२ राजे ९:१-३७

  • इस्राएलचा राजा म्हणून येहूचा अभिषेक (१-१३)

  • येहू यहोरामला आणि अहज्याला मारून टाकतो (१४-२९)

  • ईजबेलला मारलं जातं; कुत्री तिचं मांस खातात (३०-३७)

 अलीशा संदेष्ट्याने मग संदेष्ट्यांच्या पुत्रांपैकी* एकाला बोलावून म्हटलं: “आपला झगा कंबरेला बांध आणि ही तेलाची कुपी घेऊन लगेच रामोथ-गिलादला+ जा. २  तिथे पोहोचल्यावर निमशीचा नातू, म्हणजे यहोशाफाटचा मुलगा येहू+ याला शोध. मग त्याला त्याच्या भाऊबंदांपासून बाजूला घेऊन आतल्या खोलीत जा. ३  आणि या कुपीतलं तेल त्याच्या डोक्यावर ओतून म्हण: ‘यहोवा असं म्हणतो, की “मी तुला इस्राएलचा राजा म्हणून अभिषिक्‍त करतोय.”’+ त्यानंतर लगेच दार उघडून तिथून पळून जा.” ४  म्हणून मग संदेष्ट्याचा तो सेवक रामोथ-गिलादला जायला निघाला. ५  तो तिथे पोहोचला तेव्हा त्याला सेनाधिकारी बसलेले दिसले. तो म्हणाला: “हे सेनाधिकारी! तुझ्यासाठी एक निरोप आहे.” त्यावर येहूने विचारलं: “आमच्यापैकी कोणासाठी?” तेव्हा तो म्हणाला: “हे सेनाधिकारी! तुझ्यासाठी.” ६  म्हणून येहू उठला आणि घरात गेला. त्या सेवकाने मग त्याच्या डोक्यावर तेल ओतलं आणि तो म्हणाला: “इस्राएलचा देव यहोवा असं म्हणतो: ‘मी यहोवा तुला माझ्या लोकांवर, इस्राएलवर राजा म्हणून अभिषिक्‍त करतोय.+ ७  तू तुझ्या प्रभूच्या, अहाबच्या घराण्याचा नाश कर; ईजबेलने माझ्या संदेष्ट्यांचा आणि यहोवाच्या इतर सर्व सेवकांचा खून केलाय,+ त्याचा बदला मला घ्यायचाय. ८  अहाबच्या संपूर्ण घराण्याचा नाश होईल; त्याच्या घराण्यातला प्रत्येक पुरुष व मुलगा, मग तो लाचार असो किंवा दुर्बळ, त्याचा मी इस्राएलमधून समूळ नाश करीन.+ ९  नबाटचा मुलगा यराबाम आणि अहीयाचा मुलगा बाशा यांच्या घराण्यांसारखीच+ मी अहाबच्या घराण्याचीही दशा करीन.+ १०  ईजबेलच्या बाबतीत म्हणशील, तर तिला इज्रेलच्याच जमिनीवर कुत्री खाऊन टाकतील,+ आणि कोणीही तिला दफन करणार नाही.’” मग तो सेवक दार उघडून तिथून पळून गेला.+ ११  येहू सेनाधिकाऱ्‍यांकडे परत आला, तेव्हा त्यांनी त्याला विचारलं: “सगळं काही ठीक आहे ना? तो वेडा माणूस तुझ्याकडे कशाला आला होता?” त्यावर तो म्हणाला: “तो माणूस आणि त्याचं बोलणं तर तुम्हाला माहीतच आहे.” १२  पण ते त्याला म्हणाले: “तू खोटं बोलतोस! तो काय बोलला ते आम्हाला सांग.” त्यावर येहू म्हणाला: “त्याने मला असं-असं सांगितलं. मग तो म्हणाला, की ‘इस्राएलचा देव यहोवा म्हणतो: “मी तुला इस्राएलवर राजा म्हणून अभिषिक्‍त करतोय.”’”+ १३  तेव्हा त्यांनी लगेच आपापले कपडे घेऊन पायऱ्‍यांवर त्याच्या पायांखाली पसरवले,+ आणि शिंग फुंकून ते म्हणाले: “येहू राजा बनलाय!”