२ शमुवेल १०:१-१९
-
अम्मोन आणि सीरियावर मिळवलेले विजय (१-१९)
१० पुढे अम्मोनी+ लोकांच्या राजाचा मृत्यू झाला. आणि त्याच्या जागी त्याचा मुलगा हानून+ हा राजा बनला.
२ तेव्हा दावीद म्हणाला: “नाहाशचा मुलगा हानून याच्यावर मी दया* करीन. कारण त्याच्या वडिलांनीसुद्धा माझ्यावर दया केली होती.”* हानूनने आपल्या वडिलांना मृत्यूमध्ये गमावलं होतं, म्हणून दावीदने त्याचं सांत्वन करण्यासाठी आपले काही सेवक त्याच्याकडे पाठवले. पण दावीदचे सेवक जेव्हा अम्मोनी लोकांच्या देशात आले,
३ तेव्हा अम्मोनी लोकांचे अधिकारी आपल्या प्रभूला, हानूनला म्हणाले: “तुम्हाला काय वाटतं, दावीदने खरंच तुमच्या वडिलांचा सन्मान करण्यासाठी आणि तुमचं सांत्वन करण्यासाठी आपली माणसं पाठवली आहेत काय? नाही! खरंतर शहर उलथून टाकावं, म्हणून हेरगिरी करायला आणि शहराची पाहणी करायला दावीदने त्याच्या सेवकांना तुमच्याकडे पाठवलंय.”
४ त्यामुळे मग हानूनने दावीदच्या सेवकांना पकडून त्यांच्या अर्ध्या दाढ्या कापल्या.+ तसंच, त्यांच्या झग्यांचा कमरेखालचा भाग कापून टाकला आणि त्यांना पाठवून दिलं.
५ दावीदने हे ऐकलं, तेव्हा त्याने लगेच त्या सेवकांना भेटायला काही माणसं पाठवली. कारण त्या सेवकांचा घोर अपमान झाला होता. राजाने आपल्या माणसांच्या हातून त्यांना असा निरोप पाठवला: “तुमच्या दाढ्या वाढत नाहीत तोपर्यंत यरीहोतच+ राहा आणि मग परत या.”
६ काही काळाने अम्मोनी लोकांना समजलं, की दावीद आपला तिरस्कार करू लागला आहे. म्हणून त्यांनी इतर देशांत आपली माणसं पाठवली आणि भाडोत्री सैनिक गोळा केले: बेथ-रहोब+ आणि सोबा+ इथे राहणारे सीरियाचे २०,००० पायदळ सैनिक; माका+ राजा व त्याचे १,००० सैनिक आणि इशतोबचे* १२,००० सैनिक त्यांनी मागवले.+
७ ही गोष्ट दावीदच्या कानावर आली, तेव्हा त्याने यवाबला आणि आपल्या संपूर्ण सैन्याला, तसंच आपल्या सगळ्यात शूर योद्ध्यांना लढाईला पाठवलं.+
८ मग अम्मोनी लोक बाहेर पडले आणि सैन्यदलाप्रमाणे शहराच्या दरवाजासमोर तैनात झाले. आणि सोबा व रहोब इथले सीरियाचे सैनिक, तसंच इशतोब* व माकाचे सैनिक दुसरीकडे खुल्या मैदानात उतरले.
९ शत्रूच्या सैन्याने आपल्याला मागून-पुढून घेरलं आहे हे यवाबने पाहिलं, तेव्हा त्याने इस्राएली सैनिकांच्या सगळ्यात चांगल्या तुकड्या निवडल्या आणि सीरियाच्या सैनिकांचा सामना करण्यासाठी त्यांना सैन्यदलाप्रमाणे तैनात केलं;+
१० तर अम्मोनी+ लोकांचा सामना करण्यासाठी बाकीच्या सैनिकांना सैन्यदलाप्रमाणे तैनात करता यावं, म्हणून त्याने त्यांना आपला भाऊ अबीशय+ याच्या हाताखाली दिलं.
११ मग तो म्हणाला: “सीरियाचे लोक जर माझ्यावर प्रबळ झाले, तर तू मला मदत करायला ये. आणि जर अम्मोनी लोक तुझ्यावर प्रबळ झाले, तर मी तुझ्या मदतीला येईन.
१२ आपल्या लोकांसाठी आणि आपल्या देवाच्या शहरांसाठी आपण हिंमत धरून धैर्याने लढूयात;+ आणि यहोवाला जसं योग्य वाटेल तसं तो करेल.”+
१३ मग, यवाब आणि त्याची माणसं जेव्हा सीरियाच्या लोकांचा सामना करण्यासाठी पुढे गेली, तेव्हा त्यांनी त्यांच्यापासून पळ काढला.+
१४ सीरियाचे लोक पळून गेल्याचं पाहून अम्मोनी लोकांनीही अबीशयपुढून पळ काढला आणि ते आपल्या शहरात गेले. त्यानंतर यवाब अम्मोनी लोकांना सोडून यरुशलेममध्ये परत आला.
१५ इस्राएलपुढे आपण हरलो हे पाहून, सीरियाचे लोक पुन्हा एकदा एकत्र जमले.+
१६ हदद-एजरने+ आपली माणसं पाठवून नदीजवळच्या*+ प्रदेशातल्या सीरियाच्या माणसांना बोलावलं. आणि हदद-एजरचा सेनापती शोबख याच्या नेतृत्वाखाली ते हेलाम या ठिकाणी आले.
१७ दावीदला ही खबर मिळताच, त्याने लगेच सर्व इस्राएलला जमा केलं आणि यार्देन पार करून तो हेलाम इथे गेला. तिथे सीरियाचे लोक दावीदचा सामना करण्यासाठी सैन्यदलाप्रमाणे तैनात झाले आणि त्यांनी त्याच्याशी युद्ध केलं.+
१८ पण सीरियाच्या लोकांनी इस्राएलपुढून पळ काढला; दावीदने रथांवर स्वार असलेल्या सीरियाच्या ७०० माणसांना आणि ४०,००० घोडेस्वारांना मारून टाकलं. तसंच, त्याने त्यांचा सेनापती शोबख याच्यावर वार केला आणि तो तिथेच मेला.+
१९ इस्राएलने आपल्याला हरवून टाकलं आहे, हे हदद-एजरच्या अधीन असलेल्या सर्व राजांनी पाहिलं, तेव्हा त्यांनी लगेच इस्राएलसोबत शांतीचा करार केला आणि ते इस्राएलच्या अधीन झाले;+ त्यानंतर सीरियाच्या लोकांनी अम्मोनी लोकांना मदत करायची धास्ती घेतली.
तळटीपा
^ किंवा “एकनिष्ठ प्रेम.”
^ किंवा “एकनिष्ठ प्रेम केलं होतं.”
^ किंवा “तोबच्या माणसांमधून.”
^ किंवा “तोब.”
^ म्हणजे, फरात नदी.