२ राजे २२:१-२०

  • यहूदाचा राजा योशीया (१, २)

  • मंदिराच्या दुरुस्तीबद्दल सूचना (३-७)

  • नियमशास्त्राचं पुस्तक सापडतं (८-१३)

  • येणाऱ्‍या संकाटाबद्दल हुल्दाची भविष्यवाणी (१४-२०)

२२  योशीया+ राजा बनला तेव्हा तो आठ वर्षांचा होता. त्याने ३१ वर्षं यरुशलेममधून राज्य केलं.+ त्याच्या आईचं नाव यदीदा असून ती बसकाथ+ इथे राहणाऱ्‍या अदायाची मुलगी होती. २  योशीयाने यहोवाच्या नजरेत जे योग्य ते केलं. तो आपला पूर्वज दावीद याच्या सर्व मार्गांप्रमाणे चालला;+ त्यांपासून तो भरकटला नाही. ३  योशीया राजाने आपल्या शासनकाळाच्या १८ व्या वर्षी आपला सचिव शाफान याला यहोवाच्या मंदिरात पाठवलं;+ शाफान हा असल्याहचा मुलगा आणि मशुल्लामचा नातू होता. शाफानला पाठवताना राजा त्याला म्हणाला: ४  “हिल्कीया+ महायाजकाकडे जा आणि यहोवाच्या मंदिरात येणारा सगळा पैसा, म्हणजे द्वारपालांनी लोकांकडून गोळा केलेला सगळा पैसा+ त्याला जमा करायला सांग.+ ५  मग तो पैसा यहोवाच्या मंदिराचं काम पाहणाऱ्‍या माणसांना दिला जावा. पुढे ही माणसं, तो पैसा यहोवाच्या मंदिराची दुरुस्ती करणाऱ्‍या मजुरांना,+ ६  म्हणजे कारागिरांना, बांधकाम करणाऱ्‍यांना आणि गवंड्यांना देतील. या पैशाचा उपयोग त्यांनी मंदिराच्या दुरुस्तीसाठी लागणारी लाकडं आणि घडवलेले दगड विकत घेण्यासाठी करावा.+ ७  पण दिलेल्या पैशांचा हिशोब त्यांच्याकडून घेऊ नये; कारण ती माणसं भरवशालायक आहेत.”+ ८  नंतर, हिल्कीया महायाजक राजाच्या सचिवाला, शाफानला म्हणाला:+ “मला यहोवाच्या मंदिरात नियमशास्त्राचं पुस्तक+ सापडलंय.” मग हिल्कीयाने ते पुस्तक शाफानला दिलं आणि तो ते वाचू लागला.+ ९  मग, सचिव शाफान हा राजाकडे गेला आणि त्याला म्हणाला: “तुमच्या सेवकांनी यहोवाच्या मंदिरातला सगळा पैसा जमा केलाय, आणि तो मंदिराच्या दुरुस्तीचं काम पाहणाऱ्‍या माणसांना दिलाय.”+ १०  सचिव शाफानने राजाला असंही सांगितलं: “हिल्कीया याजकाने मला एक पुस्तक दिलंय.”+ मग शाफान ते पुस्तक राजासमोर वाचू लागला. ११  नियमशास्त्राच्या पुस्तकात लिहिलेली वचनं ऐकताच राजाने दुःखी होऊन आपले कपडे फाडले.+ १२  मग राजाने हिल्कीया याजक, शाफानचा मुलगा अहीकाम,+ मीखायाचा मुलगा अखबोर, सचिव शाफान आणि राजाचा सेवक असाया यांना असा हुकूम दिला: १३  “जा, आणि हे जे पुस्तक सापडलंय त्यात लिहिलेल्या वचनांविषयी माझ्या वतीने, लोकांच्या वतीने आणि सर्व यहूदाच्या वतीने यहोवाला विचारा. कारण आपल्यासाठी या पुस्तकात जे लिहिलंय त्यानुसार आपले पूर्वज वागले नाहीत. आणि म्हणूनच यहोवाचा क्रोध आपल्यावर खूप भडकलाय.”+ १४  तेव्हा हिल्कीया याजक, अहीकाम, अखबोर, शाफान आणि असाया हे सगळे हुल्दा संदेष्टीकडे+ गेले. हुल्दा ही वस्त्र-भांडाराची देखरेख करणाऱ्‍या शल्लूमची बायको होती. (शल्लूम हा तिकवाचा मुलगा आणि हरहसचा नातू होता.) हुल्दा यरुशलेमच्या उपनगरात राहायची. राजाने पाठवलेले लोक तिकडे जाऊन तिच्याशी बोलले.+ १५  ती त्यांना म्हणाली: “इस्राएलचा देव यहोवा म्हणतो, की ‘ज्या माणसाने तुम्हाला माझ्याकडे पाठवलंय त्याला जाऊन असं सांगा: १६  “यहोवा असं म्हणतो, ‘यहूदाच्या राजाने या पुस्तकात जे वाचलंय ते सगळं मी पूर्ण करीन;+ मी या जागेवर आणि इथे राहणाऱ्‍या लोकांवर संकट आणीन. १७  त्यांनी मला सोडून दिलंय. ते इतर देवांना बलिदानांचं हवन करत आहेत+ आणि आपल्या हातांनी बनवलेल्या वस्तूंनी+ मला संताप आणत आहेत. म्हणून या जागेवर माझा क्रोध भडकेल आणि तो शांत होणार नाही.’”+ १८  पण ज्या यहूदाच्या राजाने तुम्हाला यहोवाकडे चौकशी करायला पाठवलंय, त्याला असं सांगा, की “तू जी वचनं ऐकलीस, त्यांबद्दल इस्राएलचा देव यहोवा म्हणतो: १९  ‘या जागेविषयी आणि इथल्या लोकांविषयी मी जे बोललो, म्हणजे हे लोक शापित होतील आणि यांना पाहून लोक घाबरतील असं मी जे बोललो, ते ऐकून तू यहोवासमोर नम्र झालास+ आणि आपलं हृदय कोमल केलंस; तू आपले कपडे फाडून माझ्यासमोर रडलास.+ म्हणून यहोवा म्हणतो, की मी तुझा धावा ऐकलाय; २०  आणि त्यामुळे तू जिवंत आहेस तोपर्यंत मी या जागेवर संकट आणणार नाही. तू तुझ्या पूर्वजांकडे जाशील;* तू शांतीने आपल्या कबरेत जाशील.’”’” मग, त्या लोकांनी हा संदेश राजाला येऊन सांगितला.

तळटीपा

काव्यात मरणाला सूचित करणारा वाक्यांश.