२ राजे २:१-२५

  • एलीयाला वादळातून वर आकाशात नेलं जातं (१-१८)

    • अलीशाला एलीयाचा झगा मिळतो (१३, १४)

  • अलीशा यरीहोचं पाणी शुद्ध करतो (१९-२२)

  • दोन अस्वली बेथेलमधल्या मुलांना मारून टाकतात (२३-२५)

 यहोवा देव एलीयाला+ वादळातून आकाशात घेऊन जाणार होता+ ती वेळ आता आली होती. तेव्हा एलीया आणि अलीशा+ हे दोघं गिलगालमधून+ निघाले. २  मग एलीया अलीशाला म्हणाला: “यहोवाने मला बेथेलला जायला सांगितलंय. तेव्हा तू इथेच थांब.” पण अलीशा त्याला म्हणाला: “जिवंत देव यहोवा याची आणि तुमच्या जिवाची शपथ! मी तुमची साथ सोडणार नाही.” म्हणून मग ते दोघं बेथेलला+ गेले. ३  तेव्हा बेथेल इथे असलेले संदेष्ट्यांचे पुत्र* अलीशाकडे आले आणि त्याला म्हणाले: “यहोवा तुझ्या प्रभूला, तुझ्या मस्तकाला आज तुझ्यापासून घेऊन जाणार आहे, हे तुला माहीत आहे का?”+ त्यावर तो म्हणाला: “मला माहीत आहे. शांत राहा!” ४  यानंतर एलीया त्याला म्हणाला: “अलीशा, यहोवाने मला यरीहोला+ जायला सांगितलंय. तेव्हा तू इथेच थांब.” पण अलीशा म्हणाला: “जिवंत देव यहोवा याची आणि तुमच्या जिवाची शपथ! मी तुमची साथ सोडणार नाही.” म्हणून मग ते दोघं यरीहोला गेले. ५  तेव्हा यरीहो इथे असलेले संदेष्ट्यांचे पुत्र अलीशाकडे आले आणि त्याला म्हणाले: “यहोवा तुझ्या प्रभूला, तुझ्या मस्तकाला आज तुझ्यापासून घेऊन जाणार आहे, हे तुला माहीत आहे का?” त्यावर तो म्हणाला: “मला माहीत आहे. शांत राहा!” ६  नंतर एलीया त्याला म्हणाला: “यहोवाने मला यार्देन नदीकडे जायला सांगितलंय. तेव्हा तू इथेच थांब.” पण अलीशा त्याला म्हणाला: “जिवंत देव यहोवा याची आणि तुमच्या जिवाची शपथ! मी तुमची साथ सोडणार नाही.” मग ते दोघं पुढे गेले, ७  आणि संदेष्ट्यांचे ५० पुत्र त्यांच्यामागे गेले. ते दोघं यार्देनजवळ उभे असताना संदेष्ट्यांचे पुत्र त्यांना दुरून पाहत होते. ८  मग एलीयाने आपला झगा*+ काढून तो गुंडाळला आणि नदीच्या पाण्यावर मारला. तेव्हा पाण्याचे दोन भाग झाले आणि ते दोघं कोरड्या जमिनीवरून चालत पलीकडे गेले.+ ९  नदीच्या पलीकडे जाताच एलीया अलीशाला म्हणाला: “देव मला तुझ्यापासून दूर नेईल, त्याआधी मी तुझ्यासाठी काय करावं अशी तुझी इच्छा आहे?” त्यावर अलीशा त्याला म्हणाला: “कृपया, मला तुमच्या शक्‍तीचा*+ दुप्पट हिस्सा+ मिळू शकेल का?” १०  तेव्हा एलीया म्हणाला: “तू फारच कठीण गोष्ट मागितलीस. मला तुझ्यापासून दूर नेलं जाईल, त्या वेळी जर तू मला पाहू शकलास तर तू म्हणतोस तसं होईल. पण जर तू मला पाहू शकला नाहीस, तर तसं होणार नाही.” ११  मग ते दोघं एकमेकांशी बोलत रस्त्याने जात असताना, अचानक एका अग्नीच्या रथाने आणि अग्नीच्या घोड्यांनी+ त्यांना एकमेकांपासून वेगळं केलं. आणि एलीया वादळातून वर आकाशात गेला.+ १२  अलीशा हे सर्व पाहत असताना मोठ्याने म्हणत होता: “माझ्या पित्या! माझ्या पित्या! पाहा, इस्राएलचा रथ आणि त्याचे घोडेस्वार!”