२ राजे १८:१-३७

  • यहूदाचा राजा हिज्कीया (१-८)

  • इस्राएलचा पराभव (९-१२)

  • सन्हेरीब यहूदावर हल्ला करतो (१३-१८)

  • रबशाके यहोवाची निंदा करतो (१९-३७)

१८  इस्राएलचा राजा एलाह याचा मुलगा होशे+ याच्या शासनकाळाच्या तिसऱ्‍या वर्षी, हिज्कीया+ यहूदाचा राजा बनला; तो आहाज+ राजाचा मुलगा होता. २  हिज्कीया राजा बनला तेव्हा तो २५ वर्षांचा होता आणि त्याने २९ वर्षं यरुशलेममध्ये राज्य केलं. त्याच्या आईचं नाव अबी* असून ती जखऱ्‍याची मुलगी होती.+ ३  आपला पूर्वज दावीद याच्याप्रमाणेच+ हिज्कीया यहोवाच्या नजरेत जे योग्य ते करत राहिला.+ ४  त्याने उपासनेची उच्च स्थानं काढून टाकली+ आणि पूजेचे स्तंभ व पूजेचे खांबही* तोडून टाकले.+ तसंच, मोशेने जो तांब्याचा साप बनवला होता, त्याचाही त्याने चुराडा केला.+ कारण त्या काळापर्यंत, इस्राएली लोक त्या सापापुढे बलिदानांचं हवन करत होते.* त्या तांब्याच्या सापाला नहूशतान* म्हटलं जायचं. ५  हिज्कीयाने इस्राएलचा देव यहोवा याच्यावर भरवसा ठेवला.+ यहूदामध्ये त्याच्याआधी जितके राजे होऊन गेले आणि त्याच्यानंतर जितके राजे झाले, त्या सगळ्यांमध्ये हिज्कीयासारखा कोणी नव्हता. ६  हिज्कीया यहोवाला एकनिष्ठ राहिला.+ त्याने यहोवाच्या मार्गावर चालण्याचं कधीही सोडलं नाही; देवाने मोशेद्वारे ज्या आज्ञा दिल्या होत्या, त्यांचं तो पालन करत राहिला. ७  यहोवा त्याच्यासोबत होता. आणि हिज्कीयाने जी काही कामं केली, ती सगळी हुशारीने केली. त्याने अश्‍शूरच्या राजाविरुद्ध बंड केलं; तो त्याच्या अधीन राहिला नाही.+ ८  हिज्कीयाने थेट गाझा आणि त्याचे प्रदेश इथपर्यंत पलिष्टी लोकांना हरवलं;+ त्याने पहारेकऱ्‍यांच्या बुरुजांपासून ते तटबंदीच्या शहरांपर्यंत,* त्यांना हरवलं. ९  हिज्कीया राजाच्या शासनकाळाच्या चौथ्या वर्षी, म्हणजे इस्राएलचा राजा एलाह याचा मुलगा होशे+ याच्या शासनकाळाच्या सातव्या वर्षी, अश्‍शूरचा राजा शल्मनेसर हा शोमरोनशी लढाई करायला आला. आणि त्याने त्या शहराला वेढा घातला.+ १०  मग तीन वर्षांच्या शेवटी, अश्‍शूरी लोकांनी ते शहर काबीज केलं.+ त्यांनी हिज्कीयाच्या शासनकाळाच्या सहाव्या वर्षी, म्हणजे इस्राएलचा राजा होशे याच्या शासनकाळाच्या नवव्या वर्षी शोमरोन शहर काबीज केलं. ११  नंतर अश्‍शूरच्या राजाने इस्राएलच्या लोकांना बंदी बनवून अश्‍शूरला नेलं.+ त्याने त्यांना मेदच्या शहरांमध्ये, तसंच हलह शहरात व गोजान नदीजवळ असलेल्या हाबोर शहरात वसवलं.+ १२  हे सर्व यामुळे घडलं, कारण त्यांनी आपला देव यहोवा याचं ऐकलं नाही. यहोवाचा सेवक मोशे याने दिलेल्या सर्व आज्ञा ते मोडत राहिले; आणि असं करून त्यांनी त्याचा करार पाळला नाही.+ त्यांनी देवाचं ऐकलं नाही आणि ते त्याच्या सांगण्याप्रमाणे वागलेही नाहीत. १३  हिज्कीया राजाच्या शासनकाळाच्या १४ व्या वर्षी, अश्‍शूरचा राजा सन्हेरीब+ याने तटबंदी असलेल्या यहूदाच्या सगळ्या शहरांवर हल्ला करून ती शहरं काबीज केली.