२ राजे ५:१-२७

  • अलीशा नामानचा कुष्ठरोग बरा करतो (१-१९)

  • लोभी गहेजीला कुष्ठरोग होतो (२०-२७)

 सीरियाच्या राजाचा एक सेनापती होता. त्याचं नाव नामान. तो एक प्रतिष्ठित माणूस असून राजाच्या नजरेत त्याला फार मान होता. कारण त्याच्या हातून यहोवाने सीरियाला विजय मिळवून दिला होता. नामान एक कुष्ठरोगी होता.* असं असलं, तरी तो एक पराक्रमी योद्धा होता. २  सीरियाचे सैनिक सहसा इस्राएल देशात येऊन लूटमार करायचे. एकदा, लूटमार करताना त्यांनी इस्राएलमधून एका लहान मुलीला बंदी बनवून नेलं. ती मुलगी नामानच्या बायकोची दासी झाली. ३  एक दिवस, ती आपल्या मालकिणीला म्हणाली: “आपले मालक जर शोमरोनातल्या संदेष्ट्याला+ जाऊन भेटले, तर किती चांगलं होईल! ते त्यांचा कुष्ठरोग बरा करतील.”+ ४  म्हणून मग तो* राजाकडे गेला आणि इस्राएली मुलीने जे काही म्हटलं होतं, ते त्याने राजाला सांगितलं. ५  तेव्हा सीरियाचा राजा म्हणाला: “मग लगेच जायला निघ! मी इस्राएलच्या राजाला एक पत्रही पाठवतो.” म्हणून नामान आपल्यासोबत दहा तालान्त* चांदी, सोन्याचे ६,००० तुकडे आणि कपड्यांचे दहा जोड घेऊन निघाला. ६  त्याने इस्राएलच्या राजाला ते पत्र दिलं. त्यात असं लिहिलं होतं: “या पत्रासोबत, मी माझा सेवक नामान याला तुमच्याकडे पाठवतोय. त्याचा कुष्ठरोग तुम्ही बरा करावा.” ७  ते पत्र वाचताच इस्राएलच्या राजाने आपले कपडे फाडले आणि तो म्हणाला: “त्याने या माणसाला माझ्याकडे पाठवून मला त्याचा कुष्ठरोग बरा करायला सांगितलंय! मी काय देव आहे?+ जीवन किंवा मरण देणं काय माझ्या हातात आहे? बघा तो माणूस कसा माझ्याशी भांडण करायचं कारण शोधतोय!” ८  इस्राएलच्या राजाने आपले कपडे फाडले हे जेव्हा खऱ्‍या देवाच्या माणसाने, म्हणजे अलीशाने ऐकलं, तेव्हा त्याने लगेच राजाला असा निरोप पाठवला: “तू आपले कपडे का फाडलेस? त्या माणसाला माझ्याकडे पाठवून दे; म्हणजे इस्राएलमध्ये एक संदेष्टा आहे हे त्याला समजेल.”+ ९  म्हणून नामान आपले घोडे आणि युद्धाचे रथ घेऊन अलीशाच्या घरासमोर येऊन उभा राहिला. १०  पण अलीशाने एका दूताला पाठवून नामानला सांगितलं: “जा, यार्देन+ नदीत सात वेळा+ डुबकी मार. मग तुझं शरीर आधीसारखं होऊन तू शुद्ध होशील.” ११  ते ऐकून नामान संतापला आणि परत जायला निघाला. तो म्हणाला: “मी असा विचार केला होता, की ‘तो माझ्याकडे बाहेर येईल आणि इथे उभा राहील. मग त्याचा देव यहोवा याला प्रार्थना करून तो कुष्ठरोगाच्या ठिकाणी हात फिरवेल आणि मला बरं करेल.’ १२  इस्राएलच्या नद्यांपेक्षा दिमिष्कमधल्या+ अबाना आणि परपर या नद्या काय चांगल्या नाहीत का? मी त्यांत डुबकी मारून शुद्ध होऊ शकत नाही का?” असं म्हणून तो मागे फिरला आणि रागाच्या भरात तिथून निघून गेला. १३  पण त्याचे सेवक त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाले: “हे प्रभू!* त्या संदेष्ट्याने जर तुम्हाला एखादं अवघड काम करायला सांगितलं असतं, तर तुम्ही ते केलं नसतं का? पण त्याने तर तुम्हाला इतकंच सांगितलंय, की ‘डुबकी मारा आणि शुद्ध व्हा.’ मग तसं करायला काय हरकत आहे?” १४  तेव्हा, खऱ्‍या देवाच्या माणसाने सांगितल्याप्रमाणे नामान यार्देन नदीकडे गेला आणि त्याने सात वेळा नदीत डुबकी मारली.+ त्यानंतर त्याचं शरीर आधीसारखं झालं; त्याची त्वचा लहान मुलाच्या त्वचेसारखी होऊन+ तो शुद्ध झाला.+ १५  त्यानंतर तो आपल्या सर्व सैनिकांना घेऊन परत खऱ्‍या देवाच्या माणसाकडे गेला+ आणि त्याच्यासमोर उभा राहून म्हणाला: “आता मला समजलंय, की या संपूर्ण पृथ्वीवर फक्‍त इस्राएलमध्येच देव आहे;+ दुसरीकडे कुठेही नाही. तर आता कृपा करून तुमच्या या सेवकाने आणलेली भेट स्वीकारा.” १६  पण अलीशा त्याला म्हणाला: “ज्या जिवंत देवाची, यहोवाची मी सेवा करतो* त्याची शपथ, मी हे स्वीकारणार नाही.”