२ राजे ३:१-२७

  • इस्राएलचा राजा यहोराम (१-३)

  • मवाबचा राजा इस्राएलविरुद्ध बंड करतो (४-२५)

  • मवाबचा पराभव (२६, २७)

 यहूदाचा राजा यहोशाफाट याच्या शासनकाळाच्या १८ व्या वर्षी, अहाबचा मुलगा यहोराम+ हा शोमरोन इथे इस्राएलचा राजा बनला. त्याने १२ वर्षं राज्य केलं. २  यहोवाच्या दृष्टीने जे वाईट ते तो करत राहिला. पण आपल्या आईवडिलांइतकी वाईट कामं त्याने केली नाहीत; कारण त्याच्या वडिलांनी बआल दैवताच्या उपासनेसाठी उभा केलेला पूजेचा स्तंभ+ त्याने काढून टाकला. ३  असं असलं, तरी नबाटचा मुलगा यराबाम याने इस्राएलला जी पापं करायला लावली होती, तीच तो करत राहिला;+ ती पापं करण्याचं त्याने सोडलं नाही. ४  मवाबचा राजा मेशा याच्याकडे मेंढरांचे बरेच कळप होते. तो इस्राएलच्या राजाला १,००,००० कोकरं आणि १,००,००० लोकर न कातरलेले एडके कर* म्हणून द्यायचा. ५  पण अहाबचा मृत्यू होताच,+ मवाबच्या राजाने इस्राएलच्या राजाविरुद्ध बंड केलं.+ ६  तेव्हा, यहोराम राजा शोमरोनातून निघाला आणि त्याने सगळ्या इस्राएली लोकांना लढाईसाठी एकत्र जमवलं. ७  तसंच, त्याने यहूदाचा राजा यहोशाफाट याला असा संदेश पाठवला: “मवाबच्या राजाने माझ्याविरुद्ध बंड केलंय. म्हणून त्याच्याशी युद्ध करायला माझ्यासोबत येशील का?” त्यावर तो म्हणाला: “हो मी येईन.+ माझे लोक आणि माझे घोडे घेऊन मी तुझ्यासोबत येईन.”+ ८  त्याने विचारलं: “आपण कोणत्या रस्त्याने जायचं?” तो म्हणाला: “आपण अदोमच्या ओसाड रानातून जाऊ.” ९  मग इस्राएलचा राजा हा यहूदाच्या राजासोबत आणि अदोमच्या+ राजासोबत निघाला. पण सात दिवस प्रवास केल्यानंतर सैनिकांना आणि सोबत असलेल्या जनावरांना प्यायला पाणी नव्हतं. १०  तेव्हा इस्राएलचा राजा म्हणाला: “काय हे संकट! यहोवाने आम्हा तिघा राजांना मवाबच्या हाती देण्यासाठीच एकत्र आणलंय!” ११  त्यावर यहोशाफाटने विचारलं: “आपल्याला ज्याच्याकडून यहोवाचा सल्ला घेता येईल असा कोणी यहोवाचा संदेष्टा इथे नाही का?”+ तेव्हा इस्राएलच्या राजाच्या सेवकांपैकी एक म्हणाला: “हो आहे. एलीयाच्या हातांवर पाणी ओतणारा* शाफाटचा मुलगा+ अलीशा+ इथे आहे.” १२  त्यावर यहोशाफाट म्हणाला: “यहोवाची इच्छा काय आहे हे तोच आपल्याला सांगू शकेल.” मग यहोशाफाट, इस्राएलचा राजा आणि अदोमचा राजा हे तिघं अलीशाकडे गेले. १३  तेव्हा अलीशा इस्राएलच्या राजाला म्हणाला: “तू माझ्याकडे कशाला आलास?*+ तुझ्या आईवडिलांच्या संदेष्ट्यांकडे जा!”+ पण इस्राएलचा राजा त्याला म्हणाला: “असं बोलू नका. कारण यहोवानेच आम्हा तिघा राजांना मवाबच्या हाती देण्यासाठी एकत्र आणलंय.” १४  त्यावर अलीशा म्हणाला: “ज्या देवाची मी सेवा करतो,* त्या सैन्यांच्या जिवंत देवाची, यहोवाची शपथ! यहूदाचा राजा यहोशाफाट+ याच्याबद्दल मला आदर नसता, तर मी तुझ्याकडे लक्ष दिलं नसतं किंवा तुझ्याकडे ढुंकूनही पाहिलं नसतं.