२ राजे ८:१-२९

  • शूनेमकरीण स्त्रीला घर व शेतीवाडी परत मिळते (१-६)

  • अलीशा, बेन-हदाद आणि हजाएल (७-१५)

  • यहूदाचा राजा यहोराम (१६-२४)

  • यहूदाचा राजा अहज्या (२५-२९)

 अलीशाने ज्या स्त्रीच्या मुलाला पुन्हा जिवंत केलं होतं,+ त्या स्त्रीला तो म्हणाला: “ऊठ, आपल्या घराण्यातल्या लोकांना सोबत घे, आणि तुला शक्य असेल तिथे जाऊन विदेशी म्हणून राहा. कारण यहोवा या देशात दुष्काळ पाडणार आहे.+ आणि तो दुष्काळ सात वर्षं राहील.” २  म्हणून मग ती स्त्री निघाली आणि खऱ्‍या देवाच्या माणसाने तिला सांगितलं होतं तसं तिने केलं; आपल्या घराण्यातल्या लोकांना सोबत घेऊन ती सात वर्षं पलिष्ट्यांच्या देशात+ जाऊन राहिली. ३  मग सात वर्षं संपल्यावर, ती स्त्री पलिष्ट्यांच्या देशातून परत आली. आणि आपलं घरदार व शेतीवाडी परत मिळावी म्हणून राजाकडे फिर्याद घेऊन गेली. ४  त्या वेळी राजा खऱ्‍या देवाच्या माणसाच्या सेवकाशी, म्हणजे गेहजीशी बोलत होता. राजा त्याला म्हणाला: “अलीशाने ज्या सर्व मोठमोठ्या गोष्टी केल्या आहेत त्यांबद्दल मला सांग.”+ ५  मग अलीशाने एका मेलेल्या मुलाला कसं जिवंत केलं हे गेहजी राजाला सांगत होता;+ इतक्यात, ज्या स्त्रीच्या मुलाला जिवंत केलं होतं, ती स्त्री आपल्या घराची व शेतीची फिर्याद घेऊन राजाकडे आली.+ तिला पाहताच गेहजी म्हणाला: “हे राजा, माझ्या प्रभू! हीच ती स्त्री आहे, आणि अलीशाने ज्याला जिवंत केलं होतं तो हा तिचा मुलगा.” ६  तेव्हा राजाने त्या स्त्रीला विचारलं आणि तिने त्याला सगळी हकिगत सांगितली. मग राजाने आपल्या एका अधिकाऱ्‍याला बोलावून म्हटलं: “हिचं जे काही असेल, ते तिला परत द्या. आणि ती इथे नव्हती त्या संपूर्ण काळात, तिच्या शेतीच्या उत्पन्‍नातून तिने जितके पैसे मिळवले असते तितके पैसे तिला देऊन टाका.” ७  पुढे अलीशा दिमिष्कला+ गेला; त्या वेळी सीरियाचा राजा बेन-हदाद+ हा खूप आजारी होता. तेव्हा, “खऱ्‍या देवाचा माणूस+ इथे आलाय,” अशी खबर राजाला देण्यात आली. ८  म्हणून राजा आपला सेवक हजाएल+ याला म्हणाला: “सोबत भेटवस्तू घे आणि खऱ्‍या देवाच्या माणसाकडे जा.+ त्याला यहोवाकडे असं विचारायला सांग: ‘मी या आजारातून बरा होईन का?’” ९  तेव्हा हजाएल अलीशाला भेटायला गेला. त्याने ४० उंटांवर दिमिष्कमधल्या चांगल्यातल्या चांगल्या वस्तू लादून नेल्या. मग तो अलीशाकडे आला आणि म्हणाला: “तुमचा सेवक, सीरियाचा राजा बेन-हदाद याने मला तुमच्याकडे असं विचारायला पाठवलंय, की ‘मी या आजारातून बरा होईन का?’” १०  त्यावर अलीशा त्याला म्हणाला: “त्याला जाऊन सांग: ‘हो, तू बरा होशील.’ पण यहोवाने मला हेसुद्धा दाखवलंय की तो नक्की मरेल.”+ ११  मग अलीशा एकटक हजाएलकडे पाहत राहिला; तो त्याच्याकडे इतका वेळ पाहत राहिला, की हजाएलला अगदी अवघडल्यासारखं वाटू लागलं. त्यानंतर खऱ्‍या देवाचा माणूस रडू लागला. १२  तेव्हा हजाएलने त्याला विचारलं: “माझे प्रभू, तुम्ही का रडताय?” त्यावर अलीशा म्हणाला: “कारण तू इस्राएली लोकांवर कोणकोणते अत्याचार करणार आहेस हे मला माहीत आहे.+ तू त्यांची तटबंदीची शहरं जाळून टाकशील, त्यांच्या शूरवीरांची तलवारीने कत्तल करशील, त्यांच्या मुलाबाळांना आपटून मारशील आणि त्यांच्या गर्भवती स्त्रियांना चिरून टाकशील.”+ १३  त्यावर हजाएल म्हणाला: “तुमचा हा दास तर केवळ एक कुत्रा आहे. मग मी हे कसं करू शकतो?” पण अलीशा त्याला म्हणाला: “यहोवाने मला दाखवलंय, की तू सीरियाचा राजा बनशील.”+ १४  मग हजाएल अलीशाकडून निघाला आणि आपल्या प्रभूकडे परत आला. तेव्हा राजाने त्याला विचारलं: “अलीशाने तुला काय सांगितलं?” त्यावर तो म्हणाला: “त्याने मला सांगितलं, की तुम्ही नक्की बरे व्हाल.”+ १५  पण दुसऱ्‍या दिवशी हजाएलने एक जाड चादर घेतली, आणि ती पाण्यात बुडवून राजाच्या तोंडावर दाबून धरली.* त्यामुळे तो मेला+ आणि त्याच्या जागी हजाएल राजा बनला.+ १६  यहोशाफाट यहूदाचा राजा असतानाच त्याचा मुलगा यहोराम+ हा यहूदाचा राजा बनला; इस्राएलचा राजा अहाब याचा मुलगा यहोराम+ याच्या शासनकाळाच्या पाचव्या वर्षी हे घडलं. १७  यहोराम राजा बनला तेव्हा तो ३२ वर्षांचा होता. आणि त्याने आठ वर्षं यरुशलेममधून राज्य केलं. १८  अहाबच्या घराण्याप्रमाणेच+ तोही इस्राएलच्या राजांसारखाच वाईट वागला.+ कारण त्याने अहाबच्या मुलीशी लग्न केलं होतं;+ यहोवाच्या नजरेत जे वाईट ते तो करत राहिला.+ १९  पण आपला सेवक दावीद याच्यामुळे यहूदाचा नाश करण्याची यहोवाची इच्छा नव्हती.+ कारण, त्याने दावीदला आणि त्याच्या मुलांना वचन दिलं होतं, की तो त्यांच्या वंशाचा दिवा कायम ठेवेल.+ २०  यहोरामच्या काळात अदोमने यहूदाविरुद्ध बंड केलं+ आणि आपला स्वतःचा एक राजा नेमला.+ २१  म्हणून यहोराम आपले सगळे रथ घेऊन पलीकडे साईरमध्ये गेला. तिथे अदोमी लोकांनी येऊन त्याला आणि त्याच्या रथ-दलाच्या अधिकाऱ्‍यांना घेरलं. पण यहोरामने रात्री उठून त्यांच्यावर हल्ला केला व त्यांना हरवलं; आणि सैनिक आपल्या तंबूंकडे पळाले. २२  अदोमने यहूदाविरुद्ध केलेलं ते बंड आजपर्यंत चालू आहे. त्याच काळात लिब्नानेही+ बंड केलं. २३  यहोरामविषयीची बाकीची माहिती, म्हणजे त्याने जे काही केलं ते सर्व यहूदाच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे. २४  मग यहोरामचा मृत्यू झाला* आणि त्याला दावीदपुरात आपल्या पूर्वजांच्या कबरेत दफन करण्यात आलं.+ आणि त्याच्या जागी त्याचा मुलगा अहज्या+ हा राजा बनला. २५  इस्राएलचा राजा अहाब याच्या मुलाच्या, म्हणजे यहोरामच्या शासनकाळाच्या १२ व्या वर्षी, यहूदाचा राजा यहोराम याचा मुलगा अहज्या हा राजा बनला.+ २६  अहज्या राजा बनला त्या वेळी तो २२ वर्षांचा होता. त्याने एक वर्ष यरुशलेममधून राज्य केलं. त्याच्या आईचं नाव अथल्या+ असून ती इस्राएलचा राजा अम्री+ याची नात* होती. २७  अहज्या हा अहाबच्या घराण्यासारखाच वागला;+ अहाबच्या घराण्याप्रमाणेच तो यहोवाच्या नजरेत जे वाईट ते करत राहिला; कारण त्याचं अहाबच्या घराण्याशी नातं होतं.+ २८  तो अहाबच्या मुलासोबत, म्हणजे यहोरामसोबत सीरियाचा राजा हजाएल याच्याशी युद्ध करायला रामोथ-गिलाद+ इथे गेला. पण सीरियाच्या सैनिकांनी यहोरामला जखमी केलं.+ २९  म्हणून बरं होण्यासाठी यहोराम इज्रेलला+ परत आला; कारण, सीरियाचा राजा हजाएल याच्याशी रामा इथे युद्ध करत असताना सीरियाच्या सैनिकांनी त्याला जखमी केलं होतं.+ अहाबचा मुलगा यहोराम जखमी झाल्यामुळे* यहूदाचा राजा यहोराम याचा मुलगा अहज्या त्याला भेटायला इज्रेलला गेला.

तळटीपा

किंवा “ठेवली.”
शब्दशः “आपल्या पूर्वजांकडे जाऊन निजला.”
शब्दशः “मुलगी.”
किंवा “आजारी असल्यामुळे.”