२ राजे २१:१-२६

२१  मनश्‍शे+ राजा बनला तेव्हा तो १२ वर्षांचा होता. त्याने ५५ वर्षं यरुशलेममधून राज्य केलं.+ त्याच्या आईचं नाव हेफसीबा होतं. २  मनश्‍शेने यहोवाच्या नजरेत जे वाईट ते केलं. यहोवाने ज्या राष्ट्रांना इस्राएली लोकांमधून घालवून दिलं होतं,+ त्यांच्या घृणास्पद चालीरितींचं त्याने अनुसरण केलं.+ ३  त्याचे वडील हिज्कीया यांनी उपासनेची जी उच्च स्थानं* पाडून टाकली होती, ती त्याने पुन्हा बांधली.+ तसंच, त्याने बआल दैवतासाठी वेदी बांधल्या आणि इस्राएलचा राजा अहाब याच्याप्रमाणेच+ त्याने पूजेचा खांब* बनवला.+ त्याने आकाशातल्या सगळ्या सैन्याला नमन केलं आणि त्यांची उपासना केली.+ ४  यहोवा ज्या मंदिराबद्दल असं म्हणाला होता की “यरुशलेम माझ्या नावाने ओळखलं जाईल,”+ त्या यहोवाच्या मंदिरात त्याने वेदी बांधल्या.+ ५  तसंच, यहोवाच्या मंदिराच्या दोन्ही अंगणांत+ त्याने आकाशातल्या सगळ्या सैन्यासाठी वेदी बांधल्या.+ ६  याशिवाय, त्याने स्वतःच्या मुलाचा अग्नीत होम केला.* तसंच, त्याने जादूटोणा केला, शकुन पाहिले+ आणि भूतविद्या करणाऱ्‍यांना व ज्योतिषांना नेमलं.+ मनश्‍शेने फार मोठ्या प्रमाणावर यहोवाच्या नजरेत जे वाईट ते केलं आणि त्याचा क्रोध भडकवला. ७  तसंच, मनश्‍शेने जो पूजेचा खांब,*+ म्हणजे जी कोरीव मूर्ती बनवली होती, ती मंदिरात ठेवली. यहोवा या मंदिराविषयी दावीद आणि त्याचा मुलगा शलमोन यांना म्हणाला होता: “हे मंदिर आणि इस्राएलच्या सर्व वंशांतून मी निवडलेलं यरुशलेम, कायम माझ्या नावाने ओळखलं जाईल.+ ८  आणि जो देश मी इस्राएली लोकांच्या पूर्वजांना दिला होता, त्यातून मी त्यांना बाहेर काढून पुन्हा कधीही भटकायला लावणार नाही.+ पण त्यासाठी त्यांनी माझ्या सगळ्या आज्ञांचं, म्हणजे माझा सेवक मोशे याने इस्राएली लोकांना जे नियमशास्त्र पाळायला सांगितलं होतं, त्याचं काळजीपूर्वक पालन करणं गरजेचं आहे.”+ ९  पण इस्राएली लोकांनी त्या आज्ञा पाळल्या नाहीत. यहोवाने ज्या राष्ट्रांचा इस्राएली लोकांसमोर सर्वनाश केला होता,+ त्यांच्यापेक्षाही जास्त वाईट कामं करायला लावून मनश्‍शे त्यांना बहकवत राहिला. १०  यहोवा आपल्या सेवकांद्वारे, म्हणजे संदेष्ट्यांद्वारे वारंवार असा संदेश देत राहिला:+ ११  “यहूदाचा राजा मनश्‍शे याने अशी सगळी घृणास्पद कामं केली आहेत; त्याच्याआधी होऊन गेलेल्या+ अमोरी लोकांपेक्षाही तो वाईट वागत राहिला;+ आणि त्याने यहूदाला आपल्या घृणास्पद मूर्तींच्या* नादी लावून पाप करायला लावलं. १२  म्हणून इस्राएलचा देव यहोवा म्हणतो: ‘मी यरुशलेमवर आणि यहूदावर असं संकट आणतोय,+ की जो कोणी त्याबद्दल ऐकेल त्याला धक्का बसेल.