२ राजे २३:१-३७

  • योशीयाने देशात केलेल्या सुधारणा (१-२०)

  • वल्हांडण सण पाळला जातो (२१-२३)

  • योशीया देशात आणखी सुधारणा करतो (२४-२७)

  • योशीयाचा मृत्यू (२८-३०)

  • यहूदाचा राजा यहोआहाज (३१-३३)

  • यहूदाचा राजा यहोयाकीम (३४-३७)

२३  तेव्हा योशीया राजाने निरोप पाठवून यहूदा आणि यरुशलेम इथल्या सगळ्या वडीलजनांना बोलावून घेतलं.+ २  त्यानंतर यहूदातले सगळे पुरुष, यरुशलेमचे सर्व रहिवासी, याजक व संदेष्टे अशा सर्व लहानमोठ्या लोकांना सोबत घेऊन राजा यहोवाच्या मंदिरात गेला. मग त्याने यहोवाच्या मंदिरात सापडलेल्या+ कराराच्या+ पुस्तकातली सगळी वचनं त्यांच्यासमोर वाचली.+ ३  योशीया स्तंभाजवळ उभा राहिला आणि त्याने यहोवासमोर असा करार केला,*+ की तो यहोवाच्या सांगण्यानुसार चालेल आणि त्याच्या आज्ञा, स्मरण-सूचना* व कायदे यांचं पूर्ण मनाने व पूर्ण जिवाने पालन करेल; तसंच, या पुस्तकात लिहिलेल्या कराराच्या सर्व वचनांप्रमाणे तो वागेल. तेव्हा, सर्व लोकांनीही कराराप्रमाणे वागण्याचं कबूल केलं.+ ४  त्यानंतर राजाने हिल्कीया+ महायाजक, इतर याजक आणि द्वारपाल यांना असा हुकूम दिला, की बआल दैवतासाठी, पूजेच्या खांबासाठी*+ आणि आकाशातल्या सैन्यासाठी बनवलेली सगळी भांडी त्यांनी यहोवाच्या मंदिरातून बाहेर आणावी. मग त्याने ती सगळी भांडी यरुशलेमच्या बाहेर, किद्रोनच्या उतारांवर नेऊन जाळून टाकली आणि त्यांची राख बेथेलला नेली.+ ५  त्याने परक्या देवांच्या पुजाऱ्‍यांना हाकलून लावलं; यहूदाच्या राजांनी या पुजाऱ्‍यांना यहूदाच्या शहरांमध्ये आणि यरुशलेमच्या आसपासच्या प्रदेशांत उपासनेच्या उच्च स्थानांवर* बलिदानांचं हवन करायला* नेमलं होतं. याशिवाय, जे लोक बआल दैवतासाठी आणि सूर्य, चंद्र, राशीचक्रातली नक्षत्रं व आकाशातले सर्व सैन्य यांच्यासाठी बलिदानांचं हवन करत होते त्यांनाही योशीयाने हाकलून लावलं.+ ६  त्याने यहोवाच्या मंदिरात असलेला पूजेचा खांब*+ यरुशलेमच्या बाहेर, किद्रोन खोऱ्‍यात आणला आणि तिथे तो जाळून टाकला.+ त्यानंतर, त्याने त्याचा चुराडा केला आणि तो चुरा सामान्य लोकांच्या कबरींवर फेकून दिला.+ ७  तसंच, त्याने यहोवाच्या मंदिरात असलेली पुरुष-वेश्‍यांची+ घरंही पाडून टाकली; या घरांमध्ये स्त्रिया, पूजेच्या खांबासाठी* तंबूचं कापड विणायच्या. ८  मग योशीयाने यहूदाच्या शहरांतून सगळ्या याजकांना बाहेर आणलं. नंतर, गेबापासून+ बैर-शेबापर्यंत+ असलेल्या उच्च स्थानांवर उपासना केली जाऊ नये, म्हणून त्याने ती भ्रष्ट केली; कारण या उच्च स्थानांवर याजक बलिदानांचं हवन करायचे. तसंच, शहराचा प्रमुख यहोशवा याच्या दरवाजाजवळ असलेली उच्च स्थानंही त्याने पाडून टाकली; ही उच्च स्थानं, शहराच्या दरवाजातून प्रवेश करताना डाव्या बाजूला होती. ९  उच्च स्थानांवर सेवा करणारे याजक यरुशलेममधल्या यहोवाच्या वेदीसमोर सेवा करत नव्हते;+ पण आपल्या भाऊबंदांसोबत ते बेखमीर* भाकर खायचे. १०  तसंच, योशीयाने ‘हिन्‍नोम वंशजांच्या खोऱ्‍यात’*+ असलेली तोफेत+ ही जागा भ्रष्ट करून टाकली; म्हणजे कोणालाही तिथे आपल्या मुलाचा किंवा मुलीचा मोलख दैवताला आगीत होम करता येणार नाही.