२ राजे २०:१-२१

  • हिज्कीयाचा आजार आणि त्याचं बरं होणं (१-११)

  • बाबेलहून निरोप घेऊन आलेले दूत (१२-१९)

  • हिज्कीयाचा मृत्यू (२०, २१)

२०  त्या काळात, हिज्कीया खूप आजारी पडला आणि मरणाला टेकला.+ तेव्हा आमोजचा मुलगा, म्हणजे यशया संदेष्टा त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला: “यहोवा म्हणतो, की ‘आपल्या घराण्याची व्यवस्था लाव. कारण तू या आजारातून बरा होणार नाहीस, तू मरणार आहेस.’”+ २  हे ऐकून हिज्कीयाने आपलं तोंड भिंतीकडे वळवलं, आणि तो यहोवाला अशी प्रार्थना करू लागला: ३  “हे यहोवा, मी तुझ्याकडे भीक मागतो! मी तुझ्यासमोर नेहमी विश्‍वासूपणे चाललो, पूर्ण मनाने वागलो आणि तुझ्या नजरेत योग्य तेच करत आलो. कृपा करून या सगळ्याची आठवण कर.”+ असं म्हणून हिज्कीया ढसाढसा रडू लागला. ४  हिज्कीयाशी बोलून यशया राजमहालाच्या मधल्या अंगणापर्यंतही पोहोचला नव्हता, इतक्यात त्याला यहोवाकडून असा संदेश मिळाला:+ ५  “परत मागे जा आणि माझ्या लोकांचा पुढारी हिज्कीया याला असं सांग, की ‘तुझ्या पूर्वजाचा, दावीदचा देव यहोवा म्हणतो: “मी तुझी प्रार्थना ऐकली आहे आणि तुझे अश्रू पाहिले आहेत.+ मी तुला बरं करीन.+ पाहा! तू तिसऱ्‍या दिवशी उठून यहोवाच्या मंदिरात जाशील.+ ६  मी तुझं आयुष्य आणखी १५ वर्षं वाढवीन. मी तुला आणि या शहराला अश्‍शूरच्या राजाच्या हातून वाचवीन.+ माझ्या नावासाठी आणि माझा सेवक दावीद याच्यासाठी मी या शहराचं रक्षण करीन.”’”+ ७  मग यशया राजाच्या सेवकांना म्हणाला: “वाळलेल्या अंजिरांची एक ढेप घेऊन या.” तेव्हा त्यांनी ती आणून हिज्कीयाच्या फोडावर* लावली. त्यानंतर तो हळूहळू बरा झाला.+ ८  हिज्कीयाने यशयाला असं विचारलं होतं: “यहोवा मला बरं करेल आणि मी तिसऱ्‍या दिवशी उठून यहोवाच्या मंदिरात जाईन, हे कशावरून? याचं चिन्ह काय?”+ ९  त्यावर यशया म्हणाला: “यहोवा जे बोलला ते तो नक्की पूर्ण करेल याचं यहोवाकडून हे चिन्ह आहे: सांग, तुझी काय इच्छा आहे? जिन्यावरच्या* सावलीने दहा पायऱ्‍या पुढे जावं, की दहा पायऱ्‍या मागे यावं?”+ १०  हिज्कीया म्हणाला: “सावली दहा पायऱ्‍या पुढे जाऊ शकते, पण ती मागे येऊ शकत नाही.” ११  म्हणून यशया संदेष्ट्याने यहोवा देवाला प्रार्थना केली, तेव्हा अहाजच्या जिन्यावर पुढे गेलेली सावली देवाने दहा पायऱ्‍या मागे आणली.+ १२  त्या दिवसांत, बाबेलचा* राजा बरोदख-बलदान याने, म्हणजे बलदानच्या मुलाने आपल्या दूतांच्या हातून हिज्कीयाला पत्रं आणि नजराणा पाठवला. कारण हिज्कीया आजारी असल्याचं त्याने ऐकलं होतं.+ १३  हिज्कीयाने त्यांचं स्वागत केलं* आणि त्यांना राजभांडारातला सगळा खजिना दाखवला.+ त्याने त्यांना आपलं सोनं, चांदी, बाल्सम* तेल व इतर मौल्यवान तेल; तसंच, आपलं शस्त्रांचं भांडार आणि राजभांडारात जे काही होतं ते सगळं दाखवलं. हिज्कीयाने त्यांना दाखवलं नाही असं त्याच्या राजमहालात आणि राज्यात काहीही नव्हतं. १४  त्यानंतर यशया संदेष्टा हिज्कीया राजाकडे आला आणि त्याने त्याला विचारलं: “ते लोक कुठून आले होते? काय म्हणत होते ते?” तेव्हा हिज्कीया त्याला म्हणाला: “ते लोक एका दूरच्या देशातून, बाबेलमधून आले होते.”+ १५  मग त्याने विचारलं: “त्यांनी तुझ्या राजमहालात काय-काय बघितलं?” त्यावर हिज्कीया म्हणाला: “त्यांनी माझ्या राजमहालातल्या सगळ्या गोष्टी बघितल्या. माझ्या राजभांडारातलं असं काहीही नाही जे मी त्यांना दाखवलं नाही.” १६  मग यशया हिज्कीयाला म्हणाला: “यहोवाचा संदेश ऐक,+ १७  ‘पाहा! असे दिवस येत आहेत, जेव्हा तुझ्या राजमहालात जे काही आहे ते सगळं, आणि तुझ्या वाडवडिलांनी आजपर्यंत जे काही साठवून ठेवलंय ते सगळं बाबेलला नेलं जाईल.+ इथे काहीच उरणार नाही,’ असं यहोवा म्हणतो. १८  ‘आणि तुझ्या काही वंशजांना बाबेलला नेलं जाईल.+ तिथे ते बाबेलच्या राजाच्या महालात राजदरबारी म्हणून सेवा करतील.’”+ १९  यावर हिज्कीया यशयाला म्हणाला: “यहोवाने कळवलेला संदेश योग्यच आहे.”+ पुढे तो म्हणाला: “मी जिवंत आहे तोपर्यंत तरी राज्यात शांती आणि स्थिरता* राहील ही चांगली गोष्ट आहे.”+ २०  हिज्कीयाबद्दलची बाकीची माहिती, म्हणजे त्याने केलेली पराक्रमाची कामं, त्याने बांधलेलं तळं+ आणि शहरात पाणी आणण्यासाठी बांधलेला पाट*+ यांबद्दलची सगळी माहिती यहूदाच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आली आहे. २१  मग हिज्कीयाचा मृत्यू झाला*+ आणि त्याच्या जागी त्याचा मुलगा मनश्‍शे+ राजा बनला.+

तळटीपा

किंवा “गळवावर.”
कदाचित या जिन्याचा उपयोग एखाद्या सूर्य-घड्याळाप्रमाणे (शंकुयंत्राप्रमाणे) वेळ पाहण्यासाठी केला जात असावा.
किंवा “बॅबिलॉनचा.”
किंवा “त्यांचं ऐकलं.”
किंवा “खरेपणा.”
किंवा “कालवा.”
शब्दशः “आपल्या पूर्वजांकडे जाऊन निजला.”