापरला जातो.
शब्दशः “अग्नीतून पार केलं.”
शब्दशः “स्वतःला विकून टाकलं.”
किंवा “उपासना करत नव्हते.”
किंवा “उपासना कशी करायची.”