+ १४  म्हणून यहूदाचा राजा हिज्कीया याने अश्‍शूरच्या राजाला लाखीश इथे असा संदेश पाठवला: “माझ्याकडून चूक झाली. आता तुम्ही जो काही दंड भरायला लावाल, तो मी भरीन. पण हा वेढा मात्र काढून घ्या.” तेव्हा, अश्‍शूरच्या राजाने यहूदाचा राजा हिज्कीया याला ३०० तालान्त* चांदी आणि ३० तालान्त सोनं इतका दंड भरायला लावला. १५  म्हणून मग, हिज्कीयाने यहोवाच्या मंदिरात आणि राजमहालातल्या भांडारांत जितकी चांदी होती ती सगळी घेऊन अश्‍शूरच्या राजाला दिली.+ १६  त्या वेळी, हिज्कीयाने यहोवाच्या मंदिरातले दरवाजे+ आणि त्यांच्या चौकटी काढून अश्‍शूरच्या राजाला दिल्या; ते दरवाजे आणि चौकटी त्याने सोन्याने मढवल्या होत्या.+ १७  मग अश्‍शूरच्या राजाने तर्तान,* रबसारीस* आणि रबशाके* यांना लाखीश+ इथून एक मोठी सेना घेऊन यरुशलेमला हिज्कीया राजाकडे पाठवलं.+ हे सर्व यरुशलेममध्ये आले आणि वरच्या तळ्याच्या पाटाजवळ* तैनात झाले; पाण्याचा हा पाट, धोब्याच्या मैदानाकडे जाणाऱ्‍या महामार्गावर होता.+ १८  त्यांनी राजाला बाहेर बोलावलं, तेव्हा राजमहालाची व्यवस्था पाहणारा हिल्कीयाचा मुलगा एल्याकीम,+ सचिव शेबना+ आणि इतिहास-लेखक असलेला आसाफचा मुलगा यवाह, हे तिघं त्यांच्याकडे बाहेर आले. १९  तेव्हा रबशाके त्यांना म्हणाला: “जा, जाऊन हिज्कीयाला सांगा, ‘अश्‍शूरचा महान राजा असं म्हणतो: “कसल्या गोष्टीचा तुला एवढा भरवसा आहे?+ २०  तू म्हणतोस, ‘माझ्याकडे युद्धनीती आणि युद्ध करायची ताकद आहे.’ पण हे सगळे वायफळ शब्द आहेत. तू कोणाच्या भरवशावर माझ्याविरुद्ध बंड करायला निघालास?+ २१  इजिप्तच्या?+ तो तर चेपलेली वेताची काठी* आहे. कोणी त्या काठीवर टेकायला जरी गेला, तरी ती तुटून त्याच्याच हातात घुसेल. जे इजिप्तच्या राजावर, फारोवर भरवसा ठेवतात त्यांच्यासाठी तो असल्या वेताच्या काठीसारखाच आहे. २२  आणि तुम्ही जर असं म्हणत असाल, की ‘आमचा भरवसा आमच्या यहोवा देवावर आहे,’+ तर हा तोच देव आहे ना ज्याच्या वेदी आणि ज्याची उच्च स्थानं हिज्कीयाने पाडून टाकली,+ आणि ‘तुम्ही यरुशलेममधल्या या वेदीपुढेच नमन केलं पाहिजे,’ असं त्याने यहूदा आणि यरुशलेमच्या लोकांना सांगितलं?”’+ २३  तर आता चल, माझ्या प्रभूशी, अश्‍शूरच्या राजाशी पैज लाव! मी तुला २,००० घोडे देतो. हिंमत असेल तर त्यांच्यासाठी तितके घोडेस्वार आणून दाखव.+ २४  इजिप्तने तुला रथ आणि घोडेस्वार जरी पुरवले, तरी माझ्या प्रभूची सेवा करणाऱ्‍या अधिकाऱ्‍यांपैकी सगळ्यात छोट्या अधिकाऱ्‍याला तरी तू हरवू शकशील का? २५  तुला काय वाटतं, मी काय यहोवाच्या परवानगीशिवाय या जागेचा नाश करायला आलोय? यहोवाने स्वतः मला सांगितलंय: ‘जाऊन त्या देशावर हल्ला कर आणि त्याचा नाश कर.’” २६  त्यावर हिल्कीयाचा मुलगा एल्याकीम, शेबना+ आणि यवाह हे तिघं रबशाकेला+ म्हणाले: “कृपया आपल्या या सेवकांशी अरामी* भाषेत बोला.