२ राजे ६:१-३३

  • अलीशामुळे कुऱ्‍हाड पाण्यावर तरंगते (१-७)

  • अलीशा विरुद्ध सीरियाचं सैन्य (८-२३)

    • अलीशाच्या सेवकाचे डोळे उघडतात (१६, १७)

    • सीरियाच्या लोकांना आंधळं केलं जातं (१८, १९)

  • शोमरोनला वेढा; आणि दुष्काळ (२४-३३)

 एकदा संदेष्ट्यांचे पुत्र*+ अलीशाला म्हणाले: “आम्ही तुमच्यासोबत जिथे राहतो ती जागा आम्हाला खूप कमी पडत आहे. २  तर आता आम्हाला यार्देन नदीकडे जायची परवानगी द्या. तिथे जाऊन आमच्यापैकी प्रत्येक जण लाकडाचा एक ओंडका घेईल आणि आम्हाला सगळ्यांना राहायला तिथे एक घर बांधेल.” त्यावर तो म्हणाला: “ठीक आहे, जा.” ३  तेव्हा त्यांच्यापैकी एक जण अलीशाला म्हणाला: “कृपया तुम्ही आपल्या सेवकांसोबत याल का?” त्यावर तो म्हणाला: “हो मी येईन.” ४  मग तो त्यांच्यासोबत गेला. ते सर्व यार्देनकडे गेले आणि झाडं तोडू लागले. ५  झाडं तोडत असताना अचानक एका माणसाच्या कुऱ्‍हाडीचं पातं दांड्यातून निसटून पाण्यात पडलं. तेव्हा तो ओरडला आणि म्हणाला: “हे प्रभू! मी तर ती कुऱ्‍हाड मागून आणली होती!” ६  खऱ्‍या देवाच्या माणसाने त्याला विचारलं: “ती कुठे पडली?” तेव्हा त्याने ती जागा त्याला दाखवली. मग अलीशाने लाकडाचा एक तुकडा तोडून तिथे टाकला, आणि कुऱ्‍हाडीचं पातं वर आलं आणि पाण्यावर तरंगू लागलं. ७  मग तो म्हणाला: “ते काढून घे.” तेव्हा त्याने हात पुढे करून ते पातं काढून घेतलं. ८  एकदा सीरियाचा राजा इस्राएलशी युद्ध करायला निघाला.+ तो आपल्या सेवकांशी सल्लामसलत करून म्हणाला: “मी अमुक-अमुक ठिकाणी तुमच्यासोबत छावणी देईन.” ९  इकडे, खऱ्‍या देवाच्या माणसाने+ इस्राएलच्या राजाला असा निरोप पाठवला: “सावध राहा! तिथून जाऊ नकोस. कारण सीरियाचे लोक तुझ्यावर हल्ला करायला तिथेच येत आहेत.” १०  म्हणून मग, खऱ्‍या देवाच्या माणसाने ज्या ठिकाणाबद्दल इशारा दिला होता, त्या ठिकाणी असलेल्या आपल्या लोकांना इस्राएलच्या राजाने सावध केलं. खऱ्‍या देवाचा माणूस इस्राएलच्या राजाला सावध करायचा आणि राजा त्या ठिकाणांपासून दूर राहायचा; असं अनेकदा घडलं.+ ११  त्यामुळे सीरियाचा राजा खूप संतापला. त्याने आपल्या सेवकांना बोलावून विचारलं: “मला सांगा, आपल्यातला कोण इस्राएलच्या राजाच्या बाजूने आहे?” १२  तेव्हा एक सेवक त्याला म्हणाला: “हे राजा, माझ्या प्रभू! आमच्यातला कोणीही नाही! हे सगळं इस्राएलमधला अलीशा संदेष्टा करतोय. तुम्ही तुमच्या आतल्या खोलीत जे काही बोलता, अगदी तेसुद्धा तो इस्राएलच्या राजाला सांगतो.”+ १३  तेव्हा राजा म्हणाला: “जा! तो कुठे आहे ते शोधून काढा; म्हणजे त्याला पकडायला मी माणसं पाठवीन.” नंतर राजाला अशी खबर देण्यात आली, की “तो दोथानमध्ये आहे.”+ १४  म्हणून राजाने लगेच घोडे आणि युद्धाचे रथ, तसंच मोठं सैन्य तिथे पाठवलं. त्यांनी रातोरात येऊन त्या शहराला वेढा घातला. १५  मग खऱ्‍या देवाच्या माणसाचा सेवक सकाळीच उठून बाहेर आला, तेव्हा त्याने पाहिलं की घोडे आणि युद्धाचे रथ घेऊन सैन्याने शहराला वेढा घातला आहे. ते पाहताच तो सेवक अलीशाला म्हणाला: “हे प्रभू! आता काय करायचं?” १६  पण अलीशा त्याला म्हणाला: “घाबरू नकोस!+ त्यांच्यासोबत जितके आहेत, त्यापेक्षा जास्त आपल्यासोबत आहेत.”+ १७  मग अलीशा प्रार्थना करू लागला आणि म्हणाला: “हे यहोवा! कृपा करून याचे डोळे उघड, म्हणजे याला दिसेल.”+ यहोवाने लगेच त्या सेवकाचे डोळे उघडले. तेव्हा अलीशाच्या सभोवती+ असलेल्या संपूर्ण डोंगराळ प्रदेशावर त्याला अग्नीचे घोडे आणि अग्नीचे युद्ध-रथ दिसले.+ १८  सीरियाचे लोक हल्ला करायला पुढे येऊ लागले, तेव्हा अलीशा यहोवाला प्रार्थना करून म्हणाला: “कृपा करून या राष्ट्राला आंधळं कर.”+ तेव्हा अलीशाच्या विनंतीप्रमाणे त्याने त्यांना आंधळं केलं. १९  मग अलीशा त्यांना म्हणाला: “तुम्ही रस्ता चुकलात; हे ते शहर नाही. माझ्यामागे या. तुम्ही ज्या माणसाला शोधताय त्याच्याकडे मी तुम्हाला घेऊन जाईन.” पण अलीशा त्यांना शोमरोनमध्ये+ घेऊन गेला. २०  ते शोमरोनात आले तेव्हा अलीशा म्हणाला: “हे यहोवा! यांचे डोळे उघड, म्हणजे यांना दिसेल.” यहोवाने त्यांचे डोळे उघडले, तेव्हा आपण शोमरोनमध्ये आहोत असं त्यांना दिसलं. २१  इस्राएलच्या राजाने त्यांना पाहिलं तेव्हा तो अलीशाला म्हणाला: “हे प्रभू, मारून टाकू का यांना? कत्तल करू का यांची?” २२  पण तो त्याला म्हणाला: “नाही, त्यांना मारू नकोस. तू ज्यांना तुझ्या तलवारीच्या आणि धनुष्याच्या जोरावर कैद करून आणतोस, त्यांना काय मारून टाकतोस? यांना भाकरी आणि पाणी दे, म्हणजे ते खाऊन-पिऊन+ आपल्या राजाकडे परत जातील.” २३  म्हणून इस्राएलच्या राजाने त्यांना एक मोठी मेजवानी दिली आणि त्या लोकांनी खाणंपिणं केलं. मग त्याने त्यांना आपल्या राजाकडे परत पाठवून दिलं. त्यानंतर लूटमार करणाऱ्‍या सीरियाच्या टोळ्या+ पुन्हा कधीही इस्राएल देशात आल्या नाहीत. २४  पुढे काही काळाने, सीरियाचा राजा बेन-हदाद याने आपलं सगळं सैन्य जमा केलं आणि जाऊन शोमरोनला वेढा घातला.+ २५  त्यामुळे शोमरोनात मोठा दुष्काळ पडला.+ सीरियाच्या सैन्याचा वेढा इतका काळ राहिला, की गाढवाच्या डोक्याची+ किंमत चांदीचे ८० तुकडे इतकी झाली. आणि काब* मापाच्या चौथ्या भागाएवढ्या कबुतराच्या विष्ठेची किंमत चांदीचे पाच तुकडे इतकी झाली. २६  इस्राएलचा राजा शहराच्या तटबंदीवरून चालत असताना, एक स्त्री त्याला हाक मारून म्हणाली: “हे राजा, माझ्या प्रभू! आम्हाला मदत कर!” २७  त्यावर राजा म्हणाला: “जर यहोवाच तुला मदत करत नाही, तर मी कुठून करणार? मी कुठून तुला अन्‍नधान्य, द्राक्षारस किंवा तेल देणार?” २८  राजाने पुढे विचारलं: “काय झालं तुला?” त्यावर तिने उत्तर दिलं: “ही स्त्री मला म्हणाली होती, की ‘तू तुझा मुलगा दे, म्हणजे आज आपण त्याला खाऊ. मग उद्या आपण माझा मुलगा खाऊ.’+ २९  म्हणून आम्ही माझ्या मुलाला शिजवून खाल्लं.+ मग दुसऱ्‍या दिवशी मी तिला म्हणाले, की ‘आता तुझा मुलगा दे, म्हणजे आपण त्याला खाऊ.’ पण तिने त्याला लपवून ठेवलंय.” ३०  त्या स्त्रीचे हे शब्द ऐकताच, राजाने आपले कपडे फाडले.+ तो शहराच्या तटबंदीवरून चालत जात असताना लोकांनी पाहिलं, की त्याने आपल्या कपड्यांच्या आत गोणपाट घातलं आहे. ३१  मग तो म्हणाला: “आज जर मी त्या शाफाटच्या मुलाचं, अलीशाचं मुंडकं उडवलं नाही, तर देव मला कठोरातली कठोर शिक्षा करो!”+ ३२  त्या वेळी अलीशा आपल्या घरात काही वडीलजनांसोबत बसला होता. इकडे राजाने एका दूताला आपल्यापुढे पाठवलं. पण तो दूत पोहोचण्याआधीच अलीशा वडीलजनांना म्हणाला: “पाहा! त्या खुनी माणसाच्या+ मुलाने माझं डोकं उडवण्यासाठी आपल्या दूताला पाठवलंय. लक्ष ठेवा, तो दूत आला की दार लावून घ्या. त्याने आत येऊ नये म्हणून दार धरून ठेवा. त्याच्यामागे मला त्याच्या मालकाच्या पावलांचाही आवाज ऐकू येतोय.” ३३  अलीशा बोलतच होता इतक्यात तो दूत त्याच्याकडे आला. त्याच्या पाठोपाठ राजाही आला आणि म्हणाला: “यहोवानेच हे संकट आणलंय; मग मी मदतीसाठी यहोवाची वाट का बघत बसू?”

तळटीपा

“संदेष्ट्यांचे पुत्र” हा वाक्यांश संदेष्ट्यांच्या समूहाला किंवा प्रशिक्षण मिळणाऱ्‍या संदेष्ट्यांच्या गटाला सूचित करत असावा.
एक काब म्हणजे १.२२ ली. अति. ख१४ पाहा.