*+ ११  यहूदाच्या राजांनी काही घोडे सूर्याला समर्पित केले होते; योशीयाने यहोवाच्या मंदिरात या घोड्यांच्या प्रवेशावर बंदी घातली. हे घोडे, वऱ्‍हांड्याजवळ असलेल्या नथन-मेलेक दरबाऱ्‍याच्या खोलीतून* प्रवेश करायचे. योशीयाने सूर्याला+ समर्पित असलेले रथसुद्धा जाळून टाकले. १२  याशिवाय, आहाजच्या वरच्या खोलीच्या छतावर यहूदाच्या राजांनी बांधलेल्या वेदी,+ आणि यहोवाच्या मंदिराच्या दोन्ही अंगणांत मनश्‍शेने बांधलेल्या वेदी योशीयाने पाडून टाकल्या.+ त्याने त्यांचा चुराडा केला आणि तो किद्रोनच्या खोऱ्‍यात फेकून दिला. १३  आणि यरुशलेमच्या समोर, म्हणजे ‘विनाश पर्वताच्या’* दक्षिणेला असलेल्या उच्च स्थानांवर उपासना केली जाऊ नये, म्हणून त्याने ती भ्रष्ट केली; ही उच्च स्थानं इस्राएलच्या शलमोन राजाने सीदोनी लोकांची घृणास्पद देवी अष्टारोथ, मबावी लोकांचं घृणास्पद दैवत कमोश आणि अम्मोनी लोकांचं घृणास्पद दैवत+ मिलकोम+ यांच्यासाठी बांधली होती. १४  योशीयाने पूजेच्या स्तंभांचे तुकडे-तुकडे केले व पूजेचे खांब*+ तोडून टाकले, आणि त्यांच्या जागी माणसांची हाडं टाकली. १५  तसंच, नबाटचा मुलगा यराबाम याने बेथेलमध्ये जी वेदी व उच्च स्थान बांधून इस्राएलला पाप करायला लावलं होतं,+ ते योशीयाने पाडून टाकलं. नंतर त्याने ते उच्च स्थान जाळून टाकलं, तिथल्या सगळ्या गोष्टींचा चुराडा केला आणि पूजेचा खांबही*+ जाळून टाकला. १६  नंतर योशीयाने वळून पाहिलं, तेव्हा त्याला डोंगरावर कबरी दिसल्या. त्याने त्या कबरींमधून हाडं बाहेर काढली आणि ती वेदीवर जाळून वेदी भ्रष्ट केली. अशा प्रकारे, खऱ्‍या देवाच्या माणसाने यहोवाचा जो संदेश आधीच सांगितला होता, त्याप्रमाणे हे घडलं.+ १७  मग योशीया म्हणाला: “ती तिथे कोणाची कबर आहे?” त्यावर शहरातली माणसं त्याला म्हणाली: “ती यहूदातल्या खऱ्‍या देवाच्या माणसाची कबर आहे.+ बेथेलमधल्या वेदीचं तुम्ही जे काही केलंत, त्याबद्दल त्याने आधीच सांगितलं होतं.” १८  तेव्हा योशीया म्हणाला: “त्याच्या अस्थींना हात लावू नका. त्या तशाच राहू द्या.” म्हणून त्यांनी त्याच्या आणि शोमरोनातल्या संदेष्ट्याच्या अस्थी तशाच राहू दिल्या.+ १९  शोमरोनच्या शहरांतल्या उच्च स्थानांवर बांधलेली सगळी देवळं योशीयाने पाडून टाकली.+ इस्राएलच्या राजांनी ही देवळं बांधून देवाचा क्रोध भडकवला होता. योशीयाने बेथेलमधल्या उच्च स्थानांचं जे केलं होतं, तेच या देवळांच्या बाबतीतही केलं.+ २०  त्याने उच्च स्थानांवर सेवा करणाऱ्‍या सर्व याजकांना वेदींवर मारून टाकलं आणि त्यांवर माणसांची हाडं जाळली.+ त्यानंतर तो यरुशलेमला परत आला. २१  मग राजाने सगळ्या लोकांना अशी आज्ञा दिली: “या कराराच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे,+ तुमचा देव यहोवा याच्यासाठी वल्हांडण सण पाळा.”+ २२  न्यायाधीश न्याय करायचे त्या काळापासून, तसंच इस्राएल आणि यहूदामध्ये राजे शासन करायचे त्या काळापासून आतापर्यंत कधीही असा वल्हांडण सण पाळण्यात आला नव्हता.+ २३  यहोवासाठी असलेला हा वल्हांडण सण, योशीया राजाच्या शासनकाळाच्या १८ व्या वर्षी यरुशलेममध्ये पाळला गेला. २४  यासोबतच योशीयाने, यहूदाच्या प्रदेशातून व यरुशलेममधून ज्योतिषांना+ आणि भूतविद्या करणाऱ्‍यांना काढून टाकलं; तसंच, त्याने कुलदैवतांच्या मूर्ती,*+ घृणास्पद मूर्ती* आणि इतर सगळ्या घृणास्पद गोष्टीही तिथून काढून टाकल्या. हिल्कीया याजकाला यहोवाच्या मंदिरात जे नियमशास्त्राचं पुस्तक सापडलं होतं,+ त्यात लिहिलेल्या वचनांप्रमाणे करता यावं म्हणून योशीयाने हे सगळं केलं.