+ कारण आम्हाला ती भाषा समजते. शहराच्या तटबंदीवर असलेल्या लोकांसमोर आमच्याशी यहुदी लोकांच्या भाषेत बोलू नका.”+ २७  पण रबशाके त्यांना म्हणाला: “माझ्या प्रभूने मला काय फक्‍त तुमच्या प्रभूशी आणि तुमच्याशी बोलायला पाठवलंय? त्यांनी मला शहराच्या तटबंदीवर असलेल्या लोकांशीही बोलायला पाठवलंय. कारण तुमच्यासोबत तेसुद्धा स्वतःचं मलमूत्र खातील.” २८  मग रबशाके पुढे आला आणि यहुदी लोकांच्या भाषेत मोठ्याने ओरडून म्हणाला: “अश्‍शूरचा महान राजा काय म्हणतो ते ऐका!+ २९  राजा असं म्हणतो, ‘हिज्कीया तुम्हाला फसवतोय. त्याचं ऐकू नका. तो काही तुम्हाला माझ्या हातून वाचवू शकणार नाही.+ ३०  तो तुम्हाला असं सांगतोय, की “यहोवा आपल्याला नक्की वाचवेल. हे शहर अश्‍शूरच्या राजाच्या हाती जाणार नाही.” पण त्याचं ऐकून यहोवावर भरवसा ठेवू नका.+ ३१  तुम्ही हिज्कीयाचं काहीही ऐकू नका. कारण अश्‍शूरचा राजा असं म्हणतो: “माझ्याशी सलोखा करा आणि मला शरण या. मग तुमच्यापैकी प्रत्येक जण आपापल्या द्राक्षवेलीचं आणि अंजिराच्या झाडाचं फळ खाईल; आणि प्रत्येक जण आपापल्या विहिरीचं पाणी पिईल. ३२  नंतर मी येईन आणि तुम्हाला तुमच्या देशासारख्या असलेल्या एका देशात घेऊन जाईन;+ एका अशा देशात जिथे भरपूर धान्य आणि नवीन द्राक्षारस आहे; जिथे भाकरी, द्राक्षमळे, जैतुनाची झाडं आणि भरपूर मध आहे. मग तुम्ही जिवंत राहाल, मरणार नाही. हिज्कीयाचं काहीएक ऐकू नका. ‘यहोवा आपल्याला वाचवेल,’ असं म्हणून तो तुम्हाला खरंतर फसवतोय. ३३  दुसऱ्‍या कोणत्याही राष्ट्रांच्या देवांनी त्यांच्या लोकांना अश्‍शूरच्या राजाच्या हातून वाचवलंय का? ३४  हमाथ+ आणि अर्पाद यांचे देव कुठे आहेत? सफरवाईम,+ हेना आणि इव्वा यांचे देव कुठे आहेत? यांच्यापैकी कोणीही शोमरोनला माझ्या हातून वाचवू शकला का?+ ३५  आजपर्यंत या सगळ्या देशांतल्या देवांपैकी कोणत्याही देवाने त्यांच्या देशाला माझ्या हातून वाचवलं नाही. तर मग, यहोवा कसं काय यरुशलेमला माझ्या हातून वाचवू शकेल?”’”+ ३६  पण लोक शांत राहिले आणि त्यांनी त्याला एका शब्दानेही उत्तर दिलं नाही. कारण राजाचा असा हुकूम होता, की “तुम्ही त्याला काहीच उत्तर देऊ नका.”+ ३७  मग राजमहालाची व्यवस्था पाहणारा हिल्कीयाचा मुलगा एल्याकीम, सचिव शेबना आणि इतिहास-लेखक असलेला आसाफचा मुलगा यवाह, हे तिघं आपले कपडे फाडून हिज्कीया राजाकडे आले; आणि रबशाके जे काही बोलला ते सर्व त्यांनी त्याला सांगितलं.

तळटीपा

हे अबीया नावाचं छोटं रूप आहे.
किंवा “धूर वर जाण्यासाठी बलिदानं जाळत होते.”
किंवा “तांब्याच्या सापाची मूर्ती.”
म्हणजे, प्रत्येक ठिकाणी; मग तिथे कमी लोकवस्ती असो किंवा जास्त लोकवस्ती असो.
एक तालान्त म्हणजे ३४.२ किलो. अति. ख१४ पाहा.
किंवा “कालव्याजवळ.”
किंवा “मुख्य प्यालेबरदार.”
किंवा “मुख्य दरबारी.”
किंवा “सेनापती.”
किंवा “बोरू.”
किंवा “सीरियाच्या.”