+ एलीया दृष्टिआड झाला, तेव्हा अलीशाने दुःखाने आपले कपडे फाडले.+ १३  त्यानंतर अलीशाने एलीयाच्या अंगावरून पडलेला झगा*+ उचलला आणि तो परत यार्देन नदीच्या काठावर जाऊन उभा राहिला. १४  मग एलीयाचा झगा नदीच्या पाण्यावर मारून तो म्हणाला: “एलीयाचा देव यहोवा कुठे आहे?” झगा पाण्यावर मारताच पाण्याचे दोन भाग झाले आणि अलीशा चालत पलीकडे गेला.+ १५  यरीहो इथल्या संदेष्ट्यांच्या पुत्रांनी अलीशाला दुरून पाहिलं, तेव्हा ते म्हणाले: “एलीयाची शक्‍ती आता अलीशाला मिळाली आहे.”+ मग ते त्याला भेटायला गेले आणि त्यांनी जमिनीवर पडून त्याला नमन केलं. १६  ते त्याला म्हणाले: “इथे तुमच्या सेवकांकडे ५० धडधाकट पुरुष आहेत. कृपया त्यांना परवानगी द्या, म्हणजे ते जाऊन तुमच्या प्रभूला शोधतील. कदाचित, यहोवाच्या शक्‍तीने त्यांना उचलून एखाद्या डोंगरावर किंवा एखाद्या खोऱ्‍यात नेलं असेल.”+ पण अलीशा म्हणाला: “त्यांना पाठवू नका.” १७  पण तरीही ते त्याला आग्रह करत राहिले. शेवटी तो त्यांना म्हणाला: “पाठवा त्यांना.” तेव्हा त्यांनी त्या ५० माणसांना पाठवलं. ते तीन दिवस एलीयाला शोधत राहिले, पण त्यांना तो सापडला नाही. १८  ते परत आले, तेव्हा अलीशा यरीहोमध्ये+ होता. तो त्यांना म्हणाला: “मी तुम्हाला सांगितलं होतं ना, जाऊ नका.” १९  मग काही काळाने शहरातली माणसं अलीशाकडे येऊन म्हणाली: “प्रभू, तुम्हाला तर दिसतंय की हे शहर सुंदर ठिकाणी वसलंय.+ फक्‍त इथलं पाणी खराब आहे आणि जमीन नापीक आहे.”* २०  यावर तो म्हणाला: “एका नवीन वाटीत मीठ टाकून माझ्याकडे आणा.” तेव्हा त्यांनी तसं केलं. २१  मग तो पाण्याच्या झऱ्‍याकडे गेला आणि पाण्यात मीठ टाकून+ म्हणाला: “यहोवा असं म्हणतो: ‘मी हे पाणी शुद्ध केलंय. या पाण्यामुळे आता कोणीही मरणार नाही किंवा जमीन नापीक राहणार नाही.’”* २२  आणि अलीशाने म्हटलं होतं त्याप्रमाणे, आजपर्यंत ते पाणी शुद्ध आहे. २३  मग अलीशा तिथून बेथेलकडे जायला निघाला. रस्त्याने जात असताना काही मुलं शहरातून बाहेर आली आणि त्याची थट्टा करू लागली.+ ती मूलं त्याला म्हणत होती: “अरे टकल्या, निघ इथून! अरे टकल्या, निघ इथून!” २४  शेवटी त्याने मागे वळून त्यांच्याकडे पाहिलं, आणि यहोवाच्या नावाने त्यांना शाप दिला. तेव्हा जंगलातून दोन अस्वली+ बाहेर आल्या आणि त्यांनी त्यांतल्या ४२ मुलांना फाडून ठार मारलं.+ २५  मग अलीशा तिथून कर्मेल डोंगराकडे+ गेला आणि नंतर शोमरोनात परत आला.

तळटीपा

“संदेष्ट्यांचे पुत्र” हा वाक्यांश संदेष्ट्यांच्या समूहाला किंवा प्रशिक्षण मिळणाऱ्‍या संदेष्ट्यांच्या गटाला सूचित करत असावा.
किंवा “संदेष्ट्याचा झगा.”
ही देवाची पवित्र शक्‍ती असू शकते किंवा एलीयाचा स्वभाव असू शकतो.
किंवा “संदेष्ट्याचा झगा.”
किंवा कदाचित, “आणि त्यामुळे देशात गर्भपात होतात.”
किंवा कदाचित, “गर्भपात होणार नाहीत.”