+ २५  मोशेच्या नियमशास्त्राचं पालन करून आपल्या पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने+ आणि पूर्ण शक्‍तीने यहोवाकडे परत येणारा योशीयासारखा एकही राजा त्याच्याआधी नव्हता किंवा त्याच्यानंतरही कधी झाला नाही. २६  पण तरीही, यहूदावर असलेला यहोवाचा क्रोध शांत झाला नाही; कारण मनश्‍शेने केलेल्या अनेक घृणास्पद गोष्टींमुळे त्याचा क्रोध भडकला होता.+ २७  यहोवा म्हणाला: “मी इस्राएलला जसं माझ्या नजरेसमोरून दूर केलं,+ तसं यहूदालाही करीन;+ आणि मी निवडलेल्या या यरुशलेम शहराचा व ज्या मंदिराबद्दल मी म्हणालो होतो, की ‘माझं नाव कायम तिथे राहील,’+ त्या मंदिराचाही मी त्याग करीन.” २८  योशीयाबद्दलची बाकीची माहिती, म्हणजे त्याने जे काही केलं ते सर्व यहूदाच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे. २९  योशीयाच्या काळात, फारो-नखो हा इजिप्तचा राजा अश्‍शूरच्या राजाला भेटायला फरात नदीकडे गेला. तेव्हा, योशीया राजा त्याच्याशी लढायला गेला. पण नखो राजाने योशीयाला पाहिलं आणि त्याला मगिद्दो+ इथे ठार मारलं. ३०  मग, त्याच्या सेवकांनी त्याचा मृतदेह रथात ठेवून मगिद्दोमधून यरुशलेमला आणला, आणि त्याला त्याच्या कबरेत पुरलं. त्यानंतर देशातल्या लोकांनी योशीयाचा मुलगा यहोआहाज याचा अभिषेक केला आणि त्याला त्याच्या वडिलांच्या जागी राजा बनवलं.+ ३१  यहोआहाज+ राजा बनला तेव्हा तो २३ वर्षांचा होता. त्याने यरुशलेममधून तीन महिने राज्य केलं. त्याच्या आईचं नाव हमूटल+ असून ती लिब्ना इथे राहणाऱ्‍या यिर्मयाची मुलगी होती. ३२  यहोआहाजसुद्धा आपल्या पूर्वजांप्रमाणेच यहोवाच्या नजरेत जे वाईट ते सर्व करू लागला.+ ३३  यहोआहाजने यरुशलेममध्ये राज्य करू नये, म्हणून फारो-नखो+ याने त्याला कैद करून हमाथ देशातल्या रिब्ला+ इथे तुरुंगात टाकलं. तसंच, त्याने देशावर १०० तालान्त* चांदी आणि एक तालान्त सोनं इतका दंड लावला.+ ३४  याशिवाय, फारो-नखो याने योशीयाचा मुलगा एल्याकीम याला त्याच्या वडिलांच्या, म्हणजे योशीयाच्या जागी राजा बनवलं; आणि त्याचं नाव बदलून यहोयाकीम असं ठेवलं. पण यहोआहाजला मात्र तो इजिप्तला घेऊन गेला.+ आणि शेवटी तिथेच यहोआहाजचा मृत्यू झाला.+ ३५  फोरोने लावलेला दंड भरण्यासाठी यहोयाकीमने फारोला चांदी व सोनं दिलं. पण त्यासाठी त्याला देशातल्या लोकांकडून कर वसूल करावा लागला. त्याने देशातल्या लोकांकडून त्यांच्या जमिनींच्या किंमतीप्रमाणे चांदी व सोनं वसूल केलं आणि ते फारो-नखोला दिलं. ३६  यहोयाकीम+ राजा बनला तेव्हा तो २५ वर्षांचा होता. त्याने ११ वर्षं यरुशलेममधून राज्य केलं.+ त्याच्या आईचं नाव जबूदा असून ती रुमा इथे राहणाऱ्‍या पदायाह याची मुलगी होती. ३७  आपल्या पूर्वजांप्रमाणेच+ यहोयाकीमसुद्धा यहोवाच्या नजरेत जे वाईट ते करत राहिला.+

तळटीपा

किंवा “पुन्हा करार केला.”
किंवा “धूर वर जाण्यासाठी बलिदानं जाळायला.”
शब्दशः “अग्नीतून पार करता येणार नाही.”
शब्दार्थसूचीत “गेहन्‍ना” पाहा.
किंवा “जेवणाच्या खोलीतून.”
म्हणजे, जैतुनांचा डोंगर; खासकरून दक्षिणेकडच्या टोकाचा तो भाग ज्याला ‘अपराधाचा डोंगर’ असंही म्हटलं जातं.
किंवा “तेराफीम मूर्ती.”
इथे वापरलेला हिब्रू शब्द, “विष्ठा” या अर्थाच्या शब्दाशी संबंधित असावा आणि तो तिरस्कार दाखवण्यासाठी वापरला जातो.
एक तालान्त म्हणजे ३४.२ किलो. अति. ख१४ पाहा.