+ १४  मग निमशीचा नातू, म्हणजे यहोशाफाटचा मुलगा येहू+ याने यहोरामविरुद्ध कट रचला. त्या वेळी यहोराम आणि इस्राएलचं सैन्य रामोथ-गिलादमध्ये+ होतं. ते तिथे सीरियाचा राजा हजाएल+ याच्या हल्ल्यांपासून इस्राएलचं संरक्षण करत होते. १५  नंतर यहोराम राजा हा इज्रेलला+ परत आला; सीरियाचा राजा हजाएल याच्याशी लढाई करत असताना सीरियाच्या सैनिकांनी त्याला जखमी केलं होतं, म्हणून बरं होण्यासाठी तो इज्रेलला परत आला.+ येहू मग सेनाधिकाऱ्‍यांना म्हणाला: “तुम्ही जर माझ्या बाजूने असाल, तर शहरातून एकाही माणसाला इज्रेलमध्ये खबर द्यायला जाऊ देऊ नका.” १६  नंतर तो आपल्या रथातून इज्रेलला जायला निघाला. कारण यहोराम जखमी झाल्यामुळे तिथे पडून होता, आणि यहूदाचा राजा अहज्या त्याला भेटायला गेला होता. १७  इज्रेलच्या बुरुजावर जो पहारेकरी उभा होता, त्याला येहूच्या माणसांचा एक मोठा जमाव येताना दिसला. तो लगेच म्हणाला: “मला माणसांचा एक मोठा जमाव दिसतोय.” तेव्हा यहोराम म्हणाला: “एका घोडेस्वाराला त्यांच्याकडे पाठवा आणि असं विचारायला सांगा, की ‘तुम्ही शांतीच्या उद्देशानेच येताय ना?’” १८  म्हणून एक घोडेस्वार त्याला भेटायला गेला आणि म्हणाला: “राजा विचारतोय, की ‘तुम्ही शांतीच्या उद्देशानेच येताय ना?’” पण येहू त्याला म्हणाला: “मी ‘शांतीने’ येतोय की नाही याच्याशी तुला काय घेणं-देणं? मागे हो आणि माझ्याबरोबर चल!” पहारेकऱ्‍याने मग कळवलं: “निरोप घेऊन जाणारा दूत तिथे पोहोचला खरा, पण तो काही परत आला नाही.” १९  मग त्याने दुसऱ्‍या एका घोडेस्वाराला पाठवलं. तो त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला: “राजा विचारतोय, की ‘तुम्ही शांतीच्या उद्देशानेच येताय ना?’” पण येहू त्याला म्हणाला: “मी ‘शांतीने’ येतोय की नाही याच्याशी तुला काय घेणं-देणं? मागे हो आणि माझ्याबरोबर चल!” २०  तेव्हा पहारेकऱ्‍याने कळवलं: “तो दूत त्यांच्यापर्यंत पोहोचला खरा, पण परत आला नाही. आणि त्यांच्या प्रमुखाचं रथ चालवणं हे निमशीच्या नातवासारखं, येहूसारखंच आहे. कारण तो वेड्यासारखा भरधाव वेगाने रथं चालवतोय.” २१  त्यावर यहोराम म्हणाला: “रथ तयार करा!” तेव्हा त्याचा युद्धाचा रथ तयार करण्यात आला. मग इस्राएलचा राजा यहोराम आणि यहूदाचा राजा अहज्या+ हे दोघंही आपापल्या रथात स्वार होऊन येहूला भेटायला निघाले. आणि इज्रेलकर नाबोथच्या मळ्यात+ त्यांची त्याच्याशी गाठ पडली. २२  येहूला पाहताच यहोराम म्हणाला: “तुझं येणं शांतीचं आहे ना येहू?” पण तो त्याला म्हणाला: “जोपर्यंत तुझी आई ईजबेल+ हिची वेश्‍येची आणि भूतविद्येची कामं+ चालू आहेत, तोपर्यंत शांती कशी असणार?” २३  हे ऐकताच यहोरामने तिथून पळून जाण्यासाठी आपला रथ वळवला, आणि तो अहज्याला म्हणाला: “अहज्या! आपल्याला फसवलं गेलंय!” २४  तेव्हा येहूने धनुष्य घेऊन यहोरामला असा बाण मारला, की तो त्याच्या पाठीत घुसून हृदयातून आरपार निघाला; आणि तो आपल्या रथातच कोसळून पडला. २५  मग आपल्यासोबत असलेला योद्धा बिदकर याला येहू म्हणाला: “त्याला उचल आणि इज्रेलकर नाबोथच्या मळ्यात फेकून दे.