+ नामान तरीही त्याला आग्रह करत राहिला, पण त्याने ती भेट स्वीकारली नाही. १७  शेवटी नामान म्हणाला: “ठीक आहे. पण कृपा करून, दोन खेचरं वाहू शकतील इतकी माती या देशातून घेऊन जाण्याची तुमच्या या सेवकाला परवानगी द्या. कारण इथून पुढे तुमचा हा सेवक यहोवाशिवाय दुसऱ्‍या कोणत्याही देवाला होमार्पण किंवा बलिदान अर्पण करणार नाही. १८  पण यहोवाने तुमच्या या सेवकाला फक्‍त एका गोष्टीसाठी क्षमा करावी: माझे प्रभू जेव्हा रिम्मोनच्या मंदिरात नमन करायला जातात, तेव्हा ते माझ्या हाताचा आधार घेऊन नमन करतात. त्यामुळे मलाही त्या मंदिरात खाली वाकावं लागतं. म्हणून जेव्हा-जेव्हा मी रिम्मोनच्या मंदिरात खाली वाकीन, तेव्हा-तेव्हा यहोवाने कृपा करून तुमच्या या सेवकाला क्षमा करावी.” १९  तेव्हा अलीशा त्याला म्हणाला: “शांतीने जा.” मग नामान तिथून निघून गेला. तो काही अंतरावर गेला, २०  तेव्हा खऱ्‍या देवाच्या माणसाचा,+ अलीशाचा सेवक गेहजी+ मनात म्हणाला: ‘सीरियाच्या नामानने+ आणलेल्या भेटीतून काहीही न घेता माझ्या प्रभूने त्याला असंच जाऊ दिलं. जिवंत देवाची, यहोवाची शपथ! मी त्याच्या मागे धावत जाईन आणि त्याच्याकडून काहीतरी घेईन.’ २१  म्हणून गेहजी नामानच्या मागे धावत गेला. आपल्यामागे कोणीतरी धावत येत असल्याचं पाहून नामान त्याला भेटायला आपल्या रथातून खाली उतरला आणि म्हणाला: “सगळं ठीक आहे ना?” २२  त्यावर तो म्हणाला: “सगळं ठीक आहे. पण माझ्या प्रभूने मला असं सांगून पाठवलंय: ‘नुकतेच माझ्याकडे, एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातून संदेष्ट्यांच्या पुत्रांपैकी* दोघं जण आले आहेत. तेव्हा कृपा करून, त्यांच्यासाठी एक तालान्त चांदी आणि कपड्यांचे दोन जोड द्या.’”+ २३  नामान त्याला म्हणाला: “एक काय, दोन तालान्त घे.” नामान त्याला आग्रह करत राहिला.+ मग नामानने दोन तालान्त चांदी व कपड्यांचे दोन जोड घेतले आणि ते दोन गोण्यांमध्ये बांधून आपल्या दोन सेवकांकडे दिले. हे सर्व घेऊन सेवक गेहजीच्या पुढे चालू लागले. २४  मग ओफेल* इथे पोहोचल्यावर गेहजीने त्यांच्या हातून त्या गोण्या घेतल्या आणि घरात ठेवल्या. नंतर त्याने त्या माणसांना पाठवून दिलं. ते गेल्यावर, २५  गेहजी आत गेला आणि आपल्या प्रभूजवळ, अलीशाजवळ जाऊन उभा राहिला. तेव्हा अलीशाने त्याला विचारलं: “गेहजी, तू कुठे गेला होतास?” त्यावर तो म्हणाला: “कुठेही नाही, तुमचा हा सेवक तर इथेच होता.”+ २६  तेव्हा अलीशा त्याला म्हणाला: “तुला काय वाटतं, तू त्या माणसाच्या मागे गेला आणि तो तुला भेटायला रथातून खाली उतरला हे काय मला माहीत नाही? ही वेळ काय चांदी, कपडे, जैतुनाच्या बागा, द्राक्षमळे, मेंढरं, गुरंढोरं किंवा दास-दासी घेण्याची आहे का?+ २७  म्हणून आता नामानचा कुष्ठरोग+ तुला आणि तुझ्या वंशजांना कायमचा लागेल.” तेव्हा गेहजीला कुष्ठरोग* होऊन तो लगेच बर्फासारखा* पांढरा पडला,+ आणि अलीशासमोरून निघून गेला.

तळटीपा

किंवा “त्याला एक प्रकारचा त्वचारोग होता.” शब्दार्थसूचीत “कुष्ठरोग” पाहा.
हा कदाचित नामान असावा.
एक तालान्त म्हणजे ३४.२ किलो. अति. ख१४ पाहा.
शब्दशः “माझ्या पित्या.”
शब्दशः “ज्याच्यासमोर मी उभा राहतो.”
“संदेष्ट्यांचे पुत्र” हा वाक्यांश संदेष्ट्यांच्या समूहाला किंवा प्रशिक्षण मिळणाऱ्‍या संदेष्ट्यांच्या गटाला सूचित करत असावा.
शोमरोनातलं एक ठिकाण; कदाचित एक टेकडी किंवा तटबंदी असलेलं ठिकाण.
शब्दशः “हिम.”