+ १५  आता वीणा वाजवणाऱ्‍या एखाद्या माणसाला बोलवा.”+ तो माणूस वीणा वाजवू लागताच, यहोवाची शक्‍ती* अलीशावर कार्य करू लागली.+ १६  तेव्हा तो म्हणाला: “यहोवा असं म्हणतो: ‘या खोऱ्‍यात* ठिकठिकाणी खड्डे खोदा. १७  कारण यहोवा म्हणतो: “वारा वाहणार नाही किंवा पाऊस पडणार नाही, पण तरी हे खोरं पाण्याने भरून जाईल.+ आणि तुम्हाला व तुमच्या जनावरांना प्यायला पाणी मिळेल.”’ १८  ही तर यहोवासाठी खूपच क्षुल्लक गोष्ट आहे.+ तो तर मवाबच्या लोकांनाही तुमच्या हाती देईल.+ १९  तुम्ही त्यांच्या प्रमुख शहरांचा आणि मजबूत भिंती असलेल्या सगळ्या शहरांचा नाश करा;+ तिथलं प्रत्येक चांगलं झाड कापून टाका; पाण्याचे सर्व झरे बुजवून टाका आणि दगड टाकून प्रत्येक चांगल्या जमिनीची नासाडी करा.”+ २०  मग सकाळी, म्हणजे सकाळच्या अन्‍नार्पणाच्या वेळी+ अदोमच्या दिशेने अचानक पाणी येऊ लागलं आणि संपूर्ण खोरं पाण्याने भरून गेलं. २१  आपल्याविरुद्ध राजे लढाई करायला आले आहेत हे मवाबी लोकांनी ऐकलं. तेव्हा त्यांनी शस्त्र चालवणाऱ्‍या आपल्या सर्व माणसांना एकत्र केलं, आणि ते सीमेवर जाऊन तैनात झाले. २२  ते सकाळी उठले तेव्हा सूर्य पाण्यावर चमकत होता. आणि पलीकडून त्यांना ते पाणी रक्‍तासारखं लाल दिसलं. २३  ते पाहून मवाबी लोक म्हणाले: “हे तर रक्‍त आहे! त्या राजांनी नक्कीच एकमेकांना तलवारीने मारून टाकलं असावं. मवाबी लोकांनो! लूटमार करायला चला!”+ २४  मवाबी लोक इस्राएलच्या छावणीत आले, तेव्हा इस्राएली लोकांनी उठून त्यांच्यावर हल्ला केला. मवाबी लोक पळू लागले,+ तेव्हा इस्राएली लोक त्यांची कत्तल करत-करत त्यांच्यामागे मवाब देशात गेले. २५  त्यांनी त्यांची शहरं उद्ध्‌वस्त केली. तसंच, त्यांच्यापैकी प्रत्येकाने तिथल्या चांगल्या जमिनींवर दगड टाकून त्यांची नासाडी केली. त्यांनी पाण्याचे सर्व झरे बुजवून टाकले,+ आणि प्रत्येक चांगलं झाड कापून टाकलं.+ शेवटी फक्‍त कीर-हरेसेथ+ या शहराच्या दगडी भिंतीच उभ्या होत्या. पण गोफण चालवणाऱ्‍या सैनिकांनी त्या शहराला वेढा घालून त्याचाही नाश केला. २६  आपण युद्ध हरत आहोत हे मवाबच्या राजाच्या लक्षात आलं. तेव्हा त्याने तलवार चालवणाऱ्‍या ७०० सैनिकांना सोबत घेतलं आणि अदोमच्या+ राजाभोवती असलेला वेढा फोडण्याचा प्रयत्न केला. पण तो यशस्वी झाला नाही. २७  म्हणून मग त्याने आपल्या पहिल्या मुलाचं, म्हणजे जो त्याच्या जागी राजा होणार होता त्या मुलाचं शहराच्या भिंतीवर होमार्पण केलं.+ तेव्हा इस्राएलविरुद्ध संतापाची लाट उसळली आणि लोकांनी मवाबच्या राजाविरुद्ध लढाई करण्याचं सोडून दिलं. ते सर्व आपापल्या देशात परत गेले.

तळटीपा

किंवा “खंडणी.”
किंवा “एलीयाचा सेवक.”
किंवा “मला तुझ्याशी काय घेणंदेणं?”
शब्दशः “ज्याच्यासमोर मी उभा राहतो.”
शब्दशः “हात.”