*+ १३  आणि मोजमाप करण्याच्या ज्या दोरीने+ मी शोमरोनाला+ मोजलं, त्याच दोरीने मी यरुशलेमलाही मोजेन. आणि अहाबच्या घराण्याला लावलेला ओळंबा*+ मी यरुशलेमला लावीन. वाटी जशी घासूनपुसून पालथी घालून ठेवतात, तशीच मी यरुशलेमची दशा करीन.+ १४  माझ्या वारशातल्या+ उरलेल्या लोकांना मी सोडून देईन. मी त्यांना त्यांच्या शत्रूंच्या हाती देईन. त्यांचे सर्व शत्रू त्यांना लुटतील आणि बंदी बनवून नेतील.+ १५  कारण माझ्या नजरेत जे वाईट ते त्यांनी केलं; आणि त्यांचे पूर्वज इजिप्तमधून बाहेर आले, त्या दिवसापासून आजपर्यंत ते माझा क्रोध भडकवत राहिले.’”+ १६  मनश्‍शेने यहूदाच्या लोकांना यहोवाच्या नजरेत जे वाईट ते करायला लावलं; याशिवाय, त्याने यरुशलेमच्या एका टोकापासून दुसऱ्‍या टोकापर्यंत खूप मोठ्या प्रमाणात निर्दोष लोकांचं रक्‍तही सांडलं.+ १७  मनश्‍शेबद्दलची बाकीची माहिती, म्हणजे त्याने केलेली पापं आणि त्याने जे काही केलं ते सगळं यहूदाच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे. १८  त्यानंतर मनश्‍शेचा मृत्यू झाला* आणि त्याला त्याच्या राजमहालाच्या बागेत, म्हणजे उज्जाच्या बागेत पुरण्यात आलं.+ मग त्याच्या जागी त्याचा मुलगा आमोन हा राजा बनला. १९  आमोन+ राजा बनला तेव्हा तो २२ वर्षांचा होता. त्याने दोन वर्षं यरुशलेममधून राज्य केलं.+ त्याच्या आईचं नाव मशुल्लेमेथ असून ती योत्बा इथे राहणाऱ्‍या हारूसची मुलगी होती. २०  आपले वडील मनश्‍शे यांच्याप्रमाणेच आमोन हा यहोवाच्या नजरेत जे वाईट ते करत राहिला.+ २१  तो आपल्या वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवून चालत राहिला. त्याच्या वडिलांनी ज्या घृणास्पद मूर्तींची उपासना केली होती, त्यांची तो उपासना करत राहिला आणि त्यांच्या पाया पडत राहिला.+ २२  अशा प्रकारे आमोनने आपल्या पूर्वजांच्या देवाला, यहोवाला सोडून दिलं; तो यहोवाच्या मार्गावर चालला नाही.+ २३  पुढे त्याच्या सेवकांनी त्याच्याविरुद्ध कट रचून त्याच्याच महालात त्याला ठार मारलं. २४  पण देशातल्या लोकांनी आमोन राजाविरुद्ध कट रचणाऱ्‍या सगळ्यांना मारून टाकलं आणि त्याच्या जागी त्याचा मुलगा योशीया याला राजा बनवलं.+ २५  आमोनबद्दलची बाकीची माहिती, म्हणजे त्याने जे काही केलं ते सगळं यहूदाच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे. २६  त्यांनी आमोनला उज्जाच्या बागेत असलेल्या त्याच्या कबरेत पुरलं.+ मग त्याच्या जागी त्याचा मुलगा योशीया+ राजा बनला.

तळटीपा

शब्दशः “अग्नीतून पार केलं.”
इथे वापरलेला हिब्रू शब्द, “विष्ठा” या अर्थाच्या शब्दाशी संबंधित असावा आणि तो तिरस्कार दाखवण्यासाठी वापरला जातो.
शब्दशः “त्याचे दोन्ही कान भणभणतील.”
भिंत सरळ रेषेत बांधली जात आहे की नाही हे पाहण्याचं साधन.
शब्दशः “आपल्या पूर्वजांकडे जाऊन निजला.”