+ तुला आठवतं! आपण त्याचा बाप अहाब याच्यामागे रथातून चाललो होतो, तेव्हा यहोवाने स्वतः त्याच्याबद्दल असा न्यायाचा संदेश सांगितला होता:+ २६  ‘यहोवा म्हणतो, की “मी काल नाबोथचं आणि त्याच्या मुलांचं रक्‍त सांडलेलं पाहिलं.+ म्हणून आता ‘याच जमिनीवर मी तुझा बदला घेईन,’ असं यहोवा म्हणतो.”’+ तर आता यहोवाने सांगितलं होतं तसं याला उचलून मळ्यात फेकून दे.”+ २७  हे सगळं यहूदाच्या राजाने, अहज्याने+ पाहिलं तेव्हा तो बागेतल्या घराच्या रस्त्याने पळून गेला. (नंतर येहूने त्याचा पाठलाग केला आणि तो म्हणाला: “यालाही मारून टाका!” म्हणून मग त्यांनी त्याच्यावर वार केला; त्या वेळी अहज्या आपल्या रथातून इब्लामजवळ+ असलेल्या गुर या ठिकाणी पळून चालला होता. पण वार होऊनही अहज्या तसाच पुढे मगिद्दोला पळाला आणि तिथे जाऊन मेला. २८  मग त्याच्या सेवकांनी त्याला रथात टाकून यरुशलेमला नेलं आणि दावीदपुरात+ त्याच्या पूर्वजांच्या कबरेत दफन केलं. २९  अहाबचा मुलगा यहोराम याच्या शासनकाळाच्या ११ व्या वर्षी अहज्या+ यहूदाचा राजा बनला होता.) ३०  येहू इज्रेलमध्ये+ आला आहे, हे ईजबेलने+ ऐकलं. तेव्हा ती डोळ्यांत सुरमा घालून* आणि केस वगैरे करून खिडकीतून बाहेर बघू लागली. ३१  येहू फाटकातून आत आला, तेव्हा ती त्याला म्हणाली: “आपल्या प्रभूचा खून करणाऱ्‍या जिम्रीचं काय झालं हे तुला माहीत आहे ना?”+ ३२  तेव्हा येहूने वर खिडकीकडे पाहिलं आणि तो म्हणाला: “माझ्या बाजूने कोण आहे? आहे कोणी?”+ तेवढ्यात राजमहालातल्या दोघा-तिघा अधिकाऱ्‍यांनी खाली डोकावून त्याच्याकडे पाहिलं. ३३  मग तो म्हणाला: “तिला खाली फेका!” म्हणून त्यांनी तिला खाली फेकून दिलं. तेव्हा तिच्या रक्‍ताचे शिंतोडे भिंतीवर व घोड्यांवर उडाले; आणि त्याने तिला आपल्या घोड्यांच्या पायांखाली तुडवलं. ३४  त्यानंतर येहूने आत जाऊन खाणंपिणं केलं. मग तो म्हणाला: “जा, त्या शापित बाईला दफन करा; शेवटी ती राजाची मुलगी आहे.”+ ३५  पण जेव्हा ते तिला दफन करायला गेले, तेव्हा त्यांना तिची कवटी, पाय आणि हातांचे तळवे यांशिवाय काहीच दिसलं नाही.+ ३६  मग त्यांनी परत येऊन येहूला ही गोष्ट सांगितली. त्यावर तो म्हणाला: “यहोवाने आपला सेवक एलीया तिश्‍बी याच्याद्वारे जसं सांगितलं होतं तसंच घडलं.+ तो म्हणाला होता: ‘इज्रेलच्याच जमिनीवर कुत्री ईजबेलचं मांस खाऊन टाकतील.+ ३७  आणि ईजबेलचा मृतदेह इज्रेलच्या जमिनीवर शेतासाठी खत बनेल; म्हणजे ही ईजबेल आहे हे कोणीही ओळखू शकणार नाही.’”

तळटीपा

“संदेष्ट्यांचे पुत्र” हा वाक्यांश संदेष्ट्यांच्या समूहाला किंवा प्रशिक्षण मिळणाऱ्‍या संदेष्ट्यांच्या गटाला सूचित करत असावा.
किंवा “डोळे रंगवून.”