२ राजे ७:१-२०

  • दुष्काळ संपेल अशी भविष्यवाणी अलीशा करतो (१, २)

  • सीरियाच्या छावणीत खाण्यापिण्याच्या वस्तू (३-१५)

  • अलीशाची भविष्यवाणी पूर्ण होते (१६-२०)

 त्यावर अलीशा म्हणाला: “यहोवाचा संदेश ऐका! यहोवा असं म्हणतो: ‘उद्या या वेळेपर्यंत शोमरोनच्या दरवाजात* एका शेकेलला* एक सेया माप* चांगलं पीठ मिळेल, आणि एका शेकेलला दोन सेया मापं* जव मिळेल.’”+ २  तेव्हा राजा ज्या अधिकाऱ्‍याच्या हाताचा आधार घेऊन उभा होता, तो अधिकारी खऱ्‍या देवाच्या माणसाला म्हणाला: “यहोवाने आकाशाची दारं जरी उघडली, तरी हे शक्य आहे का?”+ त्यावर अलीशा म्हणाला: “तू स्वतः आपल्या डोळ्यांनी हे पाहशील,+ पण त्यातलं काहीही खाणार नाहीस.”+ ३  शोमरोनच्या दरवाजाजवळ चार कुष्ठरोगी बसले होते.+ ते एकमेकांना म्हणाले: “आपण इथे बसून मरायची वाट का बघतोय? ४  आपण इथेच बसून राहिलो, तरी मरू आणि शहरात गेलो, तरी दुष्काळामुळे मरू.+ त्यापेक्षा आपण सीरियाच्या छावणीत जाऊ या. त्यांनी जर आपल्याला जिवंत ठेवलं, तर जगू आणि आपला जीव घेतला, तर मरू.” ५  मग संध्याकाळी अंधार पडल्यावर ते निघाले आणि सीरियाच्या छावणीकडे गेले. ते छावणीच्या हद्दीवर पोहोचले, तेव्हा त्यांना एकही माणूस तिथे दिसला नाही. ६  कारण यहोवाने सीरियाच्या लोकांना युद्धाच्या रथांचा, घोड्यांचा आणि एका मोठ्या सैन्याचा आवाज ऐकवला होता.+ तेव्हा ते एकमेकांना म्हणाले: “इस्राएलच्या राजाने आपल्यावर हल्ला करण्यासाठी नक्कीच हित्ती लोकांच्या राजांना आणि इजिप्तच्या* राजांना पैसे देऊन बोलवलंय!” ७  त्यामुळे ते सगळे लगेच पळाले; आपले तंबू, घोडे, गाढवं आणि छावणीतलं सर्वकाही तसंच सोडून ते संध्याकाळच्या अंधारात जीव मुठीत घेऊन पळाले. ८  छावणीच्या हद्दीवर पोहोचल्यावर ते कुष्ठरोगी एका तंबूत गेले आणि खाऊ-पिऊ लागले. त्यांनी तिथून सोनं, चांदी आणि काही कपडे घेतले आणि जाऊन ते लपवून ठेवले. मग ते छावणीकडे परत आले आणि दुसऱ्‍या एका तंबूत गेले. त्यांनी तिथल्याही वस्तू घेतल्या आणि जाऊन त्या लपवून ठेवल्या. ९  शेवटी ते एकमेकांना म्हणाले: “आपण जे करतोय ते बरोबर नाही. हा दिवस आनंदाची बातमी सांगण्याचा दिवस आहे! आपण जर गप्प बसलो आणि पहाटेपर्यंत वाट बघत राहिलो, तर आपल्याला नक्कीच शिक्षा होईल. तर आता चला, आपण जाऊन राजाच्या महालात ही खबर पोहोचवू.” १०  मग ते गेले आणि शहराच्या दरवाजावर असलेल्या पहारेकऱ्‍यांना हाक मारून म्हणाले: “आम्ही सीरियाच्या छावणीत गेलो होतो, पण तिथे कोणीही नव्हतं; कोणाचा आवाजही आम्हाला ऐकू आला नाही. तिथे फक्‍त घोडे व गाढवं बांधलेली होती आणि तंबू जसेच्या तसे होते.” ११  तेव्हा पहारेकऱ्‍यांनी लगेच हाक मारून राजाच्या महालात ही खबर पोहोचवली. १२  राजा रात्रीच उठला आणि आपल्या सेवकांना म्हणाला: “सीरियाच्या लोकांचा काय डावपेच आहे हे मी तुम्हाला सांगतो. त्यांना चांगलं माहीत आहे, की आपली उपासमार होत आहे.+ म्हणून ते छावणीतून निघून रानात जाऊन लपलेत. त्यांचा असा विचार आहे, की ‘इस्राएली लोक जसं शहरातून बाहेर पडतील, तसं आपण त्यांना जिवंत पकडू आणि त्यांच्या शहरात घुसू.’”+ १३  तेव्हा राजाचा एक सेवक म्हणाला: “शहरात उरलेल्या घोड्यांपैकी पाच घोडे घेऊन काही माणसांना तिकडे जाऊ द्या. ते जरी वाचले, तरी त्यांची दशा इथे उरलेल्या इस्राएली लोकांसारखीच होईल; आणि मारले गेले, तरी जे इस्राएली लोक मेले आहेत त्यांच्यासारखीच त्यांची अवस्था होईल.” १४  म्हणून त्यांनी दोन रथांना घोडे जुंपले, आणि राजाने त्यांना सीरियाच्या छावणीत पाठवलं. तो त्यांना म्हणाला: “जा आणि बघून या.” १५  ते थेट यार्देन नदीपर्यंत त्यांच्यामागे त्यांचा शोध घेत गेले. तेव्हा त्या रस्त्यावर सगळीकडे कपडे आणि भांडी पडलेली त्यांना दिसली; सीरियाच्या लोकांनी पळण्याच्या गडबडीत या वस्तू टाकून दिल्या होत्या. मग दूत परत आले आणि त्यांनी राजाला ही खबर दिली. १६  मग सर्व लोक शहराबाहेर पडले आणि त्यांनी जाऊन सीरियाची छावणी लुटली. तेव्हा यहोवाने सांगितल्याप्रमाणे एका शेकेलला एक सेया माप चांगलं पीठ आणि एका शेकेलला दोन सेया मापं जव मिळू लागलं.+ १७  राजा ज्या अधिकाऱ्‍याच्या हाताचा आधार घेऊन उभा राहायचा, त्याला राजाने शहराच्या दरवाजावर नेमलं होतं. पण तिथे तो लोकांच्या पायांखाली तुडवला गेला आणि मेला; राजा जेव्हा खऱ्‍या देवाच्या माणसाकडे आला होता, तेव्हा खऱ्‍या देवाच्या माणसाने त्याला जसं सांगितलं होतं, अगदी तसंच घडून आलं. १८  शिवाय, खऱ्‍या देवाचा माणूस राजाला जे म्हणाला होता, तेही पूर्ण झालं. तो म्हणाला होता: “उद्या या वेळेपर्यंत शोमरोनच्या दरवाजात एका शेकेलला दोन सेया मापं जव मिळेल. आणि एका शेकेलला एक सेया माप चांगलं पीठ मिळेल.”+ १९  पण तो अधिकारी खऱ्‍या देवाच्या माणसाला म्हणाला होता: “यहोवाने आकाशाची दारं जरी उघडली, तरी हे शक्य आहे का?” त्यावर अलीशा म्हणाला होता: “तू स्वतः आपल्या डोळ्यांनी हे पाहशील, पण त्यातलं काहीही तू खाणार नाहीस.” २०  त्या अधिकाऱ्‍याच्या बाबतीत अगदी तसंच घडलं. कारण, शहराच्या दरवाजाजवळ लोकांनी त्याला पायांखाली तुडवलं आणि तो मेला.

तळटीपा

किंवा “बाजारांत.”
एक शेकेल म्हणजे ११.४ ग्रॅम. अति. ख१४ पाहा.
सुमारे ४ किलो चांगलं पीठ. अति. ख१४ पाहा.
सुमारे १० किलो. अति. ख१४ पाहा.
किंवा